देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार करून आत जायचे असते, हे अनेकांना ठाऊक असते; परंतु हा नमस्कार का आणि कशा पद्धतीने करावयाचा याचे ज्ञान अनेक दर्शनार्थ्यांना नसते. हा लेख वाचून आपणही योग्य पद्धतीने पायरीला नमस्कार करा आणि तशी कृती परिचितांनाही करावयाची विनंती करा !
१. कृती
पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवावा.
२. शास्त्र
‘देवळाच्या प्रांगणात देवतांच्या लहरींच्या संचारामुळे सात्त्विकता वाढलेली असते. परिसरातील चैतन्यामुळे पायर्यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे. पायर्यांवरील धूळही चैतन्यमय असल्याने आपण तिचाही मान राखायचा असतो आणि तिच्यातील चैतन्याचाही लाभ करून घ्यावयाचा असतो, हे यावरून लक्षात येते. नमस्कार करतांना ‘पायरीत आलेले देवतेचे चैतन्य हातातून संपूर्ण शरिरात संक्रमित होत आहे’, असा भाव ठेवल्याने जिवाला अधिक लाभ होतो; परंतु या वेळी जिवाचा अहंही न्यून असेल, तर नमस्काराचे मिळणारे फळ सर्वाधिक असते. कुठलीही कृती ही ‘स्व’चा त्याग करून केली असता, ते अकर्म कर्म होते.’
प.पू. डॉ. आठवले : एका हाताने नमस्कार करू नये, असे शास्त्राने सांगितले आहे, तर आपण दिलेल्या ज्ञानामध्ये देवळाच्या पायरीला एका हाताने नमस्कार करावा, असा उल्लेख आहे. असे का ? (वडीलधार्या मंडळींना नमस्कार करतांना एका हाताने नमस्कार करणे अयोग्य, तर देवळाच्या पायर्या चढतांना एका हाताने नमस्कार करणे सोयीच्या दृष्टीने योग्य)
उत्तर : ’देवळाचा परिसर हा इतर परिसरांच्या मानाने मुळातच सात्त्विक असल्याने तेथे कोणतेही कर्म भावरहित जरी केले, तरी इतर ठिकाणच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात सात्त्विकतेचा लाभ होतोच. देवळाच्या पायर्या चढता चढता पायरीला स्पर्श करून नमस्कार करणे, ही शरिराचा तोल सांभाळून अल्प कालावधीत करावयाची एक सात्त्विक कृती आहे. पायर्या चढणे, या रजोगुणी हालचालीमुळे जिवाच्या शरिरातील रजोगुण कार्यरत झालेला असतो. एका हाताने, म्हणजेच उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श केल्याने चैतन्यभूमीतील सात्त्विक आणि शांत लहरी हाताच्या बोटांतून शरिरात संक्रमित होत गेल्याने एकप्रकारे सातत्याने जिवाच्या शरिरातील रजोगुणावर सूर्यनाडीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते, म्हणजेच सूर्यनाडीच्या कार्याचे क्षणिक शमन करणे शक्य होते. या प्रक्रियेतून जिवाला रजोगुणातूनही सात्त्विकतेचे संवर्धन करण्यास शिकवले जाते. म्हणून त्या त्या स्तरावर ती ती कृती करणे योग्य ठरते. याउलट वडीलधार्या मंडळींना नमस्कार करतांना एका हाताने नमस्कार करणे, ही उद्धटपणाची कृती ठरते; म्हणून प्रसंगानुरूप तारतम्याने योग्य कृती करणे महत्त्वाचे ठरते. पायर्या चढतांना जर भावपूर्णरीत्या चढल्या, तर नमस्कार न करतासुद्धा आवश्यक त्या प्रमाणात चैतन्याचा लाभ होतो.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.७.२००५, दुपारी ३.१५)