आनंददायी शिक्षणपद्धत कशी असावी ?

gurukul

 

Anjali_Gadgil
पू. (सौ.) अंजली गाडगीळ

वर्तमानात अभ्यास करून मुले खरेच आनंदी होत आहेत का ?

शाळा चालू होऊन एक महिनाच होत आहे. तरीही शाळेच्या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे मुले त्रस्त झालेली असतात. ‘कधी एकदा शाळा सुटते’, असे त्यांना सततच वाटत असते. परीक्षांच्या काळातही पाठ्यपुस्तकांतील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून ती अतिशय कंटाळून जातात. ‘परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला हवे…..’ असे संवाद परीक्षेच्या काळात घरोघरी पालकांच्या आणि मुलांच्या तोंडून ऐकायला मिळतात. हेच तर आजकालच्या अभ्यासक्रमाचे, विज्ञानाचे मोठे अपयश आहे. दप्तराचे ओझे वाढले; पण ज्ञानात भर पडली नाही. शाळेत जाऊन, अभ्यास करून मुले आनंदित झाली आहेत, असे दृश्य पहायला मिळाले तर कुणाला आवडणार नाही ? सद्यस्थितीत ते शक्य आहे का ?

पौराणिक कथा, संत-चरित्रे वाचतांना प्रत्येक वेळी त्यातून नवीन बोध होणे

याउलट अध्यात्माचे आहे. जरा पूर्वीच्या गुरुकुलाचे दृश्य आठवून पहा.. !, लगेचच आपल्या तोंडवळ्यावर आनंद पसरतो; कारण पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदु धर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना आत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. आता हे सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले आहे.

अध्यात्मविषयक ग्रंथ, संतांची चरित्रे, देवतांच्या पौराणिक कथा, संतांनी एखाद्या विषयावर केलेले मार्गदर्शन हे कितीही वाचले, प्रतिदिन तेच तेच वाचले, तरी त्यातील मिळणार्‍या आनंदात उलट वाढच होत जाते. या वाचनाचा कधीच कंटाळा येत नाही; कारण अशा प्रकारच्या ग्रंथवाचनातून चैतन्य मिळते आणि यातून बुद्धीची शुद्धी होत गेल्याने आनंद मिळत असतो. म्हणून संतांची चरित्रे ही प्रतिदिन वाचली, तरी प्रतिदिन आपल्याला त्यांतील नवीनच अर्थ उमगल्यासारखे वाटते. असे का होते, तर प्रतिदिनच्या वाचनाने आपल्या देहाची अनुक्रमे स्थूलदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह अशी आतील शुद्धी होत गेल्याने त्या त्या देहाच्या स्तरावर मनाला आणि बुद्धीला भावणारा संत-चरित्रामधील भावार्थ निराळा असतो; म्हणून प्रतिदिन निराळा आनंद मिळतो.

विज्ञान हे चैतन्यरहित असल्याने ते विद्यार्थ्यांना पाट्याटाकूपणा शिकवते. हे पाट्याटाकूपण कंटाळा आणणारे असते, म्हणून अशा अभ्यासाचा विद्यार्थ्यांना ताण येतो, तर अध्यात्म मात्र नित्यनूतन आणि चैतन्यमय असल्याने ते भक्तांना, भाविकांना प्रतिदिन निराळ्या पद्धतीचा आनंद देते, जसे वाचनात आपण खोल खोल जाऊ तसा आनंद द्विगुणीत होत असल्याचे समाधान आपल्याला लाभते, म्हणूनच संत-चरित्र वाचतांना त्याचा खूप कंटाळा आला आहे, हे कधी एकदा वाचून संपते आहे, असे झाले आहे, अशी वाक्ये कोणाच्याच तोंडून बाहेर पडतांना दिसत नाहीत, याचे कारण म्हणजे संत-चरित्रातील चैतन्य आणि त्यातील संतांचे अनुभूतींचे प्रत्यक्ष बोल !

मग, चला तर परत एकवार आनंददायी गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धत भारतात आणण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि पुढील पिढ्यांना तरी चैतन्याचा आणि यातून मिळणार्‍या देवकृपेचा आनंद देण्यासाठी सज्ज होऊया ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशाच एका अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे.

चला, आनंददायी धर्माधिष्ठित शिक्षणपद्धतीकडे वाटचाल करूया !

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०१२)