सण, धार्मिक उत्सव आणि व्रते

सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांना हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा, तसेच सात्त्विकता आणि चैतन्य वाढून त्याचा ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी सण, धार्मिक उत्सव आणि व्रते साहाय्यभूत ठरतात. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांचे महत्त्व या लेखातून आपण समजून घेऊया.

१. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते साजरे करण्याचे उद्देश

१. देवतांची कृपादृष्टी संपादन करणे
२. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संतमाहात्म्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
३. आपण ज्या धर्मात जन्म घेतला, त्या धर्माचे शिक्षण मिळवणे

४. ईश्‍वरोपासनेतून कुटुंबात सतत भक्तीभाव आणि धर्मनिष्ठा वृद्धिंगत करणे
५. दैनंदिन ठराविक चाकोरीबद्ध जीवनाला बाजूला सारून देवतांची पूजा, सेवा यांच्या माध्यमातून उच्च सांस्कृतिक जीवनाचा समन्वय साधणे
६. समाजातील प्रत्येकात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून व्यक्तीसह समाजजीवनही समृद्ध करणे

अशा विविधांगी आणि व्यापक दृष्टीकोनातून समाजातील धर्म कायम टिकवून संपूर्ण सृष्टीला सुखी करणे, हा उत्सव करण्यामागचा प्राचीन आर्यांचा मूळ उद्देश होता.

अ. सर्वसाधारण माहिती

आमचे सण आणि उत्सव हे असे आहेत की, जे इहलोकी सुखावह होतातच, शिवाय मृत्यूनंतर सद्गती देतात.

आ. निसर्गातील बदल

उदा. नारळी पौर्णिमा. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात.

इ. अवतारांच्या जन्मतिथी

उदा. श्रीराम नवमी. श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतारांच्या जन्मतिथी साजर्‍या करतात; कारण देहत्याग हा त्यांचा मृत्यू नसतो. ते भक्तांसाठी केव्हाही देह धारण करू शकतात, म्हणजेच ते अमर आहेत.

ई. संतांच्या पुण्यतिथी

उदा. श्री ज्ञानेश्वर पुण्यतिथी. संतांच्या देहत्यागाचा दिवस साजरा करतात; कारण ते जन्माला येतात, तेव्हा बहुधा बाह्यतः केवळ सर्वसाधारण व्यक्ती किंवा साधक असतात. पुढे साधना करून ते संतपदाला पोहोचतात. देहत्यागानंतर ते उच्चलोकात जातात आणि त्यांचे कार्य आणखी वाढते; कारण देहासाठी आवश्यक असलेली शक्ती देह उरलेला नसल्याने कार्यासाठीच वापरली जाते. यासाठी त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस म्हणून पुण्यतिथी साजरी करतात. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत मात्र त्यांच्या मृत्यूदिनी श्राद्ध करणे आवश्यक असल्याने तो दिवस लक्षात ठेवतात.

उ. पौराणिक आणि ऐतिहासिक घटना

उदा. वटपौर्णिमा. या दिवशी सावित्रीने यमाला वादविवादात जिंकून पतीला पुन्हा जिवंत करून घेतले.

ऊ. आध्यात्मिक शिकवण

साधक, साधन आणि साध्य यांच्यात अद्वैत व्हावे, साधकाने परमेश्वराशी एकरूप व्हावे, हा साधनेचा एकमेव उद्देश असतो. त्या दृष्टीने एक टप्पा म्हणून साधनांतही ईश्वराचे रूप पहायला शिकण्याच्या दृष्टीने काही सण साजरे केले जातात, उदा.

१. शीतला सप्तमी

स्वयंपाकाच्या शेगडी, कढई, सांडशी वगैरे साधनांचा या दिवशी वापर न करता त्यांची पूजा केली जाते.

२. पोळा

या दिवशी शेतकरी बैल आणि नांगर यांची पूजा करतात.

