‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार करून तमोगुण वाढवणारी जीन्स पँट परिधान करण्याऐवजी सात्त्विकता वाढवणारी वेशभूषा परिधान करणे सर्व दृष्टींनी अधिक लाभदायी !

युवकांनो, जीन्स पँटचा दुष्परिणाम जाणा !

 

‘रिप्ड जीन्स’ नावाची विकृती !

फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स परिधान करणारी भारतातील नतद्रष्ट युवा पिढी ! हिंदु संस्कृतीत फाटके कपडे वापरणे असांस्कृतिक समजले जाते; मात्र पाश्‍चात्त्य संस्कृतीत त्याकडे ‘फॅशन’ म्हणून पाहिले जाते ! फुटक्या वस्तू आणि फाटलेले कपडे वापरणे हे अध्यात्मशास्त्रीयदृष्ट्या चुकीचे असल्यामुळे त्याचा व्यक्तित्वावर नकारात्मक परिणाम होतो !

फाटलेले कपडे परिधान करण्याची टूम (फॅशन) सध्या झपाट्याने प्रचलित होऊ लागली आहे. ‘जीन्स’ कापडाची फाटलेली विजार घातलेले तरूण-तरुणी शहरासारख्या ठिकाणी हमखास पहायला मिळतात. सध्या तर याचे प्रमाण इतके वाढले आहे की, मुंबईत ‘जीन्स’ची विजार घातलेल्या प्रत्येक ३ व्यक्तींपैकी एकाची विजार ही फाटलेल्या कापडापासून बनवलेली असते किंवा ती बनवल्यानंतर फाडलेली असते. याची लागण ग्रामीण भागातही लागली आहे. लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानातही या ‘रिप्ड जीन्स’ चढ्या किमतीत मिळू लागल्या आहेत. आताआतापर्यंत आपल्या संस्कृतीत परिधान केलेल्या कपड्याला एखादे छिद्र असणे किंवा कुठेतरी थोडेसे फाटलेले असणे अयोग्य आणि असभ्यतेचे लक्षण मानले जात असे. कपडे परिधान करणार्‍याला सुद्धा याविषयी लज्जा उत्पन्न होत असे. त्यामुळे कपडे जुने असले, तरी ते कुठे फाटलेले नाहीत ना, याविषयी विशेष सतर्कता घेतली जात असे. आता मात्र ‘फॅशन’च्या नावाखाली फाटलेल्या कापडापासून बनवलेले कपडे सर्रास वापरले जात आहेत. ज्यांनी न फाटलेल्या विजार खरेदी केल्या आहेत, त्यांपैकी काही जण विजारींना नंतर छिद्रे पाडतांना दिसतात. तरूणांसमवेत तरूणींची संख्याही यामध्ये सारखीच आहे. काही मोजक्या महाविद्यालयांमध्ये या ‘रिप्ड जीन्स’ना अनुमती नसली, तरी बहुतांश खाजगी कार्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये यांवर प्रतिबंध नसल्यामुळे हळूहळू याकडे ‘स्टेटस सिंबॉल’ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. फाटलेल्या विजारी परिधान करून पायांचे प्रदर्शन घडवणार्‍या आणि तरूणांमधील लैंगिक भावना उद्दीपीत करणार्‍या या पाश्‍चात्त्य विकृतीने तरूण-तरुणींवर चांगलीच भुरळ घातली आहे. काही तरुणी हल्ली खांद्यावर फाटलेले पोषाख घालतात, तर काही मध्ये मध्ये भोके असलेले पोषाख घालतात. हाही याचाच प्रकार आहे.

फुटक्या वस्तू आणि फाटलेले कपडे यांमधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा वापर करणार्‍या व्यक्तीच्या मनावरही त्याचा दुष्पपरिणाम होतो. त्यामुळे अशा वस्तूंचा वापर करणे आध्यात्मिकदृष्ट्या चुकीचे आहे. महाविद्यालयात ज्ञानार्जन करण्यासाठी जाणार्‍या आणि कार्यालयात बौद्धिक कामे करणार्‍या व्यक्तींची यामुळे हानी होऊ शकते. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे परिधान केले आहे, हा विचार व्यक्तीतील अहं वाढवण्यासही साहाय्य करतो. परिणामी फाटक्या कपड्यांचा नियमित वापर करणार्‍या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर कालांतराने नकारात्मक पालट होऊ शकतो. त्यामुळे याविषयी अधिक संशोधन करून तरूणांमध्ये जागृती करण्याची आणि या पाश्‍चिमात्य विकृतीला हद्दपार करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे.

– श्री. जगन घाणेकर, मुंबई

 

देहाभोवती त्रासदायक स्पंदनांची निर्मिती करणारी असात्त्विक जीन्स पँट घालू नका !

‘जीन्सची पँट तम-रज प्रधान असल्याने ती परिधान करणार्‍या व्यक्तीच्या देहाभोवती त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते आणि वातावरणातील नकारात्मक शक्ती व्यक्तीकडे आकृष्ट होते. जीन्स पँट ही उच्छृंखलतादर्शक असते. तिच्यामुळे व्यक्तीचा अहंकार वाढतो आणि तिला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाची तीव्रताही वाढते. जीन्स पँटसारख्या असात्त्विक पोशाखामध्ये ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता अगदी नगण्य असते. त्यामुळे जीन्स पँट, ‘फेडेड जीन्स पँट (पँटच्या काही भागातील रंग फिकट असल्याने ‘पांढर्‍या रंगाचा पट्टा आहे’, असे वाटणारी) अथवा अन्य अशा नवीन ‘फॅशन’ची जीन्स पँट घालू नये.’

१. तमोगुणी पोशाखामुळे वातावरणातील नकारात्मक शक्ती व्यक्तीकडे आकृष्ट होणे

असे चित्रविचित्र कपडे वापरल्याने व्यक्तीतील रज-तम गुण मोठ्या प्रमाणावर वाढतो. विविध प्रकारच्या ‘फॅशन’च्या नावाखाली फाटक्या, ठिगळे लावल्यासारख्या, तंग अथवा अधिक लांबीच्या जीन्स पँटमुळे तामसिकता वाढून व्यक्तीला होणार्‍या आध्यात्मिक त्रासात वाढ होते. त्यामुळे ‘पोशाख आरामदायी आहे’, असा वरवरचा विचार न करता त्या पोशाखामुळे सूक्ष्म स्तरावर होणार्‍या परिणामांचा विचार करावा. अशा प्रकारचेे कपडे परिधान करण्याऐवजी व्यक्तीसाठी सात्त्विक कपडे परिधान करणे अधिक लाभदायी असते.

२. हिंदु संस्कृतीनुसार सदरा आणि धोतर ही पुरुषांसाठी सात्त्विक वेशभूषा !

जीन्स पँटऐवजी अंगरखा आणि पायजमा वापरणे, हे त्या तुलनेत अधिक सात्त्विक आहेे. हा पोशाख रज-सत्त्वप्रधान असून तो संयम अन् धैर्य यांचे दर्शक आहे. या वेशभूषेमुळे अहं न्यून होऊन वाईट शक्तींचा त्रासही उणावू शकतो आणि ईश्‍वरी चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करता येते. हिंदु संस्कृतीनुसार अंगरखा आणि धोतर ही पुरुषांसाठी सात्त्विक वेशभूषा आहे. ती निर्मळतादर्शक असून तिच्यामुळे अहं अल्प होतो, तसेच वाईट शक्तींचा त्रासही अत्यल्प होतो. यामुळे लहान मुले आणि पुरुष यांनी असात्त्विक वेशभूषेचा त्याग करून प्राधान्याने अंगरखा आणि धोतर परिधान करावे. ते शक्य नसल्यास किमान अंगरखा आणि पायजमा वापरावा.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

तरुणींनो, आधुनिकतेच्या आणि नाविन्याच्या
अट्टाहासापायी असात्त्विक अन् अशोभनीय पोशाख परिधान करू नका !

‘सध्या तरुणी आणि मध्यमवयीन स्त्रिया यांच्यामध्ये तोकडा अन् अंगाला घट्ट बसणारा ‘जीन्स पँट आणि टी-शर्ट’ हा पोशाख घालणे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या असात्त्विक पोशाखामुळे स्त्रियांच्या मानसिक, तसेच आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्याचे लक्षात येते. खरेतर ‘सात्त्विक, सोज्वळ पोशाख आणि विनयशील वर्तन’ हेच स्त्रीचे खरे सौंदर्य आहे; पण आधुनिकतेच्या अन् नाविन्याच्या अट्टाहासापायी अशोभनीय पोशाख घालण्याची स्त्रीवर्गात जणू चढाओढच लागली आहे. लहान मुलींसाठी परकर-पोलके, तर स्त्रियांसाठी नऊवारी आणि सहावारी साडी हे सात्त्विक पोशाख असून स्त्रियांनी सात्त्विक पोशाख आहेत.’

– सौ. सुजाता कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०१९)

 

जीन्स पँट’च्या सततच्या वापरामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम

१. काही जीन्सचे कापड पुष्कळ जाड असते. त्यामुळे अशा कपड्यांत हवा सहजपणे खेळती रहात नाही आणि उष्णता कपड्यांच्या आतच साठून रहाते. यामुळे भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशातील लोकांनी सतत जीन्स वापरणे चुकीचे आहे.

२. कंबर, जननेंद्रिय आणि जांघ या भागांत एरव्हीही अधिक प्रमाणात घाम येतो. नेहमी जीन्स वापरल्याने त्या ठिकाणी घाम साठून रहातो आणि त्वचेला बुरशीजन्य त्वचाविकार (फंगल इन्फेक्शन) होतो.

३. अंगाला अगदी चिकटून रहाणार्‍या घट्ट जीन्स घालणार्‍या तरुणींना कंबरदुखी, तसेच पोटर्‍यांमध्ये गोळे येणे, असे त्रास होऊ शकतात.

‘या धारिकेसह जोडलेली जीन्स पँटची छायाचित्रे पाहून डोके पुष्कळ जड झाले.’

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात