संगीताचा सराव कसा करावा ?

 

१. संगीताचा सराव करण्याचे महत्त्व

‘संगीत ही ईश्‍वराची देणगी आहे. ‘ज्याच्यावर देवाची कृपा आहे, तो गाऊ शकतो’, असे म्हटले जाते; परंतु ईश्‍वराने सर्वांना स्वतःच्या क्रियमाणाने स्वतःचे स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली आहे. तुमचा आवाज साधारण असला, तरी कसून सराव केल्यास केवळ तुमच्या आवाजातच पालट होणार नाही, तर तो आवाज संगीतातील उंचीही गाठू शकतो.

 

२. संगीताच्या सरावातील कृती

पुढे काही कृती दिल्या आहेत. त्यांप्रमाणे टप्प्याटप्प्याने सराव करू शकतो.

२ अ. ‘ॐ’काराचा सराव

संगीत शिकतांना आरंभीचे तीन मास न्यूनतम ३० मिनिटे ‘षड्ज’(सा)च्या स्वरात ‘ॐ’कार लावून त्याचा सराव करावा.

२ आ. सरगम आणि आरोह-अवरोह यांचा सराव

१. सरावासाठी अधिक कालावधी उपलब्ध असल्यास ‘ॐ’काराचा सराव झाल्यावर ५ मिनिटे विश्रांती घेऊन त्यानंतर सरगम, आरोह-अवरोह यांचा संथ गतीत ३० मिनिटे सराव करावा. हे म्हणत असतांना सावकाश म्हणावे. घाई करू नये.

२. ‘सरगम’चा सराव करतांना ‘स्वर अचूक लागत आहे का ?’, याकडे पूर्ण लक्ष द्यावे. स्वर जर व्यवस्थित लागत नसेल, तर तो लावण्यासाठी पुनःपुन्हा प्रयत्न करावा. संगीतात चिकाटी महत्त्वाची आहे. संगीत शिकण्याच्या आरंभीच्या काळात मात्र पुष्कळ संयम हवा.

२ इ. खर्जातील स्वरांचा सराव

संगीत सरावात खर्जातील स्वरांचा सराव सर्वांत चांगला मानला जातो. खर्ज स्वरांचा सराव केल्यामुळे स्वरांमध्ये खोलाई येते आणि स्वर उंच लावण्याची (उच्च पट्टीत म्हणण्याची) क्षमता निर्माण होते. खर्जातील स्वर लावणे थोडे कठीण आहे; परंतु खर्जातील सराव पहाटे ५ ते सकाळी ६ या कालावधीत केला, तर ते स्वर लावायला सुलभ जाते. चांगल्या गायकाला सगळ्या सप्तकांत गाता येणे आवश्यक आहे आणि ते येण्यासाठी ‘खर्जातील सराव करणे’, हा एकमात्र उपाय आहे. त्यामुळे हा सराव मनापासून, प्रतिदिन स्वतःला एक शिस्त लावून आणि साधना म्हणून करणे आवश्यक आहे.

२ ई. सरावाने आपली शारीरिक क्षमता पूर्णपणे विकसित कशी करावी ?

प्रतिदिन न्यूनतम ३० मिनिटे प्राणायाम करावा. गातांना चार वेगवेगळे सप्तक शरिराच्या ‘पोट, फुफ्फुसे, गळा आणि डोक्याचा वरील भाग’, या चार भागांशी जोडावे. प्रतिदिन भस्त्रिका, भ्रामरी आणि कपालभाती हे प्राणायाम केले, तर तुमच्यात लक्षणीय परिवर्तन झालेले दिसून येईल. हे तुम्ही स्वतः कृती करून अनुभवू शकता.

 

३. संगीताचा सराव करण्याचा कालावधी

३ अ. संगीताचा सराव किती वेळ आणि कधीपर्यंत करावा ?

बर्‍याच वेळा संगीत शिकणारे ‘संगीताचा सराव किती वेळ आणि कधीपर्यंत करावा ?’, असे विचारतात. ‘खर्‍या संगीत शिकणार्‍याचा सराव कधीच संपत नसतो आणि कितीही सराव केला, तरी तो कधीही जास्त होत नसतो’, हे वर्षानुवर्षांपासून चालत आलेले सत्य आहे.

३ आ. सरावातील विश्रांतीचा कालावधी

तुम्ही प्रतिदिन वेळ देऊन परिणामकारक सराव करत असाल, तर १० ते १५ दिवस सलग सराव केल्यानंतर एक दिवसाची विश्रांती घेऊ शकता. असे केल्याने शरिरात निर्माण झालेला सर्व ताण नाहीसा होतो आणि गायकीच्या सरावाचे परिश्रम पुढे चालू ठेवण्यासाठी पहिल्यापेक्षाही अधिक शक्तीने तुम्ही सिद्ध होता.

३ इ. स्वरांच्या सरावाचा कालावधी

सराव करतांना स्वर लावायला पुष्कळ परिश्रम घ्यावे लागत असतील, तर तोपर्यंत केवळ स्वरांच्या सरावावरच भर द्यायला हवा. गाणे किंवा राग म्हणण्याच्या प्रक्रियेकडे जाऊ नये. जेव्हा सरगम, आरोह-अवरोह म्हणतांना सुरांत सहजता असेल, बाह्य कुठल्या गोष्टींचा आधार न घेता स्वर योग्य श्रुतीत लागत असतील, तेेव्हा समजावे की, आपण पुढल्या टप्प्यात, म्हणजेच राग म्हणण्याकडे वाटचाल करू शकतो.

 

४. संगीताचा सराव केल्याने होणारे लाभ

सराव करतांना पुढील टप्प्यांची सिद्धता होते.

अ. श्‍वासाची शक्ती आणि नियंत्रण स्थिर होते.

आ. गळ्याच्या पेशींमध्ये गाण्याच्या उतार-चढावातील ताण सहजतेने पेलण्याची क्षमता निर्माण होते.

इ. कान आणि मस्तिष्क स्वरांना प्राकृतिक रूपाने पकडण्यास (ओळखण्यास) समर्थ होतात.

ई. मन आणि आंतरिक विचारप्रक्रिया यांमुळे गायकीसाठी आवश्यक असलेले धैर्य, एकाग्रचित्तता, पावित्र्य आणि सकारात्मकता निर्माण होते.

चांगला गायक बनण्यासाठी या चारही टप्प्यांनी स्वतःला विकसित करणे आवश्यक आहे.

 

५. ‘स्वतःचा अभ्यास आणि चांगले संगीत
ऐकणे’, हासुद्धा संगीताच्या सरावाचाच एक भाग असणे

सरावात स्वतःचा अभ्यास करण्यास सांगितले आहे, तसेच ‘चांगले संगीत ऐकणे’, हासुद्धा सरावाचा एक भाग आहे. त्यामुळे चांगल्या गायकांचे शास्त्रीय संगीत ऐकावे. (माहितीजालावरील (इंटरनेटवरील) किंवा ध्वनीचकत्यांवरील चांगले संगीत ऐकू शकतो.) संगीत ऐकून ते मनात उतरवल्याने त्या पद्धतीने मनाची एक विचारप्रक्रिया सिद्ध होते.

 

६. संगीताचा सराव आणि दिनचर्येतील अन्य कृती यांच्यात ताळमेळ असावा !

सराव करण्यासाठी तुमची दिनचर्या पुष्कळ कष्टदायक, तणावपूर्ण आणि कठीण बनवू नका. असे केल्याने तुम्हाला सरावात यश मिळणार नाही. त्यामुळे संगीत शिकण्यासह इतर गोष्टींतही सहजता आणि संतुलन असावे.

 

७. गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक !

वरील सर्व सूत्रे आचरणात आणतांना गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. संगीतातील सरगम, आलापी यांचा सराव काही वर्षे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करणे नितांत आवश्यक आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment