काळजी किंवा भीती (Anxiety/Fear/Panic) यांवरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

प्रत्‍यक्ष आजारांवर स्‍वउपचार चालू करण्‍यापूर्वी ‘होमिओपॅथी स्‍वउपचाराविषयीची मार्गदर्शक सूत्रे आणि प्रत्‍यक्ष औषध कसे निवडायचे ?’, याविषयीची माहिती वाचकांनी आधी वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

काळजी आणि भीती या सामान्य मानवी भावना आहेत; परंतु जेव्हा जीवनातील सामान्य परिस्थितींमध्येही सातत्याने अन् अवाजवी प्रमाणात काळजी किंवा भीती निर्माण होत असेल आणि त्यामुळे छातीची धडधड होणे, घाम फुटणे, श्वासोच्छ्वास गतीने होणे, अशी लक्षणे दिसत असतील, तर त्यावर उपचार घेणे आवश्यक ठरते, तसेच तणाव निर्माण करणार्‍या परिस्थितीमध्ये सामान्यतः काळजी / भीती वाटणे स्वाभाविक असते; परंतु जेव्हा ती सातत्याने प्रमाणापेक्षा अधिक असते, तेव्हा उपचार घेणे आवश्यक ठरते. अवाजवी काळजी / भीती न्यून करण्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम, ध्यान आणि स्वयंसूचना देणे लाभदायी ठरते. या व्यतिरिक्त पुढे दिलेल्यापैकी उपयुक्त औषध घ्यावे. औषधांच्या नावापुढे कोणती लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे दिले आहे.

१. ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

१ अ. अचानक घबराट निर्माण होणे, अस्वस्थ होणे, काळजी वाटणे

१ आ. प्रत्येक कृती घाईने करणे

१ इ. शरिराची स्थिती सतत पालटणे

१ ई. मरणाची तीव्र भीती वाटणे, मृत्यूची नेमकी वेळ सांगणे

१ उ. गर्दीमध्ये जाण्याची भीती वाटणे

१ ऊ. बंद खोलीत थांबण्याची भीती वाटणे (Claustrophobia)

२. अर्जेंटम् नायट्रिकम् (Argentum Nitricum)

२ अ. काहीतरी वाईट घडेल, याची काळजी वाटणे

२ आ. मुलाखतीला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जातांना, पुढे घडणार्‍या प्रसंगाविषयी किंवा प्रवासाविषयी काळजी वाटणे

२ इ. विमानातून प्रवास करण्याची, उंचीची भीती वाटणे (fear of heights)

२ ई. सतत घाईमध्ये असणे

३. जल्सेमियम सेम्पर्विरेन्स् (Gelsemium Sempervirens)

३ अ. परीक्षेची, अपयशाची, व्यासपीठावरून बोलण्याची भीती वाटणे

३ आ. भीतीमुळे अंग थरथरणे, जुलाब होणे, अशक्तपणा येणे

३ इ. सतत हालचाल केली नाही, तर हृदयाची क्रिया बंद पडणार, अशी भीती वाटणे

४. आर्सेनिकम् आल्बम् (Arsenicum Album)

डॉ. अजित भरमगुडे

४ अ. रात्री काळजीमुळे अस्वस्थ होऊन झोप लागत नसणे

४ आ. मरणाची काळजी आणि भीती वाटणे

४ इ. ‘औषधाचा काही उपयोग नाही, आपला आजार बरा होऊ शकत नाही, आपण नक्की मरणार’, असे विचार करणे

४ ई. मनाच्या स्तरावर अस्वस्थता असणे; परंतु शारीरिक स्तरावरील तीव्र अशक्तपणामुळे हालचाल करता न येणे

५. इग्नेशिया अमारा (Ignatia Amara)

५ अ. सतत दुःखी विचारांत असणे, रडणे

५ आ. दुःखाने कण्हणे, उसासे टाकणे

५ इ. सतत काही ना काही करण्याच्या काळजीत असणे

५ ई. कधी आनंदी, खेळकर, तर कधी अचानक खिन्न होऊन रडू लागणे

५ उ. भित्रेपणा, छोट्याशा कारणाने भीती वाटून हृदयाचे ठोके वाढणे

५ ऊ. ‘आपण बरे होणार नाही’, या विचाराने निराश होणे

५ ए. रात्री चोरांची भीती वाटणे

५ ऐ. जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर काळजीची लक्षणे चालू होणे

६. कल्केरिया कार्बाेनिका (Calcarea Carbonica)

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

६ अ. सारासार विचार करता न येण्याची, संसर्गजन्य रोग होण्याची, आर्थिक हानी इत्यादी दुर्भाग्य ओढवण्याची भीती वाटणे

६ आ. भीतीदायक गोष्टी ऐकल्यामुळे किंवा काळजीमुळे मानसिक यातना होऊन हृदयाची धडधड वाढणे, त्यामुळे स्वस्थता नसणे, विश्रांती न मिळणे

६ इ. तिन्हीसांजेला किंवा रात्री भीती वाटून अंग थरथरणे

६ ई. कल्पना किंवा भीतीदायक कथा यांमुळे उत्तेजित होणे

६ उ. रोग, दुर्भाग्यपूर्ण घटना, दुःखद अपघात, मृत्यू यांविषयीची भीती वाटणे

७. फॉस्फोरम् ॲसिडम् (Phosphorum Acidum)

७ अ. कमालीचा निरुत्साह असणे – शारीरिक आणि मानसिक कामे करण्याची इच्छा नाहीशी होणे

७ आ. छोट्याशा कारणाने अप्रसन्न होणे

७ इ. काना-कोपर्‍यातून जणू आपल्याकडे काही तरी सरपटत येत असल्याप्रमाणे भयभीत असणे

७ इ. उजेड, गंध, आवाज, स्पर्श यांविषयी अतीसंवेदनशीलता असणे किंवा त्यामुळे दचकणे

Leave a Comment