आध्यात्मिकदृष्ट्या चैतन्यमय असलेल्या गोमुत्राने केस धुणे

Article also available in :

केस गळणे, कोंडा, केसांच्या जटा होणे यांसारख्या केसांच्या विविध समस्यांवर एक प्रभावी उपाय म्हणजे केस धुण्यासाठी गोमूत्राचा वापर करणे. प्रस्तूत लेखात आपण यासंदर्भात आलेल्या विविध अनुभूतीपहाणार आहोत. हे वाचून गोमूत्राचे आणि पर्यायाने हिंदु धर्माचे महात्म्यही वाचकांना लक्षात येईल.

गोमूत्रमिश्रित पाण्याने आंघोळ करणे, केसांना गोमूत्र
लावणे आणि केसांना गोमूत्र लावून आंघोळ केल्याने आलेल्या अनुभूती

१. गोमूत्रमिश्रित पाण्याने आंघोळ करणे

‘केसांना रासायनिक द्रवरूप साबण (शॅम्पू) लावल्यानंतर साध्या पाण्याने आंघोळ केली आणि शेवटी मी पाण्यात थोडे गोमूत्र घातले अन् त्यातील २ तांबे पाणी डोक्यावर ओतले. तेव्हा मला त्रास देणार्‍या मांत्रिकाचे प्रकटीकरण उणावले, तसेच रासायनिक द्रवरूप साबण (शॅम्पू) लावल्यावर निर्माण झालेले काळ्या शक्तीचे आवरण काही प्रमाणात उणावले आणि माझा नामजपही होऊ लागला.

२. केसांना गोमूत्र लावणे आणि साध्या पाण्याने आंघोळ करणे

अ. डोक्याभोवती, तसेच शरिरावर निर्माण झालेले सापाच्या कातडीसारखे काळ्या शक्तीचे घट्ट आवरण दूर झाले.

आ. डोक्यावरचा दाब आणि शरिरावर जाणवणारी उष्णता अल्प झाली.

इ. डोक्यावर चांगल्या संवेदना जाणवून ‘डोक्यातील प्रत्येक पेशी श्वास घेत आहे’, असे जाणवले.

ई. डोक्याची बधिरता न्यून होऊन तोंडावरील मांत्रिकाचे प्रकटीकरण अल्प झाले आणि तोंडावर चांगला पालट (बदल) जाणवला.

उ. तोंडावरील काळी शक्ती उणावली अन् त्यातील मायावी मोहकता न्यून झाली.’

– सौ. रजनी, गोवा.

३. केसांना गोमूत्र लावून आंघोळ केल्याने आलेल्या अनुभूती

३ अ. ‘दैनिक सनातन प्रभात’मधील सूचनेनुसार प्रयोग करणे

‘१.४.२००७ या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये केसांना गोमूत्र लावण्याच्या संदर्भात सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या सूचनेनुसार ‘केसांना गोमूत्र लावून आंघोळ केल्याने काय जाणवते’, याचा प्रयोग एक मास (महिना) करून जाणवलेली सूत्रे (मुद्दे) आणि आलेल्या अनुभूती लिहून पाठवायच्या होत्या. या सूचनेनुसार २.४.२००७ पासून मी केसांना गोमूत्र लावून आंघोळ करू लागले. आंघोळीपूर्वी मी पुढीलप्रमाणे प्रार्थना करत होते. ‘हे श्रीकृष्णा, हे गुरुमाऊली, गोमूत्र हे सर्व देवतांचे तीर्थ आहे. या तीर्थाने मी – सौ. उषा शरद म्हात्रे – केसांवरून आंघोळ करत आहे. या तीर्थातील चैतन्याचा लाभ माझ्या शरिरातील प्रत्येक पेशीला होऊ दे आणि हा देह चैतन्यमय होऊ दे !’ या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

३ अ १. गोमूत्र केसांना लावल्याने प्रथम झालेला त्रास : पहिले आठ दिवस केसांच्या मुळांना गोमूत्र लावल्यावर टोचल्यासारखे होऊन डोक्याला झोंबत होते. आठ दिवसांनंतर हे झोंबणे न्यून होत बंद झाले.

३ अ २. केसांना गोमूत्र लावून आंघोळ केल्याने झालेले लाभ

अ. शारीरिक
१. केसांमधील कोंडा बर्‍याच प्रमाणात उणावून केस गळणे न्यून झाले आहे.

२. माझ्या डोळ्यांभोवती काळे थर आले होते. ते पूर्णपणे गेले आहेत.

३. पूर्वी मला माझ्या डोक्यावर जडपणा जाणवायचा आणि चालतांना चक्कर आल्यासारखे व्हायचे. केसांना गोमूत्र लावून आंघोळ केल्यामुळे मला होणारा हा त्रास पूर्णपणे थांबला आहे.

आ. आध्यात्मिक
१. शरीर, मन अन् बुद्धी यांवरील काळ्या शक्तीचे आवरण उणावले.

२. आंघोळ करतांना ‘मला सर्व देवता आंघोळ घालत आहेत’, असे वाटते.

३. आंघोळ झाल्यानंतर शरीर हलके झाल्याचे जाणवते.

४. पूर्वी बसून नामजप करतांना मला पुष्कळ त्रास व्हायचा. गोमूत्र लावून आंघोळ करू लागल्यानंतर माझा नामजप एका ठिकाणी बसून सहज होऊ लागला.

५. आता माझा नामजप श्वासासहित होऊ लागला आहे, तसेच मनाला प्रसन्नता आणि शांती जाणवते.

हा प्रयोग करायला सांगितल्यामुळे प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटून कंठ दाटून येतो.’

– सौ. उषा शरद म्हात्रे, डोंबिवली, जिल्हा ठाणे.

३ आ. केसांना गोमूत्र चोळून आंघोळ केली असता केसात गुंता न होणे आणि केस गळायचे थांबणे

‘२००३ च्या गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधीपासून मला वाईट शक्तींचा त्रास होत होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुष्कळ सेवा करायची होती. त्या घाईत मी केसांना पिना लावून केस घट्ट बांधले. दोन दिवस वरवरच विंचरत होते. तिसर्‍या दिवशी विंचरण्यासाठी केस सोडले, तेव्हा ते जटा झाल्याप्रमाणे घट्ट झाले होते. केस सोडवण्यासाठी तेल लावले, केस ओलेसुद्धा केले; पण जटा निघेनात. आजारपणात कित्येक दिवस केस विंचरता येत नाहीत, तरी नंतर केसांतील गुंता सोडवता येतो. मी तर दोन दिवसच केस विंचरले नव्हते; पण माझ्या केसात पुष्कळ जटा झाल्या होत्या. धर्मशास्त्रानुसार ‘केस कापू नयेत’, हे मला ठाऊक होते; पण केस कापण्यावाचून गत्यंतर नाही, अशी अवस्था झाली होती. त्यामुळे मला १५ इंच लांब केस कापावे लागले. त्यानंतर तीन वर्षांनी माझे केस पुन्हा पूर्वीसारखे वाढले. मी सेवेसाठी बाहेर जायला लागले. पुन्हा माझ्या केसात गुंता होऊन माझे केस जायला लागले. ‘मुखावर पुष्कळ काळे डाग पडले आणि डोक्यावरचे केस गळायला लागले. मी समाजात जाऊन सेवा कशी करू’, असे वाटून मी देवाला भावपूर्ण प्रार्थना केली. दुसर्‍या दिवशी मी आंघोळीला गेले असतांना मला केसांना गोमूत्र चोळावेसे वाटले. केसांना गोमूत्र चोळून मी आंघोळ केली. त्या दिवसापासून माझ्या केसांत गुंता झालाच नाही आणि केसही गळायचे पूर्ण थांबले.’ – सौ. मीनाक्षी शेखर इचलकरंजीकर, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

३ इ. गोमूत्र लावल्यावर केस गळण्याचे प्रमाण न्यून होऊन गुंता न होणे

‘पूर्वीपासूनच माझ्या डोक्याच्या उजव्या अंगाला वरती एका विशिष्ट ठिकाणी जाळे लागल्याप्रमाणे माझे केस गोळा व्हायचे आणि त्यात पुष्कळ जटा व्हायच्या. लग्नापूर्वी आई माझ्या केसातील गुंता काढून द्यायची. काही दिवसांनी केस गळायला लागले आणि पांढरेही झाले. वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणि द्रवरूप साबण (शॅम्पू) लावून बघितले; पण त्यामुळे केवळ १ टक्काच पालट झाला. ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये गोमूत्राच्या उपायांविषयी सूचना वाचून मी प्रार्थना करून त्याप्रमाणे केसांना गोमूत्र लावले आणि शिकेकाईने केस धुतले. त्यानंतर लगेच केस गळण्याचे प्रमाण १० टक्क्यांवर आले. गोमूत्र लावल्यावर आता कोठेही गुंता होत नाही. गोमूत्राचा वापर केल्याने केस मऊ झाले.’ – सौ. निलीमा सुशील कुलकर्णी, निफाड, नाशिक.

(जेथे प्रतिदिन गोमूत्र उपलब्ध होऊ शकत नाही, तेथे गोमूत्र-अर्क पाण्यात मिसळून वापरल्याने गोमूत्राएवढाच प्रभावी ठरतो.)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’

Leave a Comment