गायनासंदर्भात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन

Article also available in :

‘७.५.२०१९ या दिवशी म्हणजे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात आम्हाला (मी आणि सौ. अनघा यांना) श्री सत्यनारायणाची आरती म्हणण्याची सेवा होती. त्या दिवशी अक्षय्यतृतीया होती. आम्ही दोघी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना कार्यक्रमापूर्वी आरती ऐकवण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आम्हाला संगीताविषयी अनमोल मार्गदर्शन केले आणि त्यांनी अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला आशीर्वाद दिला.

 

१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी संगीत कलेच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१ अ. गीताचा सराव करतांना लक्षात ठेवायची सूत्रे

१ अ १. आरती म्हणतांना खालच्या पट्टीत (सप्तकात) म्हणणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असणे

आम्ही मूळ गायकाने म्हटलेली आरती ऐकून त्याच्याप्रमाणे उंच (वरच्या पट्टीत) स्वरात आरती म्हणत होतो. ती ऐकल्यावर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारे आरती म्हणण्याने आरतीचा नाद गाणार्‍यांच्या (तुमच्या) आणि ऐकणार्‍यांच्या (इतरांच्या) आतमध्ये जात नाही. तो नाद बाहेरच रहातो. तुम्ही एखादे गीत जितक्या खालच्या पट्टीत (सप्तकात) म्हणाल, तितके ते आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे.

१ अ २. गीताचा सराव चैतन्याच्या अन् भावाच्या स्तरावर हवा

कुठल्याही गाण्याचा सराव म्हणजे, ‘केवळ गीत म्हणणे’, असे असायला नको, तर गीताचा सराव चैतन्यपूर्ण आणि भावपूर्ण असायला हवा. संत मीराबाई भजने गात असतांना तिच्यापुढे प्रत्यक्ष भगवंत साकार व्हायचा. गाण्याचा सराव करतांना ‘आपल्यापुढे भगवंत किती वेळ साकार झाला ?’, ते पहायला हवे. त्या पद्धतीनेच गायन व्हायला हवे. गीत इतके भावपूर्ण म्हणायला हवे की, गायकाच्या मनात त्या गीताने भावनिर्मिती व्हायला हवी आणि ती झाली की, श्रोत्यांचीही भावजागृती आपोआप होते.

१ अ ३. गीत गातांना ‘आपल्याला त्या गीताच्या आत आणि आपल्या अंतरंगात जायचे आहे’, अशा पद्धतीने त्याचा सराव करायला हवा !

गीत गातांना ‘ते इतरांसाठी न गाता स्वतःसाठी गात आहे’, हे लक्षात ठेवून ‘आपल्याला त्या गीताच्या आत आणि आपल्या अंतरंगात जायचे आहे’, असा सराव करायला हवा. सराव करतांना याप्रमाणे होत नसेल, तर प्रायश्‍चित्त म्हणून ते गाणे भावपूर्ण होईपर्यंत पुनःपुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करायचा.

१ आ. नादब्रह्मास शब्दब्रह्माची जोड देण्यासाठी गाण्यातील शब्दांचे योग्य उच्चार महत्त्वाचे !

१ आ १. गायकाने गाण्यातील शब्द योग्य रितीने उच्चारल्यास त्या नादाचा गायकाच्या कुंडलिनीवर आघात होऊन त्याची कुंडलिनी जागृत होणे आणि त्याचा परिणाम श्रोत्यांवर होऊन त्यांचीही कुंडलिनी आपोआप जागृत होऊन ते ध्यानावस्थेत जाणे

आरती किंवा कोणतेही गीत गातांना त्या शब्दांचे उच्चार आणि शब्दांवरील जोर योग्य पद्धतीने दिल्यास त्यातून शब्दब्रह्म प्रगट होते, उदा. आरतीतील ‘ठ’, ‘भ’ यांसारखे नाभीतून येणारे शब्द योग्य पद्धतीने म्हटल्यास त्या नादाचा गायकाच्या कुंडलिनीवर आघात होऊन त्याची कुंडलिनी जागृत होते. गायकाची कुंडलिनी जागृत झाल्यावर त्याचा परिणाम श्रोत्यांवर होऊन त्यांचीही कुंडलिनी आपोआप जागृत होते आणि त्यामुळे ऐकणारेही आपोआप ध्यानावस्थेत जातात.

१ आ २. ‘गायन करतांना माझ्या मनात देवाचे विचार किती वेळ होते ?’, अशी स्वतःच स्वतःची टक्केवारी काढण्याचा आणि ती वाढवण्याचा प्रयत्न करावा’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंनी सांगितले.

१ इ. आरतीत अनुभवावयास येणारे ईश्‍वराचे निर्गुण-सगुण-निर्गुण स्वरूप

‘कुठल्याही देवतेची आरती म्हणण्यास आरंभ करण्यापूर्वी तिचे निर्गुण तत्त्व अस्तित्वात असते. आपण आरती म्हणण्यास आरंभ केल्यानंतर त्या देवतेचे सगुण तत्त्व कार्यरत होते आणि आरतीतील ओळीतील शेवटचे अक्षर म्हणून थांबल्यावर पुन्हा निर्गुण तत्त्व कार्यरत होते, उदा. ‘जय लक्ष्मीरमणा । स्वामी जय लक्ष्मीरमणा ॥’ ही श्री सत्यनारायण देवाच्या आरतीतील पहिली ओळ म्हणण्यास आरंभ करण्यापूर्वी, म्हणजे गायनापूर्वी तेथे त्याचे निर्गुण तत्त्व असते. आरतीतील ओळ गाण्यास आरंभ केल्यावर हे ईश्‍वरी तत्त्व शब्दांच्या माध्यमातून सगुण साकार होते आणि ती ओळ पूर्ण झाल्यावर ते पुन्हा निर्गुणात जाते’, असे अनुभवायला येते. त्यामुळे आरतीच्या ओळीचा शेवटच्या अक्षराचा सूर (उदा. या आरतीतील ‘णा’ हे अक्षर) जास्त न लांबवता म्हणून झाल्यावर लगेच सोडून द्यावा. त्यामुळेे त्या स्वराची स्पंदने (आस) टिकून रहातात आणि ती निर्गुणाकडे नेणारी असतात. अशा प्रकारे आरती म्हणणे, म्हणजे निर्गुुण-सगुण-निर्गुण असा प्रवास आहे.’

– कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी, संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment