बहुपयोगी टोमॅटो

Article also available in :

टोमॅटो हा जेवणातील एक अविभाज्य असा पदार्थ आहे. परसातील कुंडीतही त्याची लागवड करता येते. टोमॅटोची एक गावठी जात आढळते. तिला ‘चिंगळी टोमॅटो’ म्हणतात. ती अधिक चविष्ट असते आणि तिच्यातून आपल्या शरिराला आवश्यक असणारे पोषक घटकही मिळतात.

 

१. टोमॅटोचे सूप किंवा सार बनवण्याची पद्धत

अर्धा तांब्या पाण्यात ४ – ५ टोमॅटो शिजवावेत. ते चांगले शिजले की, त्यांची साल आणि बिया काढून वाटून घ्यावेत. एक चमचा गरम तुपात पाव चमचा जिर्‍याची फोडणी करावी. त्यात छोटा आल्याचा तुकडा ठेेचून घालावा. नंतर वाटलेले टोमॅटो आणि टोमॅटो शिजवण्यासाठी वापरलेले शिल्लक पाणी त्यात घालावे. आवश्यकता असल्यास अधिक पाणी घालावे. चवीपुरते मीठ आणि साखर घालावी. चांगली उकळी आली की, टोमॅटोचे सार बनते. त्यात चिरलेली ओली कोथिंबीर घालून उष्ण असतांनाच हे प्यावे. गावठी चिंगळी टोमॅटो मिळाल्यास उत्तम सार बनते. असेच चिंचेचे किंवा आमसुलाचे सार बनवतात.

 

२. टोमॅटोचे औषधी उपयोग

२ अ. तोंडाला चव नसणे आणि भूक न लागणे

टोमॅटो सालासकट मिक्सरला बारीक करून ३ चमचे टोमॅटोचा रस दिवसातून २ वेळा घ्यावा. त्यात चवीपुरते मीठ आणि जिरे टाकल्यास उत्तम ! ढाब्यात जी ग्रेव्ही बनवतात, तिच्यात टोमॅटो, कांदा, खोबरे, काजू आदी घालतात. टोमॅटोमुळे त्या ग्रेव्हीला छान चव येते.

२ आ. खाण्याची इच्छा नसणे

ज्या वेळी खाण्यातून रस, रक्त आदी शरीरघटक बनत नाहीत, त्या वेळी हे लक्षण जाणवते. या वेळी रुग्णाला टोमॅटोचा रस पिण्यास सांगावे. केवळ ‘टोमॅटोचा रस पी’, असे सांगितल्यास रुग्ण ऐकणार नसल्यास ‘माझ्या जवळील औषधाची पुडी टोमॅटोच्या रसातून घे’, असे त्याला सांगावे.

२ इ. रक्तदुष्टी

‘वात, पित्त आदी दोषांमुळे रक्त दूषित झाले आहेे’, हे ओळखण्याची काही लक्षणे अशी आहेत – शरीर नेहमी उष्ण असणे, हिरड्यांतून रक्त येणे, शरिराची आग होणे, अंगावर गांधी उठणे, अंग उष्ण होऊन बारीक ताप असल्यासारखा वाटणे. अशा व्यक्तींनी टोमॅटो सूप प्यावे किंवा अधून मधून टोमॅटो खावा; मात्र प्रतिदिन टोमॅटो खाणे टाळावे. ‘अति सर्वत्र वर्जयेत् ।’ म्हणजे ‘कोणतीही गोष्ट वाजवीपेक्षा अधिक करणे टाळावे’, हा नियम लक्षात ठेवावा.

२ ई. ताप

तापात ‘तहान लागणे किंवा तोंडाला सतत कोरड पडणे’, हे लक्षण असतांना टोमॅटो कापून खायला द्यावेत. त्यामुळे तहान न्यून होऊन ताप उतरण्यास साहाय्य होते. तापात टॉमेटोचे सारही उपयोगी पडते.

२ उ. अशक्तपणा जाणवणे

आजारपण संपल्यावर काही वेळा शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण न्यून झालेले असते. अशांना टोमॅटोचे सार लाभदायी आहे.

 

३. विशेष

मूतखड्याचा विकार असणार्‍यांनी टोमॅटोच्या बिया खाऊ नयेत.

– वैद्य विलास जगन्नाथ शिंदे, जिजाई आयुर्वेद चिकित्सालय, खालापूर, रायगड.
संपर्क क्रमांक : ७७५८८०६४६६ (रात्री ८ ते ९ या वेळेत संपर्क करावा.)

Leave a Comment