रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

Article also available in :

‘रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍या काही जणांना मी आध्यात्मिक उपाय सांगितले. त्यांच्यासाठी उपाय शोधतांना असे लक्षात आले, ‘त्यांना झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. मी उपाय करून त्यांच्या डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर केल्यावर त्यांना त्या रात्री व्यवस्थित झोप लागली. त्यामुळे रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करावा.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय शोधतांना आपल्यातील त्रासदायक शक्तीची जाणीव होण्यासाठी जसे आपण शरिराच्या चक्रांवरून हाताची बोटे फिरवतो, तसे डोळ्यांतील त्रासदायक शक्तीची जाणीव होण्यासाठी डोळ्यांसमोर बोटे फिरवावी लागतात आणि डोळ्यांसाठी उपाय शोधावे लागतात.

‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय कसे शोधायचे ?’, याची सविस्तर माहिती सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’ यामध्ये दिली आहे. त्याचप्रमाणे या मार्गिकेवरही ती त्रोटक स्वरुपात उपलब्ध आहे.

२. डोळ्यांसमोर बोटे फिरवल्यावर डोळ्यांवर आवरण असल्याचे जाणवल्यास प्रथम ते आवरण काढणे आवश्यक आहे. त्यासाठी हातांनी वारा घेतल्याप्रमाणे डोळ्यांवरील आवरण दूर सारावे. ‘त्रासदायक शक्तीचे आवरण दूर कसे करायचे ?’, याची माहिती सनातनच्या वर नमूद केलेल्या ग्रंथामध्ये दिली आहे.

३. डोळ्यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर केल्यावर ‘डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर कशी करायची ?’, याची पद्धत आता आपण पाहू. डोळ्यामध्ये त्रासदायक शक्ती प्रवेश करतांना ती डोळ्याच्या कानाकडील कोपर्‍यातून प्रवेश करते आणि मग डोळ्यात पसरते. डोळ्यातील त्रासदायक शक्ती बाहेर पडतांनाही ती डोळ्याच्या कानाकडील कोपर्‍यातून बाहेर पडते. यामुळे ‘डोळ्यांवर उपाय करायचे असल्यास डोळ्यांच्या समोरून उपाय करणे परिणामकारक नाही, तर डोळ्यांच्या कानांकडील कोपर्‍यांवर उपाय करणे परिणामकारक आहे. त्‍यासाठी हाताची ५ ही बोटे एकत्र करून दोन्‍ही डोळ्‍यांवरून फिरवावी. नंतर नामजप शोधा‍वा.

४. ‘शरिराच्या एखाद्या भागावर त्रास जाणवत असतांना त्या भागावर हाताची बोटे फिरवून ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय कसे शोधायचे ?’, याची पद्धत ‘सूत्र १’मध्ये नमूद केलेल्या सनातनच्या ग्रंथामध्ये दिली आहे. तीच पद्धत डोळ्यांच्या त्रासासाठी उपाय शोधतांना उपयोगात आणावी.

५. डोळ्यांसाठी उपाय शोधल्यावर तेजतत्त्व, वायुतत्त्व किंवा आकाशतत्त्व या पंचमहाभूताचा उपाय आल्यास अनुक्रमे मध्यमा, तर्जनी किंवा अंगठा याच्याशी संबंधित मुद्रा येते. तेव्हा ती मुद्रा दोन्ही हातांनी करावी आणि त्या मुद्रेने डोळ्यांच्या कानांकडील कोपर्‍यांवर न्यास करून उपाय करावेत. आकाशतत्त्वाच्या पुढील निर्गुणाशी संबंधित ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ किंवा ‘ॐ’ या नामजपाचा उपाय आल्यास कुठल्याही एका हाताचा तळवा दोन्ही डोळ्यांसमोर ठेवून उपाय करावेत आणि दुसर्‍या हाताचा तळवा आकाशाच्या दिशेने करून मांडीवर ठेवावा.

६. डोळ्यांवर न्यास करत उपाय करतांना मधे मधे ‘डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दोन्ही हातांच्या मुठींमध्ये गोळा करून ती दूर करणे’, असेही करावे. यामुळे अधिक परिणामकारक उपाय होतात. डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दोन्ही हातांच्या मुठींमध्ये गोळा करतांना ती डोळ्यांच्या कानांकडील कोपर्‍यांतून गोळा करावी. ‘डोळ्‍यांवर मुद्रा करून हात फिरवतांना डोळे जड वाटत असतील, तर ‘डोळ्‍यांवर अजून आवरण आहे’, असे समजावे आणि पुन्‍हा एकदा आवरण काढावे. ‘डोळ्‍यांना हलकेपणा वाटत असेल, तर आवरण न्‍यून झाले आहे’, असे समजावे.

७. उपाय करतांना डोळ्यांवरील जडत्व न्यून झाल्याने त्यांना थोडेसे हलके वाटले की, पुन्हा डोळ्यांसाठी उपाय शोधावेत. तेव्हा प्रत्येक वेळी जप न्यून स्तराचा मिळत जातो, उदा. आरंभीच्या ‘शून्य’ या जपावरून तो ‘आकाशदेव’, ‘वायुदेव’ आणि शेवटी ‘अग्निदेव’ असा होत जातो. डोळ्यांवर उपाय करतांना जप न्यून स्तराचा होत गेल्यावर दोन्ही डोळ्यांच्या नाकाकडील कोपर्‍यांपासून कानांकडील कोपर्‍यांपर्यंत डोळ्यांतील त्रासदायक शक्ती अल्प अल्प होत गेल्याचे जाणवते.

८. शेवटी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती पूर्णपणे दूर झाली की, डोळे हलके आणि प्रकाशमान वाटू लागतात.

त्यानंतर डोळ्यांवर उपाय करणे थांबवावे आणि शांत झोप येण्यासाठी देवाला प्रार्थना करून झोपावे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, गोवा. (३०.१०.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

3 thoughts on “रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !”

 1. रात्री डोक्यात इगीन मच्छर चावणे व नकारात्मक विचाराची भीती वाटते

  Reply
  • नमस्कार,

   नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी पुढील लिंक वरील माहिती वाचा – https://www.sanatan.org/mr/a/77428.html

   आपल्याला आपल्यातील दोषांमुळे त्रास होतो. त्या दोषांवर मात करण्यासाठी स्वतःला दिवसातून दर थोड्या वेळाने स्वयं-सूचना द्याव्या. याविषयी माहिती पुढील लिंकवरील काही लेखांमध्ये सविस्तर देण्यात आली आहे – https://www.sanatan.org/mr/a/category/spirituality/types-of-spiritual-practice/gurukrupayog/personality-defect-removal
   याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

   Reply

Leave a Comment