प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

अखंड भारताच्या कानाकोपर्‍यांत शिक्षणाची असंख्य केंद्रे वसलेली होती. अगदी लहान-लहान विद्याकेंद्रे तर किती होती, त्याची गणतीच नाही. यातील बहुतांशी विद्याकेंद्रे आसुरी वृत्तीच्या तत्कालीन मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त करून टाकली. ज्ञानकेंद्रांच्या या अपरिमित हानीचे दुष्परिणाम आपण आजही पदोपदी भोगत आहोत. प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत. या सर्वांविषयीच्या गौरवशाली इतिहासाचे सोनेरी क्षण प्रस्तुत लेखाद्वारे जाणून घेऊया.

 

१. तक्षशिला विद्यापीठ : भारताची बौद्धिक राजधानी !

जगातील सर्वांत प्राचीन आणि जगद्विख्यात तक्षशिला विद्यापिठाचे अवशेष ! या विद्यापिठाने तब्बल १२०० वर्षे ज्ञानदानाचे प्रचंड मोठे कार्य केले.

‘तक्षशिला’ हे जगातील पहिले विश्‍वविद्यालय (विद्यापीठ) मानले जाते. आजच्या पाकिस्तानात (रावळपिंडीपासून १८ मैल उत्तरेकडे) असलेले हे विद्यापीठ इसवी सनाच्या ७०० वर्षे पूर्वी स्थापन करण्यात आले. पुढे इसवी सन ४५५ मध्ये पूर्व युरोपच्या आक्रमकांनी अर्थात् हुणांनी ते नष्ट केले. जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या या विद्यापिठाने अनुमाने १२०० वर्षे ज्ञानदानाचे प्रचंड मोठे कार्य केले. श्रेष्ठ आचार्यांची परंपरा निर्माण केली. अनेक जगप्रसिद्ध विद्यार्थी दिले. तक्षशिला विद्यापीठ बंद पडल्यानंतर काही वर्षांतच मगध राज्यात (आजच्या बिहारमध्ये) नालंदा विद्यापीठ स्थापन झाले. ही दोन्हीही नामांकित विद्यापिठे एकाच वेळी कधीही कार्यरत नव्हती.

असे म्हणतात की, तक्षशिला या नगरीची स्थापना भरताने त्याच्या मुलाच्या म्हणजे तक्षाच्या नावावर केली. पुढे येथेच विद्यापीठ स्थापन झाले. जातक कथांमध्ये तक्षशिला विद्यापिठाविषयी बरीच माहिती मिळते. या कथांमध्ये १०५ ठिकाणी तक्षशिला विद्यापिठाचे संदर्भ मिळतात. त्या काळात म्हणजे अनुमाने १ सहस्र वर्षे तक्षशिला ही संपूर्ण भरतखंडाची बौद्धिक राजधानी होती. तिची ही ख्याती ऐकूनच चाणक्यसारखी व्यक्ती मगध (बिहार) येथून इतक्या दूर तक्षशिलेला आली. बौद्ध ग्रंथ ‘सुसीमजातक’ आणि ‘तेलपत्त’ मध्ये तक्षशिलेचे अंतर काशीपासून २ सहस्र कोस इतके सांगितले आहे.

१ अ. तक्षशिला विद्यापिठातील चिकित्सा शास्त्राचे प्रगत केंद्र !

इसवी सनाच्या ५०० वर्षांपूर्वी, जेव्हा चिकित्सा शास्त्राचे नावही जगात कुठेच नव्हते, तेव्हा तक्षशिला विद्यापीठ हे चिकित्सा शास्त्राचे फार मोठे केंद्र मानले जात होते. येथे ६० हून अधिक विषय शिकवले जात होते. एकाच वेळी १० सहस्र ५०० विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय होती.

१ आ. तक्षशिला विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा

१ आ १. या विद्यापिठाच्या स्थापनेनंतर म्हणजेच इसवी सनापूर्वी ७०० वर्ष, येथून शिकून गेलेला पहिला जगप्रसिद्ध विद्यार्थी म्हणजे पाणिनी ! त्यांनी पुढे संस्कृत भाषेचे व्याकरण सिद्ध केले !

१ आ २. इसवी सनापूर्वी ६ व्या शतकात चिकित्सा शास्त्र शिकलेला जीवक (किंवा जिबाका), पुढे जाऊन मगध राजवंशाचा राजवैद्य झाला. त्याने अनेक ग्रंथ लिहिले.

१ आ ३. इसवी सनापूर्वी ४ थ्या शतकातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी चाणक्य, जो पुढे ‘कौटील्य’ नावाने प्रसिद्ध झाला.

१ इ. वाढत्या आक्रमणांमुळे आचार्यांची विद्यापिठाकडे पाठ !

चिनी यात्री आणि विद्यार्थी ‘फाह्यान’ हा वर्ष ४०५ मध्ये तक्षशिला विद्यापिठात आला. हा काळ ह्या विद्यापिठाचा पडता काळ होता. पश्‍चिमेकडून होणार्‍या आक्रमकांच्या संख्येत वाढ झाली. अनेक आचार्य विद्यापीठ सोडून गेले. अर्थात्च फाह्यानला तेथे फार काही ज्ञानाचा लाभ झाला नाही. त्याने तसे लिहून ठेवले आहे. पुढे ७ व्या शतकात तक्षशिला विद्यापिठाची महती ऐकून आणखी एक चीनी यात्री युवान च्वांड तेथे गेला. त्या वेळी त्याला विद्याभ्यासाची कसलीही खूण तेथे आढळली नाही.

 

२. अनेक दुर्लभ आणि दुर्मिळ ग्रंथांचा प्रचंड मोठा संग्रह असणारे नालंदा विद्यापीठ !

अनुमाने ७०० वर्षे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून ख्याती असलेल्या नालंदा विद्यापिठाचे अवशेष ! येथे अनेक दुर्लभ आणि दुर्मिळ ग्रंथांचा प्रचंड मोठा संग्रह होता.

हूण आक्रमकांनी ज्या काळात तक्षशिला विद्यापीठ उद्ध्वस्त केले, जवळपास त्याच काळात मगध साम्राज्यात नालंदा विद्यापिठाची मुहूर्तवेढ रोवली जात होती. मगधचे महाराज शकादित्य (म्हणजेच गुप्त वंशीय सम्राट कुमार गुप्त : वर्ष ४१५ ते ४५५) यांनी त्यांच्या अल्पकाळात नालंदा येथील जागा विद्यापिठाच्या रूपात विकसित केली. या विद्यापिठाचे आरंभीचे नाव होते ‘नलविहार’ ! नालंदा विद्यापीठ हे अनेक इमारतींचे एक फार मोठे संकुल होते. यातील प्रमुख भवने होती – रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजक ! ‘मान मंदिर’ हे सर्वांत उंच प्रशासकीय भवन होते. पुढे इसवी सन ११९७ मध्ये बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ जाळून टाकले. तोपर्यंत अनुमाने ७०० वर्ष नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वोकृष्ट विद्यापीठ होते.

या विद्यापिठात प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागत असे. येथे अनेक दुर्लभ आणि दुर्मिळ ग्रंथ यांचा प्रचंड मोठा संग्रह होता. चिनी यात्री ह्युएन त्सांग हा येथे १० वर्षे अध्ययन करत होता. त्याचे गुरु शीलभद्र हे आसामचे होते. ह्युएन त्सांगने या विद्यापिठाविषयी भरभरून आणि खूप चांगले लिहून ठेवले आहे.

 

३. विक्रमशील विद्यापीठ, बिहार

बौद्ध धर्मातील ‘वज्रयान’ संप्रदायाच्या अभ्यासाचे अधिकृत केंद्र असलेल्या विक्रमशील विद्यापिठाचे अवशेष !

८ व्या शतकातील बंगालचा पाल वंशीय राजा धर्मपाल यानेे या विद्यापिठाची स्थापना आजच्या बिहार येथे केली होती. या विद्यापिठाच्या अंतर्गत ६ विद्यालये होती. प्रत्येक विद्यालयात १०८ शिक्षक होते. १० व्या शतकातील प्रसिद्ध तिबेटी लेखक तारानाथ यांनी या विद्यापिठाचे विस्तृत वर्णन केलेले आहे. या विद्यापिठात प्रत्येक दाराला एक-एक प्रमुख आचार्य नियुक्त होते. नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याची आचार्य परीक्षा घ्यायचे. त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापिठात प्रवेश मिळत असे. हे आचार्य होते – पूर्व द्वार – पं. रत्नाकर शास्त्री, पश्‍चिम द्वार – वर्गाश्‍वर कीर्ती, उत्तर द्वार – नारोपंत आणि दक्षिण द्वार प्रज्ञाकर मित्रा. यातील नारोपंत हे महाराष्ट्रातून आलेले होते. आचार्य दीपक हे विक्रमशील विद्यापिठाचे सर्वाधिक प्रसिद्ध आचार्य झालेले आहेत.

१२ व्या शतकात येथे ३ सहस्र विद्यार्थी शिकत होते. हा या विद्यापिठाचा पडता काळ होता. पूर्वेत आणि दक्षिणेत मुसलमान आक्रमक पोहोचत होते अन् दिसतील ती ज्ञानाची साधने आणि स्थाने उद्ध्वस्त करत होते. म्हणूनच उत्खननात जे अवशेष सापडले आहेत, त्यावरून असे लक्षात येते की, या विद्यापिठाच्या मोठ्या सभागृहात तब्बल ८ सहस्र लोकांची बसायची व्यवस्था होती ! या विद्यापिठात विदेशी विद्यार्थ्यांमध्ये तिबेटी विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्याचे एक कारण म्हणजे बौद्ध धर्माच्या ‘वज्रयान’ संप्रदायाच्या अभ्यासाचे हे महत्त्वाचे आणि अधिकृत केंद्र होते.

नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झाल्यानंतर अनुमाने ६ वर्षांनी म्हणजेच वर्ष १२०३ मध्ये नालंदा जाळणार्‍या बख्तियार खिलजीने हेही विद्यापीठ जाळून टाकले !

 

४. उड्डयंतपूर विद्यापीठ, बिहार

सोमपूर महाविहार विद्यापिठात चीन, तिबेट, मलेशिया, जावा आणि सुमात्रा येथील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत.

पाल वंशाची स्थापना करणारे राजा गोपाळ यांनी उड्डयंतपूर विद्यापिठाची स्थापना बौद्ध विहाराच्या रूपात केली होती. त्याच्या विशाल भवनांना बघून बख्तियार खिलजीला वाटले की, हा एखादा किल्लाच आहे. म्हणून त्याने यावर आक्रमण केले. वेळेवर सैनिकी साहाय्य मिळू शकले नाही. केवळ विद्यार्थी आणि आचार्यांनीच शर्थीने झुंज दिली; पण सर्वच्या सर्व मारले गेले.

 

५. सुलोटगी विद्यापीठ, कर्नाटक

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हे महत्त्वाचे विद्यापीठ ११ व्या शतकाच्या शेवटी उभे राहिले. राष्ट्र्कुटांचे शासन असतांना कृष्ण (तृतीय) या राजाचे मंत्री नारायण यांनी सुलोटगी विद्यापीठ बांधले; मात्र विद्यापीठ म्हणून काही करून दाखवण्याच्या आतच त्यावर मुसलमानी आक्रमकांनी आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले.

येथील पविट्टागे हे संस्कृत महाविद्यालय अल्पावधीतच संस्कृत शिक्षणासाठी चचेर्र्त आले होते. देशभरातील निवडक २०० विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासासह शिक्षण देणारे हे विद्यापीठ वैशिष्ट्यपूर्ण होते.

 

६. सोमपूर महाविहार, बांगलादेश

बांगलादेशाच्या नवगांव जिल्ह्यात बादलगाझी तालुक्यातील पहाडपूर गावात महाविहार म्हणून स्थापन झालेले सोमपूर महाविहार हे शैक्षणिक केंद्र पुढे विद्यापीठ म्हणून नावारूपाला आले. पाल वंशाचे दुसरे राजा धर्मपाल देव यांनी ८ व्या शतकाच्या शेवटी हा महाविहार निर्मिला. जगातील सर्वांत मोठे बौद्ध विहार म्हणता येईल, अशी याची रचना होती. चीन, तिबेट, मलेशिया, जावा आणि सुमात्रा येथील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत होते. १० व्या शतकातील प्रसिद्ध विद्वान अतीश दिपशंकर श्रीज्ञान हे याच विद्यापिठाचे आचार्य होते.

 

७. रत्नागिरी विद्यापीठ, ओडिशा

६ व्या शतकात बौद्ध विहाराच्या रुपात स्थापन झालेले हे स्थान पुढे शिक्षणाचे मोठे केंद्र बनले. तिबेटमधील अनेक विद्यार्थी येथून शिकून गेले. तिबेटीयन इतिहासात या विद्यापिठाचा उल्लेख ‘कालचक्र तंत्राचा विकास करणारे विद्यापीठ’, असा केला गेला आहे; कारण येथे खगोलशास्त्राचा अभ्यास होत असे.

 

८. गोलकी मठ अर्थात् विद्यापीठ, मध्यप्रदेश

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील भेडाघाट येथे ६४ योगिनींचे मंदिर आहे. त्याला ‘गोलकी मठ’ असेही म्हणतात. या ‘गोलकी मठा’चा उल्लेख ‘मलकापूर पिलर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोदकामातही आढळतो. ‘मटमायूर वंश’ हा कलचुरी वंशांपैकीच एक आहे. या वंशाचे युवराजदेव (प्रथम) यांनी या मठाची स्थापना केली. मुळात हे तांत्रिक आणि इतर विषयांचे विद्यापीठ होते. या गोलकी मठाच्या अर्थात् विद्यापिठाच्या आधीन अनेक विद्यालये ही आंध्रप्रदेशात होती.

 

९. भारतात असंख्य ज्ञानमंदिरे !

बंगालमधील ‘जगद्द्ल’, आंध्रप्रदेशातील ‘नागार्जुनकोंडा’, काश्मीरमधील ‘शारदापीठ’, तमिळनाडूमधील ‘कांचीपुरम्’, ओडिशामधील ‘पुष्पगिरी’, उत्तरप्रदेशातील ‘वाराणसी’, अशी किती नावे घ्यावीत..? ही सर्व ज्ञानमंदिरे होती, ज्ञानपिठे होती. अगदी वनवासी अन् (आजच्या भाषेत) मागास भागांतही आवश्यक ते शिक्षण सर्वांना मिळत होते.

– श्री. प्रशांत पोळ (संदर्भ : ‘मासिक एकता’)

(‘विद्यापीठ’ ही संकल्पना भारतानेच जगाला सर्वप्रथम दिली. आज तोच भारत पाश्‍चात्त्य मॅकॉलेच्या इंग्रजाळलेल्या निरुपयोगी शिक्षणपद्धतीच्या विळख्यात अडकलेला पाहून प्रत्येक भारतीय मन अस्वस्थ झाल्याशिवाय रहात नाही. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीला खर्‍या अर्थाने गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संकलक)

Leave a Comment