संस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड !

Dharmagrantha_Sanskruit_Cगेली ७ दशके सातत्याने मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतच विद्यार्थ्यांना शिकवली गेल्याने इंग्रजी भाषेलाच ‘करिअर’चा केंद्रबिंदू समजले जात आहे. इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते. संस्कृतचे महत्त्व लक्षात घेऊन तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःतील स्वभाषाभिमान वाढवण्याची अनिवार्यता लक्षात आणून देणारा लेख !

१. विदेशींनी ओळखलेले संस्कृत भाषेचे महत्त्व !

जे.टी. ग्लोव्हर हे लंडनमधील ‘सेंट जेम्स बॉइज स्कूल’चे उपप्राचार्य आहेत. ते वैदिक गणित शिकले. गेली २५ वर्षे ते लंडनमध्ये तो विषय शिकवत आहेत. प्रतिवर्षी १०० मुले गणित शिकून बाहेर पडतात. यात ब्रिटीश, अमेरिकन, चिनी, वेस्ट इंडियन्स आदी वंशाची मुले असतात; पण भारतीय नसतात. ‘हे भारतीय गणितशास्त्र भारतातील प्रत्येक शाळेत शिकवायला हवे’, असे ते आवर्जून सांगतात; पण गणकयंत्राची (‘कॅलक्युलेटर’ची) विक्री बंद होईल, अशी आपल्याला चिंता वाटते. जानेवारी २०११ मध्ये बेंगळूरुमधील नॅशनल हायस्कूलमध्ये विश्‍व संस्कृत पुस्तक मेळा भरला होता. त्या वेळी तिथे ग्लोव्हर आले होते. २५ वर्षीय मायकेल विल्यम्स हा तरुण मँचेस्टरहून या मेळ्यासाठी आला होता. तेथील विद्यापिठात तो संस्कृत शिकवतो आणि पीएच्डीचा अभ्यास करतो. तो सहजपणे संस्कृमध्ये बोलत होता. तो शांकरमताचा अभ्यासही करत आहे. या ठिकाणी बाहेरच्या देशातून येणारे अनेक संस्कृतप्रेमी पाहिल्यावर स्वतःचीच लाज वाटू लागते. बाहेरच्याने येऊन ‘तुमची भाषा उपयुक्त आहे. चांगली आहे. तिला जगवा’, असे सांगावे, यात आपला कमीपणा नव्हे का ? आपण तिला ‘मृतभाषा’ ठरवून टाकली आहे.

२. भारतातील शालेय अभ्यासक्रमात युरोपीय
विद्वानांच्या तत्त्वांचा समावेश; मात्र भारतातील श्रेष्ठ महापुरुषांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष !

आपल्याकडे राज्यशास्त्र शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पाश्‍चात्त्य आणि विशेषतः युरोपीय विद्वानांनी काय म्हटले आहे, तेच शिकवले जाते. यात प्लुटो, अ‍ॅरिस्टॉटल, मॅकियाव्हली आदींचा भरणा असतो; पण त्यांना चाणक्यनीती, श्रीकृष्णनीती, कणकनीती, विदूरनीती अथवा भीष्मनीती शिकवली जात नाही. कुठल्याही युरोपीय तत्त्ववेत्त्यापेक्षा आपल्याकडचे हे लोक श्रेष्ठ आणि विद्वान होते, हे शिकवले जात नाही, तर पुढच्या पिढीपर्यंत हे पोचेल कसे ? यासाठी संस्कृतचा अभ्यास हवा. तिथेच घोडे पेंड खाते. शाळा आणि महाविद्यालये आदी ठिकाणी संस्कृत विषय घेणार्‍यांची संख्या घटत आहे. समर्थांचा ‘दासबोध’ हा व्यवस्थापन अभ्यासासाठी (‘मॅनेजमेंट स्टडी’साठी) उपयुक्त ग्रंथ ब्रिटनमध्ये शिकवला जातो. आपल्याकडे ‘दासबोध’ जाळण्याची भाषा होते ! ते इंग्रजीतून आपल्या अभ्यासक्रमात लागू केले की, त्याची किंमत कळणार का ?

३. संस्कृत पुस्तक मेळाव्यात जमलेले संस्कृतप्रेमी हा आशेचा किरण

आशेचा किरण एवढाच की, त्या मेळ्यात गीता, योग, पर्यावरण, कला, विज्ञान, ललित आदी अनेक विषयांवरील पुस्तके, सीडी आणि डीव्हीडी मिळून ३०० प्रकाशने झाली. एकूण ४ कोटी रुपयांहून अधिक रकमेची पुस्तके विकली गेली आणि दानपात्रात ९० लक्ष रुपये जमले. संस्कृत पुस्तके खरेदीसाठी लोकांनी चक्क रांगा लावल्या होत्या. हे दृश्य स्वप्नवत वाटावे. मध्यप्रदेशातील ‘जिरी’ नामक संस्कृत गावाहून ४३ जण आले होते. या गावात केवळ संस्कृतच बोलली जाते. कर्नाटक आणि बिहारमध्ये अशी गावे असल्याचे कळते; मात्र त्यांची नावे ठाऊक नाहीत. संमेलनाला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल, नेपाळ, ब्रह्मदेश, पोलंड आदी देशांचे प्रतिनिधी आले होते.

४. पुरातन साहित्याचे मोल लक्षात
न आल्याने भारतियांकडून होणारी अक्षम्य हेळसांड !

या उलट एक स्विस विदुषी काही वर्षांपूर्वी आपल्याकडे आली होती. पुणे आणि परिसरातील अनेक गावांमध्ये ती फिरली. लोकांकडून पूर्वीची कागदपत्रे, पोथ्या वगैरे सामान पैसे देऊन तिने खरेदी केले. अनेकांनी माळे, पोटमाळे धुंडाळून तिला जुनी कागदपत्रे, पोथ्या आणि हस्तलिखिते दिली. ही मूर्ख बाई या अशा धूळ खात पडलेल्या सामानाला ५ ते १० सहस्र मोजते, याची काहींना मौज वाटली. अशी १६९ कागदपत्रे घेऊन ती रवाना झाली. त्यात काय महत्त्वाचे हे देणार्‍याला ठाऊक नाही. आज आपल्याकडील एका संस्कृत पीएच्डी धारकाला भरभक्कम वेतन देऊन त्या सर्व साहित्याचे भाषांतर करून ते संगणकात साठवून ठेवण्याचे काम तेथे होत आहे. त्यातून एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावरचा ग्रंथ आपल्याकडे येईल, तेव्हा कॉपीराईट (हक्कधारक) तेथील असतील एवढेच !

५. विदेशांत योग विद्येचा प्रसार होत असतांना भारतात
योग विद्येचा प्रसार करणार्‍यांची अपकीर्ती होणे, हे मोठे षड्यंत्र !

भारताबाहेर संस्कृतचा आणि संस्कृतीचा मोठा प्रचार महेश योगींनी केला. जगभरात १८२ देशात त्यांची केंद्रे आहेत. त्यांचे अनेक विदेशी साधक शाकाहारी राहून हिंदु धारणेनुसार जीवनपद्धत आचरत आहेत. भारतात योग आणि अन्य प्रकारचे कार्य करणार्‍यांना मात्र पद्धतशीरपणे अपकीर्त केले जाते. योगऋषि बाबा रामदेव यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक साधू-संतांच्या अपकीर्तीची मोहीम जणू प्रसारमाध्यमांनी चालवली आहे. काही वर्षांनी त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. लोकांपर्यंत चुकीचा संदेश आधीच पोचवून झालेला असतो. या षड्यंत्राला उत्तर कधी देणार…?

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार, मुंबई.

संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, १५.३.२०१५