सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त ! – दत्ता जुवेकर, गणेशमूर्तीकार, गोवा

गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर

केपे – सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे उद्गार बेतुल, केपे येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी काढले. श्री. दत्ता जुवेकर हे गेली ६ दशके श्री गणेशमूर्ती करण्याची सेवा करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी संवाद साधतांना मूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी हे उद्गार काढले. मूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर पुढे म्हणाले, ‘‘मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून श्री गणेशमूर्ती बनवण्याची सेवा करत आहे. श्री गणेशमूर्ती या चिकण मातीपासूनच बनवणे आवश्यक आहे. मूर्तीपूजनाच्या वेळी चिकणमातीच्या मूर्तींमध्ये देवतेचे तत्त्व मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असते. मूर्ती चिकण मातीपासून बनवल्याने ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळते. यामुळे मूर्तीतील गणेशतत्त्व वातावरणात पसरते आणि त्याचा सर्वांनाच लाभ होत असतो. यामुळे मी आणि माझ्यानंतर आता माझी मुलेही चिकण मातीपासूनच गणेशमूर्ती बनवतात. आम्ही प्रत्येक वर्षी सुमारे २५० श्री गणेशमूर्ती बनवतो. आर्थिक लाभासाठी प्लास्टर ऑफ परिस किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या मूर्ती बनवून त्याची विक्री करण्यास माझा विरोध आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment