वटपौर्णिमा

अनुक्रमणिका

१. तिथी

२. उद्देश

३. सावित्रीचे महत्त्व

४. व्रताची देवता

५. शास्त्रानुसार वटपौर्णिमेचे व्रत कसे साजरे करावे ?

६. वटपौर्णिमेचे व्रत आपत्काळात कसे साजरे करावे ? (वटपौर्णिमेचे व्रत कोरोना महामारीच्या संकटकाळात कसे साजरे कराल ?) 

७. वटवृक्षाचे महत्त्व

८. वटपौर्णिमा या व्रताचे महत्त्व

——————————————————-

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.

 

सत्यवान सावित्री
सत्यवान सावित्री

१. तिथी

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात.

 

२. उद्देश

सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

 

३. सावित्रीचे महत्त्व

भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.

 

४. व्रताची देवता

वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.

 

५. वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत

वटवृक्षाचे पूजन करतांना
वटवृक्षाचे पूजन करतांना

अ. संकल्प

प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.

आ. पूजन

वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात.

इ. उपवास

स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा. (अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणजे अंनिसचे कार्यकर्ते ‘वटपौर्णिमा’ म्हणजे निवळ ‘भाकडकथा’ असा प्रचार करतात. कणाकणांत देवतांचे अस्तित्व मानून वृक्षदेवतेची पूजा करायला शिकवणारा महान हिंदु धर्म कुठे, तर हिंदु धर्माला असत्य ठरवणारे असे बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी कुठे !)

वटपौर्णिमेला हल्ली शहरासारख्या ठिकाणी वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. वटवृक्षाचे पूजन करणे कसे योग्य आहे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन का करू नये याचे अध्यात्मशास्त्रीय कारण आणि सूक्ष्म-परिक्षण वाचण्यासाठी ‘वटपौर्णिमेला वडाचे झाड आणि केवळ वडाची फांदी यांच्या पूजनातील भेद’ या लेखावर क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

६. वटपौर्णिमेचे व्रत आपत्काळात कसे साजरे करावे ?

आतापर्यंत आपण वटपौर्णिमेचे समजून घेतलेले अध्यात्मशास्त्र धर्मा ने सर्वसाधारण काळासाठी प्रतिपादले आहे. सर्वकाही अनुकूल असून धर्माप्रमाणे वागता येईल, हा ‘संपत्काल’ होय. येथे एक महत्त्वाचे सूत्र असे आहे की, हिंदु धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात  दळणवळण बंदी (लॉकडाऊन )आहे. या काळातच  वटपौर्णिमा येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या काही धार्मिक कृती या वेळी करता येणार नाहीत. या दृष्टीने प्रस्तुत लेखात सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून काय करता येऊ शकेल, याचा विचारही करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या काळात आपण  फारसे घराबाहेर जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने आपद्धर्माचा भाग म्हणून पुढील कृती करता येतील :

६ अ. आपत्काळातील वटपौर्णिमा (वडाच्या वृक्षाचे पूजन) !

५.६.२०२० या दिवशी वटपौर्णिमा आहे. भारतात दळणवळण बंदी असल्याने स्त्रियांना वडाच्या झाडाकडे एकत्र जमून वटवृक्षाची पूजा करणे शक्य नाही. त्यामुळे काही जण वटवृक्षाची फांदी घरात आणून तिचे पूजन करतात; मात्र हे सर्वथा अयोग्य असून वृक्षपूजन करण्याच्या मूळ उद्देशालाच छेद देणारे आहे. सौभाग्यवती स्त्रीने घराबाहेर न पडता घरात पुढीलप्रमाणे पूजन करावे :

१. पाट किंवा चौरंग यांना प्रदक्षिणा घालता येईल, अशा रितीने पाट किंवा चौरंग पूर्व-पश्‍चिम ठेवावा.

२. पाट किंवा चौरंग यांवर गंधाने वटवृक्षाचे रेखाचित्र काढावे.

३. आपण प्रत्यक्ष वटवृक्षाखाली बसलो आहोत, असा भाव ठेवून त्याचे विधिवत् पूजन करावे.

४. आपण प्रत्यक्ष वटवृक्षालाच प्रदक्षिणा घालत आहोत, हा भाव ठेवून या पाटाला प्रदक्षिणा घालत सूताचे वेष्टन करावे (दोरा गुंडाळावा) आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करावी.

५. शहरात ʻफ्लॅटʼमध्ये रहाणार्‍या व्यक्तींना घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास त्यांनी पूजनानंतर प्रार्थना करून पाट बाजूला ठेवला तरी चालेल.

– श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, रामनाथी, गोवा.

 

७. वटवृक्षाचे महत्त्व

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.

प.पू. परशराम<br />पांडे महाराज
प.पू. परशराम पांडे महाराज

अ. ‘प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे.

आ. बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले.

इ. प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते.

ई. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह, नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे.

उ. वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो.

ऊ. वडाच्या चिकात कापूस वाटून त्याचे अंजन डोळ्यांत घातले असता मोतीबिंदू ठीक होतो.’

ए. अक्षय अशा प्राणाचे दर्शक असणे : ‘वटसावित्रीची पूजा म्हणजे `सावित्रीच्या पातिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा’; म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे.’

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (कार्तिक शु. नवमी, कलियुग वर्ष ५११२ (१५.११.२०१०))

 

८. वटपौर्णिमा या व्रताचे महत्त्व

अ. ‘या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्त्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते. शक्तीरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असता जीव-शिव एकरूपतेची अनुभूती येऊ शकते. वायूमंडलातील शिवरूपी लहरींच्या गोलाकार भ्रमणामुळे देहात वैराग्यभावाची निर्मिती होऊ शकते. यामुळे माया त्यागातून होणारे ईश्वराचे अनुसंधानात्मक स्मरण शिवरूपी अधिष्ठानातून जिवाला मिळण्यास साहाय्य होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१)

आ. वट हा शिवरूपी आहे. वडाच्या खोडात गर्भशाळूंकेचा वास असतो. वडाच्या खोडाच्या उभ्या छेदावर जी सूक्ष्म-वलये असतात, त्या वलयांमध्ये सुप्त लाटांरूपी लहरींचे प्रमाण अधिक असते. या लहरी ब्रह्मांडातील शिवतत्त्व आकृष्ट करून घेतात आणि आवश्यकतेप्रमाणे वायूमंडलात प्रक्षेपित करतात. वटपौर्णिमा या तिथीला ब्रह्मांडात येणार्‍या शिवतत्त्वाच्या लहरी या क्रियाशक्तीशी निगडित असतात. ज्या वेळी वडाच्या खोडाला मध्यभागी सुती धाग्यांनी गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावऊर्जेप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होतात आणि सुती धाग्यांमध्ये संक्रमित होऊन बद्ध होतात. सुती धागा हा पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी निगडित असल्याने या सुती धाग्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट होऊन ते दिवसभर वायूमंडलात प्रक्षेपित होत रहाते. कालांतराने या लहरी भूमीतून दूरवर संक्रमित होतात. यामुळे संपूर्ण भूमी चैतन्यमय बनते.

शिवरूपी वडाची पूजा करणे, म्हणजे त्या वडाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची करूणामय भावाने पूजा करणे होय. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ति आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला लाभ मिळण्यास साहाय्य होते; म्हणून या दिवशी वडरूपातील शिवाला स्मरून पतीला दिर्घायुष्य लाभण्यासाठीप्रार्थना करून कर्माला शक्ति-शिव यांची जोड देऊन ब्रह्मांडातील शिवतत्त्वाचा यथायोग्य लाभ करून घ्यायचा असतो.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १४.५.२००५, दुपारी १२.२९)

इ. वटपौर्णिमा या व्रताच्या पूजनामध्ये पाचच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र

‘कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्व दर्शक असल्याने पाच फळांच्या समूच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या लहरी अल्प कालावधीत जिवाच्या कोषांपर्यंत झिरपू शकतात. यामुळे जिवाला देवतेच्या चैतन्य लहरींचा खोलवर आणि दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते; कारण जिवाचा देह हाही पृथ्वी आणि आपतत्त्वात्मक आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, कलियुग वर्ष ५११०, १०.८.२००५, सायं. ६.३५)

ई. ‘सात जन्म एकच पती मिळावा’, असे व्रत करणे म्हणजे अनेकातून एकात आणि एकातून शून्यात जाणे

१. ‘स्त्री ‘सात जन्म हाच (एकच) पती मिळो’, असे व्रत करते. याचा अर्थ ती स्त्री अनेकातून एकात आलेली असते. तसेच एकपत्नीव्रत घेतलेला पुरुष अशा स्त्रीच्या जीवनात येण्याची शक्यता असते. अशा जोडीची देवाण-घेवाण एका जिवाशीच

पू. (डॉ.) चारुदत्त<br />पिंगळेकाका
पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका

रहाते. तसेच अनेकातून एकात आल्याने साधनेद्वारे शुद्ध पुण्य मिळवून सुख-दुःखाच्या पलीकडे जाणे तिला शक्य होते. एकात आल्याने तिला पती (पतितांचा उद्धार करणारा), म्हणजे गुरु जीवनात येतात. त्यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत जीव-शिव ऐक्य साधणे शक्य होते.

या पूर्वीच्या युगात पतीच गुरुपदाचा अधिकारी असल्याने पती आणि गुरु एकच असत; मात्र सध्याच्या कलियुगात अन्य देहधारी गुरु जीवनात येतात. यासाठी व्यवहार करतांना पतीने पत्नीचा सल्ला घेतला पाहिजे आणि आध्यात्मिक उत्कर्षासाठी पत्नीने पतीचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच एकपत्नीव्रत किंवा एकपतीव्रता पाळणारे पुरुष किंवा स्त्रिया काही प्रमाणात केवळ भारतामध्येच आढळतात. यावरून भारताचे साधना किंवा आध्यात्मिक उत्कर्ष यांसाठी किती महत्त्व आहे, हे लक्षात येते.

२. अनेकातून एकात आलेल्या जिवांना एकातून शून्यात जाण्यासाठी आणि स्त्रीला (शिष्य किंवा कुंडलिनीला) पतीची (म्हणजे शिवाची) आवश्यकता असते. एकनिष्ठेद्वारे एकत्वातून शून्यात प्रवेश शक्य असतो. वटसावित्री व्रत हे स्त्रियांसाठी (कुंडलिनी शक्तीसाठी) एकनिष्ठेतून (एकातून) शून्यात (सहस्रारमध्ये) प्रवेश करण्यासाठीचा मार्ग असतो.’

– आधुनिक वैद्य (डॉ.) चारुदत्त पिंगळे (सनातनचे २२ वे संत) यांच्या माध्यमातून, १०.९.२००६, दुपारी १२.१०

2 thoughts on “वटपौर्णिमा”

 1. या वर्षीचा व्रत मुहूर्त किती वाजता पासून किती वाजेपर्यंत आहे ते कृपया सांगावे.
  तसेच गरोदर स्त्रीने हे व्रत कसे करावे याविषीयी कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
  कळावे.

  Reply
  • नमस्कार,

   गरोदर स्त्रीने 6 मास पूर्ण होईपर्यंत सामान्य पणे सर्व व्रत, पूजा इत्यादी करावीत, मात्र 7 वा मास लागल्यापासून पुढे व्रत इत्यादी करू नये, ते त्या वर्षीचे राहिले तरी हरकत नाही, पुढच्या वेळीपासून करावे.

   Reply

Leave a Comment