चीनवरील भारतीय संस्कृतीचा प्रभाव

Article also available in :

अनुक्रमणिका

१. चीन, तिबेट आणि भारत यांचे सांस्कृतिक संबंध

वा.ना. उत्पात

‘फार प्राचीन काळापासून चीन, तिबेट आणि भारत यांचे सांस्कृतिक संबंध होते. तिबेटला त्रिविष्टप म्हणजे ‘स्वर्ग’ म्हटले आहे. मनूने चीनचा उल्लेख केला आहे (इ.स.पू. ८०००). पाणिनीने (इ.स.पू. २१०० वर्षे) रेशीम चीनमधून येते; म्हणून त्यास ‘चीनांशुक’ म्हटले आहे.

 

२. भारत चीनचा गुरु !

ऑरेल स्टीन आपल्या ‘सर इंडिया’ ग्रंथात म्हणतो, ‘‘तुर्कस्तान खोतान (गोस्थान) इथे भारतीय राज्ये भरभराटली होती. तिथे राज्यकारभारात भारतीय भाषेचा उपयोग होत होता, हे तेथील नाणी, कोरीव लेख यांवरून सिद्ध होते. तिथे श्रीविष्णूची पूजा होत होती. नंतर बुद्धांची पूजा होऊ लागली. तसेच तेथे संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी परिचित होती.’

चीनचे इतिहासकार, पंडित, विद्वान काही राजकारणीसुद्धा ‘हिंदुस्थान हा चीनचा गुरु’ असल्याचे मान्य करतात. वर्ष १९६२ पर्यंत चीन-भारत मैत्री अखंड होती. पूर्वी सहस्रो वर्षे दोन्ही देशांत धार्मिक आणि सांस्कृतिक मैत्री होती.

‘विस्डम ऑफ इंडिया’ या ग्रंथात लिन युटांग म्हणतो, ‘‘हिंदुस्थान हा धर्म आणि कल्पक वाङ्मय या विषयात चीनचा गुरु अन् त्रिकोणामिती, वर्गसमीकरण, व्याकरण, ध्वनीशास्त्र, अरेबियन नाईट्स, प्राण्यांचा खेळ, बुद्धीबळाचा खेळ, तत्त्वज्ञान या विषयांत अखिल जगाचा गुरु होता. बोकॅशिओ, गटे, शपेनहॅमर, इमर्सन यांनी भारतापासून प्रेरणा घेतली.’’

चिनी पंडित सहस्रो मैलांचा खडतर प्रवास करून शिकण्यासाठी भारतात येत. हिंदु पंडित, योगी यांना चीनमध्ये मोठी मागणी होती. त्या वेळी त्यांच्या लोयांग या राजधानीत ५० सहस्र हिंदु आणि ३ सहस्र भारतीय पुरोहित होते. बौद्ध धर्म चीनला जाण्यापूर्वीसुद्धा भारत-चीन संबंध होते. इ.स.पू. १२१२ म्हणजे ३ सहस्र २०० वर्षांपूर्वीपासून भारत-चीन संबंध होते.

 

३. मनुस्मृतीच्या द्वेष्ट्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

एक संशोधक पंडित मोटवानी म्हणतात, ‘‘चीनला मनुस्मृतीचा परिचय होता.’’ ते सांगतात, ‘‘वर्ष १९३२ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. त्यात चिनी तटबंदीचा काही भाग उद्ध्वस्त झाला. तिथे जमिनीत खोल विवरात एका डब्यात एक हस्तलिखित मिळाले. ते हस्तलिखित सर ऑगस्ट्स फ्रिटझ जॉर्ज यांनी खरेदी करून लंडनला आणले आणि प्रा. अँथनी ग्रेमी यांच्या नेतृत्वाखालील चिनी तज्ञांच्या गटाकडे सुपुर्द केले. त्यात १० सहस्र वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीचा उल्लेख मिळाला. ते हस्तलिखित वैदिक भाषेत होते.

 

४. चिनी तत्त्ववेत्ता ताओ यांचे आत्म्याविषयीचे तत्त्वज्ञान वैदिक तत्त्वज्ञानच आहे.

 

५. हिंदु धर्माचा तिरस्कार करणारे बौद्ध हे वास्तव जाणतील का ?

तत्त्ववेत्ता लिंग म्हणतो, ‘‘पुरातन काळापासून चीनच्या उत्तरेला सुसंस्कृत प्रदेश नव्हता. पूर्वेला पॅसिफिक महासागराकडून सभ्यतेचा एक शब्द येण्याची शक्यता नव्हती. पश्चिमेकडे तर सारी राष्ट्रे संस्कृतीहीन होती. केवळ एकमेव नैऋत्येकडून (भारताकडून) संस्कृती येण्याची शक्यता होती. त्यांच्याशी आमची मैत्री झाली.

ख्रिस्ती युगाची पहिली ८०० वर्षे इ.स. १ ते ८०० भारताकडून अनेक विचारवंत, संत, बौद्ध भिक्षु चीनला येत होते. त्यातील २४ जणांची नावे प्रख्यात आहेत. काश्मीरमधून आमच्याकडे १३ दूत आले. चीनमधून १८७ थोर पंडित आदरभाव आणि संदेश घेऊन हिंदुस्थानात गेले. त्यातील १०५ जणांची नावे उपलब्ध आहेत. भारतीय इतिहासातसुद्धा फार्‍हीन, ह्युएनत्संग, इत्सिंग ही नावे आहेत. एक चिनी पंडित म्हणतो, ‘‘भारताला चीनकडून कशाचाही लोभ नव्हता, तरीही त्यांनी आम्हाला मोक्ष, मैत्री यांची साधना शिकवली. त्यांचे वाङ्मय, कला, शिक्षण, संगीत, चित्रकला, वास्तुशास्त्र, शिल्पकला, नाट्य यांपासून आम्हाला प्रेरणा मिळाली. भारतियांनी येतांना आपल्यासमवेत खगोलशास्त्र, औषधीशास्त्र, सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या भेटी आणल्या.’’

 

६. चीनसह वेगवेगळ्या देशात हिंदु धर्म

वर्ष १२५८ मध्ये कुब्लाईखानने बौद्ध धर्माच्या बाजूने कौल दिला. तेव्हापासून बौद्ध धर्म हा चीनचा जवळ जवळ राष्ट्रधर्म झाला. त्याप्रसंगी ३०० बौद्ध भिक्षु २०० ताओपंथी, २०० कॉन्फ्युशियन पंडितांनी हजेरी लावली. १९ वर्षांच्या फागरपा या तिबेटी बौद्ध भिक्षूने वक्तृत्वाच्या बळावर बौद्धधर्म श्रेष्ठ ठरवला.

या काळात काबूल, गांधार, कुभा, सेतुमंत आणि चाक्षुष या प्रदेशात म्हणजे काबूल, कंदाहार (अफगाणिस्तान), हेलमुंड, ऑक्सस या प्रदेशात हिंदु अन् बौद्ध धर्म होता. इराणमध्येही हिंदु धर्मच होता. या प्रदेशात मंदिरे, स्तूप, बुद्ध मूर्ती शेकड्यांनी होत्या. १७ व्या शतकात अकबराच्या एका मंत्र्याने त्यांची संख्या १२ सहस्र असल्याचे लिहिले आहे. पैकी बामियान येथील बुद्धाची प्रचंड मूर्ती अफगाणमधील धर्मांधांनी फोडून नष्ट केली. इतर मंदिरे, स्तूप, विहारही जिहादी धर्मांधांनी उद्ध्वस्त केले. अफगाणिस्तानचे पूर्वीचे नाव ‘अरियाना’ (आर्यभूमी), जलालाबादचे ‘नगरप्रहार’ आणि वेग्रामचे नाव ‘कपिशा’ होते.

चीनमध्ये एका मंदिरात असलेल्या हिंदु देवतांच्या मूर्ती (संदर्भ : संकेतस्थळ)

 

७. चीनमधील बौद्ध संस्कृतीतील हिंदुत्व

अ. वर्ष १८९१ मध्ये चीनच्या अंतर्भागात कर्नल बॉबरला बर्चवृक्षाच्या सालीवर एकूण ७ लेख मिळाले. त्यातील ३ औषधींविषयी होते. त्यात नवनीतक हा सर्वांत मोठा लेख होता आणि त्याचे १६ विभाग होते. त्यात चूर्ण, आसवे, अर्क, तेल सिद्ध करणे, औषधे अंगात मुरवणे, मुलांचे संगोपन, औषधांच्या कृती इत्यादींची चर्चा होती. सर्व लेख पद्यमय आहेत. भाषा प्राकृतमिश्रित संस्कृत आहे. त्याचा शेवटचा भाग गहाळ झाल्यामुळे लेखकाचे नाव नाही. त्यात अग्निवेश, भेद, हरित, जातुकर्ण, क्षारपाणी आणि पराशर यांची नावे आहेत.

त्यापेक्षाही पूर्वीची हस्तलिखिते चीनमध्ये सापडली आहेत. अश्वघोषाचा नाट्यविषयक लेखांक जर्मन मिशनला मिळाला आणि प्रा. लूडर्सने प्रकाशित केला. फ्रेंच मिशनला धम्मपदाच्या संस्कृत अनुवादाचे हस्तलिखित मिळाले.

आ. एमपेलिएट यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच पथकाने संस्कृत आणि कुचियन भाषेतील १५ सहस्र सुरळ्या अभ्यासल्या. त्यातील अनेक लेख बौद्ध धर्मावरचे होते. ते ११ व्या शतकापूर्वीचे होते. ते आक्रमणकर्त्यांपासून लपवण्यासाठी भिंतीत लपवले होते. त्यांचा शोध योगायोगाने वर्ष १९०० मध्ये लागला. भारतीय संस्कृतीचा उल्लेख असलेले सहस्रो लेख आहेत. ते लेख संस्कृत, प्राकृत, सोग्डीयन, तुर्की, तिबेटी, चिनी, तसेच विस्मृतीत गेलेल्या भाषेतील आहेत. त्यात चीनमधील भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाचे सहस्रो पुरावे आहेत.

 

८. भारतियांकडून भारतीय संस्कृतीचा चिनी संस्कृतीवर उमटवलेला ठसा

अ. चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार होण्यास काश्मीरचा मोठा सहभाग आहे. काश्मीरमधून पुष्कळ पंडित चीनला गेले. त्यात विख्यात असा ‘परमार्थ’ नावाचा पंडित होता. (इ.स. ५४६) त्याने ७० बौद्ध ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद केला. ब्राह्मण पंडितसुद्धा चीनमध्ये गेले. इ.स. ५६२ मध्ये ‘विनीतरुची’ नावाचा दक्षिण भारतातील ब्राह्मण चीनच्या राजधानीला गेला. त्याने दोन ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद केला. तेथून तो तोनकिनला गेला आणि तेथे त्याने एक ध्यानकेंद्र उभारले.

चीनमध्ये सापडलेले हत्ती शिवपिंडीला अभिषेक करतांनाचे शिल्प, तसेच बाजूच्या चित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण, नृसिंह यांसह अन्य देवतांचे कोरीव शिल्प (संदर्भ : संकेतस्थळ)

आ. दक्षिण चीनच्या क्वाबाझॉन बंदरात झालेल्या उत्खननात शिव, श्रीविष्णु, हनुमान, लक्ष्मी, गरुड यांच्या मूर्ती सापडल्या आहेत.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या १८ फेब्रुवारी १९८७ च्या अंकात याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानुसार नृसिंहाच्या दगडात कोरलेल्या ७३ मूर्ती मिळाल्या. पार्वतीसमवेत शिवाची कोरलेली असंख्य चित्रे मिळाली. त्यात बैल, हत्ती आणि इतर प्राणी त्याला वंदन करत आहेत. हे सारे युआन वंशाच्या काळातील (इ.स. १२६० ते १३६८) मंदिरात आढळले.

इ. तांग वंशाच्या काळात (इ.स. ६१८ ते ९६०) क्वांगझॉन येथे ब्राह्मणांनी आश्रम उभारले आणि मोठ्या संख्येने तेथे ब्रह्मचारी रहात होते.

ई. चेई राजवंशातील राजांनी ४७ मठ बांधले. नागरिकांनी खासगीरित्या ३० सहस्र मंदिरे उभारली. त्यात रहाणार्‍या भिक्षु-भिक्षुणींची संख्या २० लाखांहून अधिक होती.

उ. चीनमध्ये बौद्ध धर्म गेल्यावर भारतीय कलासुद्धा तेथे गेल्या. युनवानमध्ये पर्वत फोडून गुहा उभारल्या. ज्यात ७० फूट उंचीच्या बुद्ध मूर्ती उभारल्या. अजंठा लेणीप्रमाणे भिंतीवर रंगीत चित्रे काढली गेली. शाक्यबुद्ध, बुद्धकीर्ति, कुमार बोधी हे ३ चित्रकार चीनला गेले. त्यांनी या कलाकृती निर्माण केल्या. गांधार, गुप्त, मथुरा शैलीचे सर्व नमुने त्यात आहेत.

ऊ. भारतीय संगीतानेसुद्धा चिनी संगीतावर आपला ठसा उमटवला. ‘कुची’ नावाच्या ब्राह्मणाने हे कार्य केले. इ.स. ५८१ मध्ये हिंदी संगीतकाराचे एक पथक चीनला गेले. तांग काळात ‘बोधी’ नावाच्या एका ब्राह्मणाने त्याला ‘बोधीसत्त्व’ आणि ‘भैरो’ या नावाचे दोन संगीत प्रकार बसवले. ते जपानमध्येसुद्धा चालू केले.

ए. खगोलशास्त्र, गणित, औषधी ही शास्त्रे भारतियांनी चीनमध्ये नेली. ‘नवग्रह सिद्धांत’ या खगोलशास्त्राच्या ग्रंथाचे तांग काळात चिनी भाषेत भाषांतर झाले. भारतीय औषधीशास्त्र चीनमध्ये लोकप्रिय झाले. ‘रावणकुमारचरित’ या बालरोगावरील संस्कृत ग्रंथाचे चिनी भाषेत ११ व्या शतकात भाषांतर झाले.

ऐ. याशिवाय बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, सत्कर्म या संबंधीचे आणि भारतीय विचार चीनमध्ये रूढ झाले. चीनचे प्रसिद्ध तत्त्वज्ञ ताओ आणि लाओत्से यांच्या विचारांवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. बोधी धर्म नावाचा बौद्ध गुरु कांचीपूरम् या नगरातून चीनला गेला. त्याने तिकडे लोकांना आणि राजाला ध्यान शिकवले, त्यालाच ‘झेन’ म्हणतात. जपानमध्ये ‘चान’ म्हणतात.

 

९. हिंदु धर्माची शिकवण सहिष्णू असल्याचे प्रमाण !

अ. ह्युएनत्संग

बौद्धधर्मी महान भिक्षु होता. त्याचा जन्म इ.स. ६०० मध्ये सनातनी कन्फ्युशियन परिवारात झाला. तो वयाच्या २० व्या वर्षी भिक्षु झाला. चिनी भाषेतील बौद्ध वाङ्मयाचा त्याने अभ्यास केला; पण त्याचे समाधान झाले नाही; म्हणून त्याने हिंदुस्थानात जाऊन मूळ ग्रंथांचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. इ.स. ६२९ मध्ये तो चीनमधून निघाला. मध्य आशियातील मार्गाने एक वर्षाने तो काफिरीस्तान (कपिशा) येथे पोचला आणि तेथून काश्मीरला आला. तेथील संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. त्यानंतर तो नालंदा विद्यापिठात गेला. विद्यापिठातील आचार्य शीलभद्र यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध ग्रंथाचा योगाचार पद्धतीचा अभ्यास केला. नंतर त्याने सम्राट हर्षवर्धनाची भेट घेतली. राजाने त्याची शाही व्यवस्था करून त्याचा सन्मान केला. बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. कामरूपच्या राजानेही त्याचा सन्मान केला. इ.स. ६४४ मध्ये त्याने भारत सोडला. त्याने जातांना स्वतःसमवेत संस्कृत भाषेतील बौद्ध धर्मविषयक गाडाभर पुस्तके नेली. त्याची परत जाण्याची व्यवस्था सम्राट हर्षाने केली. त्याला लष्करी संरक्षक, हत्ती आणि आवश्यक ते साहित्य दिले.

भारताच्या पवित्रभूमीच्या दर्शनाने ह्युएनत्संगला अतिशय संतोष झाला. त्याने उद्गार काढले, ‘मी गृधकुट पर्वताचे अवलोकन केले. बोधीवृक्षाचे पूजन केले. पूर्वी कधी न पाहिलेले अवशेष पाहिले. पूर्वी न ऐकलेले पवित्र शब्द श्रवण केले. सार्‍या निसर्गपूजकांना मागे टाकणार्‍या अध्यात्मक्षेत्रातील असामान्य व्यक्ती समक्ष पाहिल्या.’ आयुष्याच्या उर्वरित काळात त्याने संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत अनुवाद केले. शिष्यांना त्याचे शिक्षण दिले. इ.स. ६६० साली तो मृत्यू पावला. भारत चीन संबंधातील हा एक मैलाचा दगड ठरला.

आ. इत्सिंग

ह्युएनत्संग यांच्यामुळे चीनमधील जिज्ञासूंना प्रेरणा मिळाली आणि अनेक चिनी भिक्षु भारतात आले. त्यापैकी इत्सिंग हा वर्ष ६७१ मध्ये चीनमधून निघून सागरी मार्गाने भारतात आला आणि तो नालंदामध्ये राहिला. वर्ष ६७५ ते ६८५ अशी १० वर्षे तो भारतात होता. त्याने आपल्या समवेत ४०० संस्कृत ग्रंथ नेले. त्यांची चिनी भाषेत भाषांतरे केली. चिनी-संस्कृत शब्दकोषांची रचना केली. विविध देशांतील ६० बौद्ध भिक्षूंची चरित्रे लिहिली.

इ. युवानच्वांग

युवानच्वांग नावाचा भिक्षु चीनमधून भारतात अभ्यासासाठी आला होता. त्याच्या वर्णनानुसार नालंदात १० सहस्र भिक्षु रहात होते. ते रहाण्यासाठी ४ सहस्र खोल्या होत्या, तसेच १ सहस्र ५०० अध्यापक होते. तो नालंदात ७ वर्षे रहात होता.

 

१०. चीनमध्ये संस्कृत भाषा होती, याचे पुरावे दर्शवणारी काही उदाहरणे

अ. चीनमध्ये संस्कृत भाषा होती, याचे पुरावे आहेत. पेकिंगपासून ४० मैलावर उत्तरेस कनयुंग क्वान येथे एका कमानीवर कोरलेल्या लेखात ६ विविध भाषा आहेत. त्यात एक लेख संस्कृत भाषेतील आहे.

आ. चीनमध्ये काही मंदिरांवर उत्खननात सापडलेल्या वस्तूंवर रामायणातील दृश्ये कोरलेली आहेत. कोंग सांग या चिनी लेखकाने इ.स. २५१ मध्ये रामायणाचा चिनी भाषेत अनुवाद केला. दक्षिण चीनमध्ये क्वांझोन येथील उत्खननात हनुमानाची मूर्ती सापडली. ती युआन घराण्याच्या काळातील आहे. दक्षिण चीनमधील क्वांओ प्रांतात युआन घराण्याच्या मालकीची शिवमूर्ती सापडली आहे.

 

११. संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू पहाणारा भारत !

ॲरियन हा ‘इंडिका’ ग्रंथात म्हणतो, ‘‘भारत हा आजतागायत इतिहासातील नवल होऊन राहिला आहे. त्याने पारमार्थिक विजय मिळवला. आंतरराष्ट्रीयवादाचा पाठपुरावा केला. कोणावरही आक्रमण केले नाही. सर्व जगात आपली संस्कृती नेली. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू’ हा संदेश भारतियांनी जगात नेला. त्यामुळे जगातील प्रत्येक देशात भारतीय संस्कृतीच्या सहस्रो खुणा आहेत.’’

चीन आणि भारत यांची सांस्कृतिक देवाण-घेवाण प्राचीन काळापासून होती. ‘चायना’ हा शब्द संस्कृत चीनपासून आला आहे. चीनमधील साम्यवाद्यांचे आक्रमण होईपर्यंत (वर्ष १९६२) या दोन देशात कधीच संघर्ष झाला नाही. दोघेही उत्तम शेजारी होते. त्यांच्यात सामंजस्य आणि सदिच्छा होती. केवळ सत्य, स्वार्थ, त्याग, कला, साहित्य या पायावर चीन आणि भारत यांचे सांस्कृतिक बंध निर्माण झाले. बौद्ध धर्माच्या चिनी संहिता स्वतःचे गुणगान न करता भारतीय भिक्षूंनी सिद्ध केल्या.

– भागवताचार्य वा. ना. उत्पात
(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, एप्रिल २०१७)

Leave a Comment