दिवसभर भावजागृतीचे विविध प्रयोग कसे करावेत ?

पू. (श्रीमती) पुतळाबाई देशमुख यांनी सर्वांसमोर ठेवलेला ‘भावजागृतीसाठी प्रयत्न कसे करायचे ?’, याचा आदर्श !

 

१. गुरुपरंपरेचे स्मरण करून आणि ‘श्रीमन्नारायणरूपी
परात्पर गुरुदेव उपस्थित आहेत’, असा भाव ठेवून नामजप करणे

‘उत्तररात्री ३ वाजता जाग आल्यावर प्रथम मी तोंड धुते आणि आवरण काढते. नंतर हनुमंताला प्रार्थना करून सूक्ष्मातून शरिरातील पेशी, रक्त आणि मांस यांतील दोष काढते. मग प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि अष्टदेवतांचे चित्र समोर ठेवते. त्यानंतर मी पुढील भाव ठेवते, ‘गुरुपरंपरेतील श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज या सर्वांच्या चरणपादुका ठेवल्या आहेत. तेथे रत्नजडित सिंहासनावर श्रीमन्नारायण बसले आहेत. त्यांनी त्यांचे चरण चौरंगावर असलेल्या रेशमी कापडावर ठेवले आहेत. एका बाजूला महिला सद्गुरु आणि संत अन् दुसर्‍या बाजूला पुरुष सद्गुरु आणि संत बसले आहेत. त्यानंतर सर्व साधक, साधकांचे कुटुंब, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे कुटुंब असे सगळे त्यांच्यासमोर बसले आहेत आणि आम्ही नामजप करत आहोत.’ नंतर मी २ घंटे नामजप करते.

 

२. रामनाथी आश्रमात येऊन श्रीमन्नारायणाचे दर्शन घेणे

आम्ही सर्व साधक सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात चाललो आहोत. आम्ही सर्व जण श्रीमन्नारायणाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालोे आहोत. आम्ही फाटकाच्या आत गेेलो आहोत. श्रीमन्नारायणाच्या खोलीचे दार जवळ येत आहे, तसतसे आमच्या समवेत आलेल्या वाईट शक्तीही दूर होत आहेत. पुढून चैतन्य येत आहे, ते वाईट शक्तीला सहन होत नाही. आम्ही शुद्ध झालो आहोत. आत प्रवेश करतांना आम्ही चैतन्यमय आणि कृष्णमय झालो आहोत. आम्हाला तेथून ‘गुरुमाऊलीच्या दर्शनाला कुठे जायचे ? कसे जायचे ?’, हे काहीच कळत नाही. आम्ही दर्शनासाठी तळमळत होतो. आम्ही कृष्णाला सांगत आहोत, ‘हे कृष्णा, आम्हाला सांग, ‘कुठून जायचे ? कसे जायचे ?’ आम्हाला तर काहीच कळत नाही. आम्ही सगळे अज्ञानी जीव आहोत. तूच आम्हाला मार्ग दाखव. तूच सांग. आमचा अंत पाहू नकोस, लवकर ये कृष्णा !’ कृष्ण नुसता आमच्याकडे बघत आहे. तो काहीच बोलत नाही. आमचे मन पुष्कळ व्याकुळ झालेले आहे. नंतर कृष्ण म्हणतो, ‘मी तुम्हाला नेण्यासाठीच थांबलो आहे. मी तुम्हाला तिकडे नेणारच आहे.’ कृष्ण आमच्या समवेत येत आहे. पुढे एक चैतन्यमय दार आहे. दारातून पुष्कळ चैतन्य आम्हाला मिळत आहे; पण दार बंद आहे. आम्ही सगळेच दार उघडण्याचा प्रयत्न करत आहोत, तरीही ते उघडतच नाही. आम्ही पुन्हा कृष्णाला विचारत आहोत, ‘किती अंत पहातोस रे ? ‘काय करायचे ?’, ते तूच सांग.’ मग तो मला प्रार्थना करायला सांगतो. प्रार्थना केल्यावर आम्ही दार उघडून आत प्रवेश करतो. श्रीमन्नारायण समोरच बसलेले आहेत. आमच्याकडे पाहून ते स्मितहास्य करत आहेत. आम्ही त्यांच्या चरणांपाशी जाऊन बसलो आहोत आणि कृतज्ञता व्यक्त करत आहोत. श्रीमन्नारायण उठून पटलावरचा प्रसादाचा डबा हातात घेत पुन्हा येऊन बसलेे आहेत. ते आम्हा सर्वांच्याच जीभेवर प्रसाद ठेवत आहेत. आमची जीभ चव घेत आहे. पेशी-पेशीत ती चव उतरत आहे. आम्ही नतमस्तक होत आहोत. आमच्यावर गुरूंची कृपादृष्टी होत आहे. त्यांचा हात त्यांनी आमच्या मस्तकावर ठेवलेला आहे; म्हणून आम्ही नतमस्तक झालो आहोत.

 

३. परात्पर गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करणे

कृष्णाने मला परात्पर गुरुदेवांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा दिली आहे. ही सेवा मिळाल्यामुळे मला पुष्कळ आनंद होत आहे. प्रार्थना करून मी परात्पर गुरुदेव उठण्याच्या आधी पहाटे त्यांच्या खोलीत जाते. परात्पर गुरुदेवांच्या घरी घालायच्या चपला (स्लीपर) उचलते. खोलीची स्वच्छता करते. त्यांच्या खोलीतील पायपुसणी कृतज्ञता व्यक्त करत ठेवते. मी पटल आणि नंतर दार, शौचालय, प्रसाधनगृह यांच्या चौकटी आणि दारे-खिडक्या पुसते.

नंतर मी दुसरे कापड घेते आणि त्यांची आसंदी पुसते. ‘या आसंदीवर बसून ते सर्वांना मार्गदर्शन करतात’, असा भाव ठेवते. कपड्यांचे कपाट आणि ते ज्या आसंदीवर बसून महाप्रसाद घेतात, ती आसंदी पुसून घेते. हस्तप्रक्षालन पात्र (बेसिन) धुऊन-पुसून कोरडे करते. पटल पुसून त्यावर तांब्या-पेला ठेवते. केरसुणी आणि सुपली यांना प्रार्थना करते आणि खोली झाडून-पुसून घेते. कचरापेटीतील कचरा टाकते आणि सुपली धुऊन-पुसून ठेवते. बालदीत पाणी घेते. त्यात गोमूत्र आणि साबण घालते अन् ‘तूच माझ्याकडून भावपूर्णरित्या प्रसाधनगृह धुऊन घे’, अशी प्रार्थना करून प्रसाधनगृह धुते. सर्व चैतन्यमय झाल्यामुळे श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. प्रसाधनगृहातील सर्व साहित्य स्वच्छ करून पुसून ठेवते आणि त्या प्रत्येक वस्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करते. त्यांना आणि मला हलके वाटते. पू. रेखाताईंना विचारून मी सर्व कृती करते. मी कृष्णाला म्हणते, ‘तूच सेवा दिलीस आणि करवून घेतलीस. मीतर कठपुतली आहे.’

 

४. परात्पर गुरुदेवांना स्नान घालणे

‘हे श्रीकृष्णा, माझ्यामध्ये भाव नाही, तळमळ नाही. तूच माझ्याकडून ही सेवा करवून घे’, अशी प्रार्थना करते. मी प्रसाधनगृहात जाते. परात्पर गुरुदेवांना अंघोळीसाठी गरम पाणी काढते. चौरंग, डोक्याला लावायला तेल आणि साबण ठेवते. उटण्यात तेल घालून ठेवते आणि कृतज्ञता व्यक्त करून बाहेर येते. परात्पर गुरुदेवांना स्नानासाठी बोलावून आणण्यासाठी प्रार्थना करून त्यांच्या खोलीत जाते. मी खोलीत गेल्या गेल्या परात्पर गुरुदेव उठलेले आहेत. मी हातात कपडे घेऊन स्नानगृहाकडे जाते. मी पुढे आणि परात्पर गुरुदेव माझ्या मागे आहेत. त्यांचे ईश्‍वरी चैतन्य माझ्या पेशीपेशीत जात आहे. माझी पेशीन्पेशी शुद्ध होत आहे.

श्रीमन्नारायण चौरंगावर बसलेले आहेत. मी प्रार्थना करून त्यांचे कपडे ठेवलेले आहेत. हातात तेल घेऊन मी हळूहळू त्यांच्या डोक्याला तेल लावत आहे. त्यांचे केस रेशमासारखे मऊ आहेत. त्यांचे शरीर अगदी कोमल आहे. त्यांनी माझेही हात मऊ केले आहेत. मी त्यांच्या डोक्याला मर्दन करून त्यावरून पाणी घालत आहे. असे तीन-तीन वेळा करत आहे. ‘श्रीकृष्णानेच भावपूर्ण अंघोळ घालून घेतली’, यासाठी मी त्याच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. मऊ रेशमी वस्त्राने त्यांचे अंग पुसते. परात्पर गुरुदेवांना घालायची वस्त्रे आणि रबरी चपला (स्लीपर) देते. ते कपडे घालतात आणि रबरी चपला (स्लीपर) घालून खोलीत जातात. मी घेतलेले सर्व साहित्य कृतज्ञता व्यक्त करून जागेवर ठेवते.

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अंघोळीचे कपडे माझ्याकडून भावपूर्ण धुऊन घे’, अशी मी कृष्णाच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करते. मी कपडे धुऊन वाळत घालते. बालदीही धुऊन-पुसून कोरडी करून ठेवते. तेव्हा पुष्कळ चैतन्य जाणवते.

 

५. पूजेसाठी रामनाथी आश्रमाच्या
लागवडीतून फुले आणणे आणि त्यांचे आश्रमात वाटप करणे

मला श्रीकृष्णाने पूजनासाठी लागवडीतून फुले आणण्याची सेवा दिली आहे. मला काहीच येत नाही आणि कळतही नाही. माझा भाव जागृत झाला आहे. कृष्णाला ‘सेवा भावपूर्ण करवून घे’, अशी प्रार्थना करते. एक मोठी टोपली आणि काही छोट्या टोपल्या घेऊन ‘या सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी आणलेल्या टोपल्या आहेत’, असा भाव ठेवते. मी ‘लागवडीत कधी गेले ?’, हेही मला कळत नाही. मी लागवडीला, तेथील सर्व रोपांना आणि फुलांना प्रार्थना करते. मी फुलांच्या टोपलीत खाली मोरपिस ठेवते. जेवढ्या तुळशीच्या मंजिरी सांगितल्या, तेवढ्या ‘कृष्ण, कृष्ण’ असे म्हणत तोडते. ज्या देवाला जी फुले आवडतात, ती घेते, उदा. ‘ॐ नमः शिवाय ।’ म्हणत बेल काढते, तसेच गणपतीसाठी ‘ॐ गं गणपतये नमः ।’ म्हणत दूर्वा काढते. रामनामाचा जप करत श्रीरामासाठी फुले घेते. सर्व फुले काढून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या वर मोरपीस ठेवते. त्या वेळी इतके चैतन्य जाणवते की, लागवडीतून मी खाली कधी आले ?’, हे मला कळत नाही. सगळे कार्य चैतन्यच करते. एका मोठ्या टोपलीत सर्व छोट्या टोपल्यांची रचना करते आणि कृतज्ञता व्यक्त करून ती टोपली घेऊन येते.

मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या दारासमोर आले आहे. तेथील पटलावर टोपली ठेवून मी त्यांच्या खोलीत जाते. ‘परात्पर गुरुदेव माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत आहेत. त्यांच्या चरणांवर मी कृतज्ञतेने फूल वाहते. प.पू. भक्तराज महाराज यांची प्रतिमा आणि देवता यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी तेथे फुलांची एक टोपली ठेवते. बाहेर येऊन कृतज्ञता व्यक्त करून मी ध्यानमंदिरात, सर्व सद्गुरु आणि संत यांच्या खोलीत, स्वयंपाकघरात श्री अन्नपूर्णादेवीसाठी, जेथे जेथे संगणक आहेत तेथे; स्वागतकक्षात, यज्ञकुंडाजवळ आणि मारुतिरायाच्या मंदिराजवळ फुलांची एक-एक टोपली ठेवते. आश्रमाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. सर्व फुलांच्या टोपल्या निघाल्यावर मोठ्या टोपलीत शेवटी मोरपीस रहाते !

 

६. परात्पर गुरुदेवांसाठी जेवण बनवणे

दुपारी मी परात्पर गुरुदेवांसाठी त्यांना विचारून त्यांना हवा असेल, तसा स्वयंपाक महाप्रसाद बनवते. ते ६ मासांच्या बालकाएवढे जेवण करतात. त्यांच्या खोलीतील सर्वच वस्तू कृतज्ञताभावात आणि आनंदात असल्याचे जाणवतात. मी पू. रेखाताईंना विचारून जेवण बनवते. श्री अन्नपूर्णादेवीला ‘तूच हा महाप्रसाद बनव. मी प्रसाद बनवत आहे. त्यात चैतन्य येऊ दे. माझा भाव टिकून राहू दे’, अशा प्रार्थना करत करत मी सर्व कृती करते.

 

७. रात्री परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांना तेल लावून काशाच्या वाटीने मर्दन करणे

रात्री मी सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘काशाच्या वाटीने तेल लावून मर्दन करायचे ना ?’, असे विचारते. तेलाच्या बाटलीला प्रार्थना करून एका वाटीत तेल घेते. नंतर काशाची वाटी, पाय पुसायला मऊ रेशमी वस्त्र आणि पाट घेते. अशा प्रकारे मर्दनासाठी लागणारी सर्व सिद्धता करून ठेवते. नंतर प्रार्थना करून परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत त्यांच्या चरणांपाशी जाते. मग परात्पर गुरुदेवांसाठी दूध गरम करून त्यात साखर, केशर आणि वैद्यांनी दिलेली पावडर १ चमचा घालते. ते ढवळून कोमट करून काचेच्या पेल्यात घालते. तो दूधाचा पेला झाकून ट्रेमध्ये ठेवते.

परात्पर गुरु डॉक्टर पहुडले आहेत. मला खोलीत आलेले पाहून ते उठून बसले आहेत. मी हातात धरलेला ट्रे त्यांच्यासमोर धरते. ते दुधाचा पेला उचलून दूध पितात आणि पेला पुन्हा ट्रेमध्ये ठेवतात. मी कृतज्ञता व्यक्त करून बाहेर येते. सर्व साहित्य स्वच्छ करून जागेवर ठेवते. बाहेर आल्यावर साधकांना तीर्थ देते. ते घेतल्यावर आम्हाला चैतन्य मिळून हलके वाटते. परात्पर गुरुदेवांना अधिक वेळ बसता येत नाही, तरीही मी परत येईपर्यंत परात्पर गुरुदेव बसून रहातात.

नंतर मी काशाची वाटी घेते आणि पुन्हा प्रार्थना करून खोलीत जाते. परात्पर गुरुदेवांच्या चरणांशी पाट ठेवते. त्यांचे चरण पाटावर ठेवते. नंतर हातावर तेल घेते आणि ‘श्रीकृष्णा, तूच माझ्याकडून भावपूर्ण मर्दन करवून घे’, अशी प्रार्थना करते. मी कृष्णाला म्हणते, ‘कृष्णा माझे हात तर इतके घट्ट आहेत. तूच बघ आता !’ असे म्हणताच त्याने माझे हात मऊ केले आहेत. आता मला पुष्कळ चैतन्यमय वाटत आहे. नंतर मी परात्पर गुरुदेवांच्या पायांच्या तळव्याला तेल लावते. संपूर्ण तेल जिरवते. परात्पर गुरुदेवांनी ‘बस’ म्हटले की, कृतज्ञता व्यक्त करते. नंतर मऊ रेशमी वस्त्र घेऊन त्यांचे चरण पुसते. नंतर मी त्यांच्या चरणांवर शाल घालून कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्व साहित्य स्वच्छ करून जागेवर ठेवते.

परात्पर गुरुदेवांच्या तांब्यातील तीर्थ मी सर्वांना वाटते. सर्व जणच कृतज्ञता व्यक्त करतात. पू. रेखाताई मला पाणी आणून देतात. मी ते पाणी एका तांब्यात गाळते आणि त्यावर पेला झाकते. परात्पर गुरुदेवांच्या उशाजवळ असलेल्या पटलावर तो तांब्या-पेला ठेवते. ‘हे श्रीकृष्णा, हे निद्रादेवी ‘तुझ्याच चैतन्यमय चरणांवर डोके ठेवून झोपत आहे. मला चैतन्य दे. माझी झोपेतही साधना करवून घे’, अशी प्रार्थना करते. नंतर अंथरूण घालून परात्पर गुरुदेवांच्या चरणांपाशी झोपते.’

– (पू.) श्रीमती पुतळाबाई देशमुख, तुळजापूर, जि. धाराशिव. (मार्च २०१९)

Leave a Comment