शिवाची विविध रूपे

अनुक्रमणिका

शिवाची विविध रूपे

१. रुद्र

१ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

१ आ. रुद्रगण

२. कालभैरव

३. वीरभद्र

४. भैरव (भैरवनाथ)

४ अ. प्रकार

४ आ. उपासना

४ इ. वाईट शक्‍तींचे निवारण करणारा

५. वेताळ

५ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

५ आ. इतर नावे

५ इ. वैशिष्ट्ये

५ ई. मूर्ती

५ उ. उपासना

६. भूतनाथ

७. नटराज

८. किरात


 

शिवाची विविध रूपे

या लेखात रुद्र, कालभैरव, वीरभद्र, नटराज, भूतनाथ इत्यादी शिवाची विविध रूपे आणि त्यांचे कार्य यांविषयी थोडक्यात माहिती पाहूया.

 

१. रुद्र

१ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

१. रोदयति इति रुद्रः ।

अर्थ : जो रडवणारा आहे, तो रुद्र होय.

२. ‘रु’ म्हणजे रडणे आणि ‘द्रु’ म्हणजे धावणे. रुद्र म्हणजे रडणारा, रडविणारा, रडत रडत धावून जाणारा. देवाने दर्शन द्यावे, म्हणून रडणारा. मुक्‍तीकरता आक्रंदन करतो तो रुद्र.

३. रुतं राति इति रुद्रः ।

अर्थ : रुत म्हणजे दुःख आणि राति म्हणजे नाश करतो. दुःखाचा नाश करणारा तो रुद्र. दुःख म्हणजे अविद्या किंवा संसार. रुद्र म्हणजे अविद्येतून किंवा संसारातून निवृत्त करणारा.

४. रुत् म्हणजे सत्य, म्हणजेच शब्दरूप उपनिषदे. रुत् ज्याने जाणले किंवा प्रतिपादिले तो रुद्र.

५. रुत् म्हणजे शब्दरूप वाणी किंवा तत्प्रतीपाद्य आत्मविद्या. ती उपासकांना देतो तो रुद्र.’

६. रुद्राचे दुसरे एक नाव म्हणजे ‘वृषभ’. ‘वृषभ हा शब्द `वृष्’ या धातूवरून बनला आहे. वृष्टी करणारा आणि अत्यधिक प्रजननशक्‍ती असलेला, असे त्याचे दोन अर्थ आहेत. रुद्र वर्षा घडवितो आणि त्याच्यामुळेच वनस्पती बहरतात, अशी स्पष्ट धारणा ऋग्वेदातील रुद्रविषयक मंत्रात व्यक्‍त झालेली आहे. सांप्रत वृषभ शब्द ‘बैल’ या अर्थाने बहुतांशी वापरला जातो. त्याचे कारण बैलाच्या ठिकाणी असलेली विशेष प्रजननशक्‍ती होय.’

१ आ. रुद्रगण

रुद्रगण हे रुद्राचे पार्षद (सेवक) आहेत, म्हणजे सतत रुद्राच्या जवळ राहून सेवा करतात. हे एक कोटी असल्याचे सांगितले आहे. भूतनाथ, वेताळ, उच्छुष्म, प्रेतपूतन, कुभांड इत्यादी रुद्राने उत्पन्न केलेले गण होत. रुद्रगण हे रुद्रासारखाच वेश धारण करतात. ते स्वर्गात वास्तव्य करतात, पापी लोकांचा नाश करतात, धार्मिकांचे पालन करतात, पाशुपतव्रत धारण करतात, योगिजनांची विघ्ने दूर करतात आणि शिवाची सदैव सेवा करतात.

 

२. कालभैरव

‘काशीचा कोतवाल’ कालभैरव !
‘काशीचा कोतवाल’ कालभैरव !

हा अष्टभैरवांपैकी एक असून, याची उत्पत्ती शिवाच्या क्रोधातून झाली. शिवाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक याच्या हातून तोडविल्यानंतर त्याला काशीक्षेत्री रहाण्याची आज्ञा केली. याला ‘काशीचा कोतवाल’ असेही म्हटले जाते. काशीत प्रवेश केल्यानंतर प्रथम याचे दर्शन घ्यावे लागते. दर्शन घेऊन परततांना कालभैरवाचा काळा गंडा हातात बांधतात.

