मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन

१. स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांना आश्रम दाखवतांना २. श्री. अभिषेक पै आणि समवेत त्यांचे शिष्य

रामनाथी, गोवा – मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी आणि त्यांचे शिष्य यांचे १९ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले. यानिमित्त त्यांना सनातन संस्थेचे साधक श्री. अभिषेक पै यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म यांविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. आश्रम पाहून स्वामी प्रवीणराजबाबाजी यांनी ‘सनातन हिंदु धर्माचे रक्षण व्हावे, हे आमचेही ध्येय असून ते कार्य चांगल्या प्रकारे सनातन आश्रमात चालू आहे’, असे समाधान व्यक्त केले. सनातन संस्थेचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि हार अर्पण करून स्वामी बाबाजींचा सन्मान आणि त्यांच्या शिष्यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी प्रवीणराजबाबाजींचा सन्मान केल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे शिष्य श्री. जयकुमार, श्री. अमृत, श्री. चंद्रहास आणि श्री. प्रज्वल उपस्थित होते.

 

स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांचा संक्षिप्त परिचय

स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबा यांचे मंगळुरू येथे सिद्धपीठ आदिभुवनेश्‍वरी देवस्थान आहे. ते राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू होते. त्यांनी ड्रम (ढोलाप्रमाणे एक वाद्य) वाजवण्यात कौशल्य प्राप्त केले असून ते तबला आणि ढोलक वाजवण्यातही निपुण आहेत; परंतु साधनेत आल्यावर त्यांनी त्यांचा पूर्णवेळ साधनेसाठीच समर्पित केला. ‘विश्‍वभर सनातन हिंदु धर्माची स्थापना व्हावी’, यासाठी गेल्या ७ वर्षांपासून ते प्रतिदिन हवन करतात. स्वामी प्रवीणराजबाबाजी प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात त्यांच्या आश्रमात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी साहाय्य करतात. एप्रिल २०२० मध्ये सिद्धपीठ आदिभुवनेश्‍वरी देवस्थानला १२ वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आयोजित केलेल्या उत्सवात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’त संगीत साधना शिकणार्‍या साधकांना संगीत सेवा सादर करण्यासाठी त्यांनी निमंत्रित केले आहे. त्यांनी देवस्थानमध्ये हिंदु जनजागृती समितीचा फलक लावलेला असून त्यावर ते देवस्थानचा नित्यक्रम लिहितात.

क्षणचित्रे

१. सनातनच्या आश्रमात यज्ञस्थळी स्थापित पूर्वाभिमुख श्री गणपतीच्या मूर्तीसमोर आणि ध्यानमंदिर येथे स्वामी प्रवीणराजबाबाजी यांनी काही वेळ बसून ध्यान केले. श्री गणपतीच्या मूर्तीसमोर बसून ध्यान केल्यावर ‘गणपति हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात साहाय्य करत आहे’, तर ‘ध्यानमंदिरात पुष्कळ चैतन्य असून त्याची स्पंदने अनुभवायला येत आहेत’, असे त्यांनी सांगितले. याचसमवेत ध्यानमंदिरात त्यांना दैवी सुगंधाची अनुभूती आली.

२. यज्ञस्थळी असलेली श्री गणपतीची मूर्ती, श्री काळभैरव दंड आणि दक्षिणाभिमुखी वीर मारुतीची मूर्ती येथे स्वामी प्रवीणराजबाबाजी यांना प्रचंड प्रमाणात देवतांची शक्ती अन् अस्तित्व जाणवले.

३. बाबाजींनी विकलांग अवस्थेत असलेले सनातन संस्थेचे संत पू. सौरभ जोशी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ‘पू. सौरभदादा हे अवधूत अवस्थेतील जीव आहेत. ते काही बोलत नाहीत; पण त्यांना सर्व ज्ञात आहे’, असे सांगितले.

४. पू. सौरभदादांच्या खोलीतून निघण्यापूर्वी बाबाजींनी त्यांना निघण्यासाठी विचारले; पण पू. सौरभदादांनी त्यांना ‘नको, नको’, असे म्हटले. त्या वेळी बाबाजी त्यांचे आज्ञापालन करत तेथेच थांबले.

५. सनातन आश्रमातील स्वागतकक्षात असलेले श्रीकृष्णाचे चित्र पाहून बाबाजींना ‘या चित्रामध्ये श्रीकृष्ण प्रत्यक्षात (सूक्ष्मरूपात) आहेत. ते साधकांवर आलेली सर्व संकटे स्वतःवर घेत आहेत, तसेच त्यांच्या हातातील सुदर्शनचक्र पुष्कळ गतीने फिरत आहेत’, असे जाणवल्याचे सांगितले. या वेळी बाबाजींनी त्यांच्या शिष्यांनाही ‘श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून काय जाणवते ? ’, याचा प्रयोग करण्यास सांगितला. हा प्रयोग करतांना त्यातील अन्य बारकाव्यांविषयी त्यांनी शिष्यांना मार्गदर्शन केले.

६. बाबाजींनी असेही सांगितले की, वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असून त्याची प्रक्रिया वर्ष २०२० पासून प्रारंभ होणार.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment