‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्‍वरम् मंदिर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !

रावणासुराच्या संहारानंतर श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येकडे जायला निघाल्यानंतर ‘विमानाच्या मागून एक काळा ढग येत आहे’, असे त्याच्या लक्षात येते. तेव्हा शिव प्रकट होऊन श्रीरामाला सांगतो, ‘‘हा काळा ढग म्हणजे तुम्हाला लागलेल्या ‘ब्रह्महत्या’ पातकाचे प्रतीक आहे.’’ रावण हा ब्राह्मण असल्याने त्याच्या हत्येमुळे लागलेल्या दोषनिवारणासाठी भगवान शिव श्रीरामाला श्रीलंकेतील पंच ईश्‍वर असलेल्या ठिकाणी जाऊन शिवपूजा करायला सांगतो. श्रीराम भगवान शिवाचे आज्ञापालन करतात. ‘केतीश्‍वरम्’, ‘तोंडीश्‍वरम्’, ‘मुन्नीश्‍वरम्’, ‘कोनेश्‍वरम्’ आणि ‘नगुलेश्‍वरम्’ हे ते पंच ईश्‍वर आहेत. यांतील तोंडीश्‍वरम् मंदिर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याखाली गेले आहे. आज आपण या पंच ईश्‍वर मंदिरांमधील ‘कोनेश्‍वरम्’ मंदिराविषयी जाणून घेऊया.

तिरुकोनेश्‍वरम् मंदिरात कोरलेल्या या शिल्पात कैलासाच्या पायथ्याशी बसून शिवाचे गुणगान करतांना दशानन रावण दिसत आहे.

 

१. श्रीलंकेतील ‘महावेली गंगा’ ही नदी तिरुकोनेश्‍वरम् येथे समुद्राला
मिळते, तेथे दगडी पर्वताचा त्रिकोण असणे आणि तेथे हे ‘कोनेश्‍वरम्’ मंदिर असणे

‘श्रीलंकेतील ‘केतीश्‍वरम्’, ‘तोंडीश्‍वरम्’, ‘मुन्नीश्‍वरम्’, ‘कोनेश्‍वरम’् आणि ‘नगुलेश्‍वरम्’ ही पंच ईश्‍वर मंदिरे फार प्रसिद्ध आहेत. त्यांतील ‘कोनेश्‍वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्‍वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्‍वरम् मंदिर’ असेही म्हणतात. ‘तिरु’ म्हणजे ‘श्री’ आणि ‘कोनेश्‍वरम्’ म्हणजे कोनाकारात असलेल्या टेकडीवर असलेला ईश्‍वर. तिरुकोनेश्‍वरम् हे गाव श्रीलंकेच्या पूर्व समुद्रकिनार्‍यावर आहे. श्रीलंकेतील उंचच्या उंच पर्वत असलेल्या मध्य प्रांतातील ‘नुवारा एलिया’ येथील पर्वतीय प्रदेशामध्ये जन्माला येणारी ‘महावेली गंगा’ नदी तिरुकोनेश्‍वरम् येथे समुद्राला मिळते. ही नदी समुद्राला मिळते, त्या ठिकाणी दगडी पर्वताचा त्रिकोण आहे. त्याच्या तीनही बाजूंना हिंदी महासागर आहे. या उंचच्या उंच दगडांवर तिरुकोनेश्‍वरम्चे मंदिर आहे.

 

२. तिरुकोनेश्‍वरम् येथील लिंगाच्या स्थापनेविषयी वायुपुराणात सांगितलेली कथा

तिरुकोनेश्‍वरम् येथे महर्षि अगस्ती यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचे भावपूर्ण दर्शन घेतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

तिरुकोनेश्‍वरम्विषयी वायुपुराणात एक गोष्ट आढळते. कैलासात शिव आणि पार्वती यांच्या विवाहाच्या वेळी सर्व देवता उपस्थित असतात. त्या वेळी पृथ्वीच्या उत्तरेकडील वजन वाढल्याने पृथ्वी एकीकडे कलते. यावर उपाय म्हणून भगवान शिव अगस्ति महर्षींना दक्षिणेकडे पाठवतात. महर्षि अगस्ति तिरुकोनेश्‍वरम् येथे येऊन भगवान शिवाने दिलेल्या लिंगाची स्थापना करतात. महर्षि अगस्तींनी शिवलिंगाची स्थापना केल्यावर पृथ्वी सरळ (स्थिर) झाली. त्यामुळे पुढे या स्थानाला ‘दक्षिण कैलास’ असे नाव पडले. भारताच्या उत्तरेकडे तिबेटमध्ये असलेला कैलास पर्वत आणि भारताच्या दक्षिणेकडे श्रीलंकेत असलेले तिरुकोनेश्‍वरम् मंदिर हे दोन्ही एका सरळ रेषेत आहेत. दोन्ही स्थाने पृथ्वीच्या ८१.३ डिग्री रेखांशावर आहेत.

तिरुकोनेश्‍वरम् मंदिराच्या बाहेर एका हरणाला खाऊ भरवतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
तिरुकोनेश्‍वरम् मंदिर आणि त्याच्या बाहेर असलेला शिवाचा पुतळा

 

तिरुकोनेश्‍वरम् मंदिराच्या बाहेर प्रार्थना मुद्रेत असलेला रावणाचा पुतळा

 

३. ‘उतारवयात आईला पूजा करता यावी’, यासाठी
घरात स्थापन करण्यासाठी रावण कोनेश्‍वराचेे शिवलिंग तलवारीने
कापून नेणार असतांना शिव तेथे प्रकट होणे, त्यामुळे रावणाची तलवार
हातातून कोनेश्‍वरम् टेकडीवर पडणे आणि त्या तलवारीने टेकडीचे दोन भाग होणे

असे म्हटले जाते, ‘लंकापती रावण प्रतिदिन तिरुकोनेश्‍वरम् मंदिरात शिवलिंगाची पूजा करत असे आणि ‘नुवारा एलिया’ प्रांतातील ‘लग्गला’ नावाच्या पर्वतावर बसून ध्यान लावत असे. त्याला त्या पर्वताच्या शिखरावरून १५० कि.मी. दूर असलेले तिरुकोनेश्‍वरम् टेकडीवर असलेले शिवलिंग दिसत असे.’ तिरुकोनेश्‍वरम् हे रावणाच्या आईचे माहेरगाव होते. रावणाची आई प्रतिदिन या शिवलिंगाची पूजा करत असे. पुढे वय आणि आजारपण यांमुळे ती मंदिरात पूजा करायला जाऊ शकत नव्हती. त्या वेळी रावणाच्या मनात आले, ‘आपण येथील शिवलिंग आईच्या घरात स्थापन करूया.’ शिवलिंग काढण्यासाठी रावण आपली तलवार काढतो. त्या क्षणी स्वयं शिव प्रकट होतो आणि रावणाच्या हातातील तलवार कोनेश्‍वरम् टेकडीवर पडते. रावणाच्या हातून पडलेल्या तलवारीमुळे टेकडीचे दोन भाग झाले असून आपण आजही ते पाहू शकतो.

 

४. पोर्तुगिजांनी येथील सर्व मंदिरे पाडणे, मंदिराच्या
पुजार्‍यांनी शिवलिंग अन् मंदिरातील मूर्ती गावातील एका
विहिरीत लपवणे आणि वर्ष १९५० मध्ये खोदकाम करतांना त्या
मूर्ती सापडल्यावर जगभरातील हिंदूंच्या साहाय्याने या मंदिराचे पुनर्निर्माण होणे

हे मंदिर एकेकाळी पुष्कळ मोठे होते. मंदिराच्या आत १ सहस्र खांब असलेला मंडप होता. मंदिराच्या आत भगवान विष्णूच्या ‘मत्स्य’ अवताराचे ‘मत्स्येश्‍वर’ नावाचे मंदिर होते. १३ व्या शतकात तमिळनाडूतून येथे आलेल्या ‘कुळकोट्टन्’ नावाच्या राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. वर्ष १६२४ मध्ये तिरुकोनेश्‍वरम् येथे आलेल्या पोर्तुगिजांनी येथील सर्व मंदिरे पाडली. आजही तिरुकोनेश्‍वरम् येथील समुद्राच्या खोल भागात मंदिराचे अवशेष सापडतात. मंदिराच्या पुजार्‍यांनी शिवलिंग आणि मंदिरातील मूर्ती गावातील एका विहिरीत लपवली होती. पुढे ३०० वर्षे तिरुकोनेश्‍वरम्पासून ३० कि.मी. दूर असलेल्या ‘तंपलगामम्’ गावात तिरुकोनेश्‍वरम्सारख्या शिवलिंगाची स्थापना करून तेथे पूजा चालू ठेवण्यात आली. वर्ष १६२४ ते वर्ष १९५० पर्यंत तिरुकोनेश्‍वरम् येथे मंदिर नव्हते. वर्ष १९५० मध्ये खोदकाम करतांना कोनेश्‍वर पर्वताच्या परिसरातील विहिरीत सर्व जुन्या मूर्ती सापडल्या आणि जगभरातील हिंदूंच्या साहाय्याने या मंदिराचे पुनर्निर्माण झाले.

 

५. मंदिराच्या बाहेर श्रीलंकेच्या सेनेचे आणि
नौकादलाचे केंद्र असणे अन् मंदिराच्या विश्‍वस्तांनी श्रीलंका
सेनेकडून विशेष अनुमती घेतल्याने साधकांना मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत जाता येणे

कोनेश्‍वर टेकडीच्या परिसरात पोर्तुगिजांंनी बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्याच्या परिसराच्या आत मंदिर आहे. मंदिर किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून २ कि.मी. अंतरावर आहे. मंदिराच्या बाहेर आणि संपूर्ण किल्ल्याच्या आत श्रीलंकेच्या सेनेचे आणि नौकादलाचे केंद्र आहे. धर्माभिमानी श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचे मित्र आणि तिरुकोनेश्‍वरम् मंदिराचे विश्‍वस्त श्री. अरुळ सुब्रह्मण्यम् यांनी गाडी घेऊन मंदिरापर्यंत जाण्यासाठी श्रीलंका सेनेकडून विशेष मोकळीक (अनुमती) घेतली होती. त्यामुळे आम्हा सर्वांना मंदिराच्या पायर्‍यांपर्यंत जाता आले.

 

६. मंदिराच्या बाहेर शिवाचा आणि प्रार्थना मुद्रेत
असलेला रावणाचा पुतळा अन् मंदिराच्या आत रावणाच्या
शिवभक्तीचे गुणगान करणारे देखावे मूर्तीरूपाने दाखवण्यात आलेले असणे

मंदिराच्या बाहेर सगळीकडे अनेक हरणे आहेत. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या हरणांना खाऊ दिला. तिरुकोनेश्‍वरम् मंदिराच्या बाहेर शिवाचा एक मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. मंदिराच्या बाहेर प्रार्थना मुद्रेत असलेला रावणाचा पुतळा आहे. मंदिराच्या आत रावणाच्या शिवभक्तीचे गुणगान करणारे देखावे भिंतींवर मूर्तीरूपाने दाखवण्यात आले आहेत.

 

७. या स्थानाची इतर वैशिष्ट्ये

अ. ‘द्वापरयुगातील महाभारताच्या काळात नाग, देव आणि यक्ष या शिवलिंगाची पूजा करायचे’, असा उल्लेख आढळतो.

आ. ‘योगसूत्रांचे जनक पतंजलि महर्षींचा जन्मही याच ठिकाणी झाला’, असे म्हटले जाते.

 

८. कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हा सर्वांना पंच ईश्‍वर क्षेत्रांपैकी एक असलेल्या तिरुकोनेश्‍वरम् मंदिराचे दर्शन झाले’, यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१८)

Leave a Comment