नमस्कार कसा करावा ?

१. परगावी जातांना आणि परगावाहून आल्यानंतर
घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार का करावा ?

‘घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे, म्हणजे त्यांच्यातील देवत्वाला शरण जाणे होय. ज्या वेळी एखादा जीव खाली वाकून लीनभावाने वडील-धार्‍यांमधील देवत्वाला शरण येतो, त्या वेळी त्याच्या देहात करुणरसाची निर्मिती होते. हा करुणरस त्याच्या सूक्ष्मदेहापर्यंत झिरपतो, त्या वेळी त्याची मनःशक्ती कार्यरत होऊन मणिपूरचक्राशी स्थित पंचप्राणांना कार्यरत करते. पंचप्राणांच्या शरिरातील वहनामुळे जिवाची आत्मशक्ती जागृत होते. आत्मशक्तीच्या बळावर सुषुम्नानाडी कार्यरत होऊन ती जिवातील व्यक्त भावऊर्जेचे अव्यक्त भावऊर्जेमध्ये रूपांतर करते. अव्यक्त भावऊर्जेच्या बळावर जिवाला वडीलधार्‍यांच्या माध्यमातून ब्रह्मांडातील आवश्यक त्या देवतेचे तत्त्व मिळते. यासाठी जिवाने घराबाहेर पडतांना वडीलधार्‍यांना नमस्कार करून सात्त्विक लहरींच्या बळावर स्वतःचे वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण करावयाचे असते आणि बाहेरून आल्यानंतरही लगेच मोठ्यांना नमस्कार करून त्यांच्यातील देवत्व ग्रहण करून आपल्याबरोबर आलेल्या रज-तम कणात्मक वायूमंडलाचे विघटन करावयाचे असते.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, २०.५.२००५, दुपारी २.५७

 

२. वयोवृद्धांना नेहमी नमस्कार का करावा ?

ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ॥ – मनुस्मृति २.१२०; महाभारत, उद्योग. ३८.१, अनु. १०४, ६४-६५.

अर्थ : वृद्ध पुरुषाचे आगमन झाल्यावर तरुण व्यक्तीचे प्राण वरच्या दिशेने सरकू लागतात आणि जेव्हा तो उठून नमस्कार करतो, तेव्हा तो प्राणांना पूर्वस्थितीत प्राप्त करतो.

‘वृद्ध व्यक्तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणात होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्ती समोर आल्यावर तरुण व्यक्तीच्या शरिरावर त्या लहरींचा परिणाम होतो आणि त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे तरुण व्यक्तीचे पंच प्राण वर उचलले जातात. अशा अचानक पंच प्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्ती वृद्ध व्यक्तीला नमस्कार करते, तेव्हा तरुण व्यक्तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते आणि तरुण व्यक्तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज आणि तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रवाह होऊ लागतो आणि तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.’ – कु. मधुरा भोसले, ३.१.२००५, दुपारी २.४४

 

३. विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?

‘विवाह म्हणजे शिवरूपी पती आणि शक्तीरूपी पत्नी या तत्त्वांचा संगम होय. कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्ती ( कार्य करणे) अन् त्या कर्माला गती करून देणारी, तसेच जास्तीतजास्त निर्गुणाशी संबंधित असणारी शक्ती यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारसागरातील कर्मे करणे आणि त्यासाठी थोरा-मोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी एकत्रितपणे नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्तीरूपी लहरी कार्यरत होऊन जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडून त्याची योग्य फलप्राप्ती झाल्याने न्यूनतम देवाणघेवाण हिशोब निर्माण होणे शक्य होते. म्हणून विवाहानंतर दोघांनी कर्माला पूरक बनून नमस्कारासारख्या कृतीतूनही एकमेकांना अनुमोदन देणे, असा वरील कृतीमागील उद्देश आहे.

 

४. एकमेकांना भेटतांना कशाप्रकारे नमस्कार करावा ?

‘परस्परांना भेटतांना एकमेकांसमोर उभे राहून दोन्ही हातांची बोटे जुळवून अंगठे छातीपासून थोड्या अंतरावर येतील, अशा रीतीने हात जोडून थोडे वाकून नमस्कार करावा. असा नमस्कार केल्याने जिवात नम्रभावाचे संवर्धन होऊन ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी जिवाच्या बोटांतून शरिरात संक्रमित होतात. तसेच परस्परांना नमस्कार केल्याने एकमेकांकडे आशीर्वादात्मक लहरींचे प्रक्षेपण होते. यामुळे दोघांनाही दोघांतील जागृत झालेल्या देवत्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, १२.७.२००५, दुपारी २.४३

 

५. एखादा भेटल्यावर हस्तांदोलन (शेकहँड) न करता हात जोडून नमस्कार का करावा ?

 

१. हस्तांदोलन करतांना हाताच्या माध्यमातून दुसर्‍याकडे रोगजंतूंचा होऊ शकतो. तसेच काही व्यक्तींना खाल्ल्यावर किंवा बाहेरून आल्यावर हात धुवायची सवय नसते. अशा वेळी हस्तांदोलन आरोग्याला अहितकारक ठरू शकते.

२. ‘हस्तांदोलन करणे म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचे संवर्धन करणे. ज्या वेळी दोन जीव हस्तांदोलन करतात, त्या वेळी त्यांच्या हातांतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरी दोन तळहातांच्या पोकळीत संपुटित होतात. या संपुटिकरणातून उत्पन्न होणारी घर्षणात्मक ऊर्जा ही हातातून जिवाच्या देहात संक्रमित होते, तसेच या ऊर्जेतून उडणार्‍या कणांच्या माध्यमातून जिवाच्या बाहेरील वायूमंडलही तामसिक बनल्यामुळे वातावरणही अशुद्ध बनते. या रज-तमात्मक लहरींच्या शरिरातील वहनामुळे शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन शरिरात तमोकणांचे वहन वेगाने चालू होते. याचा परिणाम मनोमयकोषावर होऊन मनोमयकोषातील तमोकणांचे प्रक्षेपण वाढून जीव चिडचिडा बनू लागतो. यामुळे हस्तांदोलनासारखी तामसिक कृती टाळून जिवात सात्त्विकतेचे संवर्धन करून जिवाला लीनभाव शिकवणारी नमस्कारासारखी कृती आचरणात आणावी. यामुळे जिवाला त्या त्या कर्मासाठी ईश्‍वराचे चैतन्यमय बळ मिळून त्याला ईश्‍वराची आशीर्वादरूपी संकल्पशक्ती प्रक्षेपित होण्यास साहाय्य होऊन त्याची कृती साधना बनून अल्प कालावधीत पूर्णत्वास जाते.’ – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, २८.५.२००५ ४.

हस्तांदोलन करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृती आहे. हस्तांदोलनाची कृती करणे म्हणजे पाश्‍चात्त्य संस्कृतीचा पुरस्कार करणे, तर नमस्कार करणे, म्हणजे भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणे. भारतियांनी स्वतः भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करून ही शिकवण भावी पिढीलाही द्यायला हवी.
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’