अंबाडा घालण्याचे महत्त्व

 

१. अंबाडा घालण्याचे महत्त्व

१ अ. अंबाडा घालणे

स्त्रिया मध्यभागी भांग पाडून केसांना मानेवर पाठीमागे एकत्रित करून त्यांची विशिष्ट प्रकारे गाठ बांधतात. त्याला ‘अंबाडा घालणे’, असे म्हणतात.

१ आ. सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असणे

अंबाड्यामध्ये वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि आवश्यकतेनुसार त्या प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते.

१ इ. चैतन्याच्या लहरी घनीभूत करण्याची क्षमता असणे

अंबाड्यात चैतन्याच्या लहरी घनीभूत करून त्यांना आवश्यकतेप्रमाणे स्पर्शाच्या माध्यमातून डोक्याच्या पोकळीत संक्रमित करण्याची क्षमता असते. यामुळे अल्प काळातच स्त्रीचा देह सात्त्विक स्पंदने ग्रहण करण्यासाठी संवेदनशील बनतो आणि त्या देहाची शुद्धी होते.

१ ई. अंबाडा हे आध्यात्मिक ऊर्जा गोळा करण्याचे उत्तम माध्यम असणे

त्रिपुटी म्हणजे शरिरात असलेल्या चेतनाशक्तीचा प्रवाह इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन प्रमुख नाड्यांचा मेंदूच्या पोकळीत एकत्र होण्याचे स्थान. अंबाडा घालण्याच्या प्रक्रियेद्वारे त्रिपुटीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरी अंबाड्याच्या केंद्रबिंदूच्या माध्यमातून पुष्कळ प्रमाणात ग्रहण होतात. या लहरी अंबाडा घालणार्‍या स्त्रीच्या देहाचे वायूमंडलातील आघात करणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण करतात. पारंपरिक पद्धतीने घातलेला अंबाडा स्वतःमध्ये आध्यात्मिक ऊर्जा गोळा करून ठेवण्याचे उत्तम माध्यम आहे.

१ उ. लांब केसांचा अंबाडा घातल्याने देहाची शुद्धी होणे

‘हा स्वतःत चैतन्याच्या लहरी घनीभूत करून आवश्यकतेप्रमाणे त्या स्पर्शाच्या माध्यमातून मस्तिष्क पोकळीत संक्रमित करतो. यामुळे अल्प कालावधीत देह सात्त्विक स्पंदने ग्रहण करण्यास संवेदनशील बनून देहाची शुद्धी होते.

१ ऊ. आखुड केसांचा अंबाडा घालता न आल्याने वाईट शक्तींचे आक्रमण होणे

आखुड केसांचा अंबाडा घालू शकत नसल्याने असे केस मोकळे राहून वायूमंडलातील त्रासदायक स्पंदने गोळा करतात. हे कार्य देहाला दूषित बनवते आणि त्याला वाईट शक्तींच्या आक्रमणाला अल्प कालावधीत बळी पडण्यास भाग पाडते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ ‘विद्वान’ या टोपणनावाने लिखाण करतात)

१ ए. डोक्याच्या पाठीमागे अंबाडा घालणे

‘अंबाड्यात वायूमंडलात असणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची, तसेच आवश्यकतेप्रमाणे प्रक्षेपित करण्याची क्षमता असते. डोक्याच्या पाठीमागे मस्तिष्क पोकळीतील त्रिपुटीला स्पर्श करून अंबाडा घातल्याने त्रिपुटीतून वहाणारी स्पंदने अंबाड्याच्या माध्यमातून ग्रहण होण्याचे प्रमाण मानेवर अंबाडा घालण्याच्या प्रक्रियेपेक्षा अधिक असते. डोक्याच्या पाठीमागे घातलेला अंबाडा स्वतःत आध्यात्मिक ऊर्जा साठवून ठेवण्याचे उत्तम माध्यम असल्याने तो अधिक सात्त्विक मानला जातो.

१ ऐ. मानेवर अंबाडा घालणे

या प्रकारच्या अंबाड्यात सात्त्विक लहरी ग्रहण करून ठेवण्यापेक्षा त्या लगेचच प्रक्षेपित करण्याचे प्रमाण अधिक असल्याने हा अंबाड्याचा प्रकार पहिल्याच्या तुलनेत लाभदायक असण्याचे प्रमाण अल्प आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ ‘विद्वान’ या टोपणनावाने लिखाण करतात.)

१ ओ. अंबाडा घालण्याच्या पद्धतींमध्ये जाणवलेला भेद

‘आजकाल वेगवेगळ्या पद्धतींनी अंबाडा घालतात; पण त्यांच्यात ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता पारंपरिक गाठ बांधून घातलेल्या अंबाड्याइतकी नसते. काही स्त्रिया आधुनिक पद्धतीने अंबाडा घालण्याच्या उद्देशाने त्यावर रंगीबेरंगी काटे किंवा चाप (क्लिप्स) लावतात. त्यांचे आकारही सात्त्विक नसतात. परिणामी या अंबाड्यात रज-तमात्मक स्पंदने आकृष्ट होतात आणि स्त्रीची आध्यात्मिक दृष्टीने हानी होते.

 

२. अंबाडा घातल्यावर आलेल्या अनुभूती

२ अ. केस वाढवून अंबाडा घातल्याने नम्रता आणि समंजसपणा वाढून प्रगल्भता येणे

‘वर्ष २००४ पासून मी केस वाढवू लागले आणि वेणी घालू लागले. त्या वेळी मला माझ्यात नम्रता आणि समंजसपणा वाढल्याचे जाणवले. तसेच उच्छृंखलपणाही थोडा उणावला. अंबाडा घातल्यावर या गुणांमध्ये आणखी वृद्धी होत असल्याचे जाणवले. बुद्धीने आणि विचारांनी मला प्रगल्भता आल्यासारखी वाटली.’ – कु. गिरिजा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ आ. अंबाडा घालण्यास प्रारंभ केल्यावर त्रास होणे आणि काही दिवसांनी केसांमधे एक
विशिष्ट प्रकारचा पांढर्‍या रंगाचा प्रवाह आकृष्ट होऊन तो शिरस्त्राणाप्रमाणे कार्यरत असल्याचे जाणवणे

‘मी अंबाडा घालू लागल्यावर माझे डोके दुखायचे आणि ‘कधी एकदा अंबाडा सोडून वेणी घालते’, असे मला वाटायचे. ‘डोक्यावर भार आहे’, असे मला जाणवायचे. उलटीसारखे होऊन मळमळायचे, तरीही अंबाडा घालणे चालूच ठेवल्यावर आता मात्र हलकेपणा जाणवतो. अंबाडा सोडून इतर केशरचना केल्यास डोके दुखते. ‘अंबाडा न घातल्यास चुकल्यासारखे वाटते आणि माझ्याकडून अधर्माचरण होत आहे’, असे वाटते. ‘केसांमधे एक विशिष्ट प्रकारचा पांढर्‍या रंगाचा प्रवाह आकृष्ट होऊन तो शिरस्त्राणाप्रमाणे कार्यरत आहे’, असेे जाणवते. पूर्वी अंबाडा घातल्यावर तो मानेला टोचायचा; परंतु आता तीच पद्धत असूनही केसांचा स्पर्श फुलांप्रमाणे वाटतो.’

– डॉ. (कु.) आरती तिवारी, संभाजीनगर
संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘केशरचना कशी असावी ?’

Leave a Comment