 

३. वीरभद्र

 यमधर्म आणि दक्षिणलोकाचा प्रमुख वीरभद्र !
यमधर्म आणि दक्षिणलोकाचा प्रमुख वीरभद्र !

यमधर्म आणि दक्षिणलोकाचा प्रमुख वीरभद्र हेही शिवगण आहेत. दक्षिणलोकाशी प्रत्यक्ष संबंध असलेला वीरभद्र हा एकच देव आहे; म्हणून हा भूतमात्रांचा नाथ म्हणजे भूतनाथ आहे. याने वेताळाला आपले वाहन बनविले आहे. लिंगरूपात शिवाची पहिली पूजा वीरभद्राने केली, अशी कथा आहे.

 

४. भैरव (भैरवनाथ)

चौसष्ट योगिनींचे स्वामी भैरवनाथ !
चौसष्ट योगिनींचे स्वामी भैरवनाथ !

४ अ. प्रकार

‘शिव आगमात भैरवांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. आठ भैरवांचा एक असे त्यांचे आठ वर्ग होतात. या आठ वर्गांचे प्रमुख अष्टभैरव या नावाने प्रसिद्ध आहेत. यासह कालभैरव, बटुकभैरव ही भैरवनावे प्रसिद्ध आहेत. तंत्रग्रंथात चौसष्ट भैरवांना चौसष्ट योगिनींचे स्वामी मानले असून शक्‍तींचा आणि भैरवांचा निकट संबंध दाखविला आहे. ‘भैरव हा प्रत्येक शक्‍तीपीठाचे संरक्षण करीत असतो’, असे म्हटले आहे. ‘भैरवांना वगळून केलेली शक्‍तीची पूजा ही निष्फळ होते’, असे महापीठनिरूपण या ग्रंथात म्हटले आहे.

४ आ. उपासना

महाराष्ट्रात भैरव सामान्यतः ग्रामदेवता म्हणून पुजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा किंवा विरोबा असे म्हणतात. बहुधा प्रत्येक खेड्यात या देवाचे ठाणे असते. ते वारूळ किंवा स्मशान अशा ठिकाणी असते. कधी त्याची मूर्ती असते, तर कधी तांदळा (गोल दगड) असतो. ‘रात्री हा घोड्यावर बसून फेरी घालायला निघतो, तेव्हा त्याच्यासमवेत काळा कुत्रा असतो’, असे म्हणतात.’ भैरव क्षुद्रदेवता असल्याने साधना म्हणून त्याची उपासना केली जात नाही.

४ इ. वाईट शक्‍तींचे निवारण करणारा

‘काट्याने काटा काढायचा’, या नियमाने भैरवाच्या जपाने जी शक्‍ती निर्माण होते तिच्यामुळे वाईट शक्‍तींचा त्रास न्यून होत जातो. हे होत असतांना व्यक्‍तीला त्रास जाणवू शकतो. भैरव हा मृत्यूनंतरच्या दक्षिणमार्गाचा किंवा क्षेत्राचा, तर नारायण हा उत्तरमार्गातील म्हणजेच आनंदमार्गातील देव आहे.

 

५. वेताळ

विकृतीला तालावर नाचविणारा वेताळ !
विकृतीला तालावर नाचविणारा वेताळ !

५ अ. व्युत्पत्ती आणि अर्थ

वेताळ हा शब्द ‘वैताल’ या शब्दापासून बनला आहे. वैताल म्हणजे विकृतीला तालावर नाचविणारा. आहत आणि अनाहत नाद एकत्र येतात, तेथे ‘वै’ नावाची स्पंदने निर्माण होतात. ती विकृतीला तालावर आणतात.

५ आ. इतर नावे

‘वेताळाला आग्यावेताळ, ज्वालावेताळ किंवा प्रलयवेताळ असेही म्हणतात.

५ इ. वैशिष्ट्ये

वेताळादी स्कंदसैनिकांचा भूतगणांत समावेश केला जातो. मत्स्यपुराणात वेताळाला ‘रक्‍त-मांस खाणारा’ असे म्हटले आहे. शिवाने वेताळाला पिशाचांचे आधिपत्य दिले. मांत्रिकलोक वेताळाला ‘वीर’ म्हणतात. वैताली ही वेताळाची आई ‘मातृका’ म्हणूनही महत्त्व पावली आहे.

५ ई. मूर्ती

वेताळाच्या मूर्ती काष्ठ किंवा पाषाण यांच्या असतात. ग्रामदेवतेच्या स्वरूपातील वेताळ तांदळ्याच्या (गोल दगडाच्या) आकारात असतो. गोमंतकात त्याच्या लाकडी किंवा पाषाणाच्या मूर्ती असून त्यांतील काही नग्न आहेत. याच्या हातात त्रिशूळ किंवा दंडा असतो.

५ उ. उपासना

गोमंतकातील प्रियोळ, आमोणे, सावर्डे इत्यादी गावांचा आणि महाराष्ट्रातील पुणे परिसरातील बर्‍याच गावांचा तो ग्रामदेव आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात तो शेंदूर फासलेल्या तांदळ्याच्या स्वरूपात गावच्या शिवेवर (वेशीवर) विसावलेला असतो. त्याच्याभोवती शेंदूर फासलेले आणखीही काही तांदळे असतात. त्यांना वेताळाचे सैनिक म्हणतात. वेताळाच्या मंदिराभोवती बर्‍याचदा नवग्रहांची मंदिरे असतात. महाराष्ट्रातही त्याचे काही उपासक आहेत. त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी काही ठिकाणी कोंबड्या-बकर्‍यांचा बळी देतात. तर काही ठिकाणी गोडधोडही देतात. उत्सवाच्या वेळी याला फुलांनी सजविलेल्या पालखीतून नेतात.’

क्षुद्रदेवतांना बळी देणे यांमागील उद्देश आणि दृष्टीकोन यांविषयीचे लिखाण लेखाच्या शेवटी दिले आहेत.

 

६. भूतनाथ

 भूतनाथ !
भूतनाथ !

टीप : शिवाचे अंशावतार अनेक आहेत. अवताराचे कार्यप्रयोजन निरनिराळे आहे. त्यामुळे कार्यानुरूप त्यांचे रूप, वेश आणि धारण केलेली अस्त्र-शस्त्र यांमध्ये भेद आहेत. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतांमधे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांनुसार समाजात त्यांची उपासना केली जाते.

भूतनाथ हा वेताळाच्या वर्गातला एक क्षुद्रदेव आहे. गोमंतकात याची देवस्थाने आहेत. हा मध्यरात्री आपल्या सैनिकांसह संचाराला निघतो. त्या वेळी त्याच्या हातात एक दांडा आणि खांद्यावर घोंगडी असते, असे म्हणतात. तो पायी भ्रमंती करतो; म्हणून त्याच्या पायातील वहाणा झिजून जातात, या समजुतीने महाराष्ट्रातील सावंतवाडी भागातील लोक त्याला प्रत्येक मासाला (महिन्याला) नव्या वहाणा अर्पण करतात.’

 

७. नटराज

नाट्यकला प्रवर्तित करणारा नटराज !
नाट्यकला प्रवर्तित करणारा नटराज !
‘एखादी निश्‍चित घटना अथवा विषय अभिव्यक्‍त करण्यासाठी जे अंगचालन केले जाते, त्याला ‘नटन अथवा नाट्य’ अशी संज्ञा आहे. हे नटन जो करतो तो नट होय. नटराज या रूपात शिवाने नाट्यकला प्रवर्तित केली, अशी पारंपरिक धारणा आहे. शिव हा आद्यनट आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला नटराज हे बिरुद लागले आहे.

शिवाचे रूप नटराज, तांडवनृत्य आणि त्याचे सात प्रकार याविषयीच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा !

 

८. किरात

‘हे शिवाचे कापालिक रूप आहे. शिवाइतकेच जनमानसात ते त्याचे प्रिय रूप आहे. या रूपात तो गजचर्म पांघरतो. त्याच्यापुढे भूतगण हसत-नाचत असतात. भगवती उमाही त्याच्यासह त्याच वेशात असते. शैव धर्माच्या उत्कर्षकालात शिवाचे हे रूप हळूहळू लुप्त झाले. केवळ नृत्याशी तेवढा शिवाचा संबंध राहिला. शिवाच्या त्या नर्तक रूपाचा विकास होता होता शिवाची नटराज ही मूर्ती निर्माण झाली.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव भाग १’

5 thoughts on “शिवाची विविध रूपे”

  1. रुद्रांविषयीची माहिती खूप छान. धन्यवाद

    Reply

Leave a Comment