तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता

Article also available in :

तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.

 

१. तुळशीचे पूजन घरोघरी होत असणे

गावांमध्ये घरोघरी मातीच्या ओट्यावर तुळशीचे रोप लावून स्त्रिया प्रतिदिन पूजा करतात, अर्घ्य देतात आणि सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावतात. ‘आम्हाला सुख-समृद्धी, दीर्घायुष्य, सौभाग्य, भगवद्प्रीती प्रदान कर’, अशी तुळशीला प्रार्थना करतात. काही विशेष प्रसंगी तुळशीची पूजा आणि अनुष्ठान इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात, तसेच तुळशीची पाने प्रसाद म्हणून वाटली जातात अन् अन्य पूजनाच्या वेळी तीर्थामध्ये तर ती निश्चितपणे घातली जातात.’

 

२. तुळशीपूजनाचे महत्त्व आणि तुळशीमुळे होणारे आरोग्यदायी लाभ

तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते ।
तद्गृहं नोपसर्पन्ति कदाचिद्यमकिङ्कराः ।।

– स्कन्दपुराण, खण्ड ४, अध्याय २१, श्लोक ६६

अर्थ : ज्याच्या घरी तुळशीची प्रतिदिन पूजा होते, त्या घरी यमदूत कधीही येऊ शकत नाहीत असे म्हणतात.

२ अ. जेथे तुळशीची पुरेशी रोपे असतात, तेथील हवा २४ घंटे शुद्ध रहाते. अशा घरातील लोक निरोगी रहातात. त्यांना दीर्घायुष्य लाभते.

२ आ. संतांनी सांगितले आहे, ‘‘तुळस निर्दाेष आहे. प्रत्येक घरी तुळशीची एक-दोन रोपे असलीच पाहिजेत. सकाळी तुळशीचे दर्शन करा. तुळशीजवळ बसून दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, तर आरोग्य चांगले राहील, तसेच दमा होण्याची शक्यता अल्प होईल. तुळशीला स्पर्श करणारी हवा श्वासावाटे शरिरात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.’’

२ इ. सीतामाता आणि लक्ष्मण यांनीही त्यांच्या पर्णकुटीजवळ तुळस लावली होती. तत्त्वदर्शी ऋषी-महर्षी यांनी तुळशीतील सर्व गुण पारखून तिच्यातील देवत्व आणि मातृत्व यांचे मानवाला दर्शन घडवले; म्हणून देवत्व अन् मातृत्व यांचे प्रतीक मानून तुळशीचे रोप लावणे, तसेच तिची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे.

२ ई. संत म्हणतात, ‘‘तुळशीची पाने त्रिदोषनाशक आहेत. त्यामुळे कोणताही दुष्प्रभाव होत नाही. प्रतिदिन तुळशीची ५ ते ७ पाने खाऊ शकता. तुळस हृदय आणि मेंदू यांसाठी पुष्कळ लाभदायी आहे. ईश्वराकडून मिळालेली ती आरोग्य संजीवनी आहे.’’

२ उ. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर तुळशीची पाने खाणे आरोग्यासाठी हितकर आहे. वात आणि कफ शमनासाठी तुळस औषधाचे काम करते. उभ्या-उभ्या किंवा चालता-चालताही तुळशीची पाने खाऊ शकता; परंतु इतर कोणताही पदार्थ अशा प्रकारे खाणे शास्त्रविहित नाही.

२ ऊ. दुधासह तुळशीपत्र वर्जित आहे; परंतु पाणी, दही, भोजन इत्यादी प्रत्येक पदार्थासमवेत तुळशीपत्र घेऊ शकता. रविवारी तुळस उष्णता वाढवते; म्हणून त्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये आणि सेवनही करू नये.

२ ए. वैज्ञानिक संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, तुळशीत विद्द्युत् तत्वाची निर्मिती करण्याचे आणि शरिरात ते तत्त्व टिकवून ठेवण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. तुळशीच्या थोड्या रसाने तेलासारखे मालीश केल्यास विद्द्युत् प्रवाह उत्तम रितीने चालेल.

 

३. तुळशीचे माहात्म्य

३ अ. ‘ब्रह्मवैवर्त पुराण’ (प्रकृती खंड : २१.३४) मध्ये भगवान नारायण म्हणतात, ‘‘हे वरानने (सुमुखी) ! त्रैलोक्यात देवपूजेच्या उपयोगात येणार्‍या सर्व पानाफुलांमध्ये तुळस मुख्य मानली जाईल.’’

३ आ. ‘श्रीमद्देवीभागवत’ (९.२५.४२-४३) मध्ये सांगितले आहे, ‘फुलांमध्ये कुणाशीही जिची तुलना होऊ शकत नाही, जिचे महत्त्व वेदांमध्येही वर्णिलेले आहे, जी सर्व अवस्थांमध्ये सदैव पवित्र रहाते, जी ‘तुळशी’ नावाने प्रसिद्ध आहे, जी भगवंतासाठी शिरोधार्य आहे, जी सर्वांची आवडती आहे, तसेच जी संपूर्ण जगाला पवित्र करणारी आहे, त्या जीवन्मुक्त, मुक्तीदायिनी आणि श्रीहरिंची भक्ती प्रदान करणार्‍या भगवती तुळशीची मी उपासना करतो.’

३ इ. तुळशीच्या मातीचा टिळा लावल्याने तेजस्विता वाढते.

 

४. तुळशीची वाढ आणि तिच्या संरक्षणासाठी उपाय

४ अ. तुळशीची पाने तोडतांना तिच्या मंजुळा आणि आजूबाजूची पाने तोडली, तर रोपाची वाढ चांगली होईल.

४ आ. जर तुळशीच्या पानांवर छिद्रे दिसत असतील, तर गायीच्या शेणाच्या गोवरीची राख कीटकनाशकाच्या रूपात वापरली पाहिजे.’

साभार : मासिक ‘ऋषि प्रसाद’, डिसेंबर २०१६

Leave a Comment