३. विजयादशमी

प्रत्येक जण आपापल्या साधनांची पूजा करतो, उदा. शिंपी कात्री आणि शिलाई यंत्र यांची; विद्यार्थी अन् अभ्यासक त्यांच्या पुस्तकांची वगैरे.

४. लक्ष्मीपूजन

व्यापारी लोक तराजू आणि हिशोबाच्या वह्या यांची पूजा करतात, तसेच गृहिणी केरसुणीची पूजा करतात.

२. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांच्यातील भेद

हा भेद स्पष्ट असा नाही; कारण काही सण हे धार्मिक उत्सव आणि व्रत म्हणूनही साजरे केले जातात, उदा. श्रीराम नवमी वैयक्तिकरित्या साजरी करतात, तेव्हा ‘सण’ असतो, समाजात एकत्रितपणे साजरी करतात, तेव्हा ‘उत्सव’ असतो आणि संकल्प सोडून वैयक्तिकरित्या करतात, तेव्हा ‘व्रत’ असते.

३. सण, उत्सव इत्यादींकडे केवळ रूढी म्हणून
पाहू नका, तर त्यांमागील गूढार्थ आणि शास्त्र लक्षात घ्या !

भारतात अनेक सण, उत्सव आणि परंपरा आहेत. बहुतांश जण त्यांकडे केवळ रूढी म्हणून पाहातात आणि त्या दृष्टीनेच साजरे करतात; त्यांच्या पाठीमागील गूढार्थ आणि शास्त्र लक्षात घेत नाहीत. गुढीपाडव्याला कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण करतात. ‘इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात त्या काळात जास्त प्रमाणात येणार्‍या प्रजापति-लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण केल्याने प्रजापति-लहरींचा लाभ अधिक होण्यास साहाय्य होते’, हे कडुनिंब ग्रहण करण्यामागील शास्त्र आहे. प्रादेशिकभिन्नता, लोकजीवन, उपासनेच्या पद्धती इत्यादींमुळे सण, उत्सव साजरे करतांना ठिकठिकाणच्या चालीरीतींत काही वेळा भेद आढळतो. शास्त्रीय आधार नसतांनाही केवळ पूर्वापार चालत आलेली लौकिक प्रथा म्हणून एखादी प्रथा साजरी करणे हे अयोग्य आहे. अशा लौकिक प्रथांना मूठमाती देऊन शास्त्रसंमत कृती करणेच आवश्यक असते. व्रतांविषयी त्यांच्यामागे एखाद्या उन्नतांचा संकल्प असतो, हेच त्यांच्यामागचे शास्त्रीय कारण होय.

४. धर्म आणि संस्कृती यांची हानी करणार्‍या प्रथांना विरोध करा !

अशा प्रथांनी सध्या जनमानसात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे, उदा. दिवाळी आणि गणेशोत्सव यांप्रसंगी फटाके वाजवले जातात, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांच्या निमित्ताने अनेक अपप्रकार होतात. ‘या प्रथा म्हणजेच सण किंवा उत्सव साजरा करण्याची पद्धत’, असा चुकीचा संस्कार भावी पिढीवर होऊ लागला आहे. या प्रथांवर बहिष्कार टाकणे आणि त्यांना विरोध करणे, हे धर्मपालनच आहे.

५. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांचे ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने महत्त्व

अ. सण, उत्सव आणि व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते आणि त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्वराकडे जाण्यास साहाय्य होते.

आ. साधकांच्या दृष्टीने कर्मकांड जरी कनिष्ठ श्रेणीचे असले, तरी साधना न करणार्‍यांना हळूहळू साधनेकडे वळवण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरते. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव आणि व्रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ प्रतिशत तिथींना यांपैकी काही ना काही असतेच.

इ. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे; पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव आणि व्रत यांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल.

सण, उत्सव आदींमागील शास्त्र लक्षात घेऊन ते श्रद्धापूर्वक साजरे केले जावोत आणि त्यायोगे जीवन कल्याणमय होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment