नमस्कार मुद्रेमुळे देहात देवभाव निर्माण होणे

नमस्कार मुद्रेमुळे देहात त्वरित देवभाव निर्माण झाल्याने
अहं कमी होऊन लवकर ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करता येणे

हिंदु धर्मात कोणी भेटल्यावर तिला नमस्कार करण्यास सांगितले आहे. हिंदु धर्मात सांगितलेली कोणतीही गोष्ट मानसिक स्तरावर सांगितलेली नसते. तिला आध्यात्मिक कारण असते आणि त्या गोष्टीने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होतो. पूर्वी वयस्कर लोकांनी एखादी गोष्ट करायला सांगितल्यास तिचे कारण न विचारता तंतोतंत पालन केले जायचे आणि तीच गोष्ट पुढच्या पिढीला सांगितली जायची; पण सध्याच्या विज्ञानयुगात लोकांना कारण कळले, तरच त्यांनी ती गोष्ट करण्याची शक्यता असते; म्हणून सध्याच्या लोकांसाठी कोणी भेटल्यास आदराने हात जोडून नमस्कार करण्याविषयी ईश्वरी ज्ञानाद्वारे मिळालेली माहिती येथे दिली आहे. ती वाचून लक्षात येईल की, हात जोडून नमस्कार केल्याने व्यक्तीला किती स्तरांवर लाभ होतात. विज्ञानवादी (बुद्धीवादी) या ज्ञानात दिल्याप्रमाणे अनुभूती येतात का, हे पाहू शकतात. तसे होते, याची साधना करणार्‍यांना तंतोतंत अनुभूती येते. याउलट हस्तांदोलनाने कसे तोटे होतात, हेही त्यांना जाणवते; म्हणूनच पाश्चात्त्यांप्रमाणे हस्तांदोलन नको, तर हात जोडून नमस्कार करा, असे सांगणे आहे.

 

१. सुषुम्ना नाडीला जागृती येणे

नमस्कारात तळवे एकमेकांना जोडले गेल्याने होणार्‍या मुद्रेतून सुषुम्ना नाडीला जागृती येते.

२. देहबुद्धी कमी होणे

पंचप्राण ऊर्ध्व दिशेने गतीमान होतात. यामुळे वृत्ती एकदम अंतर्मुख झाल्याने देहबुद्धी कमी होते.

३. देवाबद्दल अथवा इतरांबद्दल मनात देवभाव निर्माण होणे

देहबुद्धी कमी झाल्याने ईश्वरी अनुसंधान वाढते. ईश्वरी विचारांच्या प्राबल्यामुळे मायेच्या विचारांत घट होऊन देवाबद्दल अथवा इतरांबद्दल मनात देवभाव निर्माण होतो.

४. स्वेच्छेचा लय होणे

देवभावामुळे स्वेच्छेचा लय होऊन परेच्छेने अथवा ईश्वरेच्छेने वागण्याचे प्रमाण वाढते.

५. अहं कमी झाल्याने जीव देवाचा आवडता होणे

देवभावाने अहं कमी झाल्याने भक्तीत वृद्धी होते आणि त्यामुळे जीव देवाचा आवडता होतो; म्हणून भक्तीमार्गात नमस्कार करण्याचे पुष्कळ महत्त्व आहे.

६. ईश्वरप्राप्तीचे ध्येय लवकर समीप येणे

नमस्कार मुद्रेमुळे ईश्वरप्राप्तीचे ध्येय लवकर समीप येते. नमस्कार मुद्रेमुळे देहात भावऊर्जेचा संकर झाल्याने अहंलय होण्यास लवकर सुरुवात होते आणि यामुळेच जिवाचे मीपण नष्ट होऊन त्याला देवपण लाभते.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, पौष शु. ८, कलियुग वर्ष ५११३ (१.१.२०१२), सायं. ६.०१)

 

तळवे पाठच्या बाजूने एकमेकांना लावण्यातून
होणार्‍या तमोगुणी मुद्रेमुळे शरिरावर, तसेच मनावर होणारे दुष्परिणाम

१. त्रासदायक स्पंदने खेचली जाणे

तळवे पाठच्या बाजूने एकमेकांना लावल्यामुळे होणार्‍या मुद्रेमुळे देहाकडे मोठ्या प्रमाणात त्रासदायक स्पंदने खेचली जाऊ लागतात.

२. देहातील टाकाऊ वायू बाहेर पडणे

या प्रक्रियेत देहातील टाकाऊ वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागतात. देहाच्या पोकळीत सुरू झालेल्या या टाकाऊ वायूंच्या त्रासदायक गतीचा परिणाम होऊन मनातील भावनांचे प्रमाण वाढते.

३. चित्त अस्थिर होणे

बुद्धी नकारात्मक विचाराकडे प्रवास करू लागते. चित्त अस्थिर होते. अहंचे प्रकटीकरण होऊन महत्त्वाकांक्षीपणा वाढतो.

४. वृत्ती बहिर्मुख होणे

वृत्ती बहिर्मुख होऊन मनात उत्शृंखल भाव प्रकट होतो.

अशा तमोगुणी मुद्रेचा कुणीही आश्रय घेऊ नये, असे म्हटले जाते; कारण या मुद्रेमुळे देहावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याचे प्रमाण वाढते.

५. मांत्रिकांच्या नकारात्मक शक्तीत वाढ करून देणारी मुद्रा !

मांत्रिक मात्र या मुद्रेचा बर्‍याचदा उपयोग करून त्रासदायक लहरींना खेचून घेऊन स्वतःच्या नकारात्मक शक्तीत वाढ करून युद्धाला प्रारंभ करतात.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, पौष शु. ८, कलियुग वर्ष ५११३ (१.१.२०१२), सायं. ६.२३)

Leave a Comment