शनि ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व

 

शनि ग्रह पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह असणे

हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे. मकर आणि कुंभ या शनि ग्रहाच्या राशी आहेत. शनि तुळ राशीत उच्चीचा होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा उच्च राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. हा ग्रह वायू तत्त्वाचा असून मनुष्याला आसक्तीकडून विरक्तीकडे नेतो. मानवी जीवनातील मान, अपमान, अवहेलना यातून हा ग्रह परमार्थाकडे वळवतो. हा ग्रह पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह आहे.

 

शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक असून
अविचारांनी केलेल्या कर्मांची फळे साडेसातीत मिळतांना दिसणे

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) आणि अशुभ (दोष) अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा केवळ शुभच असतो, असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत; पण शनि ग्रहाची केवळ एकच बाजू विचारात घेतली जाते; म्हणूनच लोकांच्या मनात शनि ग्रहाविषयी भीती निर्माण होते. शनि ग्रह गर्व, अहंकार, पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणुसकी शिकवतो आणि अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो. शनि हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे. जे शिस्तबद्ध, विनयशील आणि नम्र आहेत, त्यांना शनि उच्च पदाला घेऊन जातो, तर जे अहंकारी, गर्विष्ठ आणि स्वार्थी आहेत, त्यांना शनि त्रास देतो. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. या काळात व्यक्तीला स्वकीय-परकीय यांची जाणीव होते. स्वत:चे गुण-दोष लक्षात येतात, गर्वहरण होते, अहंकार गळून पडतो. माणुसकीची जाणीव होते. एक माणूस म्हणून कसे जगावे, याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कर्मांची फळे साडेसातीत मिळतांना दिसतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात