ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबात आणि समाजात होणारा शारीरिक, मानसिक अन् आर्थिक छळ

भारताची संस्कृती महान असून त्यामध्ये एकत्र कुटुंबपद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून पाश्चात्त्यांच्या विकृतीचे अंधानुकरण होत आहे. त्यामुळे देशात विभक्त कुटुंबपद्धत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचा स्वतःची मुले, सून, समाज यांच्याकडून विविध प्रकारे कशा प्रकारे छळ होत आहे, याची काही उदाहरणे येथे देत आहोत.

 

१. शारीरिक छळ

जसे मारहाण करणे, चटके देणे, चिमटे काढणे, हातपाय किंवा केस ओढणे, कधी कधी खुर्चीला किंवा पलंगाला बांधून ठेवले जाते.

 

२. मानसिक किंवा भावनिक छळ

एखाद्या वृद्धाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते किंवा त्याला बाहेरच्या लोकांमध्ये मिसळू दिले जात नाही. घरी कुणी पाहुणे आल्यास त्यांच्याशी परिचय करून दिला जात नाही किंवा फार बोलू दिले जात नाही. त्यांचा जाता-येता सतत अपमान केला जातो किंवा सतत भीती घातली जाते अथवा लहानसहान कारणांवरून अंगावर ओरडले जाते. ज्येष्ठ व्यक्ती वयाने मोठी असूनही तिला अगदी लहान मुलासारखे वागवले जाते. अशा रितीने मानसिक अवहेलना करून त्रास दिला जातो.

 

३. आर्थिक छळ

ज्येष्ठ नागरिकांच्या संमतीविना त्यांचे पैसे व्यय (खर्च) करणे, त्यांना त्यांच्याच पैशाचा किंवा घराचा उपभोग घेऊ न देणे किंवा त्यांच्याकडून उसने घेतलेले पैसे परत न करणे, त्यांनी अधिकोषात मुदत ठेवी स्वरूपात ठेवलेले पैसे सक्तीने काढून घेणे अथवा त्या ठेवी (बळजोरीने) स्वतःच्या नावावर करून घेणे, तसेच घरे, भूमी किंवा सदनिका (फ्लॅटचे) यांचे मालकी हक्क सक्तीने स्वतःच्या नावावर वर्ग करून घेणे. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे किंवा मालमत्ता लुबाडली जाऊ शकते.

पुष्कळदा घरातील ज्येष्ठ नागरिकांची मुलगा किंवा सुनेकडून उपेक्षा केली जाते. जसे वेळेवर खाणे-पिणे न मिळणे किंवा पुरेसे जेवण न मिळणे, स्वच्छ कपडे न मिळणे, औषधपाणी वेळेवर आणि पुरेसे न देणे, तसेच घरच्या समारंभात अथवा सामाजिक कार्यक्रमात भाग घेऊ दिला जात नाही. कधी कधी ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक असमर्थतेचा लाभ घेऊन लैंगिक छळही केला जातो.

 

४. समाजात होणारा छळ

केवळ घरातच नव्हे, तर बाहेरच्या जगातही ज्येष्ठांचा छळ होत असतो. जसे बसमध्ये चढतांना धक्काबुक्की करणे, बसमधील ज्येष्ठ नागरिकांच्या राखीव जागेवर बसून ते आल्यावर त्यांना स्वतःहून उठून जागा न देणे, रेल्वे आणि बसमध्ये जागा राखीव केली असूनही दुसर्‍याने ती जागा बळकावणे, चिकित्सालयामध्ये (दवाखान्यामध्ये) ज्येष्ठ नागरिक पाहून सरळ दुप्पट पैसे (बिल) घेणे किंवा नसती भीती घालून नको असलेल्या तपासण्या करायला भाग पाडणे, शासकीय कार्यालयात ज्येष्ठ म्हणून साहाय्य न मिळणे असेही प्रकार घडतात.

ज्येष्ठ नागरिक ‘स्वतःचा अपमान किंवा छळ होतो आहे’, हे स्वतःहून पुढे होऊन स्पष्टपणे सांगण्यास कचरत असतात. त्यांना समाज, कुटुंब किंवा पोलीस यांची भीती वाटल्यामुळे साहाय्य घेण्यास संकोचतात. त्यांची न्यायालय आणि शासकीय कार्यालये येथे येण्या-जाण्याची शारीरिक अन् आर्थिक क्षमता नसते. न्यायालयात (कोर्टात) जाऊन न्याय मिळवणे, ही निदान भारतात तरी खर्चिक आणि वेळखाऊ पद्धत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना त्याचा लाभ घेणे अशक्य आहे.

(संदर्भ : साप्ताहिक ‘विवेक’, ३० जुलै २००६)

(ही स्थिती वर्ष २००६ मधील असून ज्येष्ठ नागरिकांच्या वरील समस्येत आता आणखीनच वाढ झाली आहे आणि त्या अनुषंगाने गुन्हेगारीतही वाढ झाल्याचे दिसून येते.)

Leave a Comment