मज्जातंतूशास्त्रानुसार संस्कृत भाषेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो !

वैदिक मंत्रांचा जप करण्यातील सामर्थ्य विज्ञान सिद्ध करते !

नवी देहली –  कठोर परिश्रम करून केलेले पाठांतर मेंदूला कशा प्रकारे साहाय्य करते, हेे मज्जातंतूशास्त्र (न्यूरोसायन्स) सिद्ध करते. मज्जातंतूशास्त्राचे अभ्यासक डॉ. जेम्स हार्टझेल यांनी ‘संस्कृत भाषेचा परिणाम’ प्रथमच प्रस्थापित केला. त्यासाठी त्यांनी २१ संस्कृत पंडितांचा अभ्यास केला. त्यांनी संशोधन करून हे दाखवून दिले की, वैदिक मंत्रांचे पाठांतर मेंदूच्या संज्ञानात्मक कार्याशी (Cognitive function) संबंधित क्षेत्राचा आकार वाढवते. यामध्ये अल्प आणि दीर्घकालीन स्मृतींचा समावेश आहे. त्यांनी केलेल्या या संशोधनाने ‘वैदिक मंत्रांचे पठण केल्याने स्मरणशक्ती आणि विचारशक्ती वाढते’ या भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी मिळते.

 

संशोधक डॉ. हार्टझेल यांचे अथक परिश्रम !

डॉ. हार्टझेल हे एक संस्कृत भाषेला वाहून घेतलेले स्पेन देशातील बास्क येथील ‘सेंटर ऑन कॉग्निशन, ब्रेन अँड लँग्वेज’ या विभागातील पदव्युत्तर संशोधक आहेत. त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास आणि भाषांतर करण्यात बरीच वर्षे घालवली असून संस्कृत भाषेच्या मेंदूवर होणार्‍या परिणामामुळे ते आश्‍चर्यचकित झाले आहेत.

 

संशोधन करतांना डॉ. हार्टझेल यांच्याच स्मरणशक्तीत वाढ !

डॉ. हार्टझेले म्हणतात, ‘‘मी संस्कृत भाषेचा अभ्यास आणि भाषांतर जेवढे अधिक केले, तेवढी माझी स्मरणशक्ती अधिक चांगली झाल्यासारखी मला वाटते. मी वर्गात देत असलेल्या एखाद्या व्याख्यानाची दुसर्‍या वर्गात पुन्हा जशीच्या तशी पुनरावृत्ती करत असल्याविषयी शिक्षक आणि विद्यार्थी आश्‍चर्य व्यक्त करतात. संस्कृत भाषेचे भाषांतर करणार्‍या अन्य काही जणांनीही त्यांच्यामध्ये झालेल्या अशा प्रकारच्या आकलनक्षमतेच्या वाढीविषयी मला सांगितले आहे.

भारताचे वैदिक संस्कृत पंडित ३ सहस्र वर्षे प्राचीन ग्रंथांतील ४० सहस्र ते १०० सहस्र शब्दांचा समावेश असलेले उतारे तोंडपाठ करून जसेच्या तसे म्हणण्याचे प्रशिक्षण इतरांना वर्षानुवर्षे देत आहेत. संस्कृतच्या अशा शाब्दिक स्मरणाच्या कठोर प्रशिक्षणामुळे त्यांच्या मेंदूच्या शारीरिक संरचनेवर कसा परिणाम होतो, हे आम्हाला अभ्यासायचे होते.’’

 

२१ संस्कृत पंडित आणि २१ सामान्य लोक यांच्यावर संशोधन

डॉ. हार्टझेल यांचे संशोधन हा संस्कृत अभ्यासकांच्या मेंदूचे परीक्षण करण्याचा पहिला प्रयत्न होता. भारताच्या ‘नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर’मध्ये (राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्रामध्ये) डॉ. हार्टझेल यांनी ‘स्ट्रक्चरल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग’ (एम्.आर्.आय.) वापरून २१ संस्कृत पंडित आणि २१ सामान्य लोक यांच्या मेंदूचे निरीक्षण (स्कॅन) केले.

डॉ. हार्टझेल म्हणतात, ‘‘स्ट्रक्चरल एम्.आर्.आय. स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळून आले, ते विलक्षण होते. पंडितांच्या मेंदूतील अधिक भाग हा सामान्य लोकांच्या मेंदूच्या तुलनेत बराच विकसित झाला होता. पंडितांच्या दोन्ही मेंदूशी (मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागाशी) संबंधित (सेरेब्रल) गोलार्धांमध्ये (हेमीस्फिअर) ‘ग्रे मॅटर’ (न्यूरल टिशूज) १० टक्क्यांहून अधिक असल्याचे आणि त्यांच्या ‘कॉर्टिकल’च्या (cortical) जाडीत भरीव वाढ झाल्याचे दिसून आले. जरी संस्कृत पंडितांच्या मेंदूमधील ‘ग्रे मॅटर’ वाढीच्या आणि ‘कॉर्टिकल’ जाडीच्या कारणांचे अचूक मोजमाप करण्याचे संशोधन कार्य अद्याप चालू असले, तरी त्यांच्यामध्ये वाढलेली जाण आणि आकलनक्षमता यांच्याशी ते मिळतेजुळते आहे.’’

डॉ. हार्टझेल यांच्या अहवालानुसार अल्प आणि दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या, तसेच ध्वनी, दृश्य अन् काळ यांच्याशी संबंधित स्मृतींच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍या उजव्या मेंदूमधील ‘हिप्पोकॅम्पस’ या भागामध्ये ‘ग्रे मॅटर’ अधिक असण्याचे प्रमाण सामान्य व्यक्तींपेक्षा संस्कृत पंडितांमध्ये अधिक होते. बोलण्यातील छंदशास्त्र (स्पीच प्रॉसॉडी) आणि आवाजाची ओळख यांच्याशी निगडित योग्य अशा उजव्या मेंदूमधील ‘टेम्पोरल कॉर्टेक्स’ हा भागही संस्कृत पंडितांमध्ये सामान्यांपेक्षा बर्‍यापैकी जाड होता.

 

अजून संशोधन करण्याची आवश्यकता !

मेंदूमध्ये लक्षात आलेले वरील पालट हे संस्कृत भाषेचा परिणाम आहे, याची डॉ. हार्टझेल यांना निश्‍चिती नाही; म्हणून त्यांची पुढील संशोधन करण्याची योजना आहे. त्यांच्याकडून ‘ध्वनी आणि मंत्रजप यांचे सामर्थ्य’ या विषयावर व्यापक स्वरूपात अभ्यास आणि लिखाण होत आहे.

डॉ. हार्टझेल यांच्या अलीकडील अभ्यासानुसार असा प्रश्‍न उपस्थित होतो की, प्राचीन धर्मग्रंथांतील श्‍लोकांचे पाठांतर अल्झाइयमर आणि स्मरणशक्तीविषयी होणारे इतर आजार न्यून होण्यास उपयोगी ठरू शकेल का ? भारतातील आयुर्वेदिय वैद्य याला होकार देतात आणि म्हणतात, ‘याविषयी भविष्यात अभ्यास केला जाईल, तसेच संस्कृतविषयी अधिक संशोधन केले जाईल.’

 

पूर्वीचे संशोधन

वर्ष १९६७ मध्ये फ्रेंच वैद्य, मानसशास्त्रज्ञ आणि कानाचे विशेषज्ञ असलेल्या अल्फ्रेड टोमॅटिस यांनी प्रतिदिन ८ घंट्यांपर्यंत मंत्रजप करण्याचे कठोर वेळापत्रक आखलेल्या बेनेडिक्टिन भिक्षूंवर जप करण्याच्या परिणामाचा अभ्यास केला. जेव्हा नवीन आलेल्या धर्मगुरूंनी या भिक्षूंच्या वेळापत्रकात पालट करून त्यांच्या जपाची वेळ न्यून केली, तेव्हा भिक्षूंना अधिक झोप मिळत असूनही ते आळशी बनल्याचे आढळून आले. त्यांना जितकी अधिक झोप मिळाली, तितकी त्यांच्या आळसामध्ये वाढ झाली. ‘जप त्यांच्या मेंदूला आणि शरीराला उत्तेजन देत आहे’, असा अल्फ्रेड टोमॅटिस यांचा विश्‍वास होता. त्याने जपाचे वेळापत्रक पूर्ववत केल्यावर भिक्षू संन्यासी लवकरच पुन्हा ऊर्जेने भारित झाले. विशेष म्हणजे ५० वर्षांपूर्वी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने नमूद केले होते की, ग्रेगोरियन मंत्राचे उच्चारण करणार्‍या ख्रिस्ती भिक्षूंची स्मरणशक्ती असामान्य होती.

‘वैदिक मंत्र किंवा श्‍लोक यांचा जप करणार्‍यांच्या देहामध्ये आणि अगदी छोटासा जप केल्याने मनात उत्साह निर्माण होऊन आध्यात्मिक उपाय होऊ शकतात’, असेही लक्षात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment