आदर्श नागरिक घडवण्यास अपयशी ठरलेली निधर्मी शिक्षणप्रणाली पालटून गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अंगीकार करणे आवश्यक !

मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासन शिक्षण हक्क कायद्यासारख्या विविध उपाययोजना राबवत असतांना काही मुलांना शाळेत जायला आवडत नाही. सुशिक्षित कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या मुलांमध्ये ही शाळा नकोशी वाटण्याची भावना निर्माण होत आहे.

 

 

सनातनच्या काही बालसाधकांना शाळेत जाऊ नये, असे वाटण्याची कारणे

सध्या ८ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या काही बालसाधकांनी त्यांना शाळेत जायला का आवडत नाही, यासंदर्भात पुढील माहिती दिली.

१. शाळेत मुले मारतात.

२. मुलींच्या वेण्या ओढतात.

३. शिव्या देतात.

४. वाईट (अश्‍लील) बोलतात.

५. वाईट (अश्‍लील) चित्रे आणि भ्रमणभाषवर चित्रपट पहातात.

या उदाहरणांतून भावी पिढीवर सुसंस्कार होत नसल्यामुळे ती झपाट्याने अनाचाराकडे वाटचाल करत आहे, हे स्पष्ट होते. तसेच शाळेत चालणार्‍या अशा कृत्यांमुळे शाळांमधील वातावरणात किती रज-तम निर्माण होत असेल याचीही कल्पना येते. साधनेचे म्हणजे सात्त्विकतेचे संस्कार असणार्‍या मुलांना असे वातावरण नको वाटणे स्वाभाविक आहे. अनेक दैवी बालकांना कुसंस्कार करणार्‍या शाळेत शिकण्यापेक्षा साधना करण्यासाठी आश्रमात रहावेसे वाटते. याचाही विचार करणे आवश्यक आहे.

 

पालकांनो, मुलांना शाळेत जायला
आवडत नसल्यास त्यामागील कारणांचा शोध घ्या !

सनातनच्या बालसाधकांसारखी दैवी गुण असलेली अनेक मुले समाजात आहेत. त्यांनाही शाळेतील अशा वातावरणामुळे शाळेत जायला नको, असे वाटत असेल. मुलाने शाळेत जायला नकार दिला, तर आई-वडील ओरडून किंवा प्रसंगी मारून लहान मुलाला शाळेत पाठवतात. अशा वेळी त्यांनी मुलाशी गोड बोलून शाळेत कोणी त्रास देते का ?, अशासारखी माहिती मिळवली पाहिजे आणि त्यानुसार कृती केली पाहिजे.

 

हिंदु राष्ट्रात आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धती असेल !

मुलांवर सुसंस्कार व्हावेत, त्यांनी शिक्षण घेऊन देशाचे आदर्श नागरिक व्हावे, यासाठी आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो; पण सध्याच्या निधर्मी शिक्षणव्यवस्थेच्या वातावरणात मुलांमध्ये झपाट्याने वाढणार्‍या अपप्रवृत्ती निधर्मी शिक्षणव्यवस्थेचे अपयश अधोरेखित करते. प्रभु श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, पांडवादी महापुरुष गुरुकुल शिक्षणपद्धतीची लेणी आहेत किंबहुना गुरुकुल शिक्षणपद्धती चालू होती, त्या काळात भारत विश्‍वगुरु पदावर विराजमान होता आणि भारतात सोन्याचा धूर निघत होता. भारताचे हे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी गुरुकुल पद्धतीचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे. केवळ आदर्शच नव्हे, तर दैवी गुणांनी समृद्ध असलेला समाज घडवणारी गुरुकुल शिक्षणपद्धती भावी हिंदु राष्ट्रात असेल.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

Leave a Comment