इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे युवकांना ‘राष्ट्रभक्ती’ आणि ‘साधना’
या विषयांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून मार्गदर्शन

श्री. चेतन राजहंस

जौनपूर (उत्तरप्रदेश) – ‘देश’ हा शब्द ‘दिशा’ या शब्दापासून सिद्ध झाला असून तो ४ दिशांच्या मधील सुनिश्‍चित भूभाग असतो. राष्ट्र ही संकल्पना भौगोलिक नाही, तर सांस्कृतिक आहे. देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय. आपल्यात राष्ट्रभावना आहे; म्हणून आपण गंगेला नदी न मानता ‘देवी’ मानतो. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, रहदारीचे नियम पाळणे, भेसळ करणार्‍या समाजकंटकांच्या विरुद्ध तक्रार करणे, अशा छोट्या छोट्या कृतींमधून राष्ट्रभक्ती अभिव्यक्त होते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. ते येथील नावपूरमधील सैन्य सेवा समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

 

नामजपामुळे मनातील निरर्थक विचार न्यून होतात !
– पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

‘एकाग्रतेसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘अंतर्मनात असलेले संस्कार विचारांना कारणीभूत ठरतात. मनात निरर्थक विचार येणे, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अंतर्मनावर नामजपाचा संस्कार केल्यानंतर निरर्थक विचार न्यून होतात आणि मनाची एकाग्रता वाढू लागते.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे श्री. राजन केसरी यांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment