आजचे दिशाहीन आणि निस्तेज युवक !

आजच्या युवकांची दयनीय अवस्था

 

योग्य आदर्श नसल्याने अधिकाधिक आळशी आणि व्यसनाधीन

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर करियर सोडले तर विशिष्ट कोणतेच ध्येय आणि आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वार्‍यासमवेत सागरात कोठेही भरकटत जाते, तसा आजचा युवक आहे. चारित्र्यहीन आणि ध्येयशून्य अशी लाचार व्यक्तीमत्त्वे, तसेच भ्रष्ट राजकारणात आकंठ बुडून आळसात लोळत पडलेली राजकारणी मंडळी ही आजच्या युवकांसमोर आदर्श असल्याने आजचा युवक भांबावून गेला आहे. तो हिंदी चित्रपटातील गलिच्छ आणि अश्‍लील गाणी मोठमोठ्याने गात अधिकाधिक व्यसनाधीन होत आहे. तो मादक व्यसनांच्या आहारी गेला आहे. ‘आप’ कमाईपेक्षा ‘बाप’ कमाई अन् कष्टापेक्षा बिनकष्टाचा पैसा’, हे युवकांचे भूषण ठरत आहेत.

 

मुंबईतील एका सामाजिक संस्थेने केलेली
युवकांची पाहणी आणि तिचा अती भयानक निष्कर्ष !

मुंबईतील एका सामाजिक संस्थेने महाविद्यालयीन युवकांची आरोग्याच्या दृष्टीने पाहणी केली. त्याचा निष्कर्ष अती भयानक असून सरकार, विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ यांना अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. हा अहवाल सांगतो की, शेकडा ९२ टक्के युवक व्यसनाधीन असून त्यात ८० टक्के प्रमाण मुलींचे आहे. आजच्या युवकांतील ही व्यसनाधीनता अशीच वाढत राहिली, तर एक ना एक दिवस देशात शस्त्रे असतील; पण शस्त्रे धरणारी मनगटे नीट नसतील ! अवजड यंत्रसामुग्री असेल; पण कामगार मिळणार नाहीत !

 

भरकटलेला आणि पदवी प्राप्त करूनही व्यवहारी अन् वास्तववादी जगात कुचकामी !

अत्यंत हीन अभिरुचीचे वाङ्मय, गलिच्छ आणि ओंगळवाण्या आवडी-निवडी, चित्रपटांतील नटनट्यांच्या उत्तान अन् उन्मादक मालिका, वाढती गुन्हेगारी, भस्मासुरासमान असणारा काळाबाजार आदी गोष्टींनी आजचा युवक भरकटत आहे. विद्यापिठातून पदव्यांची भेंडोळी घेऊन बाहेर पडणारा युवक नोकरीस्तव भटकत आहे. सखोल ज्ञान मिळवण्यापेक्षा जुजबी पायावर पदवीधर झालेला युवक व्यवहारी अन् वास्तववादी जगात कुचकामी ठरत आहे.

 

कोणत्याही प्रकारचे संस्कार नसल्याने राजकारणी लोकांच्या हातातील बाहुले बनलेला !

आजच्या युवकांवर कोणत्याही प्रकारचे संस्कार नाहीत. असा संस्कारहीन युवक म्हणजे समाजाला जडलेला कर्करोग आहे. कष्ट न करता केवळ पैसा मिळावा, ऐषआराम करावा, या सुखासीन वृत्तीमुळे आजचा युवक म्हणजे स्वतःचे स्वतंत्र विचार, तसेच स्वतःचे अस्तित्व नसणारा आणि राजकारणी लोकांच्या हातातील बाहुले बनलेला असा आहे.

 

पालकांच्या पैशांवर मौजमजा करणारा आणि अश्‍लील चित्रपटांचे व्यसन जडलेला !

आजचा युवक माता-पित्यांच्या पैशांवर आणि कष्टांवर बांडगुळाप्रमाणे वाढणारा आहे. लैंगिकता आणि व्यसनाधीनता हे त्याचे अलंकार ठरू लागले आहेत. त्याला चित्रपट आणि खेळ यांविषयी केवळ मोठमोठ्या आवाजात चर्चा करण्यात मोठेपणा वाटू लागला आहे. मर्दानी खेळात भाग घेऊन शरीरसंपदा प्राप्त करण्याऐवजी रात्रभर गलिच्छ चित्रपट पहाणे, हा रोग जडून तो व्यसनांचे आगर ठरत आहे.

– प्र. दि. कुलकर्णी, पंढरपूर.

जीवघेणी स्पर्धा, झटपट पैसा कमावणे, महागड्या गाड्या, असात्त्विक केशभूषा आणि वेशभूषा, ‘डे’ साजरे करणे, ‘पार्ट्या’, ‘विकएण्ड’ साजरे करणे, भ्रमणभाषचा दुरुपयोग, सेल्फी, अश्‍लील संकेतस्थळे, पाश्‍चात्त्य संगीत आणि त्याचे कार्यक्रम, चित्रपट आणि चित्रपटसंगीत, पब, सिगारेट, तंबाखू, मद्यपान, अमली पदार्थ आणि आत्महत्या या अंधःकाराच्या खोल खाईत लोटणार्‍या सर्व गोष्टींना आजचा युवक आणि युवती बळी पडल्या आहेत ! याची काही प्रातिनिधिक उदाहरणे येथे देत आहोत.

१. अमली पदार्थ

‘आयआयटी कानपूर’चे शेकडो विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी !

‘कानपूर येथे ‘आयआयटी कानपूर’ या शिक्षण संस्थेत शिकणारे शेकडो विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची माहिती प्रशासनाने केलेल्या अंतर्गत चौकशीतून उघडकीस आली आहे. याविषयी आयआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी सांगितले, ‘‘ही आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. याविषयी जिल्हा न्यायदंडाधिकारी सुरेंद्र सिंह यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.’’  महाविद्यालयांतील एक तृतीयांश विद्यार्थी मद्यसेवन करतात !

२. मद्यसेवन

‘मेडिकल अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्स’ अहवालातील माहिती !

‘गोव्यात महाविद्यालयांतील ३४.१० टक्के (एक तृतीयांश) महाविद्यालयीन विद्यार्थी मद्यसेवन करतात. त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण ३१.८ टक्के असून विद्यार्थ्यांचे प्रमाण ३९.१८ टक्के आहे. महाविद्यालयातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांना मद्याच्या दुष्परिणामाविषयी कोणी काहीही सांगितलेले नाही, असे सांगितले आहे. ‘गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मद्यसेवन आणि त्याच्या परिणामाविषयी त्यांची जाण’ यासंबंधी ‘मेडिकल अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात माहिती देण्यात आली आहे, असे वृत्त ‘द गोवन वार्ता’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.’

३. आत्महत्या

तीन मासांत गोव्यात २२ युवकांची आत्महत्या !

‘सर्वाधिक आत्महत्या होणार्‍या राज्यांमध्ये गोवा हे लहान राज्य ५व्या क्रमांकावर आहे. येथे फेब्रुवारी ते मे २०१६ या काळात १६ ते १८ वयोगटातील २२ मुलांनी आत्महत्या केली आहे. यात मुलांची संख्या अधिक आहे.’ (२३.९.२०१६)

‘आयपीएल्’चा सामना पहातांना आई ओरडल्याने गळफास लावून मुलाची आत्महत्या !

‘‘इंडियन प्रिमिअर लीग’ या टी-२० क्रिकेटचा सामना पहातांना आई ओरडल्यामुळे मुंबईतील नीलेश गुप्ता (वय १८ वर्षे) याने गळफास लावून आत्महत्या केली. ९ एप्रिल २०१८ च्या रात्री तो क्रिकेटचा सामना पहात होता. आईने त्याला घराबाहेरील पाण्याची टाकी भरली का ?, ते पहायला सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये भांडण होऊन त्याने आत्महत्या केली.’ (१३.४.२०१८)

युवकांनो, या स्थितीवर मात करण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. साधना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी click करा. 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment