प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केली पाहिजे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

पट्टणकुडी (कर्नाटक) येथे साधना शिबिर

मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पट्टणकुडी (कर्नाटक) – साधना आणि धर्माचरण यांनीच मनुष्यावर ईश्‍वराची कृपा होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती होते. मनुष्यजन्माचे सार्थक होते. त्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केली पाहिजे, तसेच भावी पिढीवर धर्माचे संस्कार केले पाहिजेत. त्यातूनच पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या २ जुलै या दिवशी पट्टणकुडी येथील श्री बिरदेव मंदिरात आयोजित साधना शिबिरात बोलत होत्या.

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘मनुष्य आनंदात रहाण्याचा प्रयत्न करतो; पण बाह्य भौतिक सुखांमधून मिळणार्‍या आनंदात मर्यादा आहेत. खरा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाने गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे. त्यासाठी नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, स्वभावदोष-अहं निर्मूलन आणि निरपेक्ष प्रीती ही अष्टांग साधना करणे आवश्यक आहे.’’

आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी शिबिराचा उद्देश सांगितला, तर सौ. अंजली कोटगी यांनी सूत्रसंचालन केले. या शिबिरासाठी पट्टणकुडी आणि खडकलाट येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या महिला आणि युवक असे ६५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. श्री बिरदेव मंदिराचे पुजारी श्री. सिद्धाप्पा वडगोले (सर) यांनी मंदिराचे सभागृह उपलब्ध करून देण्यासमवेतच सभागृहाची स्वच्छता करून दिली, तसेच बैठक आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय केली. (इतरत्रच्या मंदिर व्यवस्थापकांनीही श्री. सिद्धाप्पा वडगोले (सर) यांचा आदर्श घेऊन धर्मकार्यात हातभार लावावा ! – संपादक)

२. सनातन संस्थेद्वारे प्रकाशित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment