पोषक आरोग्यासाठी ‘लोणी’ !

Article also available in :

‘लोणी म्हटले की, समस्त भारतियांना अगदी स्वाभाविकपणे दृष्टीसमोर येते, ती त्या नटखट बाळकृष्णाची छबी ! अपरिमित सौंदर्याची मूर्ती असलेल्या त्या बाळकृष्णाचे लोण्यासह असलेल्या विविध छटा आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. रांगत रांगत लोणी खाणारा बाळकृष्ण, अतिशय सुंदर अशा मुखकमलावर लोणी माखलेला बाळकृष्ण, लोण्याचा घडा पुढ्यात घेऊन ते मिश्किलपणे खात बसलेला बाळकृष्ण, लोणी देणार्‍या गायी आणि त्यांची वासरे यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा बाळकृष्ण अशी त्याची विविध रूपे आपल्याला मोहून टाकतात. उत्तर भारतात तर कान्हा ‘माखनचोर नंदकिशोर’ म्हणूनच प्रसिद्ध पावला आहे. लोण्याचा आणि भगवंतांचा असा एक वेगळाच संबंध आहे. यामुळे भारतियांचे लोण्याशी एक वेगळे भावनिक नाते जुळले आहे. नियमपूर्वक उपयोगात आणले, तर सगळेच दुग्धजन्य पदार्थ लहान मुले, तरुण आणि वृद्ध यांना स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात. असे असूनही त्या मुरलीधराने लोण्याला विशेष सन्मान दिला आहे. असे का ?

लोण्याला ‘नवनीत’ असा पर्यायी शब्द आहे. ‘दिने दिने यत् नवतामुपैति इति नवनीतम् ।’ याचा अर्थ जे प्रत्येक दिवशी नवीन उत्पत्ती करते, नवीन भासते ते नवनीत ! शरीरात गेलेले लोणी प्रत्येक दिवशी नवीन आणि तरुण धातूंची उत्पत्ती करते आणि शरीराचे सौंदर्य वाढवते; म्हणून त्याला ‘नवनीत’ म्हणायचे. केवळ आपल्या देशातच नाही, तर जगामध्ये इतरत्र पसरलेल्या आणि प्राचीन परंपरा असलेल्या सर्वच जमातींमध्ये लोणी या पदार्थाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. डॉ. वेस्टन प्राईस यांनी वर्ष १९३० मध्ये केलेल्या अभ्यासानुसार जगातील आरोग्यसंपन्न आणि दीर्घायुषी जमातींच्या आहारात लोणी अग्रक्रमाने खाल्ले जाते. स्वित्झर्लंडमधील खेड्यांमधील चर्चमध्ये लोण्याला ‘दैवी पदार्थ’ म्हणून गौरवले जाते. अरबी लोकांमध्येही लोणी या पदार्थाला मानाचे स्थान आहे. अमेरिकेतील जुन्या जाणत्या लोकांची श्रद्धा आहे की, लोण्यावर वाढलेली मुले ही जास्त दणकट आणि ताकदवान असतात.

 

लोण्याचे गुणधर्म आणि उपयोग

लोणी चवीला मधुर, थंड आणि स्निग्ध असून ते हृदयाला हितकर आहे. पाश्‍चात्त्यांच्या मतेही लोण्यातील व्हिटॅमिन ‘ए’ हे अ‍ॅड्रेनालीन आणि थायरॉईड ग्लँडचे काम सुरळीत चालू ठेवते. त्यामुळे रक्ताभिसरण संस्था आणि हृदय यांचे कामही चोख राखले जाते. व्हिटॅमिन ‘ए’ न्यून झाल्यास बालकाच्या हृदयामध्ये जन्मत: काही विकृती आढळू शकतात. लोणी हा व्हिटॅमिन ‘ए’ चा सर्वांत नैसर्गिक, उत्तम आणि शरिराला स्वीकारार्ह (absorbable) असा प्रकार आहे. सहस्रो वर्षांपासून वैद्य गर्भिणीला चौथ्या मासांपासून लोणी खाण्यास सांगतात; कारण बालकाच्या शरिरात चौथ्या मासात हृदयाची उत्पत्ती होते.

 

लोणी आणि कोलेस्टेरॉल

लोण्यामध्ये ‘लेसिथीन’ नावाचा घटक असतो. ज्यामुळे शरिरातील कोलेस्टेरॉलचे चयापचय उत्तम राखले जाते. लोण्यामध्ये अनेक प्रकारची ‘अँटीऑक्सिडेंट्स’ असतात. त्यांच्यामुळे शरिराचे ‘फ्री रॅडिकल्स्’पासून संरक्षण होते. फ्री रॅडिकल्समुळे रक्तवाहिन्यांना होणार्‍या त्रासापासून लोण्याचे कवच रक्तवाहिन्यांना वाचवते. लोण्यामधील व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘इ’ हे दोन्ही घटक शरिराला अँटीऑक्सिडेंटस्चा पुरवठा करतात. ‘सेलेनियम’ या अँटीऑक्सिडेंटचे लोण्यातील प्रमाण अन्य पदार्थांपेक्षा जास्त आहे. शरिराला आवश्यक असणार्‍या चांगल्या कोलेस्टेरॉलचा लोणी हा एक उत्तम स्रोत आहे.

 

लोणी आणि कॅन्सर

लोण्यातील समृद्ध अशा लहान (शॉर्ट) आणि मध्यम (मीडियम) ‘चेन फॅटी अ‍ॅसिड’मुळे त्यात कर्करोगाच्या विरुद्ध कार्य करण्याची शक्ती आहे. लोण्यामधील Conjugated Linoleic Acid मुळेही शरिराला कर्करोगाच्या विरुद्ध उत्तम प्रतिकारक्षमता प्राप्त होते. लोण्यामधील अँटीऑक्सिडेंट्स असणारे व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘इ’, सेलेनियम आणि कोलेस्टेरॉल हेही कर्करोगाचा उत्तम प्रतिकार करू शकतात.

 

रोगप्रतिकारक्षमता उत्तम राहण्यासाठी लोणी

लोणी खाल्ल्याने शरिराची प्रतिकारक्षमता उत्तम राहते. म्हणूनच गोकुळातील भावी नागरिक असलेल्या बालगोपाळांना भगवंताने लोणी खायला घालून त्यांचा निरोगी बनण्याचा मार्ग प्रशस्त केला.

 

सांधेदुखीचा त्रास रोखण्यासाठी लोणी उपयुक्त

मनुष्याचे वय वाढल्यावर सांधे रुक्ष होत जातात. ते एकमेकांवर घासले जाऊन सांध्यातील हाडांची झीज होऊ लागते. रुक्षतेमुळे सांध्यांना रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या कडक होतात. हाडांमध्ये कॅल्शियम जमा होऊन त्यांचे नरम असायला हवे, असे भाग जास्त टणक होतात आणि हाडे ठिसूळ होतात. यांपैकी कुठलीही विकृती झाली, तरी सांधेदुखीला प्रारंभ होतो. नियमित लोणी खाण्याने सर्व विकृती टाळता येतात. दुधाचे पाश्‍चरायझेशन करतांना दुधातील स्निग्धांश नष्ट होतो. असे दूध प्यायल्यास पुढे जाऊन हमखास सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो; मात्र आहारात लोण्याचा समावेश ठेवल्यास हा धोका टाळता येतो.

 

दातांसाठी लोणी

आजकाल आहारामध्ये मैद्याचे पदार्थ, बेकरीचे गोड पदार्थ, चॉकलेट्स, दातांना चिकटणारे जंक फूड, थंड आणि मऊ पदार्थ यांचे प्रमाण जास्त आहे. खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध असल्यामुळे वारंवार खाल्ले जातात. प्रत्येक वेळी चूळ भरून दात स्वच्छ केले जात नाहीत. त्यामुळे दातांच्या तक्रारी लहान वयात चालू होतात. दातांची झीज आणि त्यांना लागणारी कीड यांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य देशी पद्धतीने बनवलेल्या देशी गायीच्या दुधात आहे.

 

लोणी हा आयोडीनचा एक उत्तम स्रोत

लोणी हा आयोडीनचा एक उत्तम स्रोत आहे. मुख्य म्हणजे यातील आयोडीन शरिरामध्ये पचायला, ग्रहण करायला आणि उपयोगात आणायला अत्यंत सोपे आहे. पर्वतीय प्रदेश हे समुद्रापासून दूर असतात. तिथे आयोडीनयुक्त मीठ सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी लोणी उपयुक्त ठरते.

 

लोणी आणि पचन संस्था

आयुर्वेदाच्या मते लोणी हे अग्नीदीपक आणि रूचकर आहे. नवीन संशोधनानुसार लोण्यामुळे अनेक प्रकारच्या किटाणूंपासून पचन संस्थेचे संरक्षण होते. लोण्यामध्ये उत्तम अशी जीवाणुविरोधी प्रक्रिया (अँटीफंगल अ‍ॅक्टिव्हिटी) आहे. त्यामुळे चिकित्सेला अवघड अशा बुरशीजन्य संसर्गाचा (‘फंगल इन्फेक्शन’चा) प्रतिकार लोणी करू शकते.

 

बालकांसाठी अमृत असलेले लोणी

सध्या ‘प्री-मॅच्युअर बर्थ’ ही एक मोठी समस्या आहे. मातेच्या पोटात ६-७ किंवा ८ मास राहून वेळेआधीच बालकाचा जन्म होतो. त्या बालकाची शारीरिक वाढ पुरेशी झालेली नसते. मातेच्या पोटात ज्या वेगाने वाढ होते, तो वेग जन्मल्यानंतर राहत नाही. याचसमवेत अपूर्ण वाढीच्या बालकाला विविध आजार होऊन त्याचा वाढीचा वेग आणखीनच मंदावतो. वजन वाढत नाही. बुद्धीची वाढही पुरेशी होत नाही. रोगप्रतिकारक्षमता अल्प असते. यासाठी सर्वांत उत्तम अन्न म्हणजे लोणी ! बालकाची सर्वांगीण वाढ करून धष्टपुष्ट आणि तल्लख करण्याचे काम लोणी करते

 

डोळ्यांसाठी लोणी

आयुर्वेदानुसार लोणी डोळ्यांना हितकर आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आजारांवर दिली जाणारी औषधे लोण्यासमवेत घ्यायला सांगितली जातात. सध्या देशात मुलांमध्ये चष्म्याचा ‘प्रोग्रेसिव्ह नंबर’ असण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. यात शरिराची उंची जोपर्यंत वाढते, तोपर्यंत चष्म्याचा क्रमांकही वाढत जातो. पाश्‍चात्त्य वैद्यकाला यावर काही ठोस उपाय अद्याप तरी सापडलेला नाही. त्याचप्रमाणे उतारवयातील दृष्टीमांद्य, मोतीबिंदू अशा समस्यांची सीमारेषा पुष्कळ अलीकडे येऊन त्या चाळीशीच्या आसपासच चालू होऊ लागल्या आहेत. पूर्वी घराघरात गोधन असे. लहान बालक, कुमार, किशोर, युवा आणि वृद्ध सर्वच वयोगटातील लोक मनसोक्त लोणी खात असत. साहजिकच नैसर्गिक समस्यांचे प्रमाण पुष्कळ अल्प होते. वयाच्या ९० व्या वर्षांपर्यंतही चष्मा न लावता वावरणारी पिढी लोण्यावर पोसली गेली होती. आताही त्याला पर्याय नाही.

 

प्रजननासाठी लोणी

प्रजननक्षम महिलांमध्ये ‘पीसीओडी’, तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या अल्प असण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढले आहे. शहरातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त तरुणांना पहिले अपत्य होण्यासाठी उपचार करून घ्यावे लागतात. बालपणापासून आहारात लोण्याचा समावेश असल्यास तरुणपणी येणारे हे संकट टाळता येईल.

 

पक्षाघातात लोणी

‘पक्षाघात’ या आजारात शरिराचा एखादा अवयव किंवा एखादी बाजू अथवा अर्धे अंग लुळे पडते. पाश्‍चात्त्य चिकित्सा पद्धतीत यावर ‘फिजिओथेरपी’विना अन्य उपचार उपलब्ध नाहीत; परंतु ‘फिजिओथेरपी’ करण्यासाठीचे बळ स्नायूंमध्ये येण्यासाठी काहीही उपाय केले जात नाही. हे काम लोणी करते; म्हणून या आजारात आहारामध्ये लोण्याचा समावेश असणे आवश्यक असते.

 

रक्तपित्तामध्ये लोणी उपयुक्त

ज्वर या व्याधीनंतर शरिरातील कोणत्याही भागातून होणारा रक्तस्त्राव याला शास्त्रांमध्ये ‘रक्तपित्त’ असे म्हटले आहे. या आजारात लोणी रक्त आणि पित्त या दोन्हींचे शमन करून रक्तप्रवाह थांबवायला साहाय्य करते. लोण्यातील स्निग्धतेमुळे रुग्णाचे बलही उत्तम राखले जाते. लोण्यामुळे नवीन पेशी निर्माण होण्यास साहाय्य होते.

सर्व वयाच्या आरोग्यात लोण्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोण्याच्या नावाखाली बाजारात मिळणारे बटर योग्य नाही. बाजारातील बहुतेक बटर्स (काही अपवाद वगळता) म्हणजे कोणत्याही गायीचे दूध घसळून मिळवलेले क्रीम असते. (त्याच्या आच्छादनावरील तपशील वाचावा.) आपल्याला हवे आहे ते देशी गायीच्या दुधाचे सायीसह विरजण लावून आणि दही घुसळून बनवलेले लोणी ! वरचे सगळे लाभ फक्त याच लोण्याचे आहेत.

देशभरातील समस्त बालक गोपाळांप्रमाणे लोण्यात खेळतील, असा दिवस आपल्याला लवकरात लवकर प्रत्यक्षात आणायला हवा. सध्या पुष्कळ लोक तसे प्रयत्नाला लागले आहेत. आपणही त्यात सामील व्हा !’

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (दैनिक तरुण भारत, २२.९.२०१९)

Leave a Comment