सात्त्विक आहार

अनुक्रमणिका

१. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते

२. कलियुगातील आहार

३. सात्त्विक आहाराचे महत्त्व

४. सात्त्विक आहाराने पालट (बदल) होण्यातील टप्पे

५. संयत आहारपद्धतीने उन्नती होण्यातील टप्पे


शरिराचा सत्त्वगुण वाढला, तर ईश्वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते. सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते, तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही.

 

सात्त्विक आहार

सात्त्विक आहार

१. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’, म्हणजे ‘साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे माध्यम आहे’, असे म्हटले जाते. याचे कारण असे की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी मनुष्याला देहाची (शरिराची) नितांत आवश्यकता असते. शरीर आरोग्यदायी रहाण्यासाठी आहार चांगला असावा लागतो. आहार चांगला असण्यासह सात्त्विक असला, तर शरिराचा सत्त्वगुणही वाढायला साहाय्य होते. शरिराचा सत्त्वगुण वाढला, तर ईश्वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते. सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सात्त्विक आहाराचे सेवन केल्यामुळे आपले शरीर, मन आणि बुद्धी सात्त्विक बनते, तर मांस आणि मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी बनते. खरेतर मांसाहार हा माणसाचा आहार नाहीच. सृष्टी-निर्मात्याने मांसाहार मानवासाठी निर्माण केलेला नाही. आधुनिक आहारतज्ञ शाकाहार चांगला कि मांसाहार चांगला याविषयी स्पष्टपणे काही सांगत नाहीत. प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कॅलरीज आदी विषयांच्या पलीकडे त्यांची झेप जात नाही. मद्य हा सुद्धा अन्नपदार्थ नाहीच. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते, तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही, हे येथे आवर्जून सांगावेसे वाटते.

२. कलियुगातील आहार

‘हा रज-तमात्मक प्रधान कृतींच्या आहारी गेल्याने तो आचारयुक्त आहार न रहाता विकृतीजन्यतेचे सावट घेऊन जन्माला आलेला एक प्रकारचा कुयोग दर्शवणारा घटकच बनला आहे. आहारावर विदेशी संस्कृतीची तमोगुणी छाया असल्याने हा आहार ‘आहार’ न रहाता असुरांचे पोषण करणारी एक विकृतीच बनली आहे.

३. सात्त्विक आहाराचे महत्त्व

सात्त्विक आहारातून सात्त्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो. आहार हा तमोगुणी असेल, तर या तमोगुणी ऊर्जेवर चालणारा देह हासुद्धा पापयुक्त कर्माला बळी पडतो. पापयुक्त कर्म वातावरणात मोठ्या प्रमाणात आपली सूक्ष्म स्पंदने सोडून त्या त्या स्तरावर या स्पंदनांना घनीभूत करून त्यांचे विशिष्ट कार्यकारी केंद्रात रूपांतर करते. योग्य आणि सात्त्विक आहाराच्या मुशीतून घडलेले जीव हे सज्जन असतात आणि विचारांच्या योगे सत्त्वशील मार्गाचे आचरण करणारे असतात. पूर्वीचे ऋषीमुनी यांचा आहारावर विशेष कटाक्ष असे. सात्त्विकतेचे वर्धन करणारा योग्य तेजदायी आहार देहात एक प्रकारची तेजस्वी कंपने निर्माण करून त्या त्या स्तरावर त्या त्या जिवाला योगी बनवतो. आहारावर नियंत्रण ठेवणे, म्हणजेच जिभेचे चोचले न पुरवणे, हे अतिशय अवघड असते. रसना आणि वाणी यांच्यावर नियंत्रण मिळवणारा जीव ‘योगी’ या पदाला प्राप्त होतो.

४. सात्त्विक आहाराने पालट (बदल) होण्यातील टप्पे

अ. वैराग्य

योग्य आहारातून तेजाच्या मार्गाने पेशींचे पोषण होऊ लागल्याने साधना करतांना त्या त्या स्तरावर निर्माण झालेली आध्यात्मिक ऊर्जा त्या त्या पेशीकेंद्राच्या स्तरावर घनीभूत होते आणि या ऊर्जेतूनच जिवाचा प्रवास वैराग्याकडे होऊन वासनारूपी आसक्ती त्यागण्यात होतो.

आ. देहबुद्धी घटणे

आहारातून जीव विचारांच्या मार्गाने चैतन्यविश्वात प्रवेश करता झाल्याने या मार्गात असतांना त्याची देहबुद्धी घटू लागते.

इ. आहाराचेही भान न रहाणे

देहबुद्धीचे जडत्व संपले म्हणजे, आहाराचेही भान रहात नाही. आहार घेणे काय किंवा न घेणे काय दोन्ही कृती या जिवाच्या ठायी सारख्याच स्तरावर तोलल्या जातात. अशा प्रकारे तो आहारविषयक संवेदनांच्या तरंगांच्या पलीकडे जातो.

ई. चैतन्याच्या पटलावरच विहार

आहारविधान जीवनातून नाहीसे झाले म्हणजे, देह अंतर्यामी केवळ चैतन्याच्या पटलावरच विहार करू लागतो.

उ. सात्त्विक विचारांचे संवर्धन

योग्य आणि सात्त्विक आहार घेतल्याने त्यातून सात्त्विक ऊर्जेची निर्मिती झाल्याने ही ऊर्जा मनात सात्त्विक विचारांचे संवर्धन करून चित्तावर त्यातून निर्माण झालेल्या पुण्यसंचयाचा संस्कार करते.

ऊ. सिद्धी

हा पुण्यसंचय कालांतराने जिवाला आध्यात्मिक क्षेत्रात पुढच्या पुढच्या टप्प्याच्या सिद्ध अनुभूतींच्या विश्वात सोडतो.

ए. संतत्व, ऋषीत्व आणि देवत्व

सात्त्विक आहार संतत्व देऊ शकते, आहारत्याग हे ऋषीत्व देते, तर आहारशून्यता, म्हणजेच आहार घेणे, न घेणे या जाणिवांच्या पलीकडे जाणे, हे जिवाला देवत्व देते.

हिंदु धर्माने घालून दिलेली योग्य आणि सात्त्विक आहार बनवण्याची आचरणयुक्त नियमपद्धती जिवाला विविध टप्प्यांतून, म्हणजेच सज्जन, साधक, संत, ऋषी अन् तद्नंतर देवधारणा यांपर्यंत सोडून नंतर मोक्षात विलीन करून देते.

५. संयत आहारपद्धतीने उन्नती होण्यातील टप्पे

हिंदु धर्मातील आहारपद्धतीला ‘संयत आहारपद्धती’ असे म्हणतात.

अ. पिंडशुद्धी

‘संयत आहारपद्धती’ ही पंचतत्त्वात्मक ऊर्जेच्या संतुलनावर आधारित आहे. यामुळे योग्य आहारातून त्या त्या प्रमाणात योग्य त्या पद्धतीने त्या त्या पंचतत्त्वात्मक स्तराचे देहात योग्य त्या प्रमाणात संचयन होते. हे संचयन जिवाला पिंडशुद्धीसाठी उपयुक्त ठरते.

आ. सात्त्विक विचारांच्या निर्मितीचे महामंडल सिद्ध (तयार) होणे

पिंडशुद्धीतून जीव विश्वमंडलाकडे, म्हणजेच आपल्या पिंडाच्या परिकक्षा भेदून बाह्य वायूमंडलाचा विचार करू लागतो, म्हणजेच योग्य आणि सात्त्विक आहारातून सात्त्विक विचारांच्या निर्मितीचे महामंडल साधते.

इ. मनोलय आणि बुद्धीलय

हे विचारांचे महामंडल शेवटी विचारत्यागातून मनोलयाकडे आणि चैतन्याच्या आकलनातून बुद्धीलयाकडे नेते.

ई. चित्तशुद्धी (संतपद)

मनोलयाची आणि बुद्धीलयाची जाणीव जिवाची चित्तशुद्धी साधते.

उ. देहबुद्धीलय (ऋषीपद)

चित्तशुद्धीच नित्यस्वरूपी जिवाला चैतन्याशी जोडून देते; म्हणून देहाची कुडी सात्त्विक आहाराने घडवून त्याची स्थूल स्तरावर शुद्धी साधून त्यानंतर सात्त्विकतेच्या संवर्धनातून जीव सूक्ष्मदेहांच्या शुद्धीकडे जातो, त्याच वेळी त्याचे आहारावरील लक्ष घटून तो अल्प कालावधीत देहबुद्धीलयाकडे जातो. म्हणजे सात्त्विक आहारच जिवाला कालांतराने आहाराला त्यागण्यास प्रवृत्त करून त्यागातून निवृत्तीकडे, म्हणजेच ऋषीपदाकडे नेतो. वैराग्यवर्धन, म्हणजेच ऋषीत्व. वासना संपल्या म्हणजे वैराग्यवर्धन साधते.

ऊ. देवत्व

वैराग्यवर्धनाची जाणीव संपली म्हणजे देवत्व येते.

सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ दर्श अमावास्या ७.३.२००८, दुपारी १२.४२)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’

Leave a Comment