जीवनातील नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून आनंद मिळवा !

नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

 

१. नकारात्मकता म्हणजे काय ?

नकारात्मकता ही मनाची स्थिती आहे. पुढील विचारांना नकारात्मकता म्हणता येईल.

श्री. अशोक लिमकर

अ. माणसाच्या मनात चाललेली उलट विचारांची प्रक्रिया

आ. देवाला आणि माणसाला अपेक्षित नसलेले विचार मनात येणे

इ. मनुष्याला कर्तव्य करण्यापासून दूर नेणारे विचार

ई. माणसाला देवापासून दूर नेणारे विचार

उ. माणसाला जीवनातला आनंद घेऊ न देणारे विचार

ऊ. माणसाला माणूस म्हणून जगू न देणारे विचार

ए. आनंद मिळवण्यासाठी धडपडायचे असते, हे विसरून टाकणारे विचार

 

२. नकारात्मक विचार का आणि केव्हा मनात येतात ?

अ. देवावरचा विश्‍वास डळमळीत असणे आणि श्रद्धेचा अभाव

आ. स्वतःच्या कर्तृत्वाविषयी साशंकता

इ. आत्मविश्‍वासाचा अभाव

ई. स्वभाव संशयी

उ. संबंधित व्यक्तीविषयी प्रेमभाव, आपुलकी किंवा जवळीक नसणे

ऊ. परिस्थिती सारखीच असली, तरी तिच्यात अनेक पालट होतील, अशी कल्पना करणे किंवा गृहित धरणे

ए. अनावश्यक विचारप्रक्रिया

ऐ. विचारांना कल्पनेचे अनेक फाटे फुटत जाणे

 

३. नकारात्मकतेची कारणे

३ अ. न्यूनगंड हा स्वभावदोष प्रबळ असणे

व्यक्तीत न्यूनगंड हा स्वभावदोष प्रबळ असल्यास तिच्या मनात नकारात्मक विचार येण्याचे प्रमाण अधिक असते. न्यूनगंड म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीसारखीही गुणवैशिष्ट्ये माझ्यात नाहीत किंवा त्यांची उणीव अधिक आहे. त्यामुळे मला काही येत नाही. मला इतरांसारखे काही करणे जमत नाही, असे वाटणे. अशा विचारांमुळे ती व्यक्ती कोणतीही कृती करायला सिद्ध होत नाही. सर्व प्रयत्न आणि कृती थांबल्याने त्या व्यक्तीला जगणे नकोसे वाटते. ती व्यक्ती मनोरुग्ण होते. तिचे जीवन वाया जाते.

३ आ. मन, बुद्धी आणि शरीर यांचा वापर करणे टाळणे

न्यूनगंड असलेली आणि नकारात्मक विचार करणारी व्यक्ती मनाची शक्ती हरवून बसते. देवाने दिलेली इंद्रिये आणि अवयव यांचा उपयोग करून काहीतरी करायचे असते, हेच ती विसरून जाते. अशी व्यक्ती देवाने दिलेले शरीर आणि इंद्रिये यांचा वापर करत नाही. त्यामुळी ती देवाचेही आज्ञापालन करत नाही. ती व्यक्ती संचित भोगून संपवण्याची देवाने दिलेली संधी गमावते. त्यामुळे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांची संख्या वाढवत रहाते. देवाने दिलेले मन, बुद्धी आणि शरीर यांचा वापर करणे टाळते. त्यामुळे ती ऐहिक जीवनही सुखेनैव जगू शकत नाही.

३ इ. स्वतःला न्यून लेखणे

८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म मिळतो. देवाने मनुष्याला दिलेले हे सुंदर शरीर, मन आणि बुद्धी स्वतःला न्यून लेखल्यामुळे वाया जाते, हे त्याला समजत नाही. ८४ लक्ष योनींतील सर्व जिवांमध्ये मनुष्यप्राणी सर्वश्रेष्ठ समजला जातो. मनुष्यात आकाशाला गवसणी घालण्याची क्षमताही आहे. स्वतःला न्यून लेखणे, म्हणजे त्या सृष्टीनिर्मात्याचा अपमान करण्यासारखेच आहे.

​स्वतःला न्यून लेखणारी व्यक्ती आत्मविश्‍वास गमावून बसते. अनावश्यक विचार करत राहिल्याने मला एखादी गोष्ट जमेल का ? मी ती गोष्ट करू शकेन का ?, अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यामुळे ती व्यक्ती आपली इच्छा आणि कार्यशक्ती गमावते. तिचा स्वतःवरचाही विश्‍वास ढळतो. त्यानंतर मला काही येत नाही. मला काही जमत नाही. माझी काही करण्याची क्षमता नाही, असे तिचे नकारात्मक विचार वाढत जातात आणि अशी व्यक्ती निष्क्रीय बनते.

३ ई. शिकण्याची वृत्ती नसणे

जिज्ञासा अल्प असणार्‍या व्यक्तीमध्ये शिकण्याच्या वृत्तीचा अभाव असतो. त्यामुळे शिकण्यातील आणि नवीन ज्ञान मिळण्यातील आनंद त्या व्यक्तीला मिळत नाही. अपुर्‍या ज्ञानामुळे तिच्याकडून अनेक चुका होतात. चुका झाल्यावर ती व्यक्ती स्वतःवरच चिडते, निराश होतेे आणि मला काहीच जमत नाही, या नकारात्मक विचाराने काही कृती करण्याचे टाळते. अशा व्यक्तीला समाधान आणि शांती कसे मिळणार ? माणसाने प्रतिदिन काहीतरी शिकल्यास किंवा नवीन कृती करण्याचा प्रयत्न केल्यासच सकारात्मक वृत्ती वाढण्यास साहाय्य होते.

३ उ. आळशीपणा

आळशी माणसाला विद्या मिळत नाही. विद्या, कला आणि ज्ञान यांचा अभाव असणार्‍या व्यक्तीला धनप्राप्ती होत नाही. ज्याच्याकडे धन नाही, त्याला सुख कुठून मिळणार ? दुःखामुळे गांजलेली व्यक्ती सकारात्मक राहू शकत नाही. ती व्यक्ती सर्वांवर राग काढते. नकारात्मक विचारांमुळे ती व्यक्ती स्वतःवर आणि इतरांवर चिडते. ती सारासार विचार करू शकत नाही. तिचा सर्वांना त्रास होतो. कुटुंबीय आणि समाजातील व्यक्ती त्या व्यक्तीला वाया गेली, असे म्हणतात.​

तमोगुण अधिक असणार्‍या व्यक्तीमध्ये रजोगुण अल्प असतो. असा मनुष्य आळशी आणि काम न करणारा असतो. तो काहीतरी उचापती करून स्वतःला त्रास करून घेतो आणि दुसर्‍यालाही त्रास देतो. अशा माणसाचे विचार सरळ आणि सकारात्मक कधीच नसतात. सतत नकारात्मक स्थितीत राहिल्याने ती चांगले कर्म करण्याचे विसरून जाते. कुटुंब आणि समाज यांतील व्यक्तींवर प्रेम करावे, हा विचार तिच्या मनाला शिवत नाही. तिच्या मनातील नकारात्मक विचार तिला आणखी वाईट कृती करायला भाग पाडतात.

 

४. नकारात्मकतेचे दुष्परिणाम

अ. माणसाला दैनंदिन जीवन जगण्यातील आनंद घेता येत नाही.

आ. मनुष्य कृतीहीन, निराश आणि दुःखी होतो.

इ. मनुष्य प्रेम देऊ शकत नाही आणि कुणाचे प्रेम मिळवू शकत नाही.

ई. अशा माणसाला व्यवहार चांगला करता येत नाही आणि परमार्थ करण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही.

उ. मनुष्य निराशावादी आणि वैफल्यग्रस्त होऊन जीवनाला कंटाळतो.

ऊ. त्याच्या मनात जीवनाचा स्वतःहून अंत करावा, असे विचार येतात.

ए. त्याच्याकडून कुटुंब आणि नोकरी यांतील कर्तव्ये अपेक्षित अशी पार पाडली जात नाहीत. त्याची फलनिष्पत्ती अल्प झाल्याने त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

ऐ. अशी व्यक्ती मानसिक ताणाखाली राहिल्याने तिच्याकडून कोणताही सकारात्मक विचार किंवा सकारात्मक कृती होत नाही.

ओ. नकारात्मकतेचा दुष्परिणाम माणसाचे मन आणि शरीर यांवर होतो. त्याची कार्यक्षमता (मानसिक आणि शारीरिक) उणावून त्याला नैराश्य येते.

औ. व्यक्ती साधनेपासून, म्हणजेच देवापासून दूर जाते.

अं. त्या व्यक्तीची कुणाशीही जवळीक साधली जात नाही.

क. असा माणूस कुटुंब आणि समाजातील व्यक्ती यांपासून दुरावला जातो. त्याचे देवाण-घेवाण हिशोब फेडणे प्रलंबित रहाते.

ख. ‘काळ्या रंगाचा चष्मा घालून सुंदर जगाकडे पाहिल्यास त्या व्यक्तीला सर्व जग काळे दिसते. सृष्टीसौंदर्यातही काळेपणाच दिसतो. त्या व्यक्तीला ‘देवाने जगातील प्रत्येक वस्तू परोपकारासाठी निर्माण केली आहे’, हे तिच्या लक्षात येत नाही. त्यामुळे सृष्टीतील वस्तू आणि व्यक्ती यांच्याकडून मिळणारे साहाय्य आणि प्रेम तिला मिळत नाही. त्याचा आस्वाद घेण्याची तिच्या मनाची सिद्धता नसते. त्यामुळे मिळणारे प्रेम आणि आनंद यांना तो पारखा होतो.

ग. नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला वाईट शक्ती त्रास देतात. तिला चांगले काही करू देत नाही. अशा व्यक्तीची अधोगती होते.

घ. अनेक गोष्टींत अपयश येत गेल्यास मनुष्य निराश होतो आणि म्हणतो, ‘‘माझे प्रारब्ध खडतर आहे. ‘मला यश मिळणे’, ही दूरची गोष्ट आहे.’’ अशा प्रकारच्या नकारात्मक विचाराने तो प्रयत्न करणे सोडून देतो. ‘प्रारब्ध खडतर असणे’, हे आपल्याच पूर्वकर्मांचा परिणाम आहे. प्रारब्धात असलेले भोग भोगून संपवण्यासाठीच आपल्याला पुनःपुन्हा जन्म घ्यावा लागतो’, हे तो विसरतो आणि प्रयत्न करणे सोडून देतो. असे करून तो एकप्रकारे आत्मघात करून घेतो.

 

५. नकारात्मकता घालवण्यासाठी करावयाचे उपाय

५ अ. मानसिक स्तरावर

१. मनात येणारे नकारात्मक विचार लिहून त्या विचारांसमोर ‘कोणते सकारात्मक विचार किंवा कृती करू शकतो ?’, हे लिहिणेे

२. मनात नकारात्मक विचार आल्यावर लगेच आध्यात्मिक मित्र किंवा उत्तरदायी साधक यांच्याशी बोलून त्यांनी दिलेले दृष्टीकोन कृतीत आणणे

३. मनोराज्यात न रमता वास्तव लक्षात घेऊन सकारात्मक विचाराने कृती करणे

४. ‘सकारात्मक रहाण्यामुळे माझ्या प्रयत्नांना गती मिळून माझी फलनिष्पत्ती वाढणार आहे’, असा विचार करणे

५. अनावश्यक विचार करायचे टाळणे

६. अपेक्षा न्यून करून निरपेक्षभावात रहाण्यासाठी प्रयत्न करणे

७. ‘नकारात्मक विचार करणार नाही. नकारात्मक विचारांना मनात थारा देणार नाही’, असा बुद्धीचा निश्‍चय करणे अणि त्याप्रमाणे कृतीही करणे

८. देव, गुरु आणि सहसाधक यांचे साहाय्य घेऊन स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी खडतर प्रयत्न करणे

५ आ. आध्यात्मिक स्तरावर

१. ‘देवाने मला आनंदी जीवन जगण्यासाठी जन्म दिला आहे’, असा विचार करणे

२. प्रत्येक कृतीचे कर्तेपण स्वतःकडे न घेता ‘देवच त्याला अपेक्षित असे सर्वकाही करवून घेणार आहे’, असा विचार करून कृती करणे

३. ‘प्रत्येक गोष्ट देव माझ्या भल्यासाठीच करत आहे’, असा भाव ठेवणे

४. कृती करण्यापूर्वी आणि कृती करत असतांना संत किंवा उन्नत साधक यांचे मार्गदर्शन घेणे

५. कृती झाल्यावर ईश्‍वरचरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करणे

६. ‘सकारात्मक राहिल्यामुळे मला देव आणि साधक यांचे साहाय्य मिळून माझ्या जीवनातील सर्व अडचणी सुटणार आहेत’, असा विचार सतत करणे

७. ‘सकारात्मक राहिल्याने माझ्याकडून देवाला अपेक्षित अशी कृती होऊन मला कृती करण्यातील आनंद मिळणार आहे’, असा विचार करणे

८. ‘सकारात्मक राहिल्याने माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेल आणि ‘देवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहे’, या जाणिवेने ‘माझ्यातील कर्तेपणा अन् अहं न्यून होईल’, असा विचार करणे

९. प्रयत्न वाढवण्यासाठी देवाला प्रार्थना करणे आणि प्रयत्न करून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे

१०. मनोलय आणि बुद्धीलय होण्यासाठी देवाला सातत्याने प्रार्थना करणे

११. मनात नामाचे बीज रुजवण्यासाठी साधनेची कास धरून ती तीव्र होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली अष्टांग साधना करणे

१२. सातत्याने देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे

१३. गुरुदेवांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय नियमितपणे आणि भक्तीभावाने करणे

१४. ‘प.पू. गुरुदेवांनी आपली साधना होण्यासाठी आतापर्यंत काय केले ?’, हे आठवणे आणि ‘अजूनही ते करतच आहेत’, याची जाणीव ठेवणे

१५. बुद्धीचा वापर न्यून करून मन गुरुचरणी अर्पण करणे’

 

६. सकारात्मक विचार केल्याने होणारे लाभ

६ अ. जीवन आनंदाने जगता येणे

हे जग किती सुंदर आहे ! सृष्टीतील प्रत्येक वस्तूत वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये निर्माण करून त्यांच्या सहवासात रहाण्याची देवाने आपल्याला संधी दिली आहे. मानवाचा अपवाद वगळता सर्व सजीव-निर्जीव वस्तू, प्राणी आणि वनस्पती त्यांचे जीवन कोणत्याही प्रकारचे दुःख व्यक्त न करता आनंदाने उपभोगत असतात, तसेच प्रारब्धानुसार कृती करत असतात. मग मानवानेच या नियमाला का अपवाद असावे ? देवाने ही सृष्टी माझ्या भल्यासाठीच निर्माण केली आहे, असा सकारात्मक विचार केल्यास त्यालाही जीवन आनंदाने जगता येईल.

६ आ. मी स्वतः निराश होणार नाही. दुसर्‍याला निराश करणार नाही आणि नकारात्मक विचार करणार नाही, असा निश्‍चय करून कृती केल्यास समवेत असणार्‍यांनाही निराश होण्याची वेळ येणार नाही.

६ इ. इतरांना साहाय्य करता येऊन त्यांच्याशी अधिक जवळीक साधली जाईल.

६ ई. सकारात्मकतेमुळे कुटुंबामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊन सर्वांची मने एकमेकांशी जोडली जातील. एकमेकांशी असलेला देवाण-घेवाण हिशोब फेडतांना जीवनाचा खरा आनंद लुटता येईल.

६ उ. जगातील प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पहाता येणे

मनाची जशी धारणा असते, तसे विचार मनात येतात आणि त्या विचारांनुसार कृती घडते. आपल्या मनात सकारात्मक विचार असतील, तर आपल्याला जगातील प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पहाता येईल. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता येईल.

६ ऊ. प्रारब्ध आनंदाने भोगता येणे

प्रारब्धानुसार आपण भोग भोगत असतो. तेव्हा दुःखाच्या वेळी माझ्या कर्माचे फळ, म्हणजेच दुःख भोगून संपवत आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास ते प्रारब्ध भोगणे सुखावह होते. त्या वेळी उद्विग्नता न येता ते भोगतांनाही आनंदी रहाण्याचा प्रयत्न होतो.

 

७. मनाच्या सकारात्मक धारणेचा लाभ कसा होतो ?, हे सांगणारी एक कथा

सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका योगी वैद्यांनी गुडघेदुखीचा त्रास असणार्‍या १० सहकार्‍यांना निवडले. त्या वैद्यांनी त्यांना सैन्यदलाच्या शस्त्रकर्मगृहात गुडघ्यांवर निशुल्क शस्त्रकर्म करून देतो, असे सांगितले. वैद्यांनी  सहकार्‍यांना सांगितले, हे शस्त्रकर्म तुम्हाला संगणकाच्या पडद्यावर पहाता येईल. वैद्यांनी नियोजन करून सहकार्‍यांना शस्त्रकर्म दाखवले. त्यांच्यावर पुढील औषधोपचार चालू ठेवले आणि एका मासाने कळवण्यास सांगितले. सर्वांनी शस्त्रकर्म चांगले झाल्याने गुडघेदुखीचा त्रास न्यून झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्या योगी वैद्यांनी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रकर्म केले नव्हते. त्याने दुसर्‍याच एका शस्त्रकर्माची ध्वनी-चित्रचकती त्यांना दाखवली होती. त्या रुग्णांच्या मनातील माझ्या गुडघेदुखीवर शस्त्रकर्म झाले आहे, या सकारात्मक विचाराच्या परिणामाने त्यांची गुडघेदुखी नष्ट झाली होती.

 

८. सकारात्मक दृष्टीकोन कसा ठेवायचा ?, याविषयीचे एक उदाहरण

एक साधक म्हणाला, माझ्यात भाव नाही. यावर दुसर्‍या साधकाने त्याला समजावले, भाव नाही, असे म्हणालात, तर प्रयत्न आणि प्रगती थांबली. माझ्यात भाव अल्प आहे. तो वाढवण्यासाठी काय करू ?, असे म्हणालात, तर ती सकारात्मकता झाली. भाव वाढवण्यासाठी प्रयत्नांना दिशा मिळून कृती चालू होते. भाव तेथे देव हे आपल्याला अनुभवायचे आहे. त्या स्थितीला जाण्यासाठी नकारात्मकता नाही, तर सकारात्मकताच साहाय्य करते.

 

९. नकारात्मक विचार दूर करण्यासाठी करावयाची प्रार्थना !

हे गुरुदेवा, माझ्या मनात येणार्‍या नकारात्मक विचारांमुळे मी साधनेपासून दूर जात आहे. मी नकारात्मक विचार दूर करण्यास असमर्थ आहे. आपणच माझ्यावर दया करा. माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करून तुम्हीच मला यातून पार करा, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने पुनःपुन्हा प्रार्थना करत आहे.

 

१०. प्रयत्नांती परमेश्‍वर, या उक्तीप्रमाणे प्रयत्नांची कास धरल्यास त्यातून साधना होईल !

प्रयत्नांती परमेश्‍वर, असे म्हटले आहे. ते ध्यानात घेऊन प्रयत्नांची कास धरून नेटाने एकेक पाऊल पुढे जात राहिल्यास देव नक्कीच साहाय्याला धावून येणार आहे. अशा वेळी देव कुणाच्या माध्यमातून कोणते रूप घेऊन आला आहे आणि अमुक एक गोष्ट मलाच का सांगत आहेत ?, असा विचार न करता सांगितल्याप्रमाणे कृती केल्यास त्यातून चांगलेच निष्पन्न होणार आहे, असा भाव ठेवून प्रयत्न केल्यास त्यातून साधना होणार आहे.

 

११. गुरुमाऊलीच्या स्मरणानेच आपले नकारात्मक विचार दूर होतील, अशी श्रद्धा ठेवून प्रयत्न करा !

परात्पर गुरुमाऊली प्रेमळ आणि दयाळू आहे. माझ्या साधनेतील अडचणी दूर करण्यास समर्थ आहे. आपल्या प्रार्थनेने गुरुमाऊलीला आपली करुणा येऊन ते आपल्यातील नकारात्मकता दूर करण्यास संकल्प करतील. खरेतर गुरुमाऊलीच्या स्मरणानेच आपले नकारात्मक विचार दूर होतील, आपले मन आणि बुद्धी शुद्ध होतील आणि आपली शुद्ध भक्ती होऊन साधनेत प्रगती होईल. हे सर्व लवकर होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे पुनःपुन्हा प्रार्थना करूया आणि परात्पर गुरुमाऊलीप्रती श्रद्धा वाढवूया.

– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.७.२०१७)

Leave a Comment