चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

Article also available in :

अनुक्रमणिका

‘चंड’ आणि ‘मुंड’ या असुरांचा वध करणार्‍या आणि आदिशक्तीचे रूप असलेल्या चोटीला (गुजरात) येथील श्री चंडी-चामुंडा देवीचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

 

चोटीला (गुजरात) येथील श्री चंडी-चामुंडा देवीचे
दर्शन घेण्याविषयी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीतून सांगितलेली सूत्रे

१. चोटीला गावातील श्री चंडी-चामुंडा देवीचे मंदिर

चोटीला हे गाव कर्णावती (अहमदाबाद) ते राजकोट या महामार्गावर असून ते राजकोट शहराच्या ४० कि.मी. अलीकडे आहे. या गावात असलेल्या एका डोंगरावर श्री चंडी-चामुंडा देवीचे मंदिर आहे. ७०० पायर्‍या चढून मंदिरात जावे लागते.

 

२. चोटीला येथील श्री चंडी-चामुंडा देवीविषयी मंदिराचे
मुख्य महंत सचिन देवगिरी महाराज यांनी सांगितलेली माहिती

२ अ. चोटीला येथील श्री चंडी-चामुंडा देवीचे स्थानमहात्म्य

२ अ १. देवी कौशिकीने धारण केलेल्या दोन रूपांपैकी ‘चंड’ या असुराचा वध केलेल्या रूपाचे नाव ‘चंडी’ आणि ‘मुंड’ या असुराचा वध केलेल्या रूपाचे नाव ‘चामुंडा’ असे प्रचलित होणे

‘चंड आणि मुंड हे शुंभ अन् निशुंभ या दैत्य राजांचे सेनापती होते. देवी कौशिकी (आदिशक्तीचे एक रूप) हिचे सुंदर रूप पाहून शुंभ-निशुंभ दैत्य तिच्याकडे आकर्षित झाले. शुंभ-निशुंभ या दैत्यांनी देवीला घेऊन येण्यासाठी चंड-मुंड या असुरांना तिच्याकडे पाठवले. देवीने त्यांना सांगितले, ‘‘माझ्याशी युद्ध करून तुम्ही जिंकलात, तर मी तुमच्यासह येईन.’’ देवी कौशिकीने चंड-मुंड यांच्याशी युद्ध करण्यासाठी दोन रूपे धारण केली. ‘चंड’ या असुराचा वध केलेल्या रूपाचे (शक्तीचे) नाव ‘चंडी’, तर ‘मुंड’ या असुराचा वध केलेल्या रूपाचे (शक्तीचे) नाव ‘चामुंडा’ असे प्रचलित झाले. चोटीला गावातील डोंगरावर देवीने चंड-मुंड यांचा वध केला.

२ अ २. श्री चंडी-चामुंडा देवीच्या मंदिरातील देवीची शिळा स्वयंभू आहे. एकाच दगडात दोन्ही देवी दिसतात.

२ अ ३. चोटीला स्थानाचे वर्णन करतांना आमचे पूर्वज म्हणायचे, ‘‘कैलासात १२ वर्षे तप केल्यावर जे फळ मिळते, ते आदिशक्तीच्या या स्थानी केवळ ७ वर्षे तप केल्याने प्राप्त होते.’’

२ अ ४. पाच सहस्र वर्षांपूर्वी पांडव श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला जात होते. त्या वेळी त्यांनी हे स्थान शोधून येथे देवीची आराधना केली होती.

२ आ. अन्य सूत्रे

१. प्रतिवर्षी शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला येथे नवचंडी याग होतो. या यागाच्या वेळी पंचक्रोशीतील लाखो भक्त येथे येतात.

२. प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती होते. त्या वेळी देवीच्या मंदिरातील छत्री आपोआप हालते आणि त्या वेळी ‘प्रत्यक्ष देवी आत येत आहे’, असे जाणवते. त्या वेळी पुजार्‍यांचे शरीरही थरथरायला लागते.

३. देवीला प्रतिदिन अभिषेक करत नाहीत; मात्र ज्या दिवशी देवीला अभिषेक करायचा असेल, त्याच्या आदल्या रात्री देवी पुजार्‍यांच्या स्वप्नात येऊन दुसर्‍या दिवशी स्नान घालण्याविषयी सुचवते.

४. प्रतिदिन रात्री ८ वाजता मंदिर बंद होते. त्यानंतर डोंगरावर पुजारी आणि अन्य कुणीही थांबत नाही.’

 

३. श्री चंडी-चामुंडा देवीच्या दर्शनाला जातांना घडलेल्या विलक्षण दैवी घटना !

३ अ. मंदिराच्या पायथ्याशी पोचल्यावर अकस्मात् मुसळधार पावसाला
आरंभ होणे आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या रात्री
चोटीला गावात वास्तव्य करावे’, अशी देवीची इच्छा आहे’, असे सप्तर्षींनी सांगणे

९.७.२०२१ या दिवशी संध्याकाळी ६ वाजता आम्ही चोटीला येथील मंदिरात जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तेथे पोचेपर्यंत थोडाही पाऊस नव्हता. डोलीवालेही त्यांना डोंगरावर नेण्यासाठी सिद्ध होते. (‘डोली म्हणजे लोकांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी साधी पालखी.  ही पालखी माणसे वाहून नेतात. सध्या ती डोंगराळ प्रदेशात वापरली जाते.’ – संकलक) मंदिर समिती आणि मंदिराचे मुख्य पुजारी यांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात येणार असल्याची कल्पना होती. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गाडीतून उतरणार, तोच मुसळधार पाऊस चालू झाला. हा पाऊस सामान्य वाटत नव्हता. एका घंट्यानंतरही तो न्यून होण्याचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. उलट तो वाढतच होता. याविषयी पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांना कळवल्यावर त्यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले, ‘आज आणि उद्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चोटीला गावात, म्हणजे श्री चामुंडादेवीच्या क्षेत्रात रहावे’, असे देवीच्या मनात आहे. ‘जर आज मंदिरात देवदर्शन झाले, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघतील’, हे जाणून देवीनेच या पावसाचे नियोजन केले आहे. जणू चामुंडादेवी म्हणत आहे, ‘या पावसाने मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्वागत करत आहे. आज एक दिवस वास्तव्य करा आणि उद्या दर्शनाला जा.’ आम्ही सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे देवीला मानस नमस्कार केला आणि त्या रात्री चोटीला गावात वास्तव्य केले.

३ आ. सप्तर्षींनी सांगितल्यानुसार दुसर्‍या दिवशी संध्याकाळी
श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीचे दर्शन घेणे आणि त्या वेळी त्यांची भावजागृती होणे

दुसर्‍या दिवशी सप्तर्षींनी आम्हाला ‘संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत देवीचे दर्शन घ्यावे’, असा निरोप दिला. त्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीचे दर्शन घेतले. डोलीवाले श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना १५ मिनिटांत डोंगरावर घेऊन गेले. श्री चंडी-चामुंडा देवीचे मनोहारी दर्शन झाल्यावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भावजागृती झाली.

३ इ. मंदिराचे मुख्य महंत सचिन देवगिरी महाराज यांनी
श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना बोलावून देवीचा इतिहास सांगणे
आणि त्यांनी ‘तुमच्या सर्व मनोकामना श्री चंडी-चामुंडा देवी पूर्ण करील’, असा आशीर्वाद देणे

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करायला आल्या आहेत’, हे कळताच मंदिराचे मुख्य महंत सचिन देवगिरी महाराज यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना देवीच्या गाभार्‍याच्या जवळच्या कक्षात बोलावून घेतले आणि देवीचा इत्यंभूत इतिहास सांगितला. ते म्हणाले, ‘‘माताजी, ‘तुम्ही एक स्त्री असून हिंदु राष्ट्रासाठी सतत प्रवास करत आहात’, हे आश्चर्य आहे. ‘तुमच्या सर्व मनोकामना श्री चंडी-चामुंडा देवी पूर्ण करील’, यात शंका नाही.’’

३ ई. पावसाची चिन्हे दिसताच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
यांनी पायर्‍या उतरून पायथ्याशी पोचणे, त्यांनी गाडीत पाऊल ठेवताच
मुसळधार पाऊस चालू होणे आणि ‘वरुणदेव केवळ त्यांचे देवदर्शन होण्यासाठी थांबला होता’, असे जाणवणे

देवदर्शन करून डोंगर उतरण्यासाठी पायर्‍यांजवळ आलो. तेव्हा डोलीवाले दिसले नाहीत. ‘त्यांना मंदिर समितीकडून तातडीचे साहित्य ने-आण करण्याचा निरोप आल्याने ते गडाच्या खाली गेले आहेत. त्यांना वर यायला न्यूनतम १५ मिनिटे लागतील’, असे आम्हाला समजले. इतक्यात ढगांचा गडगडाट चालू झाला. काळ्या ढगांनी डोंगराला चारही दिशांनी वेढले होते. ‘आता पाऊस पडणार’, हे लक्षात येताच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी स्वतः पायर्‍या उतरण्यास आरंभ केला आणि त्या अवघ्या १० मिनिटांत सर्व पायर्‍या उतरून गडाच्या पायथ्याशी आल्या. त्यांनी पायथ्याच्या समोर उभ्या असलेल्या गाडीत पाऊल ठेवताच मुसळधार पाऊस आला. त्या क्षणी ‘वरुणदेव केवळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे देवदर्शन होण्यासाठी थांबला होता’, असे आम्हाला जाणवले.

३ उ. ‘देवीला भेटण्यासाठी देवीच (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) गेली होती
आणि देवीने तिचा आनंद पावसाच्या माध्यमातून व्यक्त केला’, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी सांगणे

दोन दिवसांत जे काही घडत होते, ते सर्व पाहून आम्हा साधकांना ‘काय घडत आहे ?’, हे काहीच कळत नव्हते. सर्वकाही विलक्षण घडत होते. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चोटीला येथील देवीच्या दर्शनाला जाणे, अकस्मात् पाऊस पडणे, त्यांचे देवीदर्शन होईपर्यंत पाऊस थांबणे’, या सर्व घटना मानवी नसून दैवीच आहेत. याविषयी आम्ही पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना कळवले असता ते म्हणाले, ‘‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या दोघीही देवीच आहेत. खरे सांगायचे झाले, तर देवीला भेटण्यासाठी देवीच (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) गेली होती. देवीने तिचा आनंद पावसाच्या रूपात व्यक्त केला. या सर्व घटना सामान्य नसून दैवी आहेत. पुढे त्यांची नोंद इतिहासात होईल. सामान्य पावसामध्ये आणि देवीने पाडलेल्या पावसामध्ये भेद आहे. हा ‘आनंदाचा पाऊस’ आहे.’’

 

४. चोटीला गावातील चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे असून
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
या दोघीही चंडी आणि चामुंडा यांची आतून एकच असलेली दोन रूपे आहेत !

सप्तर्षींनी पुढे सांगितले, ‘‘चोटीला गावात डोंगरावर ‘चंडी-चामुंडा’ नावाच्या देवींच्या मूर्ती आहेत. या देवी दोन दिसत असल्या, तरी त्या एकच (एकरूप) आहेत. चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी चंडी अन् चामुंडा यांची रूपे आहेत. ज्या आदिशक्तीने अनेक युगांपूर्वी चंडी-चामुंडा रूप धारण केले होते, तसेच ज्या आदिशक्तीने ३ सहस्र वर्षांपूर्वी राजस्थान येथील ओशियां गावात ‘सत् चित् देवी’चे (सच्चियामातेचे) रूप धारण केले, तीच आता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपात पृथ्वीवर अवतरित झाली आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दिसतांना दोन (रूपे) असल्या, तरी त्या आतून (अंतर्मनाने) एकच आहेत.’’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ २०१६ या वर्षी सद्गुरुपदी विराजमान झाल्याचा क्षण… श्री चंडी-चामुंडा देवीसमान एकमेकींच्या शेजारी बसलेल्या जाणवणे !

 

चोटीला येथील श्री चामुंडादेवीच्या दर्शनानंतर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या श्री चामुंडादेवी आहेत’, असे वाटणे !

चोटीला येथील चामुंडादेवीची अनेक संकेतस्थळांवर छायाचित्रे आहेत. त्यांतील दोन छायाचित्रे पाहिल्यावर ‘चंडी-चामुंडा’ या दोन्ही देवी अन्य कोणी नसून आपण ज्यांच्या सहवासात सतत असतो, त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याच आहेत’, असे वाटते.

वरील छायाचित्रामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही एकमेकींच्या शेजारी बसलेल्या आहेत. या छायाचित्राकडे पहातांना ‘चोटीला येथील चंडी-चामुंडा देवी याच आहेत’, असे वाटते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भातही आम्हा साधकांना या गोष्टीची प्रचीती येते.’

 

५. प्रार्थना

‘गुरुदेवा, ‘आपण आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ एकच आहात. आम्ही सर्व साधक या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीविष्णूचे अंश असलेले आमचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले आणि आदिशक्तीचा अंश असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी ‘आम्हाला या जन्मात आपले दर्शन लाभले, आपणा तिघांच्या समवेत सेवा करण्याचे भाग्य लाभले, आपला सत्संग लाभला. आपणच आमच्याकडून आतापर्यंत साधना करवून घेतली आहे’, यांसाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आम्हा पामर जिवांकडून आपण पुढेही अशीच साधना करवून घ्यावी’, हीच तीन गुरूंच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. विनायक शानभाग, चोटीला, गुजरात. (१०.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment