शाळा आणि महाविद्यालय येथे केवळ सात्त्विक भारतीय पोशाखच गणवेश म्हणून वापरणे योग्य !

हल्ली बालवाडीपासून ते महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांना शर्ट-पँट, पायमोजे, बूट, कमरपट्टा असा विदेशी गणवेश असतो. काही शाळांमध्ये आठवी ते दहावीच्या, तसेच महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या मुलींनाही हाच गणवेश असतो. व्यावसायिक शिक्षण देणार्‍या महाविद्यालयांतही मुला- मुलींसाठी हाच गणवेश असतो. विदेशी चाली-रितींचा अभिमान बाळगणार्‍या या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय पोशाखांचा वापर केवळ ‘साडी-डे’, ‘ट्रॅडिशनल- डे’ अशी ‘डे’ संस्कृती साजरी करण्यापुरताच केला जातो. एकूणच अशा प्रकारच्या पोशाखांचे स्वरूप पहाता भारतीय संस्कृती, भारतीय वेशभूषेला हीन लेखले जात असल्याचे विदारक चित्र आपण पहात आहोत.

 

अ. हिंदु संस्कृती नष्ट करण्याच्या इंग्रजांच्या
कारस्थानाला तथाकथित भारतियांनी बळी पडून संस्कृतीद्रोह करणे

इंग्रज भारतातून गेले; पण त्यांची संस्कृती मागे ठेवून गेले. इंग्रजांच्या भारतीय संस्कृती नष्ट करण्याच्या कारस्थानाला बळी पडलेल्यांना विदेशी संस्कृतीप्रमाणे पेहराव करणे म्हणजे पुरोगामीपणा वाटतो. राष्ट्र, धर्म अन् हिंदु संस्कृतीविषयी आस्था नसलेल्या अशा भारतियांना आपल्या संस्कृतीप्रमाणे सात्त्विक आणि सुंदर पोशाखांचा वापर म्हणजे मागासलेपणा वाटतो.

 

आ. शिक्षणाचा आध्यात्मिक उद्देश ज्ञात
नसल्याने त्याच्याकडे एक व्यावहारिक गोष्ट म्हणून पहाणे

भारतीय संस्कृतीनुसार शिक्षण हे ज्ञानार्जन करण्याचे साधन आहे. ‘ज्ञानार्जन’ म्हणजे देवी सरस्वतीची उपासना, आराधना होय. विद्यालय, महाविद्यालय म्हणजे देवी सरस्वतीचे मंदिर आणि विद्यार्थी म्हणजे सरस्वती देवीची साधना करणारा ‘साधक’ असतो; मात्र धर्मशिक्षणाच्या अभावामुळे शिक्षणाचा उच्च आध्यात्मिक उद्देश माहिती नसलेले सध्याचे शिक्षक आणि पालक शालेय शिक्षणाकडे केवळ एक व्यावहारिक गोष्ट म्हणून पहातात.

 

इ. संस्कृतीचे जतन करायला शिकवणार्‍या संस्थांनी संस्कृतीद्रोह करणे

खरे तर, पँट, कोट, टाय असा गणवेश धारण करायला आपण काय विदेशात रहातो ? आपला गणवेश भारतीय संस्कृतीनुसार असायला हवा. शाळा, महाविद्यालये ही संस्कृतीचे जतन करायला शिकवणारी केंद्रे आहेत. त्यामुळे त्यांनी भारतीय पोशाखाचे महत्त्व संपूर्ण समाजाला पटवून दिले पाहिजे आणि तसे आचरणही केले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र संस्कृतीचे जतन तर दूरच, किमान संस्कृतीची ओळख तरी या शिक्षणतज्ञांना किंवा शिक्षणाच्या ठेकेदारांना आहे कि नाही याची शंका वाटते.

 

ई. ईश्‍वराचे चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता भारतीय पोशाखात असणे

भारतीय संस्कृतीनुसार मुलींसाठी घागरा-चोळी, पंजाबी पोशाख किंवा साडी हा सात्त्विक पोशाख आहे, तर मुलांसाठी कुडता-पायजमा किंवा कुडता-धोतर हा सात्त्विक पोशाख आहे. सात्त्विक पोशाखांकडे सकारात्मक स्पंदने आकृष्ट होतात, जी विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असतात. सात्त्विक कपडे घातल्याने ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करता येते. त्यामुळे मुलांचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते. ती सदाचरणी आणि विवेकी बनतात. तसेच त्यांचे नकारात्मक स्पंदनांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते. सात्त्विक कपड्यांमुळे मुलांवर संस्कार होण्यासही साहाय्य होते; म्हणून शाळा, महाविद्यालयांतील पाश्‍चात्त्य पद्धतीचा गणवेश पालटून भारतीय पद्धतीचा सात्त्विक पोशाख वापरणे अत्यावश्यक आहे. सात्त्विक वेशभूषा करणार्‍या विद्यार्थ्याची सात्त्विकता तर वाढतेच, तसेच त्या सात्त्विकतेचा समष्टीलाही मोठ्या प्रमाणात लाभ होतो. त्यामुळे भारतीय वेशभूषेचा अभिमान बाळगून शाळा-महाविद्यालयांत सात्त्विक गणवेश लागू करण्याची मागणी मुलांच्या पालकांसह संपूर्ण समाजाने संघटितपणे करणे आणि ती पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा
करणे अत्यावश्यक आहे.’

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment