शांत निद्रेसाठी करायचे उपाय

Article also available in :

निद्रा अर्थात् झोप आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. सध्या अनेकांना शांत निद्रा लागणे कठीण झाले आहे. यामागे सहसा स्थूल उपचार अर्थात् डॉक्टरांच्या निर्देशाप्रमाणे औषधोपचार इत्यादी घेण्याचा आपला कल असतो; परंतु यांमागे असणारी अध्यात्मशास्त्रीय कारणे जाणून घेतल्यास या त्रासावर मात करता येणे सहज शक्य आहे. प्रस्तुत लेखात निद्रेविषयीच्या सर्वसाधारण माहितीसमवेत निद्रेचे महत्त्व, निद्रेचा कालावधी, निद्रा आणि वाईटशक्ती यांचा संबंध, तसेच निद्रा न लागण्यामागील मूळ समस्या अन् शांत निद्रेसाठी उपाय यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 

१. निद्रा (झोप) : उत्पत्ती आणि अर्थ

१ अ. उत्पत्ती

निद्रा (झोप) ही ब्रह्माचे स्त्रीरूप असून समुद्रमंथनातून तिची उत्पत्ती झाली, असे पौराणिक मत आहे.

 

१ आ. अर्थ

‘मेध्यामनःसंयोगः’ म्हणजे ‘मेध्या’ नामक नाडी आणि मन यांचा संयोग म्हणजे ‘निद्रा’ होय. सर्व इंद्रिये मनात लीन झाली, म्हणजे इंद्रियांचे कार्य थांबले की, व्यक्तीला निद्रा येते. या वेळी व्यक्तीला ऐकू येत नाही, दिसत नाही अन् वासही येत नाही.

 

१ इ. सतेज निद्रा

‘योग्य आहाराने योग्य निद्रेकडे जीव प्रवास करतो, यालाच ‘सतेज निद्रा’ असे म्हणतात. निद्रेतही अंतर्मन ज्या वेळी सात्त्विक विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत असते, त्या वेळी निद्रेतही मनुष्याच्या अंतर्मनाची साधना चालू असते. या साधनेने मनुष्याचे मनःपटल शुद्ध होते आणि त्याला मनोलयाकडे प्रवास करणे सोपे जाते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, अधिक वैशाख शु. ५, कलियुग वर्ष ५११२ (१९.४.२०१०), दुपारी १.४९)

 

२. निद्रेचे महत्त्व

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अन्नाइतकीच निद्रेचीही आवश्यकता असते. दिवसभर काम करून शरीर आणि इंद्रिये यांची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. विश्रांतीची ही नैसर्गिक अवस्था म्हणजेच निद्रा होय. सुख-दुःख, स्थूलता-कृशता, ज्ञान-अज्ञान, आरोग्य आणि बळ या सर्व गोष्टी निद्रेवर अवलंबून असतात.

 

३. निद्रेचा कालावधी

वयोमान, त्रिगुण आणि प्रकृती यांनुसार निद्रेच्या कालावधीत पालट होतो.

 

३ अ. वयोमानानुसार

१. ‘लहानांसाठी १० ते १२ घंटे (तास), तरुणांसाठी ८ घंटे, प्रौढांसाठी ७ घंटे आणि वृद्धांसाठी ४ ते ६ घंटे निद्रा प्रतिदिन आवश्यक आहे.

३ आ. त्रिगुणानुसार

१. सत्त्वगुणी व्यक्तीला ४ ते ६ घंटे, रजोगुणी व्यक्तीला ८ घंटे आणि तमोगुणी व्यक्तीला १० ते १२ घंटे निद्रेची प्रतिदिन आवश्यकता असते.

३ इ. प्रकृतीनुसार

१. वात प्रकृतीच्या माणसाला गाढ निद्रा लागत नाही. निद्रेतही तो अस्वस्थ असतो आणि थोडाही ध्वनी (आवाज) झाला, तरी तो लगेच जागा होतो.

२. पित्त प्रकृतीच्या माणसाला गाढ निद्रा लागत नाही. त्याला प्रतिदिन ८ घंटे निद्रा लागते.

३. कफ प्रकृतीच्या माणसाला गाढ निद्रा लागते आणि तो प्रतिदिन ८ घंट्यांपेक्षा अधिक वेळ निजतो.

 

४. निद्रेविषयीच्या समस्या

सध्याची धकाधकीची जीवनपद्धत, कौटुंबिक किंवा कार्यालयीन तणाव आदींमुळे बहुतांश लोकांना शांत निद्रा (झोप) लागणे कठीण झाले आहे. शांत निद्रा लागली नाही, तर पुढील दिनक्रमावर अनिष्ट परिणाम होतो. निद्रेविषयी समस्या सोडवण्यासाठी बरेच जण आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) जातात. निद्रा येण्यासाठी डॉक्टर औषधे देतात आणि काही व्यायामप्रकार सुचवतात. ‘अ‍ॅलोपॅथी’ त्या पलीकडे काही विचार करत नाही.

रात्रीची झोप पूर्ण झालेली असतांनाही सकाळी बैठी कामे करतांना झोप येत असल्यास काय करावे ?

काही वेळा रात्रीची झोप पूर्ण झाल्यावरही सकाळी कामे करतांना झोप येते. यामागील आयुर्वेदीय कारण पुढे देत आहे.

शरिरात कफ दोष वाढल्याने सकाळी झोप येते.

पूर्वाह्णे पूर्वरात्रे च श्‍लेष्मा (प्रकुप्यति) ।

– अष्टांगहृदय, निदानस्थान, अध्याय १, श्‍लोक १८

अर्थ : दिवस आणि रात्र यांच्या पहिल्या एक तृतीयांश भागात कफ वाढतो.

या सूत्रानुसार सकाळी कफ वाढलेला असतो. त्यामुळे झोप येऊ शकते. अशा वेळी झोपल्यास कफ आणखी वाढून विकार होण्याची शक्यता असते. यामुळे रात्रीची झोप पूर्ण होऊनही सकाळी पुन्हा झोप आल्यास न झोपता शरिराची हालचाल होईल, अशी शारीरिक कामे (उदा. चालणे-फिरणे, झाडलोट करणे) करून झोप घालवावी.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, गोवा.

 

५. निद्रा (झोप) न लागण्यामागील मूळ समस्या

निद्रेविषयीचे निसर्गनियम आणि धर्मात सांगितलेले निद्रेशी संबंधीत आचार न पाळणे, हे शांत निद्रा (झोप) न लागण्याच्या समस्येचे मूळ आहे. निद्रेसंबंधीचे त्रास टाळून शांत निद्रा लागावी, यासाठी डोके कोणत्या दिशेला करावे, शयनगृहात पूर्ण काळोख करून का झोपू नये आदी गोष्टींमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

६. निद्रा (झोप) आणि वाईट शक्ती

काही वेळा निद्रा (झोप) न येण्याची सकृत्दर्शनी काही कारणे आढळत नाहीत. तसेच काही वेळा निद्रेत बडबडणे, अंथरुणातून पळून जायचा प्रयत्न करणे, असेही प्रकार घडतात. यांमागे वाईट शक्तींचा त्रास, हेही कारण असते. रात्रीच्या वेळी वाईट शक्तींचे प्राबल्य वाढत असल्याने व्यक्ती निद्राधीन असतांना तिच्यावर वाईट शक्ती सहज आक्रमण करू शकतात. त्यामुळे सकाळी लवकर जाग न येणे, जाग आल्यावर लगेच उठू न शकणे, शरीर जड होणे, उत्साह नसणे आदी त्रास होतात. यांवर आध्यात्मिक उपायच योजावे लागतात. निजल्यावर व्यक्तीच्या झोपण्याच्या दिशेत आणि स्थितीमध्ये परिवर्तन होते. अनेक वेळा त्यामागेही वाईट शक्तींचा त्रास, हेच कारण असू शकते. अशा वेळी कुटुंबातील अन्य सदस्य त्या व्यक्तीची कूस पालटणे, त्याचे डोके पूर्वेस करणे अशा योग्य कृती करू शकतात.

 

७. शांत निद्रेसाठी करायचे काही आध्यात्मिक उपाय

निद्राधीन असतांना वाईट शक्तींमुळे त्रास होऊच नये आणि शांत निद्रा यांसाठी अंथरुणाभोवती देवतांच्या नामजप-पट्ट्यांचे मंडल घालणे, उशीजवळ सात्त्विक उदबत्ती लावणे, अंथरुणावर विभूती आणि कापूर टाकणे, तेलाचा दिवा रात्रभर लावणे, निद्रेपूर्वी उपास्यदेवतेला आणि निद्रादेवीला प्रार्थना करणे, यांसारखे सुलभ आध्यात्मिक उपाय करावेत.

 

८. आयुष्यातील साधनेचे महत्त्व

कलियुगात तमोगुणी निद्रेचे सत्त्वगुणी निद्रेत रूपांतर होण्यासाठी म्हणजेच शांत निद्रेसाठी साधना करणे अत्यंत आवश्यक ठरते.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शांत निद्रेसाठी काय करावे ?’

2 thoughts on “शांत निद्रेसाठी करायचे उपाय”

Leave a Comment