संतांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत !

देवाला नमस्कार करायची जशी शास्त्रीय पद्धत आहे, तशी संतांना नमस्कार करण्याचीही एक पद्धत आहे. या लेखात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याच्या चुकीच्या पद्धतींचा उहापोह केला आहे, तद्वत संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची योग्य पद्धतही वर्णिली आहे. संतांशी ‘हस्तांदोलन’ करून त्यांचा सन्मान न राखण्याच्या या युगात ‘संतांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत’ हा लेख सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल !

 

१. संतांच्या चरणांवर डोके ठेवून
नमस्कार करण्याच्या चुकीच्या पद्धती आणि त्यांची कारणमीमांसा

अ. काही जण संतांच्या चरणांवर नाक ठेवतात. यामुळे संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प प्रमाणात ग्रहण होते.

आ. काही जण संतांच्या चरणांवर अनुक्रमे कपाळ, नाक आणि ओठ टेकवतात. यातून फारच अल्प प्रमाणात चैतन्य ग्रहण होते.

इ. काही जण संतांच्या चरणांवर नाक घासतात. यामुळे चैतन्याचा प्रवाह बंद होतो.

ई. काही जण संतांच्या पावलांचे चुंबन घेतात. संतांच्या चरणांचे चुंबन घेणे, ही ख्रिस्ती लोक पाद्रीच्या हाताचे चुंबन घेतात, त्याची नक्कल झाली. ओठांतून अत्यल्प प्रमाणात चैतन्य ग्रहण होते.

उ. काही जण चरणांवर डोके ठेवतांना प्रथम एका पावलावर आणि मग दुसर्‍या पावलावर डोके ठेवतात. असे करण्याची आवश्यकता नाही; कारण कोणत्याही एका पावलावर डोके ठेवले, तरी ते पुरेसे आहे.

 

२. संतांना पुरुषांनी, तसेच स्त्रियांनी नमस्कार करण्याची योग्य पद्धत

संतांना नमस्कार करतांना पुरुषांनी साष्टांग नमस्कार करावा. क्षेत्र (जागा) अपुरे असल्यास आणि साष्टांग नमस्कार करणे शक्य नसल्यास गुडघे टेकून बसावे अन् वाकून नमस्कार करावा; मात्र स्त्रियांनी संतांना नमस्कार करतांना गुडघे टेकून अन् वाकूनच करावा.

 

३. संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची योग्य पद्धत

संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करणे

अ. चरणांवर ठेवावयाचा डोक्याचा भाग

ब्रह्मरंध्रातून आपण चैतन्य सर्वांत जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो. ब्रह्मरंध्र संतांच्या चरणांवर ठेवता येत नाही; म्हणून कपाळ संपून डोके जेथे सुरू होते, तो भाग संतांच्या चरणांवर ठेवावा. यामुळे संतचरणांतून बाहेर पडणारे चैतन्य जास्तीतजास्त ग्रहण करता येते.

आ. चरणांवर डोके ठेवण्याचे योग्य स्थान

संतांच्या पावलांच्या अंगठ्यांतून सर्वांत जास्त प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असते; म्हणून डोके पावलाच्या मध्यभागी न ठेकवता अंगठ्यावर टेकवावे. डोके ठेवायला दोन्ही पायांचे अंगठे उपलब्ध असले, तर उजव्या पायाच्या अंगठ्यावर डोके ठेवावे.

इ. चरणांवर डोके ठेवतांना हातांची स्थिती

१. काही जण दोन्ही हात आपल्या कटीच्या (कमरेच्या) पाठी नेऊन एकमेकांत अडकवून वाकून नमस्कार करतात. त्यापेक्षा दोन्ही चरण उपलब्ध असल्यास एक हात एका चरणावर आणि दुसरा हात दुसर्‍या चरणावर ठेवून डोके अंगठ्यावर टेकवावे. एकच चरण उपलब्ध असल्यास एकाच चरणावर दोन्ही हात ठेवावेत आणि डोके अंगठ्यावर टेकवावे.

२. काही जण हात भूमीवर ठेवून नमस्कार करतात. हेही चुकीचे आहे; कारण भूमीवर हात ठेवले, तर संतांच्या चरणांतून ग्रहण झालेले चैतन्य नमस्कार करणार्‍याच्या हातांतून भूमीत जाते आणि त्यामुळे त्याला त्या चैतन्याचा लाभ होत नाही.

३. काही जण हातांची उलटापालट करून, म्हणजे आपला उजवा हात संतांच्या उजव्या चरणावर आणि आपला डावा हात संतांच्या डाव्या चरणावर ठेवून नमस्कार करतात. खिस्ती लोकांमध्ये ‘क्रॉस’च्या पद्धतीने (तिढा घालून) छातीवर हात ठेवण्याची जी पद्धत असते, तिची ही भ्रष्ट नक्कल झाली. त्यापेक्षा आपला उजवा हात संतांच्या डाव्या चरणावर आणि आपला डावा हात संतांच्या उजव्या चरणावर ठेवावा. ते सोयीचेही आहे. एखाद्या संप्रदायात तशी प्रथा गुरूंनी चालू केली असेल, तर मात्र त्याच पद्धतीने हात ठेवावेत.

४. हातांचे तळवे चरणांवर रहातील, अशा पद्धतीने हात ठेवावेत.

 

४. संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केल्याने आलेल्या अनुभूती

वर सांगितलेल्याप्रमाणे योग्य पद्धतीने संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केल्यावर साधकांना कशा अनुभूती येतात, ते पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.

अ. ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चरणांवर डोके ठेवताच मन निर्विचार होणे आणि ते आपले वाटणे

एकदा मी मोरटक्का, इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराजांच्या भंडार्‍याला गेले होते. तिथे प.पू. महाराजांच्या दर्शनाच्या वेळी मी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यानंतर मला काहीच समजत नव्हते की, मी कोण आहे, मी कोठे आहे वगैरे.

प.पू. भक्तराज महाराज

प.पू. भक्तराज महाराज

मला कशाचेच भान राहिले नव्हते. नमस्कार करून झाल्यानंतर आम्हाला आमची सामुग्री ठेवायला दुसरीकडे नेण्यात आले. मी सामुग्री ठेवायला म्हणून गेले; पण मी सगळी सामुग्री बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराजांच्या) इथेच विसरून गेले होते. बाबांच्या प्रथम दर्शनाने असे वाटायला लागले की, बाबा आपलेच आहेत आणि मी बाबांची आहे.’ – सौ. सुधा सुधाकर मांज्रेकर, बोरीवली, मुंबई.

(संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्य-शक्तीचा लाभ साधिकेला झाल्याने तिच्या मनोदेहाची शुद्धी होण्यास साहाय्य मिळाले. मनोदेहाचे कार्य म्हणजे विचार किंवा इच्छा यांची निर्मिती. मनोदेहाची शुद्धी झाल्याने विचार किंवा इच्छा यांची निर्मिती काही काळापुरती थांबली, म्हणजेच साधिकेला निर्विचार अवस्था प्राप्त झाली. – संकलक)

आ. प.पू. भक्तराज महाराजांच्या चरणांवर डोके ठेवल्यावर सत्सेवेनंतर आलेला थकवा दूर होणे

‘१९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराजांचा ‘अमृत महोत्सव’ इंदूर येथे संपन्न झाला. अमृत महोत्सवाची सिद्धता करतांना सर्वच साधकांना अगदी महिनोन् महिने खूप श्रम, जागरण झाले होते. इंदूरला असतांनादेखील पुष्कळ सेवा करायला मिळाली. इंदूरहून निघतांना आम्हाला बाबांचे (प.पू. भक्तराज महाराजांचे) दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्या काळात माझ्या शरिराची उष्णता खूप वाढली होती. बाबांच्या थंडगार चरणांवर डोकं ठेवल्यावर, डोकं तसंच ठेवून झोपावंसं वाटलं. नमस्कार करून उठताच सर्व शीण आणि थकवा दूर पळाला.’ – श्री. सुधाकर मांज्रेकर, बोरीवली, मुंबई.

(संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्य-शक्तीमुळे साधकाच्या प्राणदेहाची शुद्धी होण्यास साहाय्य मिळाल्याने त्याच्या प्राणशक्तीत वाढ झाली. त्यामुळे थकवा जाऊन त्याला उत्साह वाटला. – संकलक)

‘नमस्कार’ म्हणजे हिंदुमनावर असलेला एक सात्त्विक संस्कार आणि समृद्ध हिंदु संस्कृतीचा वारसा जपणारी कृती. भक्तीभाव, प्रेम, आदर, लीनता यांसारख्या दैवीगुणांची अभिव्यक्ती करणारी आणि ईश्वरी शक्ती प्रदान करणारी एक सहजसुलभ धार्मिक कृती योग्य पद्धतीने आबालवृद्धांनी करावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’

Leave a Comment