रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया

हिंदू धर्माभिमान्यांनी रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

१. चुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी
सनातन संस्था खर्‍या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे !

‘सनातन संस्थेच्या आश्रमात येण्यापूर्वी माझ्या मनात आश्रमाविषयी वेगळी संकल्पना होती. प्रत्यक्ष आश्रमात तेथील विविध विभागांमध्ये प्रशिक्षणाविनाही साधक गुणवत्तापूर्वक सेवा करत आहेत. त्यांची सेवा आणि त्यांच्यातील कार्यकुशलता पाहून मला आश्चर्य वाटले. माणूस आपल्याकडून होणार्‍या चुकांना सहजासहजी स्वीकृती देत नाही; मात्र इथले साधक सहजगत्या स्वत:च्या चुका फलकावर लिहून त्या मान्य करतात आणि त्यातून शिकतात. ‘आपल्या हातून होणार्‍या चुकांमधून शिकत रहा !’, अशी शिकवण देणारी सनातन संस्था ही जगाच्या पाठीवरील एकमेव संस्था आहे. या शिकवणीच्या माध्यमातून सनातन संस्था खर्‍या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे.’ – श्री. अभिजीत जयकुमार गंडवे, राजे शिवराय प्रतिष्ठान, पुणे

 

२. संप्रदायांचे प्रतिनिधी

अ. श्री. मिहीर रंजन धर, प्रतिनिधी,
‘प.पू. आसारामबापूजी संप्रदाय’, रत्नागिरी.

‘सनातन संस्थे’च्या सूक्ष्म-विभागातील वस्तूंचे प्रदर्शन पहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. मी माझ्या गुरुदेवांना प्रार्थना करतो की, अध्यात्माचे बहुमूल्य ज्ञान सार्‍या विश्वासमोर प्रमाणासहित ठेवण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाला सफलता मिळो. मी संस्थेच्या कल्याणकारी कार्यासाठी आदरभाव ठेवून त्यांना धन्यवाद देत आहे.

 

आ. दूरचित्रवाहिन्यांचे संपादक

श्री. राजासिंग ठाकूर, संपादक, ‘श्रीराम दूरचित्रवाहिनी’ आणि अध्यक्ष, ‘श्रीराम युवा सेना’, भाग्यनगर.

सनातन आश्रम म्हणजे फारच आनंदमय ठिकाण आहे. या संस्थेत फारच एकता आणि प्रेमभाव आहे. हे बघून मी प्रसन्न झालो.

 

इ. श्री. सच्चिदानंद हेगडे, प्रतिनिधी,
‘सोंडा स्वर्णपल्ली स्वामीजी’, शिरसी, कर्नाटक.

प्रसन्नता, शांतता आणि पावित्र्य यांची प्रत्यक्ष अनुभूतीदेणारे ठिकाण म्हणजे रामनाथी आश्रम !

‘प्रसन्नता, शांतता आणि पावित्र्य यांची प्रत्यक्ष अनुभूती घेऊ शकतो, असे अद्भुत ठिकाण म्हणजे हा आश्रम ! या सुंदर आश्रमातील आध्यात्मिक समृद्धी अनुभवण्यासाठीच नव्हे, तर येथील अनेक गोष्टींतून प्रेरणा घेण्यासाठी आश्रमाला भेट देणे आवश्यक आहे. या आश्रमास माझे विनम्र अभिवादन !’

 

ई. श्री. प्रभाकर यावलकर, प्रतिनिधी,
प.पू. रामानंद महाराज ‘भक्तवात्सल्याश्रम’, इंदूर.

आश्रम पाहून अद्भूत आश्चर्ययुक्त अनुभूती आली. चैतन्यशक्तीविषयी वाचले होते; पण प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाला. अनिष्ट शक्तींचे प्रभाव पाहून थक्क झालो. ख्रिस्ताब्द १९५२ च्या आसपास प.पू. भक्तराज महाराजांचे सान्निध्य लाभले. त्या वेळी मित्रता होती; पण त्यांच्या वास्तविक रूपाचे दर्शन आज झाले आणि त्यांच्या शिष्याचे दर्शन घेण्याची उत्सुकता वाढली. ईश्वर असा योग पुन्हा देवो, हीच प्रार्थना.

 

उ. श्री. अनिल रघुवंशी, प्रतिनिधी,
प.पू. रामानंद महाराज ‘भक्तवात्सल्याश्रम’, इंदूर.

रामनाथी येथे येऊन पुष्कळ चांगले वाटले. ईश्वरी अनुभूती आली. याचे वर्णन करू शकत नाही. येथे (रामनाथी) आलो नसतो, तर येथे एवढे मोठे कार्य चालू आहे, हे मला कधीच कळले नसते.

 

३. हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी

अ. श्री. तपन घोष, संस्थापक अध्यक्ष, ‘हिंदू संघती’, कोलकाता.

हिंदू राष्ट्र आणि हिंदु संस्कृती यांसाठीचे साहित्य प्रसिद्ध करणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये ‘सनातन प्रभात’ अग्रेसर आहे. ‘हिंदू राष्ट्र’ मिळवण्यासाठी सनातन संस्था एक महत्त्वाचे साधन ठरेल ! सनातनचा आश्रम हिंदू राष्ट्राचा पाया आहे.

 

आ. रजनीश गोयंका, इंद्रप्रस्थ (नवी दिल्ली), ‘सनातन धर्म मंदिर समिती’

रामनाथी आश्रमात धर्म, राष्ट्र, सामाजिक चेतना आणि चिंतन जागृत करण्याचे प्रयत्न निष्ठेने केले जात असल्याचे पहायला मिळाले. आजच्या काळात याची अत्यंत आवश्यकता आहे. धर्मप्रसाराचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या या आश्रमामध्ये आल्यानंतर एक नवी ऊर्जा आणि उत्साह अनुभवायला मिळाला. यातूनच ‘धर्मजागृतीसाठी आणि धर्माला पुढे नेण्यासाठी आपणही या कार्यात सहभागी व्हावे’, अशी प्रेरणा मिळाली. उत्तर भारतामध्ये अशा प्रकारच्या प्रसाराची अत्यंत आवश्यकता आहे. सूक्ष्म-ज्ञान आणि अनिष्ट शक्तींचा प्रभाव या संदर्भात प्रसार करण्याची आवश्यकता आहे. लोकांना याविषयी काहीच माहिती नाही आणि ते पाखंडी भोंदूच्या नादी लागतात. मी यासाठी पूर्णपणे सहकार्य करून धर्म, राष्ट्र आणि समाज यांचे रक्षण अन् समृद्धी यांसाठी सहकार्य करीन.

 

इ. श्री. मनीष मंजूल, महासचिव, ‘समर्थ’, दिल्ली.

अदभूत, अदम्य, अलौकिक, अकल्पनीय, अविस्मरणीय

 

ई. श्री. सूर्यनारायण राव, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष ‘बजरंग दल’, बेंगळुरू.

अतिशय पारदर्शकतेने आणि परिपूर्णरित्या संस्था कशी चालवावी, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. देशभरातील अनेक आश्रमांना मी भेटी दिल्या आहेत; परंतु येथे मला अद्भुत अनुभूती आली. मला येथे चांगली शक्ती जाणवली आणि ती मिळालीही. आपल्या सर्वांना सहजतेने ध्येय साध्य करता यावे, यासाठी मी श्रीकृष्णाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद!

 

उ. श्री. अर्जुन संपथ, संस्थापक, ‘हिंदु मक्कल कच्छी’
आणि राष्ट्रीय महासचिव, ‘श्रीराम सेना’, कोईमत्तूर.

सनातनचा आश्रम हे हिंदू राष्ट्रातील एक मंदिर आहे ! गुरुदेवांचे (प.पू. डॉक्टरांचे) मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांमुळे आम्ही ध्येय साध्य करणारच आहोत. या आश्रमात मला सर्वत्र दिव्य शक्ती आणि गुरुकृपा असल्याचे जाणवत आहे. आश्रमात चांगली आध्यात्मिक अनुभूती येते. आपले प्राचीन धर्मशास्त्र आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रस्तूत केल्याने आपण सर्वांना आपल्या हिंदु धर्माकडे आकर्षित करू शकतो. सनातन हिंदु धर्माचा विजय असो !

 

ऊ. श्री. प्रदीश विश्वनाथ, ‘विश्व हिंदु परिषदेच्या ‘हिंदु हेल्पलाईन’चे समन्वयक

चुकांचा फलक पाहून प्रेरणा मिळाल्यामुळे तसे कृतीत आणणार !

१. प.पू. गुरुदेवांच्या मार्गदर्शनानंतर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेविषयीच्या सर्व शंका दूर होणे

‘मला प्रारंभी वाटायचे की, हिंदु धर्म इतक्या संप्रदायात विभागला गेला आहे. राष्ट्रीय पक्ष केवळ स्वतःच्या स्वार्थात गुरफटलेले आहेत, तर त्यांच्याकडून हिंदू राष्ट्राची स्थापना कशी होईल ? प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर मला विश्वास वाटला की, कोणी बरोबर आले, तर त्यांना घेऊन आणि बरोबर न आल्यास त्यांना सोडून हिंदू राष्ट्राची स्थापना भगवान श्रीकृष्ण करणारच आहे. प.पू. डॉक्टर यांच्या वाक्यातून जसे स्कॅन होते, तसे माझे मन पवित्र झाले. माझ्या मनावरचे वजन उतरले आणि हलके वाटायला लागले.

२. वाईट शक्तींचा त्रास असलेल्या लोकांना उपाय सांगणे आवश्यक

केरळमधील वाईट शक्तींचा त्रास असलेल्या अनेक मुलींना आम्ही गुजरातमधील सारंगपूर येथील मारुतीच्या देवळात घेऊन गेलो. तिथे त्यांच्यावर महिनाभर उपाय केल्यामुळे त्या पुन्हा पूर्वरत झाल्या आहेत. सनातन आश्रमाचे आध्यात्मिक संशोधन आणि उपाय यांमुळे मी पुष्कळ प्रभावित झालो. याविषयी मी स्वतः कृती करीन आणि इतरांनाही सांगेन.

३. प.पू. भक्तराज महाराजांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र सजीव झाले आहे, तसेच श्रीकृष्णाचे छायाचित्र मारक रूपाचे असल्याचे जाणवले.

४. संपूर्ण आश्रम चैतन्याचा स्रोत आहे. अशा प्रकारचे नियम, दिनचर्या आणि त्याग कुठेच पाहिला नाही. चुकांचा फलक वाचून मी अतिशय प्रभावित झालो. अशी शिकवण कुठेही दिली जात नाही. हे संपूर्ण दैवी आहे. मी स्वतःला सुधारण्यासाठी घरात असा फलक लावून त्यावर चुका लिहीन.’

 

ए. श्री. उत्तम दंडिमे, संचालक, ‘हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान’, पुणे.

सनातन आश्रम आणि सनातन संस्थेद्वारे चालवले जाणारे सगळेच उपक्रम कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत. आपल्याकडून हिंदु धर्माचा प्रचार आणि प्रसार यांचे फारच चांगले कार्य होत आहे. याच गतीने हे कार्य चालू राहिले, तर हिंदू राष्ट्रनिर्माण होणे अशक्य नाही. आम्ही सर्वजण आपल्यासमवेत आहोत.

 

ऐ. राजकीय पक्षांचे नेते श्री. हरिदास पडळकर, ‘शिवसेना’, सांगली.

आश्रमामध्ये यायला आम्हास उशीर झाला. या अगोदरच येऊन हे वैभव डोळ्यांत साठवून घ्यायला हवे होते.

 

ओ. ‘श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, ‘श्रीराम सेना’, बेळगाव.

‘रामनाथी आश्रमाचे दर्शन’ अविस्मरणीय असून प.पू. गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे उत्तम प्रकारे जडणघडण झालेल्या साधकांचे आतिथ्य विरघळवून टाकणारे !

`सनातन आश्रमाचे दर्शन’ हे अविस्मरणीय आणि प्रेरणादायी होते. आश्रम खरोखरच आधुनिक तंत्रज्ञानांने युक्त असून कुठेही अहंकार जाणवत नाही. आश्रमातील साधकांनी सर्वांचे हसतमुखाने केलेले स्वागत, त्यांचे विनयाने आणि माधुर्याने बोलणे अन् त्यांनी केलेले आतिथ्य हे कुठल्याही व्यक्तीमत्वाला विरघळवून टाकेल, असेच आहे. आपापल्या विभागात सतत सेवेत असूनही कुणाच्याही तोंडवळ्यावर थकवा जाणवत नाही. यामागील कारण म्हणजे साधकांचे आध्यात्मिक शिक्षण, नामजप आणि प.पू. गुरुदेवांचे आशीर्वाद होत !

 

औ. श्री. महेश खिस्ते, सदस्य, ‘हिंदू महासभा’, महाराष्ट्र प्रदेश, पंढरपूर.

आगामी काळाला अनुसरून ‘धर्मकार्य कसे असावे ?’, याचे आदर्श चित्र सनातनच्या रामनाथी आश्रमात पहायला मिळाले. सर्व अत्याधुनिक सोयींनी सज्ज आश्रम पाहून मरगळलेल्या आणि स्वत्त्व विसरलेल्या हिंदू समाजास नवचेतना मिळेल आणि ती हिंदू राष्ट्रासाठी पोषक ठरेल.

 

अं. अभियंता अभिषेक मुखर्जी, हिंदू संघति, कोलकाता.

पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या दंगलीच्या वेळी हिंदूंवर होणारे अत्याचार सनातन परिवाराने जनतेसमोर आणल्यामुळे ‘हिंदू संघति’ या संघटनेचे मनोधैर्य उंचावणे

यासाठी आम्ही सनातन संस्था आणि संपूर्ण सनातन परिवार यांच्याप्रती अतिशय कृतज्ञ आहोत. मी अतिशय दुर्दैवी आहे; कारण मला प.पू. डॉक्टरांचे दर्शन मिळणे शक्य झाले नाही, तरीही त्यांच्या चरणस्पर्श झालेल्या मातीस स्पर्श करायला मिळाला, यासाठी मी अतिशय कृतज्ञ आहे.’

 

४. सूक्ष्म प्रदर्शनासंदर्भातील अभिप्राय

अ. श्री. सूर्यनारायण राव, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष ‘बजरंग दल’, बेंगळुरू.

फारच चांगला अनुभव. येथील प्रदर्शन माहितीपूर्ण असून ते साधना करण्यास उद्युक्त करणारे आहे. फार छान. धन्यवाद !’

 

आ. श्री. नटेशन, ‘गोवर्धन ट्रस्ट’ आणि ‘भारत हेरिटेज फाऊंडेशन’, चेन्नई.

ह्या अध्यात्मिक वस्तू अत्यंत माहितीपूर्ण आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. आध्यात्मिक अंगांविषयीची माहिती खेड्यातील सर्व लोक आणि मुले यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही उपक्रम कार्यान्वित करावेत.’

 

५. सनातनचा आश्रम मंदिराची अनुभूती देणारा ! – धनंजय देसाई

 

‘हिंदू राष्ट्र सेने’चे अध्यक्ष धनंजय देसाई
यांची देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट

सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यानंतर मंदिरात आल्यासारखेच वाटते. या आश्रमातील अत्यंत सात्त्विक असे अन्न ग्रहण करण्याचे भाग्य प्रथमच लाभले. सनातनचा आश्रम व्यक्तीला मंदिराची अनुभूतीदेणारा आहे, असे मत अत्यंत भारावलेल्या स्थितीत हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांनी व्यक्त केले. श्री. देसाई यांनी त्यांचे माता-पिता, भगिनी, भाचा आणि काही कार्यकर्ते यांच्यासह पनवेल येथील देवदमधील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या आश्रमातील गोदामात किंवा अन्यत्र कोठेही एखाद्या गोष्टीची अथवा साहित्याची राखण करण्यासाठी साधक नाहीत. तेथे सर्वजण धर्माचरणाने आलेल्या आत्मशिस्तीने वागतात. राज्यकर्त्यांनी हिंदूद्रोही कायदे करण्यापेक्षा या शिस्तीतून धडे घेतल्यास त्यांना लाभ होईल.’’

या प्रसंगी श्री. देसाई यांनी अत्यंत बारकाईने आश्रम पाहिला. सनातन कापुराच्या वापराचा प्रयोग करून पाहिला. ‘सनातन प्रभात’ आणि अन्य वृत्तपत्र यांच्यावरील लोलकाचा प्रयोगही त्यांना दाखवण्यात आला. ‘कापुरामुळे चैतन्य मिळते’, अशी अनुभूती त्यांनी घेतली. ध्यानमंदिरातील श्रीगणेशमूर्तीला त्यांनी साष्टांग नमस्कार केला.

 

६. हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांची
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे कार्य अद्भुत, अलौकिक आणि दैवी प्रचीती देणारे आहे. आश्रमातील साधकांच्या समर्पणभावामुळे येथील व्यवस्थापन अतिशय चांगले आहे. सनातनच्या साधकांकडून नम्रता शिकण्यासारखी आहे. सनातन आश्रम म्हणजे समर्पणभाव आणि शिस्त असलेले आध्यात्मिक साम्राज्यच आहे, असे उद्गार हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब भेट दिल्यानंतर काढले. या वेळी त्यांनी सनातन आश्रमात चालणाऱ्या विविध विभागातील राष्ट्र आणि धर्म विषयक कार्याची माहिती करून घेतली.

 

७. अध्यात्माचा पाया रचणारी ‘सनातन संस्था’ !

‘सनातन संस्था‘ समाजात अध्यात्माचा पाया रचत आहे. मूर्तीपूजा कशी करावी, कुंकू कसे लावावे यांपासून प्रत्येक लहान-सहान गोष्टीची शास्त्रीय परिभाषेत मांडणी सनातनच्या ग्रंथांत दिलेली आहे. अध्यात्मप्रसाराचे कार्य राष्ट्रीयतेला जोडून म्हणजेच समष्टी साधनेला जोडून ‘सनातन संस्था’ आज प्रचंड मोठे कार्य करत आहे.’ – श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना. (दैनिक ‘सनातन प्रभात’, वैशाख शु. षष्ठी, कलियुग वर्ष ५११३ (९.५.२०११))

 

८. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती
यांचे हिंदूसंघटनाचे कार्य अद्भूत ! – सहकारी उपानंद ब्रह्मचारी

‘‘भारतातील खंडित समाजव्यवस्थेमध्ये हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती करत आहे, ही अद्भुत घटना आहे’’, असे गौरवोद्गार सहकारी उपानंद ब्रह्मचारी यांनी येथे काढले.

‘धर्मावर आधारित कोणतेच कर्म व्यर्थ जात नाही. राष्ट्र-धर्म विकास हेतू सनातन आश्रम, सनातन संस्था आणि सनातन प्रभातचे विश्वसनीय अन् अथक प्रयत्न अद्भुत आहेत. प्रभुकृपेमुळे ‘हे राष्ट्र सनातन शक्ती घेऊन पुन्हा जागृत होऊन विजयशाली हिंदू राष्ट्र बनेल’, असे प्रत्ययास येते. ‘वयं हिन्दुराष्ट्रे जागृयाम ।’ म्हणजे ‘आम्ही हिंदुराष्ट्रात सदैव जागृत राहू.’’

Leave a Comment