जळगाव येथे हिंदू संघटन कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग

राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना ईश्‍वरी अधिष्ठान आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

कार्यशाळेला उपस्थित धर्माभिमानी

जळगाव – राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना ईश्‍वरी अधिष्ठान आवश्यक आहे; म्हणून प्रत्येक धर्मप्रेमीने कार्य करतांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीच्या उद्देशाने साधना करायला हवी. साधना म्हणजे आनंदप्राप्तीसाठी सातत्याने करावयाचे प्रयत्न. अध्यात्मात कृतीला जास्त महत्त्व असल्याने ‘आपणासी जे जे ठावे । ते इतरांसि सांगावे ।’ या उक्तीप्रमाणे धर्मप्रसाराचे कार्य करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात खारीचा वाटा उचलायला हवा, असे मार्गदर्शन सनातनचे उत्तर महाराष्ट्र प्रसारसेवक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. या एकदिवसीय कार्यशाळेचा जळगावसह धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ३० धर्मप्रेमींनी लाभ घेतला.

 

स्वभावदोष निर्मूलन करून हिंदू संघटनासाठी
सिद्ध होऊया ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, रणरागिणी शाखा

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत असतांना आपल्यामध्ये असलेल्या स्वभावदोषांवर मात करून सद्गुणांची वृद्धी करून हिंदु संघटनासाठी सिद्ध होऊया, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले.

 

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा आमचा
घटनात्मक अधिकारच ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या स्वातंत्र्यानंतर २९ वर्षांनी संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसवून हा देश निधर्मी बनवण्यात आला. वर्तमान लोकशाही, शिक्षणव्यवस्था, निवडणूकपद्धत, प्रशासन, न्यायव्यवस्था या सर्व व्यवस्था इंग्रजाळलेल्या आहेत. स्वातंत्र्य मिळूनही या व्यवस्था आपण स्वतंत्र म्हणजे आपल्या तंत्रानुसार लागू करू शकलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करून प्रजेला इस्लामी आक्रमणांपासून मुक्त केले, त्याप्रमाणे आपल्यालाही आपल्या हक्काचे ‘हिंदु राष्ट्र’ घटनात्मक मार्गाने स्थापन करावयाचे आहे. हिंदु राष्ट्राची  मागणी करणे, त्या मागणीचा प्रसार करणे आणि ती मागणी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे हा भारताच्या संविधानाने आपल्याला दिलेला अधिकारच आहे. त्या अधिकाराचा आपण परिणामकारक वापर करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार येथील डॉ. नरेंद्र पाटील आणि समितीच्या धुळे येथील कु. रागेश्री देशपांडे यांनी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्र स्थापनेचा विषय समाजात पोहोचवणे, तसेच हिंदू संघटनाच्या दृष्टीने वर्तमानकाळात कोणते प्रभावी उपक्रम आपण सहजपणे राबवू शकतो, यांविषयी मार्गदर्शन केले.

नंदुरबार येथील धर्मप्रेमी श्री. पंकज राजपूत, धानोरा येथील श्री. मनोज पाटील, पाळधी येथील श्री. देवेंद्र चौधरी, सोनगीर येथील श्री. ललित माळी, डिकसाई येथील कु. पूनम चव्हाण यांनी समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेचा समारोप संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment