सूरतपस्विनी : माँ अन्नपूर्णादेवी !

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला
माँ अन्नपूर्णादेवी ऋषितुल्य संगीतकार बाबा अल्लाउद्दीन खाँ यांची धाकटी मुलगी आणि लाडकी शिष्या होती. एक शांत, स्वस्थ, आत्मस्थ मुखमुद्रा आणि नखशिखांत साधेपणा; कलेच्या क्षेत्रातील अन् सूरबहार हे दैवी सुरावटीचे वाद्य सुरेलपणे वाजवू शकणारे एक उत्तुंग व्यक्तीमत्त्व; संपूर्ण आयुष्य कलेला वाहिलेले असूनही मोहमायेच्या जगापासून संपूर्ण अलिप्त असणारे प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तीमत्त्व म्हणजे माँ अन्नपूर्णादेवी ! माँ अन्नपूर्णादेवी म्हणजे विचार, वाणी आणि वर्तन यांची एकतानता असलेले व्यक्तीमत्त्व. केवळ गुरु आणि देवी सरस्वती यांच्या चरणी आपली संगीतसेवा अर्पण करणारा तो एक अनोखा जीव होता. माँ अन्नपूर्णादेवींचे घर म्हणजे जणू माता सरस्वतीचे मंदिरच होते. त्यांच्या घरी संगीताची शक्ती विराजमान झाली आहे. माँ अन्नपूर्णादेवी म्हणजे निष्काम कर्मयोगाचे जिवंत उदाहरण होते.
१३.१०.२०१८ या दिवशी माँ अन्नपूर्णादेवी यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांचे वय ९१ वर्षे होते. संगीत ही साधना म्हणून जगणार्‍या या योगिनीला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वाहिलेली ही भावपूर्ण शब्दसुमनांंजली !

संकलक : कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘सूरबहार’वाद्य वाजवतांना माँ अन्नपूर्णादेवी

१. जन्म आणि नामकरण

‘चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती (२३.४.१९२६) या दिवशी माँ अन्नपूर्णादेवींचा जन्म मध्यप्रदेशातील महियर येथे झाला. बाबा अल्लाउद्दीन खाँ हे महियरचे राजे ब्रिजनाथ सिंह यांचे गुरु आणि राजदरबारातील संगीतकार होते. माँ अन्नपूर्णादेवींचा जन्म बाबा अल्लाउद्दीन खाँ युरोपच्या दौर्‍यावर गेले असतांना झाला. मुलीच्या जन्माची वार्ता राजांना समजली. राजांच्या इच्छेनुसार मुलीचे नाव ‘अन्नपूर्णा’ ठेवण्यात आले.

 

२. संगीत साधनेचा झालेला प्रारंभ

२ अ. संगीतामुळे मोठ्या मुलीचा सासरी छळ होऊन तिचा दारुण
अंत झाल्यावर बाबांनी ‘अन्नपूर्णेला संगीत शिकवायचे नाही’, असे ठरवणेे

बाबांच्या आयुष्यात एक विलक्षण करुण घटना घडली होती. बाबांना एक मोठी मुलगी होती. बाबांनी तिला संगीत शिकवले होते; पण संगीतामुळे सासरी तिचा पुष्कळ छळ झाला. मोठ्या मुलीच्या जीवनाचा असा दारुण अंत झाल्यावर बाबांच्या संवेदनशील मनाने ‘संगीतामुळे अन्नपूर्णेला सासरी त्रास होऊ नये; म्हणून सर्वकाही दिले, तरी संगीतविद्या द्यायला नको’, असे ठरवले होते. बाबांचा हा निश्‍चय घरातील सर्वांनाच ठाऊक होता.

२ आ. लहानग्या अन्नपूर्णेने केवळ जाता-येता ऐकून
सहजपणे संगीत आत्मसात केलेले पाहून बाबा प्रभावित होणे

बाबांसारख्या महान संगीतकाराच्या सहवासात अन्नपूर्णा मोठी होऊ लागली. अन्नपूर्णा साधारण ७ वर्षांची असेल. त्या वेळी अन्नपूर्णेचा मोठा भाऊ अली अकबर खाँ बाबांकडून सरोद शिकत होता. प्रतिदिनच्या दिनक्रमानुसार बाबा अली अकबरला शिकलेल्या भागाचा सराव करायला सांगून बाजारात गेले. त्या वेळी अन्नपूर्णा खेळत होती. अली अकबर शिकवलेल्या पाठाचा सरोदवर सराव करत होता. अन्नपूर्णा खेळतांना ते ऐकत होती. अली अकबरजवळ जाऊन ही ७ वर्षांची छोटी बहीण त्याला म्हणाली, ‘‘बाबाने ऐसा तो नहीं सिखाया है !’’ असे म्हणून बाबांनी शिकवलेला अंश (भाग) अन्नपूर्णेने त्याला गाऊन दाखवला. त्या वेळी अली अकबर एकदम गप्प झाला. अन्नपूर्णा मात्र गातच होती. ‘हा इतका गप्प का ?’, हे तिलाही कळत नव्हते.

काही कारणाने बाबा अर्ध्या रस्त्यातून घरी परतले. त्या वेळी अन्नपूर्णा बाबांनी शिकवलेला पाठ भावाला गाऊन दाखवून त्याला सुधारणा सांगत असतांना बाबांनी ऐकले. एवढ्या लहान वयात आणि तिला काही शिकवलेले नसतांना केवळ ऐकून एवढे सुंदर गातांना पाहून बाबा प्रभावित झाले आणि यानंतर खर्‍या अर्थाने गुरुस्वरूप वडील बाबा अल्लाउद्दीन खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली अन्नपूर्णेची संगीत आराधना !

२ इ. बाबांनी अन्नपूर्णेच्या हाती तानपुरा देणे आणि तेथूनच तिची संगीत साधना चालू होणे

माँ सांगतात, ‘‘मेरी चोरी तो पकडी गयी थी और बाबा मुझे अंदर के कमरे में लेकर गए । मुझे सामने खडा रखा । बाबाने मेरे हाथ में तानपुरा दिया और प्रेमसे पूछा, ‘‘संगीत सिखोगी ?’’ ‘क्या बोले ?’, ये समझमें न आने के कारण मैं चुपचाप खडी थी । बाबा बोले, ‘‘लो ये तानपुरा !’’ आणि येथूनच अन्नपूर्णादेवींची संगीत साधना चालू झाली. इतक्या लहान वयातही इतके अवघड संगीत आत्मसात करण्याची शक्ती असलेला हा जीव ओळखू येण्यास संगीतातील त्या महान तज्ञाला कितीसा वेळ लागणार होता ?

‘बाबांनी हातामध्ये तानपुरा देणे’, हीच अन्नपूर्णेची व्रतदीक्षा होती.

 

३. माँ अन्नपूर्णा आणि पं. रविशंकर यांचा विवाहयोग जुळून येणे

बाबांकडून मिळालेले संस्कार, संगीतातील प्रावीण्य आणि अत्यंत सुशील वर्तन असलेल्या अन्नपूर्णेमुळे उदयशंकर (पं. रविशंकर यांचे मोठे भाऊ) फार प्रभावित झाले होते. त्यांनी बाबांपाशी पं. रविशंकर यांच्यासाठी अन्नपूर्णेला मागणी घातली. बाबांना संकोच वाटत होता; परंतु उदयशंकर यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर आणि प्रेम होते. बाबांनी त्यांच्या मागणीचा स्वीकार केला. अशा प्रकारे अन्नपूर्णादेवींचा विवाह पं. रविशंकर यांच्याशी झाला.

 

४. गुरूंचा प्रसादरूपाने मिळालेला कलेतील
संतोष टिकवण्यासाठी बाहेर वादन न करण्याचा
कठोर निर्णय घेणार्‍या आदर्श पतीव्रता माँ अन्नपूर्णादेवी !

माँ पंडितजींच्या समवेत कार्यक्रम करत. त्या वेळी त्या कार्यक्रमात पं. रविशंकर यांच्यापेक्षा माँच्या संगीत प्रतिभेची अधिक प्रशंसा होत असे. त्यामुळे आपल्या पुरुषप्रधान समाजात ‘पुरुषी अहंकार’ डिवचला जाऊन ते एक अत्यंत संवेदनशील सूत्र बनले आणि ते विवाहाच्या स्थैर्यासाठी फार महत्त्वाचे होते.

माताजींसाठी प्रसिद्धीपेक्षा गुरूंचा प्रसादरूपाने मिळालेला कलेतील संतोष अतीमहत्त्वाचा होता. त्यामुळेच स्वतःचा संसार सांभाळण्यासाठी माताजींनी बाहेर न वाजवण्याचा निर्णय घेतला. बाबा आणि देवी सरस्वतीच्या प्रतिमेसमोर त्यांनी स्वतःच हा निर्णय घोषित केला !

 

५. बाबा अल्लाउद्दीन खाँ यांनी
माताजींसाठी केलेली आगळ्यावेगळ्या सूरबहार
या वाद्याची निवड आणि माताजींनी केलेली संगीत साधना

५ अ. बाबा अल्लाउद्दीन खाँ हे संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व असणे

बाबा अल्लाउद्दीन खाँ हे संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आणि त्याच समवेत माता शारदेचे निस्सीम भक्तही होते. माता शारदेच्या कृपेनेच बाबा सिद्ध झाले होते. त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आदर, सन्मान आणि पूजनीयता मिळवली होती. बाबा स्वतः २८ – २९ वाद्ये वाजवू शकत असत. त्यांचे अनेक शिष्य संगीत क्षेत्रामध्ये विविध वाद्यांचे प्रतिभावंत कलाकार झाले. जगप्रसिद्ध झाले. (‘मास्टर ऑलवेज क्रीएट्स मास्टर्स !’, या म्हणीप्रमाणे) असे बाबा गुरूंचेही गुरु होते.

५ आ. शिष्यांची आवड आणि प्रकृती ओळखून त्यांना वेगवेगळी वाद्ये शिकवणारे बाबा !

शिष्यांंची आवड आणि प्रकृती ओळखून बाबांनी त्यांना वेगवेगळी वाद्ये शिकवली. बाबांनी त्या वाद्यांतून शिष्यांची प्रकृती अभिव्यक्त होईल, असे संगीत शिकवले. त्यांनी उस्ताद अली अकबर खाँ यांना सरोद, पं. रविशंकर यांना सतार, पं. पन्नालाल घोष यांना बासरी, पं. निखिल बॅनर्जी यांना सतार आणि माँ अन्नपूर्णादेवींना सूरबहार हे वाद्य शिकवले.

५ इ. सूरबहार वाद्याचे वैशिष्ट्य

सूरबहार या वाद्याची प्रवृत्ती गंभीर आहे. ‘आलाप-जोड’ आणि ‘झाला’ हे मुख्यत्वाने यावर प्रस्तुत होतात. ज्या कलाकाराच्या स्वभावात खर्जातल्या सुरांचे गांभीर्य आणि रागाचा शांत स्वरूपाचा भाव नसतो, तो कलाकार सूरबहार अन् त्यातून उमटणारे संगीत, या दोन्हींनाही न्याय देऊ शकत नाही.

सतारीपेक्षा मोठ्या आकाराचे, मंद सप्तकाच्या सुरांचे हे वाद्य आहे. जर कलाकाराची त्यावर उत्तम पकड असेल, तर श्रोत्यांनाही अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करणारे हे वाद्य आहे.

