रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग

Article also available in :

 

१. धागे

‘रुईच्या झाडाच्या सालीचे तंतू काढून त्याचे दोर बनवतात. झाडे कापून आणून त्यांना १ – २ वेळा ऊन द्यावे. असे केल्याने त्यांच्यावरील हिरवी साल सहज सोलून काढता येते. ती साल ठेचून स्वच्छ धुवावी. असे केल्याने ती पांढरी होते. नंतर तिचे बारीक बारीक धागे मोकळे करावेत. हेच याचे सूत. या सुताचे दोर पाण्यात लवकर कुजत नाहीत. त्यामुळे मासे धरण्याच्या गळासाठी हे सूत वापरतात.

 

२. कागद

रुईच्या सालीच्या आतील भागाचा कागद बनवण्यासाठी उपयोग करतात.

 

३. कापूस

रुईच्या झाडाला येणार्‍या बोंडांतून रेशमासारखा मऊ कापूस निघतो. ‘रुईचा कापूस सावरीच्या (एक प्रकारचे झाड) कापसापेक्षाही थंड असतो’, असे म्हणतात.

 

४. रंग

रुईच्या झाडाच्या चिकाचा कातडे रंगवण्यासाठी उपयोग करतात.

 

५. गोंद

रुईचा चीक उकळून घट्ट केल्यास गोंदाप्रमाणे एक चिकट पदार्थ बनतो. या चिकाचा रबर बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

 

६. आतषबाजीची दारू

रुईच्या झाडाच्या लाकडाचा कोळसा हलका असल्यामुळे आतषबाजीची दारू बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

 

७. खत

रुईच्या झाडाचे आणि पानांचे खत वाळवीचा नाश करणारे आहे.

 

८. काही औषधी उपयोग

अ. वेदना : रुईच्या पानाला तेल, तूप किंवा एरंडेल लावून (दुखर्‍या भागावर) शेक द्यावा.

आ. कान ठणकणे : रुईच्या पानाचा १ थेंब रस कानात घालावा.’

(संदर्भ : व्यवहारोपयोगी वनस्पतीवर्णन (भाग १), लेखक – गणेश रंगनाथ दिघे, वर्ष १९१३)

Leave a Comment