केसांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन

स्त्री आणि पुरुष यांच्या शरिराचे अविभाज्य अंग असलेल्या केसांसंबंधीचा आध्यात्मिक दृष्टीकोन प्रस्तूत लेखाद्वारे जाणून घेऊ.

पूर्वी स्त्रिया स्नानापूर्वी फणीघरासमोर (आरसा असलेली लाकडाची एक लहान पेटी, ज्यात कंगवा, फण्या, कुंकू, मेण, आकडे अशा केसांशी संबंधित साहित्य ठेवलेले असे.) बसून केस विंचरत असत, केसांची गुंतवळ चुलीत टाकत असत आणि केस मोकळे सोडून बाहेर जात नसत. आई किंवा आजी यांच्याकडून केसांसंबंधित अशा प्रकारचे संस्कार (आचार) सहजपणे मुलींवर होत असत. प्रत्येक मासात (महिन्यात) मुलालाही केस कापण्यासाठी नापिताकडे पाठवण्यात येई. स्नान झाल्यावर केसांना तेल लावायचा परिपाठही वडिलांकडून मुलाला शिकवला जाई. मधल्या काळात धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून धार्मिक आचार आणि परंपरा हळूहळू सोडून देणे किंवा त्यांविषयी अनास्था बाळगणे असे घडले. यातून सांस्कृतिक स्तरावर हिंदु समाजाची हानी झालीच; पण त्यापेक्षाही हिंदूंची आध्यात्मिक हानी पुष्कळ झाली.

केशभूषा ही केवळ सौंदर्यवर्धनासाठी नव्हे !

सध्या स्त्री-पुरुषांच्या केशभूषेकडे पहाण्याचा बहुतांश समाजाचा दृष्टीकोन केवळ सौंदर्यवर्धनाचा झाला आहे. येथेच धोक्याची घंटा वाजते. स्त्रीने केस कापणे, केस मोकळे ठेवून फिरणे यांसारख्या गोष्टी सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने जिवाला आवडल्या, तरी त्याद्वारे वाईट शक्तींच्या आक्रमणांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

मानवी शरिरात निसर्गाने केलेली केसांची योजना केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही, तर केसांच्या माध्यमातून ईश्वरी चैतन्य ग्रहण करणे आणि जिवाची सात्त्विकता वाढवणे, यांसाठीही आहे. केसांच्या माध्यमातून ईश्वरी चैतन्य ग्रहण केल्यास वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून जिवाचे रक्षण होते.

पिंडशुद्धतेच्या प्रक्रियेत केसांच्या शुद्धीकरणाचे महत्त्व

पिंडशुद्धतेत केसांच्या शुद्धतेलाही पिंडपोकळीच्या शुद्धतेएवढेच महत्त्व आहे. केसांच्या संदर्भात आचार पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे.

१. केस आणि वाईट शक्ती यांचा असलेला संबंध

अ. केस हा पिंडाचा रज-तमात्मक भाग असल्याने या माध्यमातून वाईट शक्तींचा शिरकाव देहात होऊ शकतो.

आ. केसांच्या मुळांशी वाईट शक्ती सूक्ष्म स्थाने बनवून ब्रह्मांडातून येणारे ईश्वरी चैतन्य अडवून पिंडाला त्याच्या शुद्धतेपासून परावृत्त करू शकतात.

इ. मोकळ्या केसांच्या घर्षणातून निर्माण होणारी उष्ण ऊर्जा ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या रज-तमात्मक प्रवाहाला आकर्षित करणारी ठरते; म्हणूनच सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी, म्हणजेच तमोकाळी केस मोकळे सोडून फिरणे यांसारख्या कृती निषिद्ध मानल्या जातात.

– ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, कार्तिक शुद्ध सप्तमी, कलियुग वर्ष ५१११, २५.१०.२००९, सकाळी ११.४६)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’

Leave a Comment