फल-ज्योतिषशास्त्रातील मूलभूत घटक : ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने

Article also available in :

‘फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.

 

१. ग्रह

ग्रह म्हणजे ‘ग्रहण करणे’. ग्रह हे नक्षत्रांकडून येणारी सूक्ष्म ऊर्जा ग्रहण करतात, म्हणून त्यांना ‘ग्रह’ म्हटले आहे. ग्रहांमध्ये ‘बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि’ हे ५ ग्रह मुख्य असून ते पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. रवि हा आत्म्याशी आणि चंद्र हा मनाशी संबंधित ग्रह आहे. ग्रहांची तत्त्वे आणि ग्रह कोणत्या गोष्टींशी संबंधित आहेत, ते पुढील सारणीत दिले आहे.

 

ग्रह तत्त्व ग्रहांशी संबंधित गोष्टी
१. बुध पृथ्वी बुद्धी, वाणी, व्यापार, स्थैर्य
२. शुक्र जल कामना, सौख्य, कला, समृद्धी
३. चंद्र जल मन, स्वभाव, वात्सल्य, औषधी
४. मंगळ अग्नि पराक्रम, शौर्य, नेतृत्व, उद्योग
५. रवि अग्नि आरोग्य, विद्या, अधिकार, कीर्ती
६. शनि वायू संशोधन, तत्त्वज्ञान, व्याधी, क्षय
७. गुरु आकाश ज्ञान, विवेक, साधना, व्यापकता

बुध, शुक्र आणि चंद्र हे ग्रह ‘पृथ्वी’ आणि ‘जल’ या तत्त्वांशी संबंधित असल्याने ते व्यक्तीचे कुटुंब, कलत्र (जोडीदार), स्वभाव, स्थैर्य आणि सौख्य यांसाठी अनुकूल असतात. रवि, मंगळ आणि शनि हे ग्रह ‘अग्नि’ आणि ‘वायू’ या तत्त्वांशी संबंधित असल्याने ते व्यक्तीचे कार्यक्षेत्र, कर्तृत्व, उत्कर्ष आणि प्रतिष्ठा यांसाठी अनुकूल असतात. गुरु ग्रह ‘आकाशतत्त्वा’शी संबंधित असल्याने सर्वदृष्ट्या अनुकूल असतो, तसेच आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरतो.

 

२. राशी

पृथ्वी ज्या मार्गाने सूर्याभोवती भ्रमण करते, त्या मार्गाला ‘क्रांतीवृत्त’ म्हणतात. क्रांतीवृत्ताचे १२ समान विभाग म्हणजे राशी. प्रत्येक राशीत सव्वादोन नक्षत्रे असतात. राशी स्थिर आहेत; परंतु पृथ्वी स्वतःभोवती भ्रमण करत असल्यामुळे राशीचक्र फिरतांना दिसते. जन्मकुंडलीत प्रथम स्थानात असणार्‍या राशीला ‘लग्नरास’ आणि चंद्र ज्या राशीत असतो, तिला ‘जन्मरास’ म्हणतात. या दोन राशी व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर विशेष परिणाम करतात. लग्नरास ही व्यक्तीचा मूळ पिंड (प्रकृती) दर्शवते, तर जन्मरास ही व्यक्तीची स्वभाव-वैशिष्ट्ये दर्शवते.

२ अ. जन्मराशीनुसार व्यक्तीमध्ये सामान्यतः आढळणारी वैशिष्ट्ये

 

जन्मरास तत्त्व व्यक्तीमध्ये सामान्यतः आढळणारी वैशिष्ट्ये
१. मेष अग्नि शौर्य, महत्त्वाकांक्षा, कार्यतत्परता, गतीशीलता
२. वृषभ पृथ्वी स्थिरता, सुखवस्तूपणा, व्यवहार-कुशलता
३. मिथुन वायू चंचलता, वाक्‌चातुर्य, समन्वय-कुशलता
४. कर्क जल भावनाप्रधानता, संगोपनशीलता, कर्तव्यदक्षता
५. सिंह अग्नि विद्वत्ता, तत्त्वनिष्ठता, अधिकारीवृत्ती, उदारता
६. कन्या पृथ्वी कलाप्रियता, चिकित्सकपणा, नियोजन-कुशलता
७. तूळ वायू आकलनशक्ती, कार्यप्रवीणता, सेवाभाव
८. वृश्चिक जल धैर्य, गुप्तता, स्वमतावर दृढ, स्पष्टवक्तेपणा
९. धनु अग्नि विवेक, न्यायप्रियता, विद्याव्यासंग, धर्मपरायणता
१०. मकर पृथ्वी सतत कार्यमग्न, नवनिर्मिती, चिकाटी, परिश्रमी
११. कुंभ वायू संशोधकवृत्ती, तत्त्वज्ञानी विचारसरणी, अनासक्ती
१२. मीन जल भक्तीपरायण, परोपकार, सज्जनता, लोकप्रियता

ग्रह त्याला पूरक असे गुणधर्म असलेल्या राशीत असतांना बलवान होतो अन् प्रकर्षाने फळ देतो, उदा. अग्नितत्त्वाचा मंगळ ग्रह अग्नितत्त्वाच्या मेष राशीत प्रकर्षाने फळ देतो. याउलट, ग्रह त्याला प्रतिकूल असे गुणधर्म असलेल्या राशीत असतांना निर्बल होतो.

 

३. कुंडलीतील स्थाने

कुंडलीतील स्थाने म्हणजे दिशांचे समान विभाग. कुंडलीत एकूण १२ स्थाने असतात. ज्याप्रमाणे दिशा त्यांचे स्थान सोडत नाहीत, त्याप्रमाणे कुंडलीतील १२ स्थाने पालटत नाहीत; स्थानांमधील राशी मात्र पालटतात. जीवनातील प्रत्येक गोष्टीचा विचार कोणत्या न् कोणत्या स्थानावरून होतो. कुंडलीतील १२ स्थानांवरून अभ्यासल्या जाणार्‍या गोष्टींची माहिती पुढील सारणीत दिली आहे.

 

स्थान स्थानांशी संबंधित गोष्टी
१. प्रथम शरीरप्रकृती, व्यक्तीमत्त्व
२. द्वितीय स्थावर संपत्ती, कुटुंब, वाणी
३. तृतीय बुद्धी, कौशल्य, भावंडे
४. चतुर्थ माता, गृह, वाहन, सुख
५. पंचम विद्या, उपासना, संतती
६. षष्ठ विकार, व्याधी, शत्रू
७. सप्तम कामना, वैवाहिक जीवन
८. अष्टम आयुष्य, सिद्धी, योगसाधना
९. नवम पुण्य, भाग्य, दैवी आशीर्वाद
१०. दशम कर्म, उद्योग, पिता, प्रतिष्ठा
११. एकादश आर्थिक लाभ, लोकसंग्रह
१२. द्वादश त्याग, आध्यात्मिक उन्नती

३ अ. चार पुरुषार्थांशी संबंधित स्थाने आणि स्थानांचे स्वरूप

हिंदु धर्मानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही मानवी जीवनाची उद्दिष्टे आहेत. कुंडलीतील १२ स्थानांवरून या ४ पुरुषार्थांचा विचार केला जातो, म्हणजे ते पुरुषार्थ साध्य करण्यासाठी भाग्याची अनुकूलता किती आहे, याचा विचार केला जातो. पुरुषार्थांशी संबंधित कुंडलीतील स्थाने आणि स्थानांचे स्वरूप पुढील सारणीत दिले आहे.

पुरुषार्थ संबंधित स्थाने
भौतिक मानसिक आध्यात्मिक
१. धर्म प्रथम पंचम नवम
२. अर्थ दशम द्वितीय षष्ठ
३. काम सप्तम एकादश तृतीय
४. मोक्ष चतुर्थ अष्टम द्वादश

स्थानांचे भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूप हे पुरुषार्थ साध्य करण्यातील टप्पे दर्शवतात, उदा. मोक्ष स्थानांपैकी ‘चतुर्थ’ स्थान हे कुलाचारांचे पालन करणे, सण-उत्सव साजरे करणे इत्यादी प्राथमिक स्वरूपाची साधना दशर्वते; ‘अष्टम’ स्थान हे जप, तप, अनुष्ठाने इत्यादी सकाम स्वरूपाची साधना दर्शवते; तर ‘द्वादश’ स्थान हे तन-मन-धनाचा त्याग, गुरुसेवा, अध्यात्मप्रसार इत्यादी निष्काम स्वरूपाची साधना दर्शवते.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (२०.१.२०२३)

Leave a Comment