श्री पंच अग्नि आखाडा

श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज

नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) येथे श्री पंच अग्नि आखाड्याचे संत आचार्य महामंडलेश्‍वर ब्रह्मर्षी श्रीमद् रामकृष्णानंद महाराज आणि येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्‍वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज यांच्याशी केलेल्या वार्तालापात उभय महाराजांनी त्यांच्या आखाड्याविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

संकलक : श्री. सचिन कौलकर

आखाड्यांचा परिचय

सिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू लागतात. सामान्य हिंदूंना आखाडा म्हणजे काय, त्यांचे कार्य, नागा साधू म्हणजे काय, त्यांची दिनचर्या आदींविषयी बर्‍याचदा माहिती नसते. त्यामुळेच हे शब्द ऐकले की, जिज्ञासा जागृत होते. हे लक्षात घेऊन आम्ही आपल्याला या आखाड्यांचा परिचय करून देणार आहोत. संपूर्ण भारतात एकूण १३ आखाडे आहेत. यातील १० शैवांचे, तर ३ वैष्णवांचे आहेत. यातील काही आखाड्यांच्या प्रमुखांशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी केलेला वार्तालाप उज्जैन येथील सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

 

१. आखाड्याची सर्वसाधारण माहिती !

श्री पंच अग्नि आखाडा हा जुना आवाहन आखाड्यानंतरचा हाच सर्वांत प्राचीन आखाडा आहे. श्री पंच अग्नि आखाडा हा इतर आखाड्यांपेक्षा काही गोष्टींत वेगळा आहे. या आखाड्याची स्थापना संवत ११९२ (वर्ष ११३६), आषाढ शुक्ल पक्ष एकादशी या दिवशी झाली. आखाड्याचे मुख्य कार्यालय वाराणसी (काशी) येथे आहे. अग्निदेव आणि गायत्री माता हे या आखाड्याचे उपास्यदैवत असून या आखाड्यातील ब्रह्मचार्‍यांना चातुर्नाम्ना असे म्हटले जाते. त्र्यंबकेश्‍वर येथे हा आखाडा संत निवृत्ती महाराज समाधीस्थळ मार्गावरील गंगासागर तलावाजवळ आहे. आखाड्याच्या शाखा हरिद्वार, नाशिक, जालना, बरेली, उज्जैन, कर्णावती (अहमदाबाद), जुनागढ आदी ठिकाणी आहेत. श्रीमंत गोपालानंद ब्रह्मचारी हे या आखाड्याचे सभापती असून ते ९३ वर्षांचे आहेत, तर श्री महंत दुर्गानंद ब्रह्मचारी हे ठाणापती आहेत. श्री पंच अग्नि आखाड्याचे जोतिर्लिंग, चैतन्य, शिदोरी, द्वारका असे एकूण ४ प्रमुख आखाडे आहेत. या आखाड्यात सभापती, ४ सचिव, स्थानापती, श्रीमहंत, महंत, रमतापंच असे पदाधिकारी आहेत. सचिव प्रत्येक ३ वर्षांनी पालटले जातात. कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सचिवांचे स्थानांतर होते. जे सचिव चांगले कार्य करतात, त्यांचे स्थानांतर केले जात नाही. (शासकीय कार्यालयाप्रमाणे हे सचिव नसतात. आखाड्यातील महंतांनाच सचिव केले जाते.) श्री पंच अग्नि आखाड्यात एकूण ६ सहस्र साधू आहेत.

 

२. आखाड्याचा साधनामार्ग !

या आखाड्यात सर्व जण ब्रह्मचारी असतात. ते अग्निहोत्र करतात आणि वेदांचे अध्ययन करून समाजात सनातन धर्माचा प्रचार करतात.

 

३. आखाड्याचे समाजकार्य !

अ. गुजरात राज्यातील भूज येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी श्री पंच अग्नि आखाड्याने अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेतले.

आ. गुजरात राज्यात १८ मास दुष्काळाची परिस्थिती असतांना पंच अग्नि आखाडा दुष्काळग्रस्त गावांच्या साहाय्याला धावून गेला. त्या वेळी जनावरांना चारा, लोकांना धान्य आणि इतर प्रापंचिक साहित्य देण्यात आले.

इ. नेपाळ येथे भूकंप झाल्यानंतर तेथील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाला धान्य आणि कपडे वाटण्यात आले.

ई. आखाड्यात वृद्धाश्रम, गोसेवा आणि अन्नछत्र चालवले जाते.

उ. विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबीर घेतले जाते.

ऊ. प्रलय, भूकंप अशा आपत्काळात आखाडे लोकांना साहाय्य करतात.

 

४. प्रत्येक आखाड्यातील साधू
आपापल्या परंपरेप्रमाणे साधना आणि कार्य करतात !

प्रत्येक आखाड्यातील साधू आपापल्या परंपरेप्रमाणे साधना आणि कार्य करत असतात. नागा साधूंचे संन्यासी दीक्षा घेतलेले, संस्कार बर्फानी नागा साधू आणि राजश्री त्रिवेणी साधू असे ३ प्रकार आहेत. नागा साधू हे शिवाचे उपासक असल्याने त्यांच्याजवळ डमरू, त्रिशूळ, रुद्राक्ष आणि भस्म असते. तथापि आमचा आखाडा नागा साधूंचा नाही. अन्य आखाड्यातील साधू परंपरेप्रमाणे जटा धारण करतात.

 

५. राममंदिराच्या सूत्राविषयी सर्व आखाडे संघटित !

आपली संस्कृती, राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही घटना, तसेच राममंदिराच्या निर्मितीतील अडथळे दूर करणे, अशा सूत्रांवर सर्व आखाडे, संत, महंत आदी संघटितपणे कार्य करतात. धर्माचार्य जे सांगतील, त्यानुसार पुढील दिशा ठरते. श्री पंच अग्नि आखाडा हा इतर सर्व धार्मिक कार्यात सहभागी होत असतो.

 

६. धर्मावरील आघात रोखण्यासाठी केंद्रशासनाला ठराव पाठवणे

देशातील राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही घटनांची नोंद घेऊन त्या रोखण्यासाठी सर्व साधू-संतांच्या बैठकीत सिद्ध केलेला ठराव केंद्रशासनाला पाठवला जातो. केंद्रशासन या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करते. आम्ही हे काम शासनालाच करायला सांगतो.

 

७. देशात धर्मांतराचे प्रस्थ वाढले आहे,
त्याविषयी आखाड्यांची भूमिका काय असते ?

ख्रिस्ती मिशनरी गरीब हिंदूंच्या अज्ञानाचा लाभ घेऊन, त्यांना आमिष दाखवून किंवा सक्तीने त्यांचे धर्मांतर करतात. हे रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. रामायण, महाभारत, गीता यांसारखे ग्रंथ हिंदूंना त्यांच्या भाषेमध्ये उपलब्ध करून दिल्यास ते धर्मांतर करणार नाहीत.

 

८. प्रसारमाध्यमे हिंदुविरोधीच !

प्रसिद्धीमाध्यमे साधू संतांकडे अत्यंत चुकीच्या दृष्टीने पाहून तशाच चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करतात. त्यामुळे समाजात साधूंची अपकिर्ती होते. चुकीच्या पद्धतीने वागणार्‍या लोकांना प्रतिबंध केला जात नाही. प्रसिद्धीमाध्यमे हिंदु धर्माच्या बाजूने नाहीत. हिंदु धर्माविषयी अयोग्य प्रसिद्धी दिली जाते. समाजाला चुकीच्या पद्धतीने काम करणारे शासन नको. असे शासन निवडून देण्यामध्ये जनतेसह प्रसिद्धीमाध्यमेही तितकीच उत्तरदायी आहेत. याचा हिंदूंनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.

– संत आचार्य महामंडलेश्‍वर ब्रह्मर्षी श्रीमद् रामकृष्णानंद महाराज, श्री पंच अग्नि आखाडा

 

शासनाने तरुण पिढीला भगवद्गीतेचे
शिक्षण देण्याची घटनेतच तरतूद करावी !

सध्याचे शासन मुलांना धर्म आणि संस्कृती यांचे शिक्षण देत नाही. शासनाने तरुण पिढीला भगवद्गीता, रामायण, भागवत अशा धार्मिक ग्रंथांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. असे शिक्षण देण्यासाठी घटनेतच तरतूद केली पाहिजे. धर्माचे शिक्षण न देणे दुर्दैवी आहे. सध्या भ्रमणभाषमुळे (मोबाईल) तरुण पिढी बिघडत आहे. त्याला आळा घालायला हवा. हिंदूंनी पाश्‍चात्त्य कुसंस्कृतीचे अनुकरण करू नये. त्यांना आपला देश, आपली संस्कृती आणि आपली परंपरा यांचा अभिमान वाटला पाहिजे. लव्ह जिहादसारख्या समस्यांना बळी न पडण्यासाठी तरुण पिढीवर संस्कृतीचे संस्कार केले पाहिजेत. गंगा नदीच्या किनारी रहाणार्‍या लोकांना गंगेचे महत्त्व समजलेले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात