सनातन संस्थेचे कार्य जग व्यापेल ! – प.पू. आबा उपाध्ये यांचे आशीर्वचन

पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी रामनाथी, गोवा
येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील साधकांवर केली प्रीतीची उधळण !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला भावपूर्ण नमस्कार करतांना प.पू. आबा उपाध्ये
आश्रमासमोर असलेल्या कमलपिठाचे दर्शन घेतांना प.पू. आबा उपाध्ये, समवेत डावीकडून श्री. मनीष श्रीवास्तव, सौ. राजश्री फणसळकर, श्रीमती संध्या कोठावळे, प.पू. आबा यांच्या सेवेत असलेले साधक श्री. किसन काळोखे आणि माहिती सांगतांना सौ. मंगला मराठे
सनातन प्रभातच्या कार्यालयातील प्रदर्शन पहातांना प.पू. आबा उपाध्ये, समवेत डावीकडून श्री. किसन काळोखे, सौ. राजश्री फणसळकर, श्री. मनीष श्रीवास्तव आणि माहिती सांगतांना सौ. मंगला मराठे

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेच्या साधकांना होत असलेले वाईट शक्तींचे त्रास न्यून व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी आध्यात्मिक स्तरावर सातत्याने प्रयत्न करणारे पुणे येथील थोर संत प.पू. नरसिंह (आबा) उपाध्ये यांचे २१ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात शुभागमन झाले. यानिमित्त २३ जुलै या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी युगानुयुगे स्नेहपूर्ण नाते असल्याप्रमाणे सहज वागणार्‍या दोन्ही महान विभूतींचा प्रत्यक्ष संवाद झाला. २५ जुलै या दिवशी प.पू. आबा यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याचे अवलोकन करत असतांना साधकांवर प्रीतीची उधळण केली. या वेळी त्यांनी दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयाला भेट दिली आणि सनातन प्रभातविषयी आत्मीयतेने जाणून घेतले. सनातन संस्थेचे दिव्यांग (विकलांग) अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी यांच्या खोलीत जाऊन त्यांचीही भेट घेतली. आश्रमाविषयी त्यांना सनातन संस्थेच्या साधिका सौ. मंगला मराठे यांनी माहिती दिली. या वेळी प.पू. आबा यांच्या मुली सौ. राजश्री फणसळकर आणि श्रीमती संध्या कोठावळे याही उपस्थित होत्या.

प.पू. आबा उपाध्ये हे सर्वांच्या कल्याणार्थ सतत उपासनेत मग्न असतात. प.पू. आबा उपाध्ये त्यांचे ५ सहस्र वर्षांपूर्वी सत्यलोकवासी झालेले गुरु परमगुरु सदानंद स्वामी यांच्याशी सूक्ष्मातून बोलतात. त्यांचे गुरूंशी सतत अनुसंधान असते.

 

१. प.पू. आबा उपाध्ये यांची ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाला आशीर्वादरूपी भेट

१ अ. सनातन प्रभात नियतकालिक कार्यालयात प्रवेश करताच प.पू. आबा यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी अतिशय उत्साहाने साधकांशी संवाद साधला. पत्रकारितेतील कोणतेही प्रचलित प्रशिक्षण न घेताही साधक उत्साहाने करत असलेल्या सेवेविषयी त्यांना अतिशय कौतुक वाटले. त्यांनी संपादकांची आस्थेने चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘दैनिकाचा अंक अतिशय चांगला असतो. त्यातील लिखाणही चांगले असते. मी प्रतिदिन संपादकीय लेख वाचतो.’’

१ आ. सनातन प्रभातच्या कार्यालयातील प्रदर्शन फलकावर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र कोणत्याही बाजूने पाहिले असता, ते आपल्याकडेच पहात असल्याचे जाणवते. त्याकडे पहात असतांना प.पू. आबांचे ध्यान लागले. त्यानंतर त्यांनी या छायाचित्राकडे पाहून प्रार्थना केली आणि भावपूर्ण वंदन केले.

१ इ. प.पू. आबांनी स्वत:हून सर्वांसमवेत सामूहिक छायाचित्र काढून घेतले. यातून त्यांना सनातन प्रभात प्रती वाटणारी विशेष प्रीती दिसून आली. या वेळी त्यांनी दैनिक सनातन प्रभातविषयी आदरभाव व्यक्त केला आणि आशीर्वाद दिले. हे पाहून उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्प केला;
म्हणून ते एवढे कार्य करू शकले ! – प.पू. आबा उपाध्ये

प.पू. आबा दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयाचे अवलोकन करत असतांना ते सनातन प्रभातशी संबंधित सेवा करणारे साधक श्री. प्रकाश जोशी यांना म्हणाले, ‘‘चांगले ज्योतिषी ठामपणे सांगतात की, अमूक घटना घडणारच. त्यांच्यात तो ठामपणा असतो आणि तसे ते घडते. परम पूज्य डॉक्टरसुद्धा अध्यात्मप्रसाराचे कार्य करायचे आणि त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांची बिघडलेली घडी नीट करायची याचा संकल्प केला आहे. त्यामुळे ते १५ ते २० वर्षांत एवढे कार्य करू शकले.’’

२ अ. नाडीपट्टी आणि ज्योतिषी यांनी सांगितल्यानुसार
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग असला, तरी त्यांचे रक्षण होईल !

प.पू. आबा पुढे म्हणाले, ‘‘नाडीपट्टी आणि ज्योतिषी सांगतात, परम पूज्य डॉक्टरांचा महामृत्यूयोग आहे. याविषयी प.पू. डॉक्टरांशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितले की, नाडीपट्टी, ज्योतिषी हे तात्कालिक भविष्य सांगतात. केवळ भृगु संहितेमध्ये पूर्ण कलियुगाच्या भविष्याचा विचार केलेला आहे. त्यांना काही होणार नाही.’’ त्यावर साधक श्री. प्रकाश जोशी म्हणाले, ‘‘तुम्ही सांगितले म्हणजे त्यांना आता काही होणार नाही.’’ याला प.पू. आबांनी हसून प्रतिसाद दिला.

 

३. अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सर्व
साधिका साक्षात अन्नपूर्णाच आहेत ! – प.पू. आबा उपाध्ये

प.पू. आबांनी प्रतिदिन चविष्ट आणि घरच्यासारखे भोजन दिल्याविषयी अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) साधिकांचे पुष्कळ कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘सर्व साधकांना तुम्ही प्रेमाने अन्न देता. सर्वाधिक पुण्याचे काम करता. तुम्ही सर्व अन्नपूर्णाच आहात.’’ ‘माझी आई अतिशय सुगरण होती. येथे जे अन्न मिळते, ते पाहून मला माझ्या आईची आठवण झाली’, असे त्यांनी अतिशय आनंदाने आणि कृतज्ञताभावाने सांगितले.

 

४. प.पू. आबा यांना भेटून सनातन संस्थेचे दिव्यांग
(विकलांग) अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी यांना अत्यंत आनंद होणे

सनातन संस्थेचे दिव्यांग (विकलांग) अवस्थेतील संत पू. सौरभ जोशी यांना भेटायला जातांना प.पू. आबा यांना पुष्कळ हर्ष झाला. ‘मला त्यांनाच भेटायचे होते’, असे म्हणत त्यांनी पू. दादांविषयी असलेली आत्मीयता प्रकट केली. पू. सौरभदादा यांना भेटल्यावर प.पू. आबा यांनी त्यांच्या चरणांना त्रिवार नमस्कार केला. प.पू. आबा यांना भेटून पू. सौरभदादा यांनाही अत्यंत आनंद झाला होता.

 

५. क्षणचित्रे

५ अ. आश्रमदर्शन करतांना प.पू. आबा यांनी काढलेले उद्गार !

१. आश्रमावर लावण्यात आलेला ध्वज पाहून प.पू. आबा म्हणाले, ‘‘आश्रमावरील हा ध्वज हिंदु राष्ट्राचे प्रतीक आहे. हिंदु राष्ट्र आणि ईश्‍वरी राज्य एकच आहे अन् ते लवकरच येणार आहे.

२. प.पू. आबा विविध कक्षांत सेवा करणार्‍या सर्वांना नमस्कार करून ‘तुम्हाला मी वंदन करायला हवे’, असे म्हणत होते.

३. प्रत्येक कक्षात गेल्यानंतर प.पू. आबा अतिशय कृतज्ञताभावाने तेथील वैशिष्ट्य जाणून घेत होते. सनातन संस्थेच्या साधकांविषयी त्यांना पुष्कळ प्रेम वाटत असल्याने ते सर्वांची आस्थेने विचारपूस करत होते.

४. अनेक साधक एवढ्या लहान वयात आश्रमात राहून सेवा करतात, हे बघून प.पू. आबांना अतिशय आनंद होत होता. त्यांनी सर्वांचे कौतुक केले, तसेच आवर्जून सर्वांना ‘अंगारा (विभूती) लावला का ?’, असे विचारले.

५. प.पू. आबा यांनी सनातन संस्थेला कृष्णार्जुनाचा रथ दिला आहे. तो त्यांनी ‘सर्व साधकांना दिसेल’, असा ठेवायला सांगितला होता. हा रथ आश्रमाच्या स्वागतकक्षामध्ये दर्शनी भागात ठेवल्याचे दिसल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला.

६. ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या गंगा, तर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या नर्मदा नदीसमान आहेत. गंगा आणि नर्मदा या नद्या शेवटी समुद्राला मिळतात. त्या समुद्राप्रमाणेच सनातन संस्थेचे कार्य होणार आहे’, असे प.पू. आबा यांनी सांगितले.

७. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात विष्णुस्वरूप आहेत. श्रीविष्णूचे वाहन गरुड आहे. तो जसे पंख पसरतो, तसे सनातन संस्थेचे कार्य जग व्यापून टाकेल’, असे आशीर्वचन प.पू. आबा यांनी सनातन संस्थेला दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment