श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ या शहरातील राम-रावण युद्धाचे साक्षीदार असलेले ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’ पर्वत अन् एका संतांनी स्थापन केलेला ‘गायत्रीपीठ’ आश्रम !

हनुमंत झोपला असल्याप्रमाणे दिसत असलेला रावणबोडा पर्वत

‘आतापर्यंत श्रीलंकेतील ९ प्रांतांमध्ये रामायणाशी संबंधित एकूण ४७ स्थाने अनेक अभ्यासक आणि इतिहास तज्ञ यांनी शोधली आहेत. त्यांतील अधिकाधिक स्थाने श्रीलंकेतील मध्य प्रांतामध्ये आहेत. या प्रांतातील सर्वांत मोठे आणि मुख्य शहर आहे ‘नुवारा एलिया’. ‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्‍चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत. ‘नुवारा एलिया’ येथील वातावरण थंड आहे; कारण हा प्रदेश उंच अशा पर्वतावर आहे.

 

१. रामबोडा पर्वत – सीतामातेच्या शोधात असतांना
हनुमंताने या पर्वतावर विश्रांती घेणे आणि या ठिकाणी आता ‘चिन्मय
मिशन’ या आध्यात्मिक संस्थेने १६ फूट उंचीची हनुमंताची मूर्ती असणारे मंदिर बांधणे

श्रीरामाचा अनन्य सेवक वायुपुत्र हनुमंत रामेश्‍वरम् येथून समुद्रावरून उड्डाण करून आकाशमार्गे उत्तर लंकेत प्रवेश करतो. ‘अशोक वाटिका’ ही लंकेच्या मध्यभागी म्हणजे ‘नुवारा एलिया’ या शहराजवळ असल्याने हनुमंत त्या दिशेने प्रवास करतो. हनुमंत एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर उड्या मारत जातो. अशोक वाटिकेच्या ३५ कि.मी. आधी जेथे हनुमंत विश्र्रांतीसाठी थांबला होता, ते स्थान म्हणजे आताचा ‘रामबोडा’ पर्वत आहे. येथे हनुमंत काही वेळ श्रीरामाचे स्मरण करत ध्यानाला बसला होता. त्यानंतर अंतःप्रेरणेने हनुमंताने अशोक वाटिकेकडे आकाशमार्गाने मार्गक्रमण केले. आता याच ठिकाणी भारतातील ‘चिन्मय मिशन’ या आध्यात्मिक संस्थेने १६ फूट उंच हनुमंताची मूर्ती असलेले मंदिर बांधले आहे. येथे श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी पंचक्रोशीतील हिंदू एकत्रित येतात.

 

२. रावणबोडा पर्वत – या पर्वतावर राम-रावण युद्धाचा आरंभ झालेला असणे

‘रामबोडा’ या पर्वताप्रमाणे या ठिकाणी अनेक पर्वत आहेत. ‘रामबोडा पर्वता’च्या समोर जो पर्वत आहे, त्याला ‘रावणबोडा पर्वत’ असे म्हणतात. श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या वानरसेनेच्या समवेत जेव्हा लंकेत आले, तेव्हा ते प्रवास करत शेवटी ‘रामबोडा’ या पर्वताच्या ठिकाणी आले. तेथे त्यांनी वानरसेनेसाठी तळ उभा केला. रावणाच्या सेनेने ‘रामबोडा’ पर्वताच्या समोर असलेल्या पर्वतावर त्यांच्या सेनेच्या तळाची उभारणी केल्याने त्या पर्वताला ‘रावणबोडा’ असे म्हटले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’ हे दोन्ही पर्वत जरी समोरासमोर असले, तरी कुणीही सहजपणे या पर्वतावरून त्या पर्वतावर जाऊ शकत नाही; कारण या दोन्ही पर्वतांच्या मध्ये ‘महावेली गंगा’ या नदीचे मोठे पात्र आहे. स्थानिक लोक आणि चिन्मय मिशनचे पदाधिकारी यांनी आम्हाला सांगितले, ‘‘श्रीरामाची सेना आणि रावणाची सेना यांमध्ये पहिले युद्ध येथे चालू झाले.’’ ‘रावणबोडा’ पर्वतामध्ये रावणाने मायावी शक्तीने अनेक सुरंगमार्ग (भुयारी मार्ग) बनवून आपल्या सेनेला लपण्यासाठी व्यवस्था केली होती. अनेक दिवस या पर्वतीय प्रदेशात राहून रावणाच्या सेनेने मायावी युद्ध केले होते.

सर्वांत आश्‍चर्य म्हणजे ‘रावणबोडा या पर्वताकडे पाहिल्यावर तेथे हनुमंत झोपल्यासारखा दिसतो’, असे स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितले. (छायाचित्र पहावे.)

गायत्रीपीठ स्थापन केलेल्या ‘मुरुगेसू सिद्धर्’ या संतांची समाधी
श्रीलंकेतील ‘नुवारा एलिया’ शहरात असलेले ‘श्रीलंकाधीश्‍वर’ नावाचे शिवाचे मंदिर

 

३. गायत्रीपीठ – ‘मुरुगेसू सिद्धर्’ या संतांनी स्थापन केलेला
आणि ‘श्रीलंकाधीश्‍वर’ हे शिवाचे अन् गायत्रीदेवीचे मंदिर असलेला आश्रम

‘नुवारा एलिया’ शहरातील एका भागात वर्ष १९७० मध्ये ‘मुरुगेसू सिद्धर्’ या संतांनी स्थापन केलेला ‘गायत्रीपीठ’ नावाचा एक आध्यात्मिक आश्रम आहे. या आश्रमाच्या आत ‘श्रीलंकाधीश्‍वर’ हे शिवाचे मंदिर आणि गायत्रीदेवीचे मंदिर आहे. (छायाचित्र क्रमांक १ पहा.) असे म्हटले जाते, ‘गायत्री पीठ असलेली भूमी म्हणजे रावणपुत्र मेघनादाची तपश्‍चर्या भूमी आहे.’ श्रीराम-लक्ष्मण यांच्याशी युद्धाला जाण्याआधी रावणपुत्र मेघनाद तपश्‍चर्येला बसतो. तो भगवान शिवाची उपासना करतो. युद्धाला जायच्या आदल्या दिवशी भगवान शिव प्रकट होतो आणि मेघनादाला आशीर्वाद देतो. ‘ज्या ठिकाणी शिव प्रकट होतो, त्याच ठिकाणी आताचे श्रीलंकाधीश्‍वर मंदिर आहे’, असे म्हटले जाते.

 

४. नर्मदा नदीतील कुणीतरी चोरून जर्मनीमध्ये नेलेली १०८ बाणलिंगे
‘मुरुगेसू सिद्धर्’ या संतांनी श्रीलंकेत आणून गायत्रीपिठामध्ये ठेवलेली असणे

गायत्री पिठाचे संस्थापक संत ‘मुरुगेसू सिद्धर्’ यांना त्यांच्या जर्मनी येथील भक्तांकडून कळले, ‘नर्मदा नदीतील १०८ बाणलिंगे कुणीतरी चोरून जर्मनीमध्ये नेली आहेत.’ जर्मन सरकारच्या साहाय्याने संत ‘मुरुगेसू सिद्धर्’ यांनी ही सर्व बाणलिंगे श्रीलंकेत आणून गायत्रीपिठामध्ये ठेवली आहेत.

 

५. ‘मुरुगेसू सिद्धर्’ यांची समाधी

वर्ष २००७ मध्ये ‘मुरुगेसू सिद्धर्’ यांनी देहत्याग केला. त्यांची समाधी या ठिकाणी बांधण्यात आली आहे. (छायाचित्र क्रमांक २ पहा.) संत ‘मुरुगेसू महर्षि’ यांनी महासमाधी घेतल्याने पुढे या बाणलिंगांची प्रतिष्ठापना त्यांचे भक्त करणार आहेत. या ठिकाणी ‘मुरुगेसू महर्षि’ यांना सिद्धांकडून, तसेच हिमालयातील तपस्वींकडून मिळालेल्या अमूल्य वस्तू जतन करण्यात आल्या आहेत.’

 

 

हनुमंताच्या रामभक्तीची महानता !

‘श्रीलंकेतील ‘रामबोडा’ आणि ‘रावणबोडा’ या पर्वतांच्या ठिकाणी श्रीरामाची वानरसेना आणि रावणासुराची मायावी असुर सेना यांमध्ये ६ मास (महिने) युद्ध चालले. हे युद्ध चालू असतांना एकदा श्रीराम आणि लक्ष्मण मूर्च्छित होतात, तेव्हा जांबुवंत बिभीषणाकडे येऊन म्हणतो,

तस्मिञ्जीवति वीरे तु हतमप्यहतं बलम् ।

हनूमत्युज्झितप्राणे जीवन्तोऽपि वयं हताः ॥

– वाल्मीकिरामायण, कांड ६, सर्ग ६१, श्‍लोक २२

अर्थ : जर हनुमंत जिवंत आहे आणि सर्व सेना मृत्यू पावली, तरी श्रीरामाची सेना जिवंत आहे; पण जर हनुमंताने शरीरत्याग केला, तर आम्ही सर्व जिवंत असूनही मेलेलो आहोत.

यावरून श्रीरामभक्त हनुमंताची महानता लक्षात येते. ‘भक्त भक्तीच्या बळावर युद्ध जिंकू शकतो’, अशी शिकवण देणार्‍या हनुमंताच्या चरणी आणि रामायण घडवून आणणार्‍या श्रीमन्नारायणाचा अवतार असलेल्या श्रीरामाच्या चरणी आम्ही सर्व साधक नतमस्तक आहोत.

साधकाने शरणागत भावाने केलेली प्रार्थना : ‘हे हनुमंता, येणार्‍या भीषण आपत्काळात सनातनच्या आम्हा सर्व साधकांना तुझ्यासारखी रामभक्ती करता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०१८)

Leave a Comment