५ ई. बालपणीच संगीताप्रती दैवी साधकत्वभाव आत्मसात
करणार्‍या माताजींसाठी बाबांनी सूरबहार या वाद्याचीच निवड करणे

माताजींची संपूर्ण व्यक्तीरेखा बघितल्यावर ‘त्यांनी बालपणीच संगीताप्रती दैवी साधकत्वभाव आत्मसात केला होता’, असे लक्षात येते. त्यांचा संगीत साधनेविषयीचा दृष्टीकोनही पुष्कळ वेगळा होता. हा स्वभाव माताजींसाठी प्रयत्नसाध्य नव्हता, तर ती त्यांची जन्मजात प्रकृती होती. त्यामुळे या योगिनीसाठी बाबांनी ‘सूरबहार’ हेच वाद्य निवडले.

५ उ. सूरबहार वाद्याविषयी बाबा अल्लाउद्दीन खाँ यांनी काढलेले उद्गार !

‘सूरबहारवर वाजणारे संगीत जनसामान्य कदाचित् नापसंत करतील, त्याची अवहेलनाही करतील; पण गुणीजन मात्र ते समजू शकतील. त्याचा रसिकतेने आस्वाद घेतील आणि मनापासून प्रशंसाही करतील. हे जगदीश्‍वरासाठीचे संगीत आहे, जगासाठी नाही. केवळ बाह्य कर्णाने हे ऐकायचे नाही, तर अंतःकरणाने त्याची पूजा करायची आहे. हे शरिराला बांधणारे नाही, तर शंकराशी जोडणारे आहे.’

५ ऊ. एखाद्या योग्याप्रमाणे स्वरमंत्राचा
सूरबहारवर गुंजारव करणे, हीच माँची सूरसाधना असणे

ज्याप्रमाणे एखादा योगी भक्त हातात जपमाळ घेऊन जपयज्ञाची साधना जपाने करतो, त्याप्रमाणे सूरबहार हेच माँ अन्नपूर्णादेवींसाठी जपमाला रूपाने मिळालेले साधन होते. माता सरस्वतीचे जपनाम आणि स्मरण स्वरमंत्राच्या गुंजनाने होत होते. रागाचा पहिला स्वर आणि शेवटचा स्वर हेच त्या जपमाळेचे मेरूमणी होते.

माँचे ज्येष्ठ बंधू आणि ज्येष्ठ सरोदवादक पद्मविभूषण अली अकबर खाँ यांनी माँचा केलेला गौरव !
सुप्रसिद्ध सरोदवादक, बाबांचे शिष्य आणि ज्येष्ठ पुत्र अन् माँचे मोठे बंधू पद्मविभूषण अली अकबर खाँ म्हणतात, ‘‘तराजूच्या एका पारड्यात मला आणि पं. रविशंकर अन् पं. पन्नालाल घोष यांना बसवले आणि दुसर्‍या पारड्यात माझी भगिनी अन्नपूर्णा हिला एकटीला बसवले, तरीही तिचेच पारडे जड होईल !’’

बाबांच्या दैवी संगीतसमुद्रात खोल बुडी मारून प्राप्त केलेल्या संगीतज्ञानाच्या खर्‍या वारसदार माँ अन्नपूर्णादेवीच आहेत.

 

६. संगीत साधना करतांना माँ अन्नपूर्णादेवींना आलेल्या विविध अनुभूती

६ अ. सूरबहार या वाद्यावर मालकंस राग वाजवतांना
घरासमोरील पिंपळ वृक्षात शक्तीचा संचार होऊन संपूर्ण वृक्ष डोलू लागणे

माँच्या महियर येथील वास्तव्याच्या वेळी घडलेला हा प्रसंग. मध्यरात्रीचा प्रहर होता. माँ अन्नपूर्णा गुरुवर्य बाबा अल्लाउद्दीन खाँ यांनी शिकवलेला मालकंस राग सूरबहार या वाद्यावर वाजवत होत्या. राग हळूहळू त्याच्या परमसीमेकडे प्रगती करत होता. बाबांच्या घरासमोर पिंपळाचे एक झाड आहे. असे सांगतात की, जसजसे रागाचे स्वरूप प्रगट होऊ लागले, तसतसा त्या पिंपळामध्ये शक्तीचा संचार होऊ लागला. संपूर्ण वृक्ष सळसळ करत डोलू लागला. वृक्ष कंप पावू लागला. हा अनुभव त्या वेळी माताजी आणि अली अकबर खाँची पत्नी यांना आला. रात्रीच्या शांत एकांतात हे अधिकच स्पष्ट दिसत होते. बाबांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी माँना सांगितले, ‘‘तुझा मालकंस राग सिद्ध झाला. आता यापुढे तो वाजवू नकोस; कारण पुढे ‘भीती वाटू शकेल’, असे अनुभव येतील.’’ तेव्हापासून माँ मालकंस वाजवत नसत.

६ अ १. राग आळवतांना त्यातून निर्माण होणार्‍या शक्तीमुळे वरील घटना घडलेली असणे

हा प्रसंग म्हणजे सगळ्यांना चमत्कार वाटतो; पण आपल्या हिंदुस्थानातील संगीतशास्त्रामध्ये रागांच्या परिणामांविषयी विस्तृत चर्चा झाली आहे. आपल्या शास्त्रात चर्चिलेल्या अनुभवांच्या घटना खरोखरच निसर्गनियमांच्या आधीन आहेत. या चमत्कारांच्या पाठीशी साधकाचा शुद्ध आणि पवित्र भाव, तसेच शास्त्रात सांगितल्याप्रमाणे केलेले त्याचे वादन किंवा गायन अन् त्यात साध्य केलेली एकाग्रता आणि लीनता असते. माताजींनी चमत्कार करावा; म्हणून तो राग वाजवला नव्हता, तर राग आळवतांना त्यातून निर्माण होणार्‍या शक्तीमुळे ही घटना घडली होती.

६ अ २. मालकंस राग सिद्ध झाल्याच्या अनुभूतीविषयी माँनी सांगितलेले शास्त्र

माँच्या मतानुसार हा माता सरस्वतीच्या स्वरआरतीचा प्रकाश आहे. त्यांनी छेडलेल्या आलापांनी वृक्षाला दिलेल्या ऊर्जेचा हा प्रतिभाव आहे. हा स्वरपर्ण उत्सव आहे.

६ आ. माँना वादन करतांना सरस्वतीदेवीच्या अस्तित्वाचा आलेला अनुभव

माँना सरस्वतीदेवीच्या दर्शनाविषयी विचारल्यावर त्यांनी अत्यंत सहजतेने सांगितले, ‘‘पूर्वी एका रात्री एकांतात मी सूरबहारवर सराव (रियाज) करत होते. तेव्हा सर्व आसमंत गुलाबाच्या सुगंधाने भरून गेला होता. हा अत्यंत दैवी सुगंध होता. त्या वेळी मला कुणा स्त्रीच्या कंकणांचा आवाज ऐकू येत होता. कुणी स्त्री आपल्या साडीचा पदर सारखा करत असल्यासारखा मला भास होत होता. पुढे अनेकदा मला हा अनुभव आला; पण कुणाचे प्रत्यक्ष दर्शन किंवा साक्षात्कार, असे काही झाले नाही.’’

६ इ. बाबांनी स्वप्नात येऊन श्रीकृष्णाचा मंत्र देणे आणि बाबा, ईश्‍वरावरील श्रद्धा
अन् श्रीकृष्णाचा मंत्रजप यांमुळेच संघर्षाच्या काळात स्थिर राहू शकल्याचे माँनी सांगणे

माँच्या जीवनात संघर्षाचा काळ फार मोठा होता. हा मोठा काळ त्यांनी एकांतात व्यतीत केला. त्या वेळी मन आणि बुद्धी शांत ठेवून अस्तित्व टिकवणे फार अवघड असते. केवळ आत्मबळ असेल, तरच ते टिकवता येऊ शकतेे. याविषयी बोलतांना माँ सांगतात, ‘‘बाबा आणि ईश्‍वरावरील श्रद्धा, यांमुळेच मी स्थिर राहू शकले. या काळात एका रात्री स्वप्नात येऊन बाबांनी (अल्लाउद्दीन खाँ यांनी) मला श्रीकृष्णाचा मंत्र दिला. त्या दिवसापासून मी शुद्ध भावाने या मंत्राचा जप आणि श्रीकृष्णाचे ध्यान करते. तोच माझा आधार होता.’’

 

७. प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या माँ अन्नपूर्णादेवी !

७ अ. ‘पद्मभूषण’ हा सन्मान नम्रपणे स्वीकारणे; पण त्यासाठी
होणार्‍या देहलीतील समारंभापासून दूर रहाणे पसंत करणे

भारताच्या पंतप्रधानांनी माँ अन्नपूर्णादेवींना ‘पद्मभूषण’ हा सन्मान देण्याचे निश्‍चित केले होते. त्यासाठी त्यांनी माँ अन्नपूर्णादेवींना देहलीला येण्याचे निमंत्रण पाठवले. त्या वेळी माँनी पुरस्काराचा विनम्रपणे स्वीकार केला; मात्र त्यांनी समारंभापासून दूर रहाणेच पसंत केले. पुढे भारत सरकारने माँना तो पुरस्कार ‘रजिस्टर पोस्टा’ने पाठवला. या प्रसंगातून माँचे एक अनासक्त रूप आपल्याला पहायला मिळते.

७ आ. बाहेर वादन न करण्याच्या स्वतःच्या निर्धारावर अढळ रहाणार्‍या माँ !

डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्र्रपती होते, तेव्हाची गोष्ट. तेव्हा श्रीमती सोनल मानसिंह या संगीत नाटक अभ्यास मंडळाच्या (अकादमीच्या) मुख्याधिकारी (चेअरमन) होत्या. त्यांनी माँना पत्राने कळवले, ‘संगीत नाटक अभ्यास मंडळाच्या (अकादमीच्या) सदस्यत्वासाठी (‘फेलोशिप’साठी) माताजींची निवड झाली आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्या स्वतः विज्ञानभवनात आल्या, तर राष्ट्रपती केवळ ४५ मिनिटे येण्याचा प्रघात मोडून ४५ मिनिटे अधिक वेळ थांबतील. राष्ट्रपतींनी दीड घंटा थांबून माताजींचे दैवी संगीत ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.’ पूर्ण अनासक्त असलेल्या माँनी त्यांना पत्राने कळवले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून मी माझे गुरु बाबा आणि देवी सरस्वतीची मूर्ती यांच्यासमोरच वादन करते. आपण दिलेला हा सन्मान मी आदरपूर्वक स्वीकारते; परंतु तेथे येऊन वादन न करण्यासाठी आपली क्षमा मागते.’

आजच्या काळात असा सन्मान मिळत असतांना आणि तोही स्वतः राष्ट्रपतींनी नियमांमध्ये पालट करण्याची सिद्धता दाखवलेली असतांना अन् ते स्वतः ऐकायला येणार असतांना कुणाला मोह होणार नाही ? कुणाचे मन डगमगणार नाही ? पण माँच्या मनाच्या दृढ निर्धाराने त्यांना सगळ्या मोहमयी जगापासून अलिप्त केले होते. त्यांनी केवळ ईश्‍वरालाच त्यांच्या कलेचे समर्पण केलेले होते आणि शिष्यांना प्रसादरूपाने ते त्या देत होत्या. हाच माँचा संतोष आणि त्यांचे व्रत होते.

संदर्भ : सूर योगिनीचे – सुरोपनिषद्, लेखक : डॉ. सुनील शास्त्री

Leave a Comment