देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता

Article also available in :

अनुक्रमणिका

‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।’

अर्थ : सर्व भाषांमध्ये देववाणी संस्कृत ही प्रमुख भाषा असून ती मधुर आणि दिव्य आहे.

 

१. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत !

संस्कृत ही मृत भाषा, विशिष्ट समाजाची भाषा, उपयोगी नसलेली भाषा असे हिणवण्यापेक्षा प्रत्येकाने ही भाषा शिकण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला निश्चित शांती लाभेल. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत भाषा ! व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दांची रचना करून वाक्य सिद्ध केल्यास, त्यातील शब्दांचा क्रम कसाही पालटला, तरी त्याच्या अर्थात पालट होऊ शकणार नाही.

 

२. पूर्वजांनी दिलेले ज्ञान शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्वांनाच उपयोगी पडणारे असणे

आपल्या पूर्वजांनी, भारतात रहाणार्‍या आपल्या ज्येष्ठ व्यक्तींनी जे शास्त्रीय ज्ञान अनुभवाच्या कसोटीवर घासून आपल्यापुढे अनुभव रूपाने मांडले, त्यातल्या अनुभवांना तो केवळ आपल्या जातीचा नाही; म्हणून नाकारणार आहोत का ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्ञान हे ज्ञानच असते. ते शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्वांनाच उपयोगी पडणारे असते. ते बहुसंख्य, अल्पसंख्य, सर्वांनाच मानवणारे, सांभाळणारे, जपणारे असते. त्याच्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नसतो. ज्ञान दिल्याने वाढते, तर आपल्याजवळ ठेवल्याने नाश होण्याची शक्यता असते.

 

३. संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे जिद्द निर्माण करतात.

संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे, रामरक्षा, सूर्यकवच, गणपति अथर्वशीर्ष, प्रज्ञा विवर्धन इत्यादि स्तोत्रे मानवाच्या मनात शांती आणि नवनवीन करण्याची जिद्द निर्माण करतात.’

– डॉ. श्रीधर म. देशमुख
(संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)

 

४. भाषांतरासाठी संस्कृत सर्वश्रेष्ठ माध्यम असून जगातील
कोणत्याही भाषेत तिचे भाषांतर केल्यास मूळ अर्थ पालटत नसणे

या गुणांमुळे संस्कृत भाषेला भाषांतराचे सर्वश्रेष्ठ माध्यम मानले आहे. आपण कोणत्याही भाषेतील वाक्यांचे संस्कृतमध्ये सहजपणे भाषांतर करू शकतो आणि संस्कृतमधील लिखाणाचे भाषांतर कोणत्याही तिसर्‍या भाषेत करू शकतो. संस्कृत भाषेतील भाषांतर सर्वांत योग्य असेल, याची निश्‍चिती देता येईल; परंतु अन्य कोणत्याही भाषेतून दुसर्‍या भाषेत आणि तिच्यातून तिसर्‍या भाषेत सरळ भाषांतर केल्यानंतर अर्थ पालटणार नाही, याची आपण शाश्‍वती देऊ शकत नाही. संस्कृतमध्ये अनुवाद केल्यानंतर जगातील इतर कोणत्याही भाषेत भाषांतर केल्यावर त्याचा मूळ अर्थ पालटत नाही; परंतु अन्य भाषांतून थेट भाषांतर केवळ एकाच भाषेत केले जाऊ शकतेे.

 

५. संक्षिप्तता या गुणामुळे संगणकीय
प्रणालीसाठीही संस्कृत सर्वश्रेष्ठ भाषा मानली जाणे

संक्षिप्तता या गुणामुळे संस्कृतला संगणकीय प्रणालीसाठीही सर्वश्रेष्ठ भाषा मानण्यात आले आहे. असे असले, तरी अजूनपर्यंत संस्कृत भाषेचा उपयोग या कार्यासाठी केलेला नाही. यासाठी राष्ट्रप्रेमी वैज्ञानिकांनाच पुढाकार घ्यावा लागेेल.

 

६. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी असलेल्या अन् देवनागरी
लिपीत लिहिली जात असल्याने संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असणे

संस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही. यामध्ये स्वर आणि व्यंजन यांची संख्याही आवश्यक आणि पुरेशी आहे. यासाठी संगणकामध्ये ध्वनीवर आधारित वापर करण्यासाठी संस्कृत सर्वश्रेष्ठ भाषा मानली गेली आहे.

 

७. संस्कृत संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असण्याची अन्य कारणे

या व्यतिरिक्त संस्कृत संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असण्याची अनेक अन्य कारणे आहेत. तिच्यातील शब्द सामर्थ्य, भाव अभिव्यक्ती सामर्थ्य आणि विपुल वाङ्मय यांपुढे जगातील कोणतीच भाषा टिकू शकणार नाही.

 

८. विश्‍व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प वदतु
संस्कृतम् । पठतु संस्कृतम् । जयतु भारतम् । म्हणजे
संस्कृत बोला. संस्कृतचा अभ्यास करा. भारताचा विजय असो

विश्‍व संस्कृत दिवस श्रावण शुक्ल पक्ष पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी असतो. या शुभ दिवशी आपण पुढील संकल्प करूया.

राष्ट्राच्या अस्मितेच्या संवर्धनासाठी मी माझ्या व्यावहारिक भाषेत अधिकाधिक संस्कृत शब्दांचा उपयोग करीन, तसेच माझ्या दैनंदिन व्यवहारात संस्कृतचे छोटे छोटे वाक्य, श्‍लोक, मंत्र यांचा उपयोग करून सतत संस्कृत शिकणे आणि शिकवणे यांसाठी प्रयत्नशील राहीन.

अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि । (वाजसनेयी शुक्लयजुर्वेद, अध्याय १, कण्डिका ५) म्हणजे अनुष्ठेय व्रताच्या पालनकर्त्या अग्नि, मी तुझ्या अनुज्ञेने या व्रताचे अनुष्ठान करीन. हे तेजस्वरूप परमात्मा ! माझ्या या संकल्पाच्या पूर्तीसाठी मला सामर्थ्य दे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

९. संस्कृत भाषेमधील विलोमकाव्य !

‘विलोमकाव्य’ ही काव्याची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. ही रचना संस्कृत भाषेत आढळते. यातील शब्दरचना अशी असते की, यातील श्‍लोकाची पहिली ओळ ही शेवटच्या अक्षराकडून प्रथम अक्षराकडे (विलोम पद्धतीने म्हणजेच उलटी) वाचली असता दुसरा श्‍लोक सिद्ध होतो.

 

१०. संस्कृत भाषेने व्याकरणाचे किचकट नियम पाळूनही अद्भुत काव्य निर्माण करणे

जगातील सर्वांत जुन्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचा समावेश होतो. वेद, पुराणे, वैद्यकशास्त्र, वास्तूशास्त्र, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, युद्धशास्त्र, गणित, ज्योतिषविद्या, नृत्य, संगीत आणि शृंगार अशा अगणित विषयांवर संस्कृतमध्ये प्रचंड ज्ञानभांडार उपलब्ध आहे. याच संस्कृत भाषेने व्याकरणाचे किचकट आणि कडक नियम पाळूनही एक अद्भुत काव्य निर्माण केले आहे. हा चमत्कार केवळ योगायोगाने घडलेला नसून त्या वेळी अनेक मंडळी असे वाङ्मय लीलया निर्माण करत असत, असे वाटते.

 

११. प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे
संस्कृत भाषेतील एकाच ओळीत दडलेले वर्णन !

अनुमाने ४५० वर्षांपूर्वी मराठवाड्यातील दैवज्ञ सूर्यकवी यांनी ‘श्रीरामकृष्ण काव्यम्’ लिहिले आहे. हे काव्य अत्यंत अद्भुत आणि कदाचित जगातील एकमेव काव्य असून त्याची प्रत्येक ओळ सरळ वाचली असता, त्यात प्रभु रामचंद्रांविषयी सांगितले असून अगदी तीच मूळ संस्कृत ओळ उलट क्रमाने वाचल्यास त्यात भगवान श्रीकृष्णाविषयी काही वर्णन आहे.

यातील पहिलाच श्‍लोक असा आहे-

‘‘तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्रीः ।’’

११ अ. श्रीरामपक्षी अन्वयार्थ

‘सीतेची सुटका करणार्‍या, गंभीर हास्य असणार्‍या, भव्य असा अवतार असणार्‍या आणि ज्याच्यापासून सर्वत्र दया अन् शोभा प्राप्त होतात, अशांना (त्या श्रीरामचंद्रांना) मी वंदन करतो.

हीच ओळ उलट लिहीत गेल्यास-

‘श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम् ।’

११ आ. श्रीकृष्णपक्षी अन्वयार्थ

भव्य प्रभा असणार्‍या, सूर्य आणि चंद्र यांचाही जो देव असलेल्या, संहार करणार्‍यालाही (पूतनेलाही) मुक्ती देणार्‍या आणि सृष्टीला प्राणभूत असणार्‍या त्या यदुनंदनाला (श्रीकृष्णाला) मी वंदन करतो.

 

१२. विलोमकाव्य ही संस्कृत भाषेची अलौकिकता वाढवणारी !

या विलोमकाव्याविषयी संस्कृतचे गाढे विद्वान श्री. वेलणकर यांनी लिहिलेले पुस्तक ‘केशव भिकाजी ढवळे प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. त्यात श्री. वेलणकर यांनी वर्ष १५४२ मध्ये रचल्या गेलेल्या ‘रसिकरंजन’ या काव्याचा उल्लेख केला आहे. लक्ष्मणभट्ट पुत्र रामचंद्र याने रचलेल्या या काव्याची ओळ सरळ वाचली असता, ती शृंगाराचे वर्णन करणारी आहे, तर उलट वाचली असता त्याचा अर्थ वैराग्यपूर्ण असा आहे. या दोन पूर्ण विरुद्ध गोष्टींचा एकाच ओळीत असा मेळ घालणे, हे अत्यंत प्रशंसा करण्यायोग्य आहे.

या पुस्तकाच्या परिशिष्टात श्रीरामकवीविरचित श्रीरामकृष्ण विलोमकाव्याचे ५ श्‍लोकही दिले आहेत. शेवटी दिलेली पुष्पपात्र बंध काव्य, गोमूत्रिका बंध काव्य आणि कमलबंध काव्यही अशीच उत्सुकता वाढवणारी आहेत.

असे म्हणतात की, तंजावर येथील जगातील सर्वांत मोठ्या शिलालेखामध्ये अशा प्रकारे लेख आहे की, तो सरळ वाचल्यास रामायण आणि उलट वाचल्यास महाभारत आहे.

लेखक – मकरंद करंदीकर (दैनिक ‘सामना’, २.९.२०१५)