भावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा !

Article also available in :

‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते. यासाठी या वनस्पती आताच तातडीने लावण्याची आवश्यकता आहे.’

टीप – ही सूचना घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करण्यासंदर्भात आहे. शेतजमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्यासंदर्भातील लिखाण लवकरच प्रसिद्ध केले जाईल.

 

१. या दिवसांत लावता येण्याजोग्या औषधी वनस्पतींची आताच लागवड करा !

बहुतेक वनस्पतींची लागवड पावसाळ्याच्या आरंभी करणे उत्तम मानले जाते; परंतु संकटकाळ जवळ येऊन ठेपल्याने तेवढा वेळ थांबणे परवडणारे नाही. साधारणपणे वनस्पतीच्या लागवडीसाठी वनस्पतीचे बी, फांदीचा तुकडा, मुळातून येणारा फुटवा (नवीन रोप), कंद, रोपवाटिकेत तयार केलेली रोपे यांचा वापर केला जातो. हिवाळ्यात थंडीमुळे बियांना अंकुर फुटण्याचे, तसेच खोडाच्या छाटांना मुळे येण्याचे प्रमाण न्यून असते. कंदही सुप्तावस्थेत असतात. यामुळे जास्त थंडी असल्यास बी, खोडाचे छाट, कंद यांपासून लागवड न करता ज्या वनस्पतींची तयार रोपे मिळतील, त्यांची लागवड करावी. जास्त थंडी नसल्यास किंवा थंडीचा जोर न्यून झाल्यावर अन्य पद्धतीनेही लागवड करू शकतो. त्याचे नियोजनही आताच करून ठेवावे.

 

२. स्थानिक स्तरावर रोपे मिळवून त्वरित लागवड करा !

पुढे ‘घरगुती औषधांसाठी प्राधान्याने लावण्याजोग्या औषधी वनस्पतींची सूची’ दिली आहे. काही साधकांकडे या सूचीतील रोपे किंवा त्या वनस्पतींचे मातृवृक्ष (ज्या झाडापासून नवीन झाडे निर्माण करता येऊ शकतील, अशी परिपक्व झाडे) आधीपासून लावलेले असू शकतात, उदा. कोरफड, अडूळसा, निर्गुंडी, देशी शेवगा, पारिजात. काही रोपे कृषी खाते किंवा कृषीविद्यापीठ यांच्या रोपवाटिकांमध्ये किंवा खासगी रोपवाटिकांमध्ये मिळू शकतात, उदा. चांगल्या प्रतीचा मोठा आवळा, कागदी लिंबू. काही औषधी वनस्पतींची रोपे स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालये, वनखाते यांच्या रोपवाटिकांमध्ये मिळू शकतात. या वनस्पतींची रोपे स्थानिक स्तरावर वाजवी दरात मिळत असल्यास साधकांनी ती उपलब्ध करून घेऊन त्यांची त्वरित लागवड करावी. रोपे कुठे मिळतील, याची चौकशी करण्यात प्रत्येकाचा वेळ जाऊ नये, यासाठी केंद्रातील साधकांनी एकत्रितपणे नियोजन करावे किंवा एका साधकाने रोपांविषयीच्या चौकशीचे दायित्व घेऊन समयमर्यादेमध्ये चौकशी करून स्थानिक साधकांना रोपांच्या उपलब्धतेची माहिती द्यावी.

‘रोपे कशी लावावीत’, हे ठाऊक नसल्यास स्थानिक जाणकाराकडून शिकून घेऊन रोपांची लागवड करावी. रोपे कशी लावावीत, याची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध होणारा सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’ यात दिली आहे.

 

३. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची रोपे किंवा मातृवृक्ष उपलब्ध असल्यास कळवा !

काही ठिकाणी काही औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, उदा. कोकणात आघाडा फार मोठ्या प्रमाणात तण स्वरूपात आढळतो. लागवडीसाठी आघाड्याचे बी गोळा करता येऊ शकते. काही शेतांच्या कुंपणाला निर्गुंडी, अडूळसा ही झाडे मोठ्या प्रमाणात लावलेली असतात. या झाडांच्या खोडांचे छाट लागवडीसाठी उपलब्ध करून देता येऊ शकतात. हिरडा, बेहडा, अर्जुन या झाडांखाली त्यांची पुष्कळ फळे पडलेली आढळतात. त्यांचा लागवडीसाठी उपयोग करता येतो. पानवेलींचे मळे असतात. या वेलींच्या खोडांच्या छाटांपासून रोपे बनवता येतात. कोकणात पावसानंतर काही दिवस शतावरीच्या वेली दिसतात. एखाद्याच्या जागेत असे शतावरीचे वेल मोठ्या प्रमाणात असू शकतात.

आपल्याला भारतभर औषधी वनस्पतींची लागवड करायची आहे. ज्यांच्याकडे या वनस्पती नसतील, त्यांना त्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती करावी लागेल. यासाठी ज्या साधकांकडे पुढे दिलेल्या औषधी वनस्पतींची रोपे किंवा मातृवृक्ष मोठ्या प्रमाणात विनामूल्य उपलब्ध होऊ शकतील त्यांनी त्यांची माहिती केंद्रातील उत्तरदायी साधकांनी जिल्हासेवकाकडे द्यावी. सर्व जिल्ह्यांना ही माहिती घेण्याची ‘गूगलशीट’ १३.११.२०१७ पर्यंत शेअर करण्यात येईल. त्यामध्ये दिलेल्या रकान्यानुसार जिल्हासेवकांनी मातृवृक्षांची माहिती घ्यावी.

 

४. रोपे न मिळाल्यास त्यांची मागणी द्या !

स्थानिक स्तरावर रोपे उपलब्ध होऊ शकत नसल्यास किंवा रोपांची किंमत फार जास्त असल्यास साधकांनी स्वतःला आवश्यक त्या रोपांची मागणी जिल्हासेवकाकडे द्यावी. सर्व जिल्ह्यांना औषधी वनस्पतींची मागणी घेण्याची ‘गूगलशीट’ शेअर करण्यात येईल. त्यामध्ये दिलेल्या रकान्यानुसार जिल्हासेवकांनी रोपांची मागणी घ्यावी.

४ अ. मागणी अभ्यासपूर्ण करा !

साधकांनी मागणी देतांना पुढील सूत्रांचा नीट अभ्यास करून मागणी द्यावी.

४ अ १. घरात किंवा घराभोवती असलेली सूर्यप्रकाशाची उपलब्धता

वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी वनस्पतीला दिवसभरात किमान ३ घंटे चांगला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. एखाद्याला आगाशीत (गॅलरीत) लागवड करायची असल्यास तेथे तेवढा सूर्यप्रकाश येतो का, याचा अभ्यास करावा.

४ अ २. वनस्पतींची नैसर्गिक उपलब्धता

काही औषधी वनस्पती घराजवळ निसर्गतःच उपलब्ध असू शकतात. (उदा. अडूळसा, कडूनिंब, आघाडा) किंवा त्या आधीपासून लावलेल्या असू शकतात. अशा वनस्पतींची मागणी करू नये. ज्यांच्या घराजवळ अशा वनस्पतीची आहेत, त्यांनी त्यांची पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता नाही. स्थानिक स्तरावर ज्या वनस्पती विनामूल्य उपलब्ध होऊ शकतात, त्यांचीही मागणी करू नये.

४ अ ३. वनस्पतीचा आकार आणि जागेची उपलब्धता

पुढे दिलेल्या औषधी वनस्पतींच्या सूचीत वनस्पतींचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण केले आहे. स्वतःकडे उपलब्ध जागेमध्ये कोणत्या आकाराच्या किती वनस्पती मावू शकतील, याचा अभ्यास करून मागणी द्यावी. सदनिकेच्या (फ्लॅटच्या) किंवा घराच्या आगाशीत झाडे लावायची असतील, तर प्राधान्याने सूचीतील सूत्र ‘अ’ आणि ‘आ’ यांतील झाडे निवडावीत. एका साधकाकडे पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर जवळजवळ रहाणारे २ – ३ साधक मिळून वेगवेगळ्या औषधी वनस्पती निवडू शकतात.

४ अ ४. विकारांनुसार आवश्यकता

घरातील व्यक्तींना आता असलेले किंवा पुढे होऊ शकणारे संभाव्य विकार लक्षात घेऊन त्यानुसार वनस्पतींची निवड करावी.

 

५. समयमर्यादा ठेवून लागवड करा आणि केलेल्या लागवडीचा आढावा द्या !

साधकांनी ज्या वनस्पती आता लावता येतील, त्यांची लागवड १ मास समयमर्यादा ठेवून पूर्ण करावी. पावसाळ्याच्या आरंभी करण्याच्या लागवडीचेही आताच नियोजन करून ठेवावे. लागवड केल्यावर या सेवेचा आढावा जिल्हासेवकाला द्यावा. सर्व जिल्ह्यांना या आढाव्यासंदर्भात ‘गूगलशीट’ शेअर करण्यात येईल. त्यामध्ये दिलेल्या रकान्यानुसार जिल्हासेवकांनी आढावा भरावा. जिल्हासेवकांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये ही सेवा साधकांकडून करवून घ्यावी.

 

६. घरगुती औषधांसाठी प्राधान्याने लावण्याजोग्या औषधी वनस्पतींची सूची

पुढीलपैकी बहुतेक औषधी वनस्पती भारतात सर्वत्र आढळतात. या वनस्पती दैनंदिन जीवनातील बहुतेक विकारांमध्ये उपयोगी पडणार्‍या आहेत. या वनस्पती केवळ औषधातच नव्हेत, तर अन्य कारणांसाठीही उपयोगी पडतात. पुढे यांचे संक्षिप्त उपयोग दिले आहेत. स्वतःकडील जागेच्या उपलब्धतेनुसार यांतील शक्य तेवढ्या वनस्पतींची लागवड करावी. सनातनचे ग्रंथ ‘वनस्पतींचे औषधी गुणधर्म (भाग १ आणि भाग २)’ यांत या वनस्पतींचे सविस्तर उपयोग दिले आहेत.

अ. कुंड्यांत लावता येतील अशा लहान वनस्पती (या वनस्पती आगाशीतही (गॅलरीतही) ठेवता येतात.)

अनु क्र वनस्पतीचे मराठी नाव कोणत्या विकारात उपयुक्त ? अन्य उपयोग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. तुळस (पांढरी किंवा काळी सर्दी, खोकला, ताप, दमा, व्रण (जखम) आणि जंत होणे नित्य पूजा बी
२. दूर्वा * उष्णतेचे विकार, रक्तस्राव आणि गर्भपात होणे ’’ मुळाचे तुकडे
३. कोरफड (पांढरे ठिपके नसलेली किंवा ठिपके असलेली कफाचा खोकला आणि भाजणे-पोळणे चेहर्‍याचे सौंदर्य वाढवणे नवीन रोप (फुटवा)
४. कालमेघ (किराईत) * ताप, बद्धकोष्ठता आणि जंत होणे बी
५. पुनर्नवा * मूतखडा, लघवीचे विकार आणि सूज येणे पालेभाजी फांदीचा तुकडा
६. मंडूकपर्णी (ब्राह्मी) * झोप न लागणे, उच्च रक्तदाब आणि मेंदूचे विकार सरबत ’’
७. वाळा (खस) उष्णतेचे विकार पिण्याच्या पाण्याला सुगंध आणणे नवीन रोप (फुटवा)
८. देशी झेंडू व्रण (जखम) डास दूर पळवण्यास उपयुक्त आणि फूलझाड बी
९. हळद व्रण (जखम) आणि लठ्ठपणा स्वयंपाक कंद
१०. आंबेहळद मुका मार लागणे आणि सूज येणे ’’
११. गवती चहा सर्दी, खोकला, ताप आणि लघवीचे विकार चहाचा पर्याय नवीन रोप (फुटवा
१२. माका पोटाचे विकार, केस गळणे आणि केस पांढरे होणे श्राद्धविधी बी
१३. आघाडा * दातांचे विकार श्री गणपति, श्री अनंत आदी देवतांच्या पत्रपूजेसाठी आणि दिवाळीतील अभ्यंग स्नानापूर्वी पापनिवारणासाठी बी
१४. पान ओवा भूक न लागणे आणि जंत होणे भजी फांदीचा तुकडा
१५. वेखंड बेशुद्ध पडणे आणि कफाचे विकार धान्य, पुस्तके आदींचे किडींपासून संरक्षण कंद
१६. आले (टीप १) खोकला, अपचन आणि संधीवात स्वयंपाक कंद
१७. पानफुटी (पाणपोय) * मूतखडा पान
१८. पुदीना (टीप २) अपचन होणे आणि पोट फुगणे स्वयंपाक मुळे
१९. अक्कलकारा * फीट येणे, जीभ जाड असणे आणि दातांचे विकार फांदीचा तुकडा
२०. ‘इन्सुलिन’चे झाड (‘पेव’ या वनस्पतीचा प्रकार) * मधुमेह फांदीचा तुकडा

टीप १ – बाजारात विकत मिळणारे जून (पक्व) झालेल्या आल्याचे डोळे (कोंब) लागवडीसाठी वापरावेत.
टीप २ – बाजारात विकत मिळणार्‍या पुदीन्याची पाने स्वयंपाकासाठी वापरावीत आणि मुळे असलेल्या खोडांद्वारे लागवड करावी.

आ. कुंड्यांमध्ये लावता येतील; पण आधार द्यावा लागेल, अशा वेलवर्गीय (वेलाप्रमाणे असलेल्या) वनस्पती

अनु क्र वनस्पतीचे मराठी नाव कोणत्या विकारात उपयुक्त ? अन्य उपयोग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. गुळवेल (अमृतवेल) * ताप, कावीळ आणि रोगप्रतिकार शक्ती अल्प असणे नेहमी काढा करून घेतल्यास आरोग्य चांगले रहाते. फांदीचा तुकडा
२. जाई * व्रण (जखम) आणि तोंड येणे फूलझाड ’’
३. विड्याच्या पानांची वेल (पानवेल) खोकला आणि दमा देवपूजा ’’
४. शतावरी * अशक्तपणा, गर्भाशयाचे विकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प असणे कंदांची भाजी बी किंवा कंद
५. कांडवेल (हाडसांधी) * अस्थीभंग आणि संधीवात फांदीचा तुकडा
६. पिंपळी खोकला आणि अपचन मसाल्यांत उपयुक्त ’’
७. मिरवेल खोकला, दमा आणि अपचन ’’ ’’
८. गुडमार (बेडकी) मधुमेह ’’

इ. घराच्या भोवताली जमिनीत लावण्याजोग्या झुडूपवर्गीय वनस्पती

अनु क्र वनस्पतीचे मराठी नाव कोणत्या विकारात उपयुक्त ? अन्य उपयोग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. अडूळसा * कफाचा खोकला, ताप, उष्णतेचे विकार आणि कावीळ घरातील भाज्या, फळे आदी ताज्या ठेवण्यासाठी फांदीचा तुकडा
२. निर्गुंडी (निगडी) * अंगदुखी आणि जंत होणे धान्यात किडे होऊ नयेत यासाठी ’’
३. पांढरी किंवा तांबडी गावठी जास्वंद केस गळणे, केस पांढरे होणे आणि स्त्रियांचे विकार ’’ ’’
४. कागदी लिंबू अपचन आणि आम्लपित्त स्वयंपाक बी
५. रुई (पांढरी किंवा तांबडी) संधीवात आणि जलोदर देवपूजा बी किंवा फांदीचा तुकडा
६. एरंड (सुरती एरंड) (टीप) * वाताचे सर्व विकार बियांची दुधात पौष्टिक खीर बनवता येते. ’’

टीप – सुरती एरंड : हाताच्या बोटांसारखे पानाचे पाच भाग असणारा एरंड. जैव इंधनासाठी वापरण्यात येणारा पिवळी गोल फळे येणारा (मोगली) एरंड नव्हे.

ई. घराच्या भोवताली जमिनीत लावण्याजोगे १० ते १५ फूट वाढणारे लहान वृक्ष

अनु क्र वनस्पतीचे मराठी नाव कोणत्या विकारात उपयुक्त ? अन्य उपयोग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. कढीपत्ता कॉलेस्टेरॉल वाढणे आणि हृदयाचे विकार स्वयंपाक बी
२. देशी शेवगा अस्थीभंग आणि अशक्तपणा भाजी बी किंवा फांदीचा तुकडा
३. पारिजात ताप फूलझाड ’’
४. आवळा डोळ्यांचे विकार आणि पचनसंस्थेचे विकार फळझाड चांगल्या प्रतीची कलमे
५. कोकंब त्वचेवर पित्त उठणे स्वयंपाक बी
६. नागचाफा लघवी, शौच आदी मार्गांतून रक्त पडणे फूलझाड ’’

उ. घराच्या भोवताली जमिनीत लावण्याजोगे मोठे वृक्ष

अनु क्र वनस्पतीचे मराठी नाव कोणत्या विकारात उपयुक्त ? अन्य उपयोग लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. कडूनिंब व्रण (जखम), मधुमेह आणि त्वचेचे विकार दात घासण्यासाठी दातण बी
२. बेल मधुमेह आणि पंडुरोग देवपूजा ’’
३. सीता अशोक (टीप) * स्त्रियांचे विकार फूलझाड ’’
४. हिरडा * डोळ्यांचे विकार, बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थेचे विकार सावली ’’
५. बेहडा खोकला आणि दमा ’’ ’’
६. अर्जुन * हृदयाचे विकार ’’ ’’

टीप – अनेक फांद्या असलेला, तांब्याच्या रंगाची कोवळी पाने असलेला आणि गुच्छामध्ये फुले येणारा अशोक. शोभेचे झाड म्हणून लावण्यात येणारा, शंकूच्या आकारात सरळसोट वाढणारा नकली अशोक नव्हे.

ऊ. अन्नधान्याचा अभाव असतांना, तसेच नेहमीसाठीही पोट भरण्यासाठी खाता येण्याजोगे कंद

अनु क्र वनस्पतीचे मराठी नाव लागवडीसाठी उपयुक्त अंग
१. साबूकंद (टॅपिओका) (टीप) * फांदीचा तुकडा
२. कणगर (कणगी) कंद
३. रताळे ’’

वरील सारण्यांमध्ये ज्या वनस्पतींच्या नावांपुढे ‘*’ असे चिन्ह आहे, त्या वनस्पतींची रंगीत छायाचित्रे सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’ यात दिली आहेत.

Leave a Comment