न्यास म्हणजे काय ?

१. व्याख्या

हाताच्या बोटांची विशिष्ट मुद्रा करून ती शरिराचे कुंडलिनीचक्र किंवा अन्य एखादा भाग यांच्या जवळ धरणे, याला न्यास म्हणतात. न्यास शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून करावा. नामजप करतांना मुद्रा आणि न्यास करणे शक्य नसेल, तेव्हा केवळ नामजप केला तरी चालेल. (काही विचारसरणींनुसार न्यास करतांना बोटांचा शरिराला स्पर्श करतात; पण स्पर्श करण्यापेक्षा १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करणे अधिक लाभदायक असते. याचे कारण याप्रमाणे आहे – बोटांचा शरिराला स्पर्श केल्यास सगुण स्तरावर उपाय होतात, तर स्पर्श न केल्यास निर्गुण स्तरावर उपाय होतात. सगुणापेक्षा निर्गुण स्तरावरील उपाय अधिक परिणामकारक असतात.)

 

२. न्यास करण्याचे महत्त्व

मुद्रेद्वारे ग्रहण होणारी सकारात्मक (पॉझिटिव्ह) शक्ती संपूर्ण शरीरभर पसरते, तर न्यासाद्वारे ती सकारात्मक शक्ती शरिरात विशिष्ट स्थानी प्रक्षेपित करता येते. थोडक्यात न्यासामुळे त्रासाशी निगडित स्थानी ही शक्ती अधिक प्रमाणात प्रक्षेपित करता आल्यामुळे त्रासनिवारण लवकर होण्यास साहाय्य होते.

३. नामजपासह मुद्रा आणि न्यास करणे लाभदायक !

मुद्रा आणि न्यास यांचे वर दिलेले महत्त्व पहाता नामजपासह मुद्रा आणि न्यास करणे लाभदायक आहे, हे लक्षात येते. नामजप करतांना मुद्रा आणि न्यास करणे शक्य नसेल, तेव्हा केवळ नामजप केला तरी चालतो.

 

४. हाताची बोटे आणि तळवा यांनी शरिराच्या
विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितलेले
असणे, हे मंत्रयोगात सांगितलेल्या मातृकान्यासांशी साधर्म्य असणारे असणे

मंत्र म्हणजे मातृदेवीचे नादमय प्रतीक. जीवोत्पत्तीच्या कार्यात पहिली पायरी म्हणजे परमेश्‍वरी संकल्प होय. या संकल्पातून इच्छा उत्पन्न होते. तिचे रूपांतर ब्रह्माच्या क्रियेत होते. ही क्रिया म्हणजेच परब्रह्माची शक्ती होय. त्या पुढची पायरी म्हणजे नाद किंवा विश्‍वाचे कंपन. त्यातून दृश्य सृष्टी उत्पन्न होते. या विश्‍वकंपनाची दृश्य रूपे म्हणजेच अक्षरे. या अक्षरांना मातृका म्हणतात. या अक्षरमातृकांतून मातृदेवतेचे अनेक मंत्र निर्माण झाले आहेत.

मातृकान्यासाचे अंतर्मातृका आणि बहिर्मातृका असे दोन प्रकार आहेत. अंतर्मातृकान्यास हा कुंडलिनीच्या षट्चक्रांच्या ठिकाणी असलेल्या
मातृकांचे ध्यान करणे, या स्वरूपाचा आहे. बहिर्मातृकान्यास हा पाच बोटे आणि करतल यांच्या योगाने शरिराच्या विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करणे, या स्वरूपाचा आहे. त्या वेळी त्या त्या इंद्रियाच्या देवतेचा बीजमंत्र म्हणतात.

Leave a Comment