संवेदना नष्ट करणारे भ्रमणभाषचे महाभयंकर व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !

‘एकीकडे आई-वडील जेवणाच्या टेबलवर बसलेले आणि दुसरीकडे मुलांच्या हातात ‘स्मार्ट फोन’ ! आई तिच्या बाळाला घास भरवत असते. तोंडासमोर घास आणून ठेवलेला आणि बाळ भ्रमणभाषवर खेळण्यात मग्न ! मध्येच त्याची इच्छा होईल, त्या वेळेस त्याला घास भरवला जातो. मग मुले सातत्याने भ्रमणभाषमध्येच तोंड खुपसतात. कालांतराने त्यांना इतरांच्या भावना समजत नाहीत. संवेदना संपल्याचाच हा प्रकार वारंवार घडतो. ‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चालला आहे. तेव्हा मुलांनो ‘ब्ल्यू व्हेल’, ‘पबजी’ यांसारख्या जीवघेण्या खेळांच्या व्यसनापासून आताच सावध रहा. पालकांनो, मुलांना वेळीच आवरा !

 

१. तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो, हे महत्त्वाचे

आज गल्लोगल्लीत, घरीदारी ‘पबजी’चे वेड लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक व्याधीही पुढे येत आहेत. अलीकडे दोन-तीन वर्षांच्या मुलांनाही अगदी बिनधास्त भ्रमणभाष दिला जातो. अशा वेळी ‘आमची मुले किती स्मार्ट आहेत’, त्याचे तोंडभरून कौतुक केले जाते. इतक्या लहान वयात मुलांना टीव्हीसमोर घंटोन्घंटे बसवणे, त्यांच्या हातात भ्रमणभाष देणे हे घातक आहेत. मी तंत्रज्ञानास वाईट म्हणत नाही. त्याचा उपयोग कसा करतो, हे महत्त्वाचे आहे.

 

२. भ्रमणभाषमधील खेळांमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष !

चित्रपटाप्रमाणे आयुष्य गतीमान नसते. यामुळे आपली मुलं नेमकी काय करत आहेत, काय बघत आहेत, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सतत भ्रमणभाषमध्येच डोके खुपसत राहिल्यामुळे मेंदू बधीर होतो. आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. दुसर्‍यांच्या भावनाही समजत नाहीत, हे अत्यंत धोकादायक आहे. मग खाण्यात, खेळण्यात आणि शिक्षणात आपसूकच दुर्लक्ष होते. मद्य आणि अमली पदार्थ यांपेक्षाही ‘पबजी’, ‘ब्ल्यू व्हेल’सारख्या भ्रमणभाषमधील खेळांचे हे महाभयंकर व्यसन आहे.

 

३. योग्य वेळी संवाद आणि उपचार आवश्यक

पालकांचा मुलांशी संवाद झाला पाहिजे. अशा वेळी आई-वडिलांनी चर्चा करायला पाहिजे. आज संवादाला वेळच नाही. ही ‘जनरेशन गॅप’ (पिढ्यांमधील अंतर) नाही. ‘कम्युनिकेशन गॅप’ (संवादाचा अभाव) आहे. शाळा-महाविद्यालयात पाठवले. शिकवणी वर्ग लावून दिले की, दायित्व संपले. मुलांसाठी वेळ काढा. त्यांच्या गरजा समजून घ्या. ‘मागेल ते द्यायचे’ असे लाड पुरवले गेले की, मग त्या मुलांना त्याच सवयी लागतात. एखाद्या प्रेमात नकार दिला की, ते पचवण्याची शक्ती नसते. मग हत्या नाही, तर आत्महत्या घडतात. आपण समाज म्हणून आणि पालक म्हणून कमी पडत आहोत. हे व्यसन सोडवण्यासाठी योग्य वेळी उपचार महत्त्वाचे आहेत. निदान मानसोपचार तज्ञांकडे घेऊन गेले पाहिजे. उपचारासमवेतच पुन्हा चर्चा, संवाद, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर पर्यायी इतर साधने उपलब्ध आहेत, याची जाणीव करून द्या. हे व्यसन आहे. त्यामुळे मुलांना मानसिक समादेश आणि व्यसनमुक्तीसाठी उपचार देणे आवश्यक आहे.’

–  पद्मश्री डॉ. राणी बंग, सहसंचालक, ‘सर्च’, गडचिरोली. (संदर्भ : दैनिक लोकमत, १५.७.२०१९)

Leave a